Islam Darshan

वर्तमान इस्लामी आंदोलन

Published : Wednesday, Mar 02, 2016

प्रत्येक क्षणी पुढे पुढे सरकणारे वर्तमान इस्लामी आंदोलन अधिकाधिक दृढ होत चालले आहे. गतकाळापासूनच आध्यात्मिक पोषण प्राप्त करुन ते पुष्ट होत आहे. वर्तमानातील समग्र मंगल, शूचिर्भूत व नैतिकदृष्ट्या संमत असलेल्या साधनांचा वापर व उपयोग करते आणि आपली दृष्टी दूरवरच्या भविष्यावर ठेवून आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे जात आहे. त्याचा भविष्यकाळ तेजपूर्ण आहे. मागे येऊन गेला तसाच चमत्कार पुन्हा एकदा त्याचेकडून घडून समोर येऊ शकतो. त्यानंतर मानव पाशवी भावनांचा गुलाम राहणार नाही उलट जगाच्या उपद्व्यापात, कटकटीमध्ये असून व त्याच्या बंधनामध्ये अडकलेला असूनसुद्धा तो एका स्वतंत्र माणसाप्रमाणे मान ताट करुन चालू शकेल. कारण त्याचे ध्येय भौतिक आस्वाद घेण्याचे असणार नाही. त्याची भरारी निळ्या आकाशाच्याही पलीकडे असेल.

एक परिपूर्ण जीवनपद्धत

परंतु याचा अर्थ असा कदापिही नाही, की इस्लाम केवळ एक आध्यात्मिक विश्वास आहे, अथवा केवळ नैतिक आचरणाची पद्धत आहे, अथवा जमीन व आकाशाच्या संदर्भात ज्ञानपूर्ण शोधांचे नाव नसून, इस्लाम मानवी जीवनातील एक व्यावहारीक पद्धत आहे. जगाच्या सर्व भागांवर व सर्व समस्यांवर प्रभावी आहे. जीवनाचा कोणताही पैलू त्याच्या वर्चस्वावाचून राहिलेला नाही. तो मानवी जीवनातील सर्व संबंध व संपर्काना सुरळीत करतो, मग या समस्या राजकारणाच्या असोत, आर्थिक वा सामाजिक असोत व त्यांच्याकरिता यथायोग्य कायदे करुन त्यांना पूर्णपणे व्यवहारात लागू करतो. इस्लामच्या या कार्याचा एक ठळक गुण असा आहे की अशा तऱ्हेने तो व्यक्ती व समाज, बुद्धी व विवेक, कर्म व भक्ती, जमीन व आकाश तसेच इहलोक व परलोक यादरम्यान समन्वय निर्माण करुन त्यात एक प्रकारचा समतोल निर्माण होतो. जीवनाचे अनेकानेक पैलू एका समतोल एकूणाचेच अंश बनतात. या प्रकरणामध्ये इस्लामच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक पद्धतीवर विस्तृत माहिती देण्यास वाव नाही.

इस्लामचा पहिला गुण

इस्लामच्या बाबतीत ही पहिली गोष्ट चांगल्यारितीने समजून घ्यावयास पाहिजे की तो एक रिकामा सिद्धान्त नसून एक अशी व्यावहारिक जीवनपद्धती आहे, जी मानवी जीवनातील कोणतीही गरज नजरेआड करीत नाही. त्याचप्रमाणे त्याच्या प्राप्तीकरिताही मार्ग मोकळे करते.

इस्लामचा दुसरा गुण

दुसरा गुण असा की मानवाच्या वास्तव गरजा एकत्र करण्याचे कामी इस्लाम जीवनामध्ये पूर्ण न्याय व समतोल स्थापन करु इच्छितो तसेच मानवी स्वभावधर्माच्या मर्यादांनाही तो आपल्या दृष्टीआड होऊ देत नाही. तो आपल्या सुधारणांचा आरंभ व्यक्तीपासून करतो व त्याच्या जीवनात देह व आत्मा, तसेच बुद्धी व इच्छा-आकांक्षाच्या अनेक प्रकारच्या मागण्यामध्ये समतोल व एकोपा निर्माण करतो, जेणेकरुन यापैकी कोणीही आपल्या वैध मर्यादांचे उल्लंघन करु नये. उच्च आध्यात्मिक विकासाखातर इस्लाम पाशवी प्रवृत्तीला पूर्णपणे दडपूनही टाकत नाही. त्याचप्रमाणे वासनांच्या पूर्तीकरिता व आस्वाद प्रियतेकरिता तो माणसाला अशा तऱ्हेने डुंबू देत नाही कारण मनुष्य शुद्ध पशू बनेल. हे त्याला पसंत नाही. त्याऐवजी इस्लाम आत्मा व देह या दोहोंवर, एका उच्चस्थानाहून दृष्टिक्षेप करतो, त्यांच्यात एकजिनसीपणा निर्माण करतो, त्यांच्या सर्व गरजा पुऱ्या करतो. आत्मा व देह समन्वयाने मानव व्यक्तित्व यांच्या परस्परविरोधी संघर्षाचे रणक्षेत्र बनून मानवी व्यक्तिमत्त्वाच्या ठिकऱ्या उडण्यापासून वाचते. अशारितीने व्यक्तीचे जीवन, जेंव्हा स्वास्थ्यपूर्ण पायावर उभारलेले असते तेव्हा इस्लाम व्यक्ती व समाज यांच्या गरजांमध्ये एकजिनशीपणा निर्माण करण्याकडे आकर्षित होतो. म्हणून हा कुठल्याही व्यक्तीला इतर व्यक्तीविरुद्ध वा समाजाविरुद्ध कसल्याही संघर्षाची परवानगी देत नाही. तसेच तो समाजालाही तसा अधिकार देत नाही की त्याने दुसऱ्या व्यक्तीचा अधिकार हिसकावून घ्यावा. मानवाच्या एका वर्गाने अथवा एखाद्या राष्ट्राने मानवाच्या इतर वर्गांवर व इतर राष्ट्रांवर आपले प्रभुत्व गाजवावे ही गोष्ट इस्लाम सहन करु शकत नाही. तात्पर्य असे की सामाजिक जीवनात आढळणाऱ्या व परस्परविरोधी संघर्ष करणाऱ्या शक्तींना बांधून ठेवून इस्लाम त्याची दोरी आपल्या हातात ठेवतो. त्याचे आपापसांतील संघर्षापासून रक्षण करतो व त्यात एकजिनशीपणा निर्माण करुन त्यांना असे शिक्षण व अशी मांडणी करतो की ते सर्व एकजीव बनून मानव तसेच मानवतेच्या उच्चतम लाभाकरिता कार्य करु शकतील.

याचबरोबर इस्लाम आध्यात्मिक व भौतिक शक्तींमध्ये तसेच आर्थिक व मानवतेच्या शक्तींमध्ये समतोल निर्माण करतो. साम्यवादाप्रमाणे इस्लाम जीवनामध्ये मानव तत्त्वावर आर्थिक तत्त्वांचे प्रभुत्व व निर्णायक श्रेष्ठत्व मान्य करीत नाही. आध्यात्मवादाचा हा सिद्धान्तही मान्य करीत नाही की ते मानवी जीवनाची घडण करण्याचे काम फक्त अध्यात्माच्या व वैचारिक सिद्धान्ताच्या बळावर केला जाऊ शकतो. कारण तो समाजाला कुठल्याही एका, अथवा काही भागाच्या समान मानत नसून त्या सर्वांचा एकजीव व मिलाफ मानतो. त्यातील सर्वांना सारखे महत्त्व देतो व त्यांच्या एकत्रित होण्याने एक संतुलित एकजीव अस्तित्वात आणतो.

इस्लामचा तिसरा गुण

तिसरी ही गोष्ट चांगल्या तऱ्हेने लक्षात ठेवली पाहिजे की आर्थिक दृष्टिकोन व आर्थिक पद्धतीमध्ये इस्लाम आपली स्वतःची, चिरकाल टिकणारी व वेगळी शान बाळगतो. काही बाबतीत काही अंशच समानता असूनसुद्धा त्याचा साम्यवादी पद्धतीशी कसलाही संबंध नाही, त्याचप्रमाणे भांडवलशाहीशी नाही. यामध्ये दोन्ही पद्धतींतील गुण अंतर्भूत आहेत. पण त्यातील अवगुण, कमजोरी, त्रुटी यापासून तो पूर्णपणे स्वच्छ आहे. आजच्या वर्तमान पाश्चिमात्य पद्धतीप्रमाणे व्यक्तीला तो इतके अतिमहत्त्व देत नाही जेणेकरुन समाज व्यक्तीच्या तुलनेत विवश व्हावा व कसल्याही अवस्थेत तो व्यक्तीला आवरु शकत नाही. ज्यामुळे सबंध समाजाचेच स्वातंत्र्य नष्ट होऊन जावे. मर्यादेचे उल्लंघन केलेले याप्रकारचे व्यक्तीस्वातंत्र्यच भांडवलशाही पद्धतीचा पाया आहे आणि त्याला उघड उघड अशी परवानगी देतो की तो इतर व्यक्तींच्या, किबहुना ज्याने त्याला प्रगतीपथावर घातले व त्याला व्यक्तिमत्त्व प्रदान केले. त्या समाजालाही एक धोका बनावे आणि दुसरीकडे सामाजिक जीवनावर बोलतानासुद्धा समाजाचे महत्त्व सांगतानाही इस्लाम अतिशयोक्ती करीत नाही, जसा वर्तमानकाळात पूर्व युरोपातील साम्यवादी राष्ट्रांचा स्थायी स्वभाव बनला आहे. या शासनामध्ये जे काही महत्त्व आहे ते समूहाचे महत्त्व आहे व तोच जीवनाचा मूळ आधार आहे. त्याच्या तुलनेत व्यक्तीला कसलेही मूल्य व महत्त्व नसून समाजापासून वेगळे त्याच्या अस्तित्वाचा कसलाही विचार केला जाऊ शकत नाही. परिणामस्वरुप या देशामध्ये शक्ती व स्वातंत्र्याचे उगमस्थान केवळ समूह आहे आणि व्यक्तीला असा अधिकार प्राप्त नाही की तो समाजाच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकेल. तसेच आपल्या गरजाखातर आपले तोंड उघडून मोकळेपणाने बोलण्याचीही परवानगी आहे. अशा दृष्टिकोनाच्या पोटी कम्युनिझमने जन्म घेतला असून त्यांचा असा दावा आहे की व्यक्तीच्या भाग्याचा धनी केवळ राज्यच आहे व त्याला आपल्या व्यक्तींवर अमर्याद अधिकार प्राप्त आहेत, म्हणून राज्य व्यक्तींना हवे तसे घडविण्याकरिता समर्थ आहे.

साम्यवाद व भांडवलशाही पद्धतींच्या या अतिरेकांचा त्याग करुन इस्लाम सुवर्णमध्याचा अंगीकार करतो. तो व्यक्तींना तसेच समूहांना समान महत्त्व देतो व त्यांच्यात असा एकजिनशीपणा निर्माण करतो की व्यक्तीला आपले व्यक्तिमत्त्व वृद्धिगत व विकसित करण्यासाठी लागणारे स्वातंत्र्य प्राप्त करता येते. परंतु त्याला अशी परवानगी नसते की त्याने इतर व्यक्तींचे अधिकार हिसकावून वा हिरावून घ्यावे अथवा त्यांच्यावर जुलूम वा अत्याचार करावा. तसेच दुसरीकडे इस्लाम समाजाला तसेच त्याच्या शासकीय अंगाला अर्थात राज्यशासनाला सामाजिक तसेच आर्थिक बाबींना एकत्र बांधणी करण्यासंदर्भात व्यापक अधिकार देतो, जेणेकरुन मानवी जीवनामध्ये एकजिनशीपणा व समतोल निर्माण केला जाऊ शकेल. इस्लामच्या या समाजव्यवस्थेचा पाया व्यक्ती व समूह यातील प्रेमसंबंधावर उभारलेला असून कम्युनिस्ट समाजाप्रमाणे तो तिरस्कार व वर्गकलहावर आधारित नाही.

संबंधित लेख

  • दंडविधानाची काही इतर स्वरुपे

    शरीअतमध्ये दंडविधानाच्या स्वरुपात शारीरिक आणि आर्थिक शिक्षांव्यतिरिक्त काही हलक्याफुलक्या स्वरुपाच्या शिक्षासुद्धा लागू करण्यात आल्या आहेत. त्या आपण थोडक्यात अभ्यासू. विचारपूस करणे इस्लामी शासक अथवा न्यायाधीशाला या गोष्टीचा अधिकार आहे की गुन्हेगारास न्यायालयात हजर राहण्याची नोटिस बजावावी अगर त्याची कसून विचारपूस करावी.(संदर्भ : बदायुन नसाया)
  • नबुवत - प्रेषित्व

    ईश्वराचे आज्ञापालन करण्यासाठी ईश्वराच्या सत्तेचे व त्याच्या गुणवत्तेचे व त्याच्या पसंतीच्या पद्धतीचे आणि पारलौकिक जीवनातील शिक्षा तसेच पुरस्कारासंबंधी उचित व खऱ्या ज्ञानाची आवश्यकता आहे. हे ज्ञान असे असावयास पाहिजे की, ज्यावर तुमचा दृढविश्वास (ईमान) आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]