Islam Darshan

इस्लाम व कम्युनिझम

Published : Wednesday, Mar 02, 2016

निस्संशय इस्लाम जीवनातील सर्व प्रकारच्या चांगुलपणाचा, सद्गुणांचा संयोग तसेच निकोप जीवनमूल्यांचे नाव आहे. हा एक शाश्वत धर्म असून मानवी पिढ्यांच्या सुधारणेसाठी कायदा पद्धत आहे. गेली चार शतके इस्लामी समाज ज्या प्रकारच्या कठीण तणावात व असंतोषात गुरफटलेला आहे. त्यामुळे आर्थिक समस्यांशी निगडित असलेला इस्लामी कायद्याचा भाग तुंबला गेला आहे व स्थगित झाल्यासारखा आहे; तसेच आपले निरंतर विकास कार्य पुढे चालू ठेवू शकत नाही. म्हणून आपल्या आध्यात्मिक व वैचारिक शुद्धीकरणासाठी इस्लामी श्रद्धेचा अवलंब करुन आर्थिक समस्या सोडविण्यासाठी कम्युनिझमला मार्गंदर्शक बनवून घ्यावे हेच अधिक चांगले नाही काय? कारण असे केल्याने आमच्या आर्थिक अडचणीही दूर होतील व आमच्या सामाजिक व्यवस्थेचा कोणत्याही अंगावर त्याचा अनिष्ट परिणाम होणार नाही, अशा रीतीने आम्ही आमच्या चरित्र्याचे, सामाजिक रुढीचे व मूल्यांचे रक्षण करु शकू. इतकेच नाही तर वर्तमान युगातील सर्वांत आधुनिक आर्थिक दृष्टिकोनाचा लाभही घेऊ शकू.

हेच कम्युनिस्टांचे आवडते अनुमान आहे. दीर्घकाळपर्यंत ते खेळत असलेला हाच राक्षसी डाव आहे. सुरुवातीला तर या लोकांनी इस्लामविरुद्ध उघडउघड आक्रमक व वैराची रीती व नीती अवलंबली व त्याच्यावर निरनिराळ्या शंकाकुशंका घेऊन त्यांचे अवमूल्यन करण्याचा प्रयत्न केला. परिणामतः त्यांच्या अशा अवरोधामुळे मुस्लिमांच्या इस्लामी भावना अधिक उर्जित होऊन दृढ झाल्या. हे पाहिल्यावर त्यांनी आपली पद्धत बदलून फसवाफसवीचा मार्ग अवलंबविण्याचे ठरविले. म्हणून सध्या त्यांनी अवलंबलेली तर्कंप्रणाली काहीशी अशा प्रकारची आहे.

‘कम्युनिझम इस्लाम धर्मात कसलीही ढवळाढवळ करीत नाही. कारण तात्त्विक दृष्टीने तर ते सामाजिक न्यायाचेच दुसरे नाव आहे. राज्यावर आपल्या राज्यातील लोकांच्या बहुमोल जीवनावश्यक गरजा भागविणे व त्या सर्व वस्तु गोळा करणे या राज्याच्या कर्तव्याचे अधिक स्पष्टीकरण करतो. म्हणून इस्लाम कम्युनिझमच्या विरुद्ध आहे हे सिद्ध करुन, इस्लाम सामाजिक न्यायाच्या विरुद्ध व त्याचा शत्रू आहे असे तुम्ही इस्लामी जगताला दाखवून देऊ इच्छिता काय? इस्लाम सामाजिक न्यायाविरुद्ध खचितच नाही; तसेच सामाजिक न्यायाला पोषक असणाऱ्या कोणत्याही जीवनपद्धतीविरुद्ध तो असूच शकत नाही.

हा तर्क पाश्चिमात्य साम्राज्यवाद्याच्या तर्कापेक्षा काही वेगळा नाही. कम्युनिस्टांप्रमाणेच साम्राज्यवाद्यानीही सुरवातीला उघडउघड हल्ले केले; पण त्यांच्या हल्यामुळे मुस्लिमात अधिकच जागृती निर्माण झाली. हे पाहून त्यांनी आपले तंत्र बदलले व असे म्हणण्यास सुरुवात केली की, ‘पाश्चिमात्यांची केवळ हीच इच्छा आहे की पौर्वात्यांना सुसंस्कृत बनवावे. इस्लाम वर्तमान संस्कृतिचे मूळ असल्याने तो कधीही संस्कृतीविरुद्ध जाऊ शकणार नाही. त्यांनी मुस्लिमांची अशी खात्री करुन दिली की, ते त्यांचे रोजे (उपवास) नमाज व आपले वैराग्य त्याग न करता, या नवीन संस्कृतीचा अंग झाले, की मुस्लिमांत इस्लामी स्वभाव व आचरण जिवंत ठेवण्याची पात्रताच उरणार नाही. काही पिढ्यानंतर ते कायमचे व पूर्णपणे नव्या संस्कृतीचे गुलाम बनतील, ही गोष्ट ते चांगल्या रीतीने जाणत होते. त्यांचा अंदाज अगदी अचूक होता म्हणूनच मुस्लिमांत या नवीन संस्कृतीने प्रभावित झालेले असे लोकही निघाले ज्यांना इस्लामबद्दल कसलेही ज्ञान नव्हते. उलट त्यांच्यात अकारणच इस्लामबद्दल तिरस्कार व द्वेष निर्माण झाला.

हाच डाव कम्युनिस्ट सध्या इस्लामी देशात खेळू इच्छितात. ते मुस्लिमांना असे सांगतात की एका आर्थिक पद्धतीच्या रुपाने तुम्ही कम्युनिझमचा स्वीकार करुनही, तुम्ही मुस्लिम राहाल. तुमच्या नमाज, रोजे, व वैराग्याच्या कर्मावर कसलीही बंधने असणार नाहीत. कारण कम्युनिझम केवळ एक आर्थिक पद्धत आहे. ती माणसाच्या धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करीत नाही. म्हणून मुस्लिमांनी कम्युनिस्टांची आर्थिक पद्धत अवलंबली की मुस्लिमांच्या दर्जाने जगणे त्यांना मुश्किल होईल, ही गोष्ट कम्युनिस्ट चांगले जाणतात. व काही वर्षाच्या आतच त्यांची विचारप्रणाली धुऊन स्वच्छ करुन, त्यांना आपल्या जीवनप्रणालीचा आकार देता येईल. त्यांच्या जीवनातील इस्लाम व त्याचे उरलेसुरले सर्व प्रभाव नष्ट करुन टाकण्यात येतील, हे ते चांगले जाणतात.

कारण वर्तमान युग अतिवेगाने पुढे जात आहे व त्यात मोठमोठे दूरगामी फेरबदल अगदी सहज रीतीने आणले जाऊ शकतात. दुःखाची गोष्ट अशी, की ही सर्व सत्ये अस्तित्वात असूनही, असंख्य मुस्लिम स्वखुशीने कम्युनिस्टांच्या या लाघवी बोलण्यास बळी पडत असतात. कारण असे केल्यानेही आपली रसहीन इस्लामी कर्तव्ये पार पाडण्यापासून वाचण्याचे एक निमित्त त्यांच्या हातात मिळते. स्वतःचा मार्ग स्वतः तयार करण्याची, चितंनमनन करण्याची तसेच विधायक कार्यात आपली शक्ती खर्च करण्याच्या कटकटीपासून त्यांना सुटका मिळते. सतत मुक्त व मोकळे असावे व अफूचे व्यसन असलेल्या माणसासारखे नुसती स्वप्ने रंगवित बसण्याखेरीज काही काम करायला लागू नये. कोणत्याही प्रश्नाचा स्वतःला विचार करायला लावू नये व इतरांनीच त्याच्या प्रश्नाविषयी चितन करावे, त्याला मार्गदर्शन करावे व इतरांच्या सांगण्यानुसार डोळे मिटून त्यांनी वर्तन करावे, इतकेच त्यांचे काम असावे.

इस्लामच्या मूलतत्त्वाशी तिचा संघर्ष होत नाही, तसेच बदलत्या परिस्थितीनुसार मुस्लिम समाजाच्या एखाद्या समस्येच्या सोडवणुकीच्या मार्गांचा ज्यात समावेश आहे, अशा कोणत्याही जीवनपद्धतीचा, तात्त्विक रुपाने इस्लाम विरोध करीत नाही. ही गोष्ट येथे आम्ही स्पष्ट करु इच्छितो, परंतु कम्युनिझमचा इस्लामी जीवनपद्धतीशी सैद्धांतिक व तात्त्विक दृष्टीने विरोध असल्या कारणाने वरकरणी काही बाबतीत इस्लामचे कम्युनिझमशी साम्य असले, तरी ते एकमेकांपासून अगदी वेगळे आहेत. इस्लामी सर्वश्रेष्ठ जीवनपद्धतीचा त्याग करून मुस्लिम कम्युनिझमचा, भांडवलवादाचा किवा भौतिकवादी समाजवादाचा अंगिकार करु शकत नाहीत. कारण त्यांचा इस्लामशी कसलाही सबंध नाही, उलट खोलवर व महत्त्वाचा फरकच आहे. काही बाबतीत जरी इस्लामशी साम्य असल्याचे आढळते, तरी अल्लाहने आपल्या पवित्र ग्रंथात स्पष्टपणे असे सांगितले आहे,

‘‘व जे लोक अल्लाहने अवतरलेल्या नियमानुसार आदेश देत नाहीत, ते अगदी सत्य नाकारणारे आहेत.’’ (कुरआन ५:४४)

कम्युनिझमचा अंगीकार केल्याने आम्ही मुस्लिम राहू शकतो काय? याचे उत्तर ठामपणे नकारात्मक आहे. कारण कम्युनिझम केवळ एक आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम नाही. जे लोक या स्वरुपात कम्युनिझम सादर करतात त्याची एकतर फसगत तरी झालेली असते किवा त्यांचा हेतू व नियम वाईट असून ते इतरांची फसगत करु इच्छितात. सत्य असे आहे की कम्युनिझम आपल्या तत्त्वात व आपल्या प्रत्यक्ष व्यवहारात इस्लामच्या नेमका उलट आहे, म्हणून या दोहोंमध्ये संघर्ष असणे अटळ आहे.

तात्त्विक दृष्टीने इस्लाम व कम्युनिझममध्ये फरकांचे जे नानाविध पैलू आढळून येतात, त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केले जाऊ शकते.

पहिली गोष्ट अशी की कम्युनिजम एक शुद्ध जडवादी व भौतिकवादी दृष्टिकोन आहे. त्याची वास्तवता एवढीच आहे, की ज्यांचे आम्हाला ज्ञानेंद्रियांद्वारा ज्ञान होऊ शकते, जी सत्ये आमच्या ज्ञानेंद्रियापलीकडची आहेत, ती सर्व अंधश्रद्धेची भेंडोळी असून त्यांना कसलीही वास्तवता नाही. म्हणून त्यांच्यासाठी माणसाला कसल्याही प्रकारची भीती बाळगण्याचे काहीएक कारण नाही. म्हणून एंजिल्सने असे लिहिले होते ‘भौतिक घटक हेच केवळ जीवनातील सत्य आहे. त्याचप्रमाणे या भौतिकवाद्यांचा एक प्रदर्शन आहे. तसेच ते आपल्या सभोवतालच्या भौतिक वातावरणाचे प्रतिबिब आहे. इस्लामी आत्मा याव्यतिरिक्त त्याला कसलीही वास्तवता नाही. यावरुन हे उघड आहे की, कम्युनिझम एक शुद्ध जडवादी दृष्टिकोन असून, त्याच्याजवळ मानव जीवनातील सर्व आध्यात्मिक प्रदर्शन हा चेष्टेचा विषय आहे व तो अशास्त्रीय विचाराची व दृष्टिकोनाची फल निष्पत्ती आहे.’
मानवी जीवनाची व मानवी प्रयत्नांची ही कल्पना इतक्या निकृष्ट दर्जांची आहे की, इस्लाम तिच्याशी कधी सहमत होऊच शकत नाही. त्याच्यासमोर माणसाचे स्थान अतिचांगले व श्रेष्ठ आहे. तसेच त्याचा देह जड आहे व तो जमिनीवर चालतो. त्याच्या विचाराची व आत्म्याची भरारी अमर्याद असते म्हणून त्याच्या भौतिक मानवी गरजासुद्धा कार्लमाक्र्स म्हणतो तसे, केवळ अन्न, निवारा व रोजगारा पुरतेच मर्यादित नाही.

कम्युनिझमचा केवळ अर्थिक कार्यक्रमाचा आम्ही अवलंब केला आणि अल्लाह व त्याचे प्रेषित मुहम्मद (स) यांच्यावरील मूलभूत श्रद्धा व सिद्धांतापासून आम्ही परावृत्त असणार नाही. तसेच आमच्या आध्यात्मिक पद्धतीचाही आम्ही त्याग करणार नाही, मग कम्युनिझमचा हा भौतिकवादी दृष्टिकोन आमच्या जीवनावर प्रभाव कसा टाकू शकेल? असा प्रश्न वाचकांच्या मनात या ठिकाणी उद्भवणे साहजिक आहे. कारण कम्युनिझम केवळ एक आर्थिक सुधारणांचाच कार्यक्रम आहे व त्या दृष्टीने या गोष्टीवर प्रभाव व परिणाम होणे अशक्य आहे. हीच चुकीची समजूत आहे. याचे कारण असे की, खुद्द कम्युनिझमच्या तत्त्वानुसार कोणत्याही राष्ट्राचा आर्थिक कार्यक्रम त्या राष्ट्राच्या भौतिक जीवनतत्त्वाहून वेगळा असूच शकत नाही. उलट या दोहोंचा एकमेकांशी घनिष्ट संबंध असतो. त्यांना एकमेकांपासून वेगळे करुन ते समजलेच जाऊ शकत नाही. कारण त्यांचा पाया एकाच आर्थिक व्यवस्थेवर असतो व त्यांची ठेवणसुद्धा भौतिकवादी जीवनसिद्धांतांवर असते. हेच सत्य कम्युनिस्ट साहित्यिकांनी आपल्या साहित्यात सविस्तरपणे प्रस्तुत केलेले आहे. नाहीपेक्षा माक्र्स व एंजिल्स यांनी लिहिलेल्या पुस्तकावरचा दृष्टिक्षेप, हे सत्य समजण्यास पुरेसे आहे.

इतिहासाची वर्गसंघर्षावर धारणा

कम्युनिझम वर्गसंघर्षावर अधिष्ठित भौतिकवादावर विश्वास बाळगतो, तो विरोधी पक्षातील लढा भांडवलवादी व श्रमिक वर्गसंघर्ष अटळ असल्याचे मानतो. हेच ते गूढ तत्त्व आहे जे माणसांच्या सर्व आर्थिक व भौतिक प्रगतीचे मूळ आहे. आजपर्यंत जी प्रगती झाली आहे, ती याच वर्गकलहाची फलनिष्पत्ती आहे. आपल्या प्रगतीसाठी मानवतेला गुलाम पद्धत, जहागीरदारी पद्धत व भांडवलवादी पद्धतीहून अनेक युगांपर्यंत जावे लागेल. तेही याचेच फळ आहे आणि याच मार्गाने व माध्यमातून ते आपले उद्दिष्ट म्हणजे कम्युनिस्ट क्रांतीप्रत पोहोचू शकतील. वर्गकलहावर आधारलेला हाच भौतिकवादाचा दृष्टिकोन आहे. त्याच्या मार्गदर्शनात कम्युनिस्ट आपले तत्त्वज्ञान बरोबर असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतात व हाच तात्त्विक आधार नजरेसमोर ठेवल्याने, सध्याच्या सैद्धांतिक लढ्यात कम्युनिजमचाच विजय होईल अशी त्यांची खात्री आहे. कम्युनिझम वर्गसंघर्षावर आधारलेला भौतिकवाद यांच्या दरम्यान शास्त्रीय कार्यकारण संबंध आहे असे ते मानतात. त्यामध्ये ईश्वर, त्याचे प्रेषित मुहम्मद (स) व धर्म यांना मुळातच कसलाही वाव नसतो; कारण त्यांच्या दृष्टीने या सर्व बाबी केवळ आर्थिक तत्त्वांची निपज असून त्यांच्या आर्थिक पार्श्वभूमीहून वेगळे असे कायमचे व महत्त्वाचे अस्तित्व नाही. म्हणून मानव जीवनातील वास्तविक ध्येय अगर लक्ष्य ठरविण्याच्या दृष्टीनेही ते निरुपयोगी व कुचकामी आहेत. जीवनात जे काही मूल्य असेल तर ते आर्थिक उत्पादनाच्या साधनांनाच आहे. कारण त्यांत बदल झाल्याने मानव जीवनावर त्याचा परिणाम घडून येतो व तिच्यात क्रांतीचा जन्म होतो. कम्युनिस्टांच्या या दृष्टिकोनातील चुकीचा प्रत्यय या गोष्टीने चांगला व स्पष्ट रीतीने येऊ शकतो की, अशी मोठमोठी प्रतिपादने व दावे करुनसुध्दा इस्लामने आणलेल्या क्रांतीपूर्वी, अरब द्वीपकल्पात एखादी क्रांती झाल्याचे दाखवून देऊ शकत नाही, की अरबांच्या आर्थिक साधनांत काही असे बदल घडून आल्याचेही सिद्ध करु शकत नाही. त्यांना इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांनी आणलेला क्रांतीचा आधार म्हटले जाऊ शकते व जगाला एका नव्या जीवनपद्धतीशी परिचय करुन देण्यास कारणीभूत ठरु शकते.

निरीश्वरवादी जीवनपद्धत

इस्लाम व कम्युनिझम परस्परविरोधी आहेत, हे यावरुन सिद्ध होते. ते दोन्ही एकच आहेत, असे कदापि म्हटले जाऊ शकत नाही. इस्लामच्या दृष्टीने ‘ईश्वराची कृपा व त्याची माया’ सर्व निर्मिलेल्या वस्तूवर असते व त्यांच्या पासून सर्वांना समान लाभ प्राप्त होत असतो. तो स्वयंभू ईश्वरच आपल्या दासांच्या मार्गदर्शनासाठी प्रेषित पृथ्वीवर धाडीत असतो. जेणेकरुन त्यांनी लोकांना आर्थिक परिस्थितीहून कितीतरी महान व श्रेष्ठ असलेल्या वास्तवतेवर म्हणजे इस्लामच्या सन्मार्गावर चालवावे. या उलट कम्युनिझममध्ये मानव स्वभावाचे व प्रकृतीचे सर्व टप्पे वर्गकलहाचे व संघर्षाच्या परिणामस्वरुप असतात. त्यात ईश्वरेच्छेला अगर अन्य कसल्याही प्रेरक तत्त्वाला निश्चितपणे कसलाही प्रवेश नसतो किवा हस्तक्षेप नसतो. जे काही आहे ते केवळ आर्थिक स्थिती आणि तिच्या दबावाखाली व दडपणाखाली उफाळून येणाऱ्या गरजा हे मुख्य आहे. कोणताही मुस्लिम, मुस्लिम राहून व इस्लामच्या सत्य मार्गावर श्रद्धा बाळगून, कम्युनिझमच्या या तत्त्वज्ञानावर कसा विश्वास ठेवू शकतो व त्याचा एकनिष्ठ सेवक कसा होऊ शकतो ?

कम्युनिझमचा निषेधात्मक सिद्धान्त

इस्लाम व कम्युनिझममध्ये महत्त्वाचा व ठळक दुसरा फरक असा आहे की, माणूस भौतिक व आर्थिक परिस्थितीपुढे विवश असतो व एखाद्या बाहुल्यापेक्षा त्यांचे अधिक महत्त्व नसते. असा नकारात्मक दृष्टिकोन कम्युनिझम माणसाबाबत बाळगतो. कार्ल माक्र्स असे लिहितो की, ‘माणसाचे सामाजिक, राजकीय व वैचारिक जीवन, आर्थिक परिस्थिती जसे घडविते तसेच बनत असते. मानवातील प्रेरणा आपली सामाजिक परिस्थिती निर्माण करु शकत नाही. उलट सामाजिक परिस्थितीच मानवात प्रेरणा व चेतना निर्माण करते.

संबंधित लेख

  • इस्लाम व वसाहतवादी पद्धत

    वसाहतवादी पद्धत, युद्धे इतर जातींचे शोषण व भांडवलशाही पद्धतीने निर्माण केलेले आणि जगभर पसरलेल्या दोषांच्या संबंधी इस्लाम या सर्वांच्या विरुद्ध आहे. आपल्या वसाहती स्थापन करण्यासाठी अथवा इतरांना आपल्या स्वार्थाचे साधन बनविण्याच्या त्यांच्या उद्देशाशी त्यांच्याविरुद्ध युद्ध करणेसुद्धा इस्लामला पसंत नाही. इस्लाम केवळ एकाच युद्धाला अनुमती देतो व ती म्हणजे अत्याचार व दडपशाहीच्या विरुद्धचे युद्ध. शांततापूर्ण उपायांचा अंगीकार करण्याच्या मार्गात अडसर होण्याच्या स्थितीत सत्याचा व न्यायनिष्ठा उंचावण्याकरिता जिहाद.
  • जकातचे व्यवस्थापन

    इस्लामने अगदी स्पष्ट आदेश जकात कशी जमा करावी आणि कशी खर्च करावी याबद्दल दिलेले आहेत. जकातव्यतिरिक्त दानधर्म करण्यास प्रत्येकजण स्वतंत्र आहे. हे स्वातंत्र्य जकातसाठी दिले गेलेले नाही. या बाबतीत जकातचे व्यवस्थापन हे नमाज सामुदायिकरित्या कायम करण्यासारखे आहेत. ही सामुदायिक व्यवस्था आहे. इस्लामी शासन आपल्या महसूल खात्यातर्फे जकात गोळा करते आणि गरजूंना त्याचे वाटप करते. शासनाला जकात देणे अनिवार्य आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]