Islam Darshan

वर्तमानकाळातील अपराध : अपराधांची कारणे

Published : Saturday, Mar 05, 2016

 

 

 

अपराधांची बरीच कारणे आहेत. अपराधावर अंकुश लावण्यासाठी आपल्याला प्रथम त्यांच्या कारणांचा सुगावा घेणे आवश्यक आहे. कारण अपराधांप्रमाणेच त्यांची कारणेसुद्धा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांशी संबंधित असतात. यांची कारणमीमांसा केल्यावर हे स्पष्ट होते की, काही अपराधाची कारणे ही क्षणिक आणि काहीची स्थायी स्वरुपांची असतात. त्याचप्रमाणे काही अपराधांचा संबंध व्यक्तीशी तर काहींचा संबंध पूर्ण समुदायाशी असतो. अर्थातच काही अपराध व्यक्तीगत तर काही अपराध सामुदायिक स्वरूपांचे असतात. काही अपराधांचा संबंध सामान्यजणांशी तर काहीचा संबंध विशेष आणि जवाबदार व्यक्तींशी असतो. काही अपराध अज्ञानातून घडतात, तर काही अपराध ज्ञान आणि कायद्याच्या आधारांवर होतात. काही अपराधांच्या आधारांवर इतर बरेच अपराध घडतात, एकूण अपराधांची सीमा जेवढी जास्त आणि अमर्याद असेल, त्याच प्रमाणात त्यांची कारणेसुद्धा अमर्याद असतात. वस्तुस्थिती अशी की, कोणताही अपराधी एका विशिष्ट पार्श्वभूमीनुसार अपराध करतो आणि त्याचे कारण त्याच्या विशिष्ट परिस्थितीत लपलेले असते. जोपर्यंत यांची कारणमीमांसा करण्यात येणार नाही, तोपर्यंत त्याविषयी बोलता येणार नाही. आपण पुढे काही विशिष्ट कारणांची मीमांसा करणार आहोत.

आधुनिक विचार आणि सिद्धान्त

तसे पाहिल्यास मानव अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत अपराध आणि दुराचार होत आहेत. मात्र वर्तमानकाळात मानवाने जे सिद्धान्त आणि विचारधारा समोर आणली आहे, त्यामुळे पूर्ण मानवताच अपराधी वळणावर चालत आहे. अपराधी वृत्ती आता तिच्या अंगवळणीच लागली. धर्म, समाज, नैतिक मूल्ये आणि चारित्र्यासारख्या बाबी आता इतिहास जमा झाल्या आहेत. नवीन विचारसरणीच्या नावावर बिनबुडाचे सिद्धान्त मांडून चारित्र्याची आणि नीतिमूल्यांची सर्रास होळी करण्यात येत आहे. यात अपराधी विचारधारांना दिवसेंदिवस महत्त्व प्राप्त होत असून न्याय, सत्य व सदाचारांची मुळी किंमतच राहिली नाही. या ठिकाणी सविस्तरपणे चर्चा न करता आपण थोडक्यात अशा महत्त्वाच्या बाबींवर नजर टाकू या, ज्यांच्या बळावण्यामागे ‘आधुनिकता‘ नावाच्या या भुताटकीने कसा स्वैराचार माजविला आहे.

मागील काळात अज्ञान आणि अशिक्षितपणा, अंधश्रद्धा आणि मार्गभ्रष्टतेचे भयंकर जाळे असूनसुद्धा त्या काळात समाजात एका वरिष्ठवर्गाची कल्पना होती आणि समाजावर या वर्गाची पकड होती. शिवाय इतर सर्वच त्यांच्यासमोर मान तुकवित होते. आपल्या कृत्यांचा, कर्मांचा त्यांच्यासमोर जाब देण्याची वृत्ती अगर जाणीव लोकांमध्ये होती. मात्र या आधुनिक काळातील आधुनिक विचारसरणीमुळे मानवाच्या अंतःकरणातून ईश्वराची, देवधर्माची कल्पनाच लुप्त झाली. अर्थाच धर्माची बंधने तुटली, नैतिकता नष्ट पावली आणि मानव हा स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचारी बनला. ज्याअर्थी ईश्वराचीच कल्पना नसेल तर भय कोणाचे आणि पाप-पुण्याचा जाब द्यायचा कोणासमोर? अशी एक विचारधारा लोकांत व विशेषतः नवीन पिढीमध्ये रुजली.

ईश्वराच्या, देवधर्माच्या कल्पनेनंतर दुराचारापासून मानवास परावृत्त ठेवणारी शक्ती म्हणजे माणसाचे अंतःकरण होय. त्याचे अंतःकरण नेहमीच पापी, अन्यायी व अत्याचारी वर्तनामुळे त्यास धिक्कारत असते. एखादे पाप घडले, एखाद्यावर अन्याय वा अत्याचार केला अगर एखादा गुन्हा घडला तर माणसास मानव-स्वभावामुळे पश्चात्ताप होतो आणि मन धिक्कारत असते. मात्र आधुनिक विचारधारणेने त्याच्या अंतःकरणालाच अपराधी आणि पापी बनविले आहे. माणुस आधुनिकतेमुळे अगदी भावनाशून्य झाला आहे, असे ‘प्रइड‘ या मानसशास्त्रज्ञानेसुद्धा म्हटले आहे. त्याने म्हटले आहे की, स्वाभाविक भावना जेव्हा चिरडण्यात येतात, स्वार्थपूर्तीसाठी भावनांवर दबाव टाकण्यात येतो आणि बाह्य शक्तींच्या आक्रमणांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मनावर ताबा ठेवण्याच्या नावावर अन्यायपूर्वक दबाव टाकण्यात येतो, तेव्हा मानवाची वृत्ती अतिविचित्र होऊन बसते.

हे झाले मानवी अंतःकरण यानंतर समाज माणसाला दुराचारापासून आणि अन्याय व अत्याचारांपासून परावृत्त ठेवत असतो. या बाबतीत ‘प्राइड‘ याने असे लिहिले की, समाज आणि समाजाच्या रूढी व परंपरांमुळेसुद्धा मानव अपराधीवृत्ती वा इतरांवर अन्याय व अत्याचार करण्याचे धाडस करीत नाही. ईश्वर झाला, देवधर्म झाला, अंतःकरण झाले, समाज झाला. आता उरला फक्त कायदा जो अपराधांवर अंकुश ठेवतो. या बाबतीतसुद्धा आधुनिक विचारसरणीने गरळ ओकली आहे. या आधुनिक विचारसरणीने म्हटले की, गुन्हेगार हा शिक्षेस नव्हे तर सहानुभूतीस पात्र असतो. कारण गुन्हेगार गुन्हा करीत नाही, तर परिस्थितीला बळी पडून तो गुन्हा करतो. तेव्हा शिक्षा द्यायची असेल तर त्या समाजास द्या, ज्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आणि त्या भल्या माणसास ना-ना परंपराच्या ज्या अमानुश बंधनात जखडले असेल त्या निष्ठूर परंपरांना फाशी द्या. अर्थातच अशा या विचारसरणीमुळे गुन्हेगारीस आळा बसण्याऐवजी उलट खतपाणी मिळत आहे. अपराध्यांची पाठ थोपटून त्यांना परत गुन्हा करण्यासाठी उभे करण्याचाच हा विलक्षण प्रकार होय.

आर्थिककारणे

पैशाचे महत्त्व कोणाला बरे माहीत नाही? सर्वांनाच याची नितांत आवश्यकता आहे. आजच्या काळात तर सर्वांत जास्त पैशांलाच महत्त्व आहे. आज पैशांच्याच आधारावर जीवनाचे अस्तित्व टिकलेले आहे. काहीजण आर्थिक माध्यमांवर जास्तीतजास्त ताबा मिळवू इच्छितात, तर दुसरीकडे अशी अवस्था आहे की, सामान्यजणांना जीवनाचा गाडा कसाबसा रेटण्यासाठी दोन पैशे मिळविण्याकरिता जिवाचे रान करावे लागत आहे. अशा या अवस्थेत अपराध घडत असताना त्याचे तीन पैलू स्पष्ट होतात. प्रथम आर्थिक दारिद्र्य, द्वितीय आर्थिक विषमता आणि तृतीय म्हणजे अर्थार्जनासाठी होत असलेली जीवघेणी स्पर्धा. या तीन पैलूंवर आपण जरा सविस्तरपणे चर्चा करु या.

आर्थिक दारिद्र्य

लोकांमध्ये असलेले अठराविश्वे दारिद्र्य म्हणजेच पाचवीला पुजलेली साडेसाती, आणि हीच साडेसाती बर्याच अपराधांची जननी आहे, असे म्हटले तर मुळीच वावगे ठरणार नाही. या जननीने असंख्य अपराधांना डुकराच्या गलिच्छ पिल्लांप्रमाणे जन्म दिला. शिवाय या अपराधांच्या आणखीन तीन शाखा निघतात. एवढेच नव्हे तर हे आरिष्ट इतके भयानक आणि रौद्र स्वरुपाचे आहे की, यामुळे मोठमोठे त्यागी पुरुष आणि महात्मे व धर्मात्मेसुद्धा खचून जाऊन निधर्माच्या आणि सत्य-द्रोहाच्या मार्गी लागून तसेच वाममार्गाची वाट धरून आपल्या ईशपरायणता आणि संयम व धैर्याची नग्न धिंड काढतात. कारणही तेवढेच गंभीर आहे. गरिबीने त्रस्त होऊन आणि दारिद्र्याने विवश होऊन माणूस मोठमोठे अपराध करतो आणि कधीकधी आपली ईमानदारी आणि श्रद्धासुद्धा विकतो, असे प्रेषित मुहम्मद (स) यांनीसुद्धा म्हटले आहे. आधुनिकतेचा जोरजोराने डंका वाजत असलेल्या या वर्तमान विज्ञानयुगात वेठबिगारी, आपसातील तंटे-बखेडे, चोर्या-डकाईती, वाटमारी हुंड्याची मागणी, लाचलुचपत, घोटाळे, भ्रष्टाचार, मटका-सटका, दारू व मद्यविक्री, देहव्यापार, आत्महत्या, रक्तपात रोगराई वगैरेसारखे भयानक अपराध याच गरिबीची ऊग्र आणि किळसवाणी अवलाद होय.

जगातील लोकसंख्येचा महत्तम भाग गरिबी आणि दारिद्र्यास बळी पडलेला. एवढेच नव्हे तर परिस्थिती इतकी बिकट आहे की, आज असंख्य लोक जीवनाच्या मूलभूत गरजांपासूनच वंचित आहेत. दुर्दैव एवढ्यावरही थांबत नाही, तर युद्ध आणि महायुद्ध तसेच नैसर्गिक आपत्तींनी यांच्यावर आणखीनच क्रूर प्रहार केला आहे. जागतिक बँकेच्या एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे की, आजच्या या चंगळवादी काळामध्ये आणि मंगळावर स्वारी करण्याच्या ज्ञान-विज्ञान व संशोधनाच्या काळामध्ये, पंचतारांकित हॉटेल्समध्ये मौज करण्याच्या काळामध्ये, डान्स बारमध्ये बारबालांवर कोट्यवधी रुपये उधळणार्यांच्या काळांमध्ये दररोज ७५ कोटी स्त्री, पुरुष आणि निष्पाप मुले उपाशीपोटी असतात व यांपैकी निम्मेजण दारिद्र्यरेषेच्या अगदी खालच्या पातळीपेक्षाही खाली जीवन कंठित आहेत. सर्वेक्षण अहवालात म्हटले गेले आहे की, जगामध्ये जीवनावश्यक वस्तुंची रेलचेल असूनही पोटाची आग शमविण्यासाठी लोकांना जीवघेना संघर्ष करावा लागत आहे.

विषमता

एकीकडे दारिद्र्याची क्रूर कहाणी तर दुसरीकडे मात्र श्रीमंतीचा माज. या वर्तमान जगात अधिकतम संख्या गरिबांची आहे, मात्र अशा लोकांचीही कमतरता नाही की, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आणि संपत्तीची रेलचेल आहे. याच पैशाच्या बळावर ते शासन आणि सत्तेला आपल्या बोटांवर खेळवितात, याच पांढर्या आणि काळ्या धनाच्या जोरावर तो इतरांच्या हातापायांत आर्थिक गुलामींच्या बेड्या घालतात. याच विषम परिस्थितीची करणी आहे की आज गरीब आणि श्रीमंतामध्ये संघर्ष उफाळलेला आहे. याच संघर्षाचा परिणाम विभिन्न अपराधी कर्मांच्या स्वरुपात समोर येत असतो. श्रीमंतवर्ग गरिबांच्या विवशतेचा पूर्ण लाभ घेऊन त्यांचे सर्वतोपरी शोषण करीत असतो. शिवाय आपल्या असुरी आणि अघोरी स्वैर कामनांच्या पूर्ततेसाठी अत्यंत निर्दयीपणे पैशांची उधळपट्टी करतो, तर दुसरीकडे गरिबांना दिवसाकाठी एकवेळची पोटाची खळगी भरण्यासाठी दुर्गंधीयुक्त कचर्याच्या ढिगारांतून सडके अन्न खावे लागते. श्रीमंतांच्या कुत्र्यांसाठी जे स्नानगृह असते आणि झोपायला प्रशस्त बेडरूम, खायला बिस्किटे आणि बागडायला जे प्रशस्त हिरवे लॉन असते, त्यासाठी येणार्या खर्चात लक्षावधी गरिबांच्या मुलांचा अन्न व औषधावाचून होणारा मृत्यू टाळता येऊ शकतो. अर्थातच,
‘मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार!‘
कवितेच्या या ओळीप्रमाणे मानवजातीची सध्या अवस्था झाली आहे. मात्र याच विषम परिस्थितीमुळे गरिबांच्या मनात श्रीमंतांविषयी क्षोभाची आणि सुडाची आग खदखदत असते, असंतोष धुमसत असतो, या क्षोभ, असंतोष आणि द्वेशातूनच वैफल्याची भावना निर्माण होते आणि ना-ना प्रकारे नैतिक वा सामाजिक अपराध घडत असतात.

स्पर्धा

हेवा, क्षोभ आणि द्वेश व मत्सर हा केवळ गरीबवर्गातच नव्हे तर यापेक्षाही जास्त श्रीमंतांत असतो. जास्तीतजास्त संपत्ती आपल्या ताब्यात घेण्याच्या पिसाळ भावनेस बळी पडून श्रीमंतांमध्येच अगदी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक श्रीमंत दुसर्या श्रीमंतास आपल्यापेक्षा हीन आणि तुच्छ ठरविण्याचा अटापिटा करीत आहे. यासाठी प्रत्येक प्रकारच्या वैध-अवैध आणि अघोरी नीतींचा व पद्धतींचा सर्रास वापर करण्यात येत आहे. इतरांपेक्षा आपल्याजवळ जास्त संपत्ती असावी आणि हे साध्य करण्यासाठी कोणत्याही आणि कितीही खालच्या पातळीपर्यंत जाण्याची मानसिकता आज श्रीमंतांमध्ये फोफावली आहे. आपल्या स्पर्धकास पराभूत करण्यासाठी श्रीमंतांमध्ये आज जीवघेणा संघर्ष सुरु आहे. एवढेच नव्हे तर आपल्या स्पधर्काचा काटाच काढून टाकण्याच्या असंख्य घटना घडत असतात. पैशांच्या बळांवर राजकीय प्रभाव प्राप्त करण्यात येतो, व याच्या आधारेच मोठ्या प्रमाणात घपले-घोटाळे आणि विविध अपराध घडतात. एकूणरित्या आर्थिक विषमता आणि स्पर्धेमुळे असंख्य अपराध घडत असतात.

धार्मिक आणि नैतिक कारणे

या बाबतीत प्रामुख्याने चार गोष्टी उल्लेखनीय आहेत. प्रथम भौतिकवाद, द्वितीय नैतिक मूल्यांचा र्हास, तृतीय अश्लीलता व व्यभिचार आणि चतुर्थ मादक पदार्थांचा वापर. पुढे याच चार विशेष बाबींवर सविस्तर चर्चा करू या.

भौतिकवाद

धर्म कशासाठी आहे? तर याचे सरळ आणि सडेतोर उत्तर असे की, धर्म हा मानवकल्याण, आत्मशुद्धी आणि नैतिकतेसाठी आहे. यामुळे समाजात नैतिक मूल्ये वाढीस लागतात आणि जर प्रामाणिकपणे याचा अंगिकार केला तर समाजातून अन्याय आणि अपराधांचे समूळ उच्चाटन होऊ शकते. नसता मानवांमध्ये भौतिकवाद अगर चंगळवाद निर्माण होऊन त्याच्या जीवनाचा उद्देश केवळ वैध-अवैध मार्गाने पैसाच कमाविणे एवढाच शिल्लक उरतो आणि मग तो नैतिक मूल्यांना व्यावहारिक जीवनातून हद्दपार करतो. यानंतर त्याच्यात अघोरी भावना आणि स्वैर कामनांची अतिरेकी प्रवृत्ती बळावते. या अघोरी भावना, स्वैर कामना व अभिलाषांच्या देवतेस प्रसन्न करण्यासाठी वाटेल ते करतो. पाहिजे त्या गोष्टीचा बळी देतो. वर्तमान परिस्थितीत याच दयनीय अवस्थेला माणूस बळी पडला आहे. अशा परिस्थितीला साम्यवाद आणि पाश्चात्य संस्कृतीने मनसोक्त खतपाणी घातले. याची अनुभूती या सिद्धान्ताच्या कैवारी आणि खंदे समर्थक असलेल्या देशांमध्ये घडणार्या अपराधी घटना पाहिल्यावरून येते. आज या भौतिकवादामुळे मानवता नष्टतेच्या क्रूर जबड्यात जखडलेली आहे. माणसाने धर्माची बंधने तर तोडून टाकली मात्र याच्या भयानक परिणामांची जवाबदारी घ्यायला कोणीही पुढे धजावत नाही. तरीसुद्धा एवढे मात्र निश्चित की डोळे बंद केल्याने सत्य लपत नसते आणि हेच सत्य उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे धाडस करावेच लागेल. घोर अपराधांच्या भयानक स्वरुपात आज हे सत्य आपल्यासमोर आ वासून उभे आहे, ते नाकारणे शक्य नाही.

नैतिक मूल्यांचा र्हास

हा भौतिकवादाचा परिणामच म्हणावा लागेल की, आज नैतिक मूल्यांचा र्हास होत असताना आपल्याला सर्वत्र दिसत आहे. वर्तमानकाळात ही अवस्था किती विदारक आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. स्नेह, त्याग, प्रेम, ममत्व आणि दया व मायेच्या ठिकाणांवर स्वार्थ, अप्पलपोटेपणा, वैरभाव व निष्ठूरतांसारख्या विद्रूप भावनांनी अतिक्रमण केले आहे, माणसा-माणसांतील नैतिक संबंधांची बंधने तुटत आहेत, रक्ताच्या नात्यांत दुही निर्माण झाली आहे, पारिवारिक आणि सामाजिक मूल्ये विखुरली आहेत, बंधुभाव नष्ट होऊन त्या ठिकाणी द्वेश, मत्सर आणि वैर निर्माण झाले आहे, कालचा जीवाभावाचा मित्र आज वैरी झाला आहे. संपूर्ण वातावरणच दूषित झाले आहे. ज्या समाजाची ही अवस्था असेल, त्या समाजात कशा प्रकारची मूल्ये वाढीस लागतील, याची कल्पना करणे अशक्य नाही. अशा समाजात मुलगाच बापाचा गळा चिरून टाकील, पोटच्या मुलीशी व्यभिचार करण्यात पित्याला लाज वाटणार नाही, घपले-घोटाळे, लूटमार, रक्तपात, चोर्या-मार्या, व्यभिचार आणि अशा स्वरुपांचे सगळेच अपराध सहजच होतील, जे आज होत आहेत.

अश्लीलता आणि व्यभिचार

माणूस जेव्हा धर्मद्वेष्टा होतो, नैतिक मर्यादांची बंधने झुगारून देतो, नीतिमत्ता ठोकरून लावतो, तेव्हा तो माणूस राहत नसून माणसाच्या रूपात एक भयानक श्वापद होतो. मग तो आपल्या शरीरावरील शिष्टाचाराचा पोषाख काढून टाकतो, त्याच्यातून लाज-लज्जा आणि शरम निघून जाते. त्याच्या मनातून ईश्वराची आणि समाजाची धाक निघून जाते आणि तो शिष्टाचार आणि चारित्र्याची होळी करून अश्लीलतेचा नग्न शिमगा अगदी निर्लज्जपणे खेळतो. मनगटावर चुना लावून बोंबलत असतो की, पाहा! मी कशा स्वरुपाचा माणूस आहे. स्वैराचार हा माझा जन्मसिद्ध हक्क असून माझ्यावर कसलेच बंधन नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाश्चात्य संस्कृतीतील शिगेला पोचलेली अश्लीलता आणि व्यभिचार होय. या संस्कृतीने सर्वांच्याच शरीरावरून कपडे हिसकावून, ओरबडून सर्वांनाच नग्न करून सोडले. त्यातल्यात्यात अश्लील साहित्य, चित्रपट सृष्टी आणि टी.व्ही.च्या प्रसारमाध्यमांनी व्यभिचाराच्या धगधगत्या ज्वालांत भरपूर तेल ओतले आणि यामुळे हा वणवा इतका भडकला की, या भीषण आगीत केवळ प्रौढ स्त्री-पुरुषांचीच नव्हे तर अल्पवयीन मुला-मुलींचीसुद्धा राखरांगोळी झाली. याच कारणांमुळे त्यांच्यात लैंगिक व्यभिचार आणि अपराधी वृत्ती बेशरमाच्या झाडासारखी सुसाटपणे फोफावली आहे.

मादक पदार्थांचा वापर

अपराधी कर्म घडविण्यामध्ये मादक पदार्थांचासुद्धा मोलाचा वाटा आहे. शिवाय मादक पदार्थांचे सेवन करणेसुद्धा एक घोर अपराध तर आहेच मात्र यातून आणखीन बरेच अपराध जन्म घेतात. बर्याच वेळा यामुळे बलात्कार आणि हत्यासारखे अपराधही घडतात. यांच्या सेवनामुळे माणसाचे आरोग्य, विचारबुद्धी आणि नैतिकता तळास जाते.

मादक पदार्थांचा वापर स्त्रिया आणि मुलांमध्ये सर्रासपणे होत असल्यानेसुद्धा अपराधांचा आलेख शिगेला पोचला आहे. एका सर्वेक्षणाच्या धक्कादायक अहवालानुसार, जगातील ४० टक्के महिला तंबाखूचे सेवन करतात.(संदर्भ : कौमी आवाज, १० एप्रिल १९९५) चीनमध्ये असा माणूस शोधूनही सापडत नाही, ज्याच्या हाती सिगारेट नसेल. एवढेच नव्हे तर दहा-दहा वर्षांची मुले सिगारेट घेण्यासाठी आपल्या चॉकलेटची पाकिटे विकतात.(संदर्भ : कौमी आवाज, १ ऑगस्ट १९९५) या सर्वच परिस्थितीला पाहता हा अनुमान लावता येतो की, जगात मादक द्रव्यांचा वापर करणारे किती मोठ्या संख्येत आहेत आणि याचे किती भयानक परिणाम भोगावे लागत लागतात.

सामाजिककारणे

याविषयी चर्चा करण्यापूर्वी आपण दोन भागांत चर्चा करण्याचे ठरवू या. प्रथम शहरी वा नागरी जीवन आणि द्वितीय म्हणजे सामाजिक मूल्यांचा र्हास.

शहरी जीवन

अपराधांचा आलेख उंचावण्यात नागरी अथवा शहरी भागाचासुद्धा मोठा वाटा आहे. ‘नॅशनल क्राइम ब्यूरो‘ च्या एका अहवालानुसार स्पष्ट करण्यात आले की, लहान शहरे आणि ग्रामीण भागाच्या तुलनेत मोठमोठ्या शहरांमध्ये चार पटीने जास्त गुन्हे घडतात. कारण शहरी भागांत अपराध घडण्यासाठी भरपूर संधी असते. एवढेच नव्हे तर काहीजणांचे पोटपाणी अपराधी कांडावरच चालते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी ग्रामीण भागातून शहराकडे येणारा सुशिक्षित आणि अशिक्षित बेरोजगारांचा लोंढा शहरी संस्कृतीने प्रभावित होतो आणि शहरी जीवन जगण्याच्या लालसेपोटी चोरी, डकाईती, चोरटा व्यापार, दहशतवादी कारवाया आणि हत्या व लूटमार करण्याचा मार्ग अवलंबतो.

काही शहरांत अथवा महानगरांच्या ठिकाणी विशेष प्रकारचे अपराध घडतात. उदाहरणार्थ, दिल्लीमध्ये खून, अपहरण व बलात्कार आणि धोका देणे तसेच शस्त्रांचा अवैध व्यापार, मुंबईत डकाईती, लूटमार, चोरी, सट्टा, दहशतवादी कारवाया, तसेच भारतीय पासपोर्टच्या कायद्यांचे उल्लंघन, बेंगलोरमध्ये नकली नोटांचा धंदा, हुंडा मागणी आणि खून करणे, चेन्नईमध्ये देहव्यापार, चित्रपट सृष्टीच्या नावावर नग्न आणि अश्लील चित्रपटांची निर्मिती, जयपूरमध्ये मादक पदार्थांचा व्यापार इतर शहरांच्या तुलनेत जास्त प्रमाणात होत असतो.

सामाजिक मूल्यांचा र्हास

शहरांमध्ये दिवसेंदिवस फोफावणार्या अपराधांचे आणखीन एक कारण आहे आणि ते म्हणजे तेथे सामाजिक मूल्यांचा र्हास, जो जवळपास झालाच आहे. आपसातील संबंध आणि सहकार्य, तसेच पारिवारिक व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. स्नेह, बंधुभाव आणि ममत्व पार हरवून गेले व त्या ठिकाणी स्वार्थ, वैरभाव आणि दुरावा निर्माण झाला आहे. यामागे काही आर्थिक आणि सांस्कृतिक कारणेसुद्धा आहेत. मात्र अपराध घडण्यामागे वर उल्लेखलेली परिस्थितीच जास्त प्रमाणात जबाबदार आहे.(संदर्भ : कौमी आवाज, १४ ऑगस्ट १९९५)

राजकीय आणि वैधानिक कारणे

या मथळ्याचेही आपण दोन भाग करु या. प्रथम राजकीय अपराध आणि द्वितीय पोलिसांची अरेरावी.

राजकारणातील अपराध

मागे आपण पाहिलेच आहे की, आजकाल राजकारण हे अपराधी वृत्तींच्याच हातातले बाहुले बनले आहे. शिवाय अशी परिस्थितीसुद्धा आहे की, राजकारणाच्या खंबीर पाठिंब्याशिवाय अपराध घडत नाहीत. अपराधांच्या आधारावर राजकारण चालते की, राजकारणाच्या पाठिंब्यावर अपराध घडतात, हा एक संशोधनाचा विषय होय. काही असो, एवढे मात्र निश्चित की आज सगळे राजकारण अपराधी वृत्तीने ढवळून निघाले आहे. मोठा अपराध करायचा असेल आणि कोणतेही श्रम न करता प्रचंड संपत्ती मिळवायची असेल तर राजकारणात एंट्री मारावीच लागते. कारण राजकारण्यांची कॉलर पकडण्यासाठी सहसा पोलिसही धजावत नाही. शिवाय बेकायदेशीर सरकारी संरक्षण त्यास मिळते. म्हणूनच गुन्हेगारी जगातील मोठमोठे गुन्हेगार राजकारणाकडे वळले. लोकांना दमदाटी करून, दहशतीचा मार्ग अवलंबून आणि वेळ पडल्यास पोलिंग बूथ कॅप्चर करून गुंड आणि अपराध्यांनी मस्तपैकी राजकारणात एंट्री मारली आणि मोठमोठे अपराध करायला मोकळे झाले. एका सर्वेक्षणाचा अहवाल असा आहे की, आपल्या भारत देशात ३८ टक्के राजकारणी गुन्हेगार आहेत.(संदर्भ : टाइम्स ऑफ इंडिया, ३१ जानेवारी १९९९, पृष्ठ क्र.१३)

पोलिस पेशातील गुन्हेगारी

चांगल्या माणसाने कधीच पोलिस स्टेशनची पायरी चढू नये, असे म्हटले जाते, ते बरोबरच आहे. पोलिस खात्यातील मोठमोठ्या अधिकार्यांना अपराधी घटकांची माहिती असूनसुद्धा ते सर्रासपणे डोळेझाक करतात. कधीकधी स्वार्थापोटी आणि राजकीय दबावापोटीसुद्धा पोलिस अपराध्यांच्या गंभीर अपराधांवर स्वतःच पडदा टाकतात. बर्याच वेळा गुन्हेगारांना सोडून निरपराधांनाच पोलिसी दंडुकेशाही बळीचा बकरा बनवित असते.(संदर्भ : टाइम्स ऑफ इंडिया, २१ जून १९९९, पृष्ठ क्र. १९)

पोलिसांच्या अशा वर्तनामुळे अपराध्यांचे चांगलेच फावते. शिवाय गुन्हा नसताना शिक्षा भोगणार्यांमध्ये अपराधी भावना निर्माण होते. पोलिसांकडून अपराधांचा नायनाट करण्यात बरेच अडथळेसुद्धा आहेत. उदाहरणार्थ, त्यांना योग्य प्रशिक्षण आणि शस्त्रे वेळेवर उपलब्ध होत नाही. शिवाय महत्त्वाचा हा मुद्दासुद्धा आहे की, पोलिस खात्यामध्ये त्यांना पगार इतका कमी असतो की, लाचलुचपत, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारांशी हप्ते वसुली करणे त्यांना भाग पडते. एका सर्वेक्षणानुसार २४ टक्के पोलिसवाले काळे धंदे करण्यात सामील आहेत.(संदर्भ : टाइम्स ऑफ इंडिया ३१ जानेवारी १९९९)

मानसिककारणे

या विषयावर चर्चा करताना आपण तीन बाबीं हताळू या.

अशांत मानसिकता

आजच्या काळातील आर्थिक आणि सामाजिक विषमता, मानसिक, आर्थिक व लैंगिक शोषण, धर्मद्वेष, भौतिकवाद, चंगळवाद, अश्लीलता आणि व्यभिचाराचा प्रादुर्भाव, दारू आणि मादक पदार्थांचे सेवन आणि यासारख्या ना-ना मानसिक व्याधींनी ग्रस्त होऊन माणूस पार वैफल्यग्रस्त झाला. त्याला कोठेच शांती आणि समाधान लाभत नाही. अशा विचित्र परिस्थितीत त्याचे सांत्वन करणारादेखील कोणी उरलेला नाही. मुले आई-बाबांच्या प्रेमापासून वंचित, वृद्ध माता-पिता आपल्या मुलांच्या सहार्यापासून दुरावलेले, बहीण-भावातील प्रेम आणि सहानुभूती करपून नष्ट झालेली, कुटुंबातील स्नेह होरपळलेला, समाजात दुही पसरलेली आणि अवघे वातावरणच दूषित झालेले असल्याने ना-ना मानसिक तणावाखाली तो वावरत आहे. अशाच वैफल्यग्रस्त मानसिकतेमुळे आज माणूस अपराधी मार्गाकडे वळला.

प्रदूषण

दुसरीकडे प्रदूषणामुळे दूषित झालेल्या वातावरणाचा माणसाच्या आरोग्य आणि मनमस्तिष्कावर विपरित परिणाम होत आहे. ‘जागतिक प्रदूषण समिती‘तर्फे काही मोठमोठ्या शहरात घेण्यात आलेल्या सर्पेक्षणात ही माहिती समोर आली की, कर्कश आवाजाच्या प्रदूषणाने दैनंदिन जीवनातील कामकाजात लोकांची एकाग्रता नष्ट होत आहे. ताण-तणावामुळे विभिन्न अपराध घडतात.(संदर्भ : कौमी आवाज, २५ एप्रिल १९९५)

मानसिक तणाव

बर्याचवेळा मानसिक तणावास बळी पडून माणूस अपराधांकडे वळतो. उदाहरणार्थ, रशियातील एका माणसाने लैंगिक तृष्णा भागविता आली नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन ५३ तरूणीं आणि तरुणांची निर्घृण हत्या केली. अशी बरीच उदाहरणे अख्या जगात सापडतात.
विज्ञान वसंशोधनाचा गैरवापर

तसे पाहता विज्ञान व संशोधन हे माणसाच्या भल्याकरिता आहे. मात्र याचा सदुपयोग करण्याऐवजी दुरुपयोगच जास्त होताना दिसतो. उदाहरणार्थ, ‘अल्ट्रा साउंड‘च्या माध्यमाने गरोदर आईच्या पोटातील मुलाची शारीरिक परिस्थिती हाताळण्यात येऊ शकते. मात्र दुर्दैव असे की, हा याचा उपयोग नव्हे तर तो दुरुपयोग गर्भातील मुलांची लिंगचाचणी करण्यासाठी आणि भ्रूणहत्यासारखे पातककर्म करण्यासाठी होत आहे. शिवाय कितीही कडक कायदा करूनसुद्धा या अपराधावर आळा घालण्यात शासनाला यश मिळाले नाही. आणखीन दुर्दैव असे की, मागील पाच वर्षांत यामध्ये सतत वाढ होत आहे. ‘भारतीय मेडिकल कौंसिल‘ च्या सर्वेक्षणानुसार, देशामध्ये कायदेशीर गर्भपातापेक्षा बेकायदेशीर गर्भपाताची संख्या पाचपटीने जास्त आहे. यामध्येसुद्धा लैंगिक चाचणी केल्यावर होणार्या भ्रूणहत्येचे प्रमाण प्रचंड आहे.

याचप्रमाणे वर्तमानपत्र, रेडिओ व टेलिव्हिजनसारख्या प्रसारमाध्यमांची अवस्थासुद्धा अत्यंत शोचनीय आहे. यामुळे असंख्य गुन्हे आणि अपराध घडत आहेत. या प्रसारमाध्यमांचा नको तसा सर्रास वापर करण्यात येत आहे. नको ते दाखवून लोकांच्या आधीच धगधगत असलेल्या भावनांत तेल ओतून त्या उत्तेजित करण्यात येत आहे. अपराधी घटना घडण्यासाठी आवश्यक मसाला असलेल्या बातम्या आणि सोबत पितपत्रकारितेमुळे सर्वत्र अरेरावी माजली आहे.

माहिती तंत्रज्ञान(Information Technology)विकसित झाल्यापासून या अत्यंत उपयुक्त संशोधनाचा सर्रास गैरवापर होत आहे. गुन्हेगारी दिवसेंदिवस अवाक्याबाहेर जात आहे.

काही संशोधनाचा वापर मानवविनाशाकरिता करण्याचे मनसुबे अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार झाले. मानवविनाशक शस्त्रास्त्रे, अणुशक्ती, जैविक व अण्वस्त्रे व अणुबॉम्ब्स् वगैरेंमुळे मानवाला लाभ होण्यापेक्षा भयंकर विनाशच आ वासून उभा आहे. याच शस्त्रशक्तीच्या बळावर काही शक्तीशाली आणि प्रगत देशांनी इतर कमकुवत देशांना सळो की पळो करून सोडले आणि जगात ‘मोठ्याचा आला गाडा, गरिबाचे झोपडे मोडा‘ अशी अवस्था झाली आहे. एवढेच नव्हे तर यासारख्या विघातक शस्त्रांच्या बिनडोक वापरामुळे पिढ्यान्-पिढ्या नष्ट करण्यात येत आहेत. आज समस्त मानवजात दारूगोळ्याच्या ढिगार्यावर उभी आहे. कोण कधी याला काडी लावील आणि कधी या जगाचा स्फोट होईल, याचा काही नेम नाही.

तात्पर्य

या ठिकाणी अपराधी घटनांच्या काही महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा करून एक ढोबळ वेध घेण्यात आला आहे. अन्यथा या शिवाय आणखीन बरेच पैलू आपल्याला दिसतील आणि बरीच कारणे व सबबी लक्षात येतील. काही कारणे सध्या रूढ झालेल्या संस्कृतीतून निर्माण होतात, तर काही व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर तर काही लोकशाहीच्या गर्भातून आणि काही आर्थिक, मानसिक व लैंगिक कारणास्तव अपराध घडतात. एवढेच नव्हे तर काही अपराध आणखीन बर्याच अपराधांना जन्म देतात.

 

संबंधित लेख

  • इस्लामचा चौथा आधारस्तंभ सौम (रोजा) - उपवास

    सौम अथवा सियाम याचा अर्थ होतो आराम करणे. मनुष्य उपवासाच्या कालावधीत खाणे, पिणे आणि समागम करणे यास पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत आराम देतो. रोजाची वैशिष्ट्ये: कुरआनने रोजाविषयीचे अनेक फायदे आणि लाभदायक गोष्टी वर्णन केलेल्या आहेत. त्यातील काही मौलिक महत्त्वाच्या आहेत. रोजाचे महत्त्व समजण्यासाठी त्याची सुधारणात्मक वैशिष्ट्ये पाहणे आवश्यक आहे.
  • सत्याच्या रुपात असत्य

    मनुष्य उघड अनाचार व स्पष्ट कुकृत्याकडे फार कमी आकृष्ट होतो. ईश्वराने मानवाला दिलेल्या उत्तम शारिरीक रचना व योग्यता या अद्भुत चमत्कारांपैकीच हा एक चमत्कार आहे. याच कारणाने अव्यवस्था आणि दुराचाराला कोणत्या ना कोणत्या प्रकारे सदाचार आणि चांगुलपणाचे फसवे वस्त्र घालून माणसापुढे प्रस्तुत करण्याकरिता सैतान नेहमीच विवश होत असतो. स्वर्गात आदम (अ) यांना, ‘‘मी तुमच्याकडून ईश्वराची अवज्ञा करवू इच्छितो, की ज्यामुळे तुम्ही स्वर्गाबाहेर काढले जाल.’’ असे सांगून सैतान कदापि धोका देऊ शकत नव्हता. त्याऐवजी त्याने हे सांगून धोका दिला.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]