Islam Darshan

लोकशाही पद्धतीने शासकांची निवड व इस्लाम

Published : Thursday, Mar 03, 2016

पुष्कळशा राष्ट्रांत सध्याच्या काळात आपल्या शासकांची निवड खुल्या सार्वत्रिक निवडणुकीने केली जाते. तसेच आपण निवडलेल्या प्रतिनिधींना त्यांची कर्तव्ये व्यवस्थित रितीने पार पाडण्यात जर अपयश आले तर त्यांना पदच्युत करण्याचा किवा अधिकारापासून दूर करण्याचा अधिकार लोकांना असतो. खरे तर हे इस्लामी पद्धतीच्याच एका वैशिष्ट्याचे नवीन प्रदर्शन आहे. हेच वैशिष्ट्य इस्लामने तेरा शतकांपूर्वी जगासमोर सादर केले होते. माननीय अबू बक्र (र) व माननीय उमर (र) यांच्या काळात हा नियम लागू करणे हा चमत्कार होता, पण आज तो चमत्कार राहिला नसून, एक वास्तवता बनली आहे. ती प्राप्त करणे पूर्णपणे आमच्या आवाक्यात आहे. अट एवढीच आहे की आम्ही निष्ठेने व प्रामाणिकपणे त्यास आपल्या जीवनात लागू केला पाहिजे. इतरांची नक्कल करुन व अनुकरण करुन हा नियम जर आम्ही इंग्लंड, अमेरिकेतून आयात करु शकतो तर शेवटी इस्लामच्या नावाने त्याचा अंगीकार का करु शकत नाही? खरे तर इस्लाममध्ये हा नियम काही नवीन नसून, पूर्वीपासूनच तो इस्लाममध्ये आहे.

त्याचप्रमाणे राज्यातर्फे आपल्या कर्मचारी वर्गासाठी लागणाऱ्या मूलभूत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याच्या हमीचा प्रश्न आहे. या संदर्भात इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांचा स्पष्ट आदेश आहे, की आपल्या कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करण्याची शासनावर जबाबदारी आहे. या इस्लामी सिद्धान्ताचा अवलंब करण्यासाठी विसाव्या शतकात कम्युनिस्टांना श्रमजीवी हुकूमशाहीचा आधार घ्यावा लागला. खरे तर इस्लामने कितीतरी पूर्वी हुकूमशाहीचे सहाय्य न घेता, यशस्वीरीत्या ती इस्लामी जीवनपद्धती अमलात आणून दाखवून दिली होती. म्हणून आज आम्हाला राज्याच्या कर्मचाऱ्यांचे जीवनावश्यक गरजांचे रक्षण हवे असेल, तर त्याकरिता कम्युनिस्टांकडे पाहण्याची गरज कदापिही नाही, इस्लामचे मार्गदर्शन व त्याचे उज्ज्वल उदाहरण पुरेसे आहे.

काहीही असले तरी मूळ प्रश्नाचा विषय असा आहे की एखादी विशिष्ट सामाजिक, आर्थिक व राजकीय पद्धत व्यवहार्य आहे किवा नाही? याच कसोटीवर घासून पारखून तिच्या व्यवहार्य असण्याच्या अगर नसण्याच्या बाबतीत निर्णय घेतला जाऊ शकतो. इस्लामच्या संदर्भात आम्ही असे म्हणू शकतो की तो पूर्णपणे या कसोटीला उतरतो कारण ती वास्तविकपणे एक व्यवहार्य जीवनपद्धत आहे. या भूतलावर यशस्वीरीतीने कार्यान्वित झालेली व अंगीकार केली गेलेली तीच पहिली परिपूर्ण जीवनपद्धत होय.

इस्लाम केवळ इच्छा भावनांची निपज आहे काय?

वर्तमान संस्कृतीची इमारत वैज्ञानिक सत्याच्या मूळपायावर उभारलेली आहे व इस्लाम मात्र केवळ सदिच्छांवर व भावनांच्या आधारावर उभारलेला आहे. या कम्युनिस्ट साहित्यिकांच्या व त्यांच्या पाठीराख्यांच्या प्रतिपादनात थोडेही सत्य किवा तथ्य नाही. इस्लामी कायद्यावर एक नजर टाकल्यास कम्युनिस्टांचा हा दावा किती भोंगळ आहे हे स्पष्ट होण्यासाठी पुरेसे आहे. इस्लामने जी कायदा व्यवस्था निर्माण केली ती केवळ सदिच्छा व भावनांवर नसून भक्कम पुराव्यांवर व प्रत्यक्ष घटनांवर आधारलेली आहे. त्याचप्रमाणे सरळ मार्गावर असलेले खलीफांचे उदाहरण आमच्या समोर आहे. त्यांनी सल्लागार समितीत सल्ला देताना अगर एखाद्या इस्लामी कायद्याचे स्पष्टीकरण व विश्लेषण करताना, अथवा तो कायदा लागू करताना, आपले निर्णय इच्छांच्या, आकाक्षांच्या व स्वतःच्या आवडीनिवडीच्या पायावर कधीही उभारलेले नव्हते.

पण सत्य असे आहे, की जीवनासाठी एक कायदा पद्धत सादर करूनसुद्धा इस्लाम केवळ कायद्यावरच विसंबून न राहता तो माणसाच्या अंतर्मनाला सुसंस्कृत करण्यावर लक्ष केंद्रित करतो व त्याच्यामध्ये इतकी नैतिक चेतना जागृत करतो की माणूस स्वतःहोऊनच कायद्याचे पालन करु लागतो. या उद्देशाकरिता त्याच्यावर कसलाही बाह्य धाक अगर लालूच दाखविण्याची गरज उरत नाही. राजकीय क्षेत्रात असा माणूस सर्वांत मोठे यश प्राप्त करतो. जव्हा समाजाच्या सार्वजनिक हिताची निकड असेल व सुधारणा करण्याचे इतर सर्व मार्ग अयशस्वी ठरतात तेव्हाच इस्लामी कायदा कार्यान्वित केला जातो. तिसरे खलीफा माननीय उस्मान (र) यांचे हे कथन सुप्रसिद्ध आहे,

‘ज्या वाईट गोष्टींना कुरआनद्वारा पायबंद बसत नाही त्या सर्व वाईट गोष्टी अल्लाह आपल्या शक्तीने रोखतो.’

हे कथन इस्लामी कायद्याचे हेच महत्त्वाचे वैशिष्ट्य स्पष्ट करते.

इस्लामचे पुनरुत्थान आजसुद्धा शक्य आहे काही उदाहरणे

जे लोक इस्लामचे पुनरुत्थान अशक्य आहे समजतात, ते बहुधा असे म्हणताना ऐकले जाते की, माननीय उमर (र) यांच्या सारख्या महान व भारदस्त व्यक्ती इतिहासात वारंवार जन्माला येत नसतात.

हजारो साल नर्गिस अपनी बे नूरी पे रोती है।
बडी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा।।

अशा प्रकारच्या गोष्टी वास्तविकपणे त्या लोकांचा बौद्धिक दिवाळखोरपणाच प्रकट करत असतात. कारण इस्लामी पद्धतीची स्थापना व इस्लामी कायदा व्यवहारात लागू करण्याच्या संदर्भात आज आमच्यात माननीय उमर (र) यांच्या सारख्या आदर्श व्यक्तींची आवश्यकता नसून, सोडून दिलेल्या त्या कायद्यांची व कायदेशीर उदाहरणांची गरज आहे. आम्ही जर निष्ठा बाळगली तर आम्ही त्याची अंमलबजावणी करु न शकण्याला काहीही कारण नाही. उदाहणार्थ, माननीय उमर (र) यांनी आपल्या खिलाफतीच्या कारकिर्दीत असा एक हुकूम जारी केला होता की जर एखाद्याने काही आर्थिक अगर सामाजिक विवशतेच्या कारणाच्या निकडीमुळे चोरीचा गुन्हा केला असेल तर त्याला हात तोडण्याची शिक्षा दिली जाऊ नये. कायद्याचे हे उदाहरण आज लागू करण्यासाठी आज खुद्द माननीय उमर (र) यांनी समक्ष हजर असण्याची काही गरज आहे काय? नक्कीच नाही, कारण त्यांचा तो हुकूम वास्तविकपणे त्यांचा इज्तेहाद (कुरआन व हदीसच्या आधारावर नवीन समस्येवर घेतलेला निर्णय) होता व इस्लामी धर्मशास्त्राच्या या सिद्धांतापासून घेतला गेला होता.

‘संशय असलेल्या अवस्थेत शिक्षा देऊ नका’ - हदीस

त्याचप्रमाणे माननीय उमर (र) यांनी आपल्या कारकिर्दीत असाही एक नियम केला होता की धनवान व श्रीमंत लोकांकडून अतिरिक्त धन काढून घेऊन त्याचे वाटप हलाखीच्या अवस्थेत असणाऱ्या गरीब लोकांत करण्याचा पुरेपूर अधिकार मुस्लिम शासक बाळगतात. आज इंग्लंडमध्ये नेमक्या यांच नियमाची अंमलबजावणी चालू आहे. पण हा नियम करण्यासाठी व तो लागू करण्यासाठी इंग्लंडला कोणत्याही उमरची गरज भासली नाही, हे उघडच आहे. इस्लामी कायदा व्यवहार्य असल्याचे व तो लागू होण्याचे हे सर्वांत मोठे प्रमाण आहे. कारण हा नियमही माननीय उमर (र) यांनी स्वतः तयार केलेला नव्हता तर कुरआनच्या या आयतीतून घेतला गेला होता.

‘‘जेणेकरुन धन हे धनवान लोकांत फिरत राहू नये.’’ (कुरआन)

माननीय उमर (र) यांनी खलीफाच्या नात्याने आपले मतही सांगितले की सरकारला आपल्या कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या संपत्तीची व मिळकतीच्या साधनांची संपूर्ण चौकशी करण्याचा व शोध घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, जेणेकरुन त्यांनी संपत्ती रीतसर मार्गाने मिळविली की गैरमार्गांनी मिळविली याची माहिती मिळावी. जरी आमच्यात कोणी उमर नसले तरी वर्तमान काळात या नियमाला सारे जग मानते व त्यानुसार कृतीही चालू आहे.

माननीय उमर (र) यांनी असाही कायदा केला होता की अनाथ व अनौरस (ज्यांच्या आईबापांचा ठावठिकाणा नाही) मुलांची देखरेख व संगोपन करण्याची जबाबदारी शासनावर आहे. त्यांच्या शिक्षण संस्काराचा खर्चाचा भार राज्याच्या खजिन्यातून वाहिला जाईल जेणेकरून माता-पित्यांच्या पापाची शिक्षा मुलांना भोगावी लागू नये. विसाव्या शतकात इंग्लंड, अमेरिकेलाही हाच कायदा करावा लागला. यावरुन इस्लामी कायदा व्यवहार्य होण्यास व तो लागू केला जाण्यास माननीय उमर (र) यांच्या सारख्या महान व्यक्तीच्या अस्तित्वावर विसंबून राहणार नाही, हेच सत्य यावरुन उघडपणे समोर येते. त्याची आम्हाला गरज आहे. ते माननीय उमर (र) यांच्या महान व्यक्तित्वाचा गुण नसून ते प्रारंभीच्या काळातील एक सुप्रसिद्ध व निष्णांत धर्मशास्त्रज्ञ होते आणि इस्लामचा वास्तविक आत्मा त्यांच्यात ओतप्रोत भरलेला होता. त्यांना इस्लामची तत्त्वे व सिद्धान्त जाणण्याची शुद्ध अंतः प्रेरणा लाभली होती. त्यांच्या वैयक्तिक जीवनाच्या उदाहरणापासून ज्ञानरुपी प्रकाश प्राशन करुन आम्ही आमचे जीवन शुशोभित करु शकतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्व काळात व सर्व स्थानी सर्व मुस्लिमांकरिता एक पवित्र आदर्श आहे, हा त्यांचा गुण आहे. पण त्यांचे हे सर्व व्यक्तिगत गुण आम्ही आमच्यात निर्माण करु शकलो नाही असे मानले तरी त्यांनी मागे सोडलेल्या इस्लामी धर्मशास्त्राचे पालन केले तरी ते आमच्या सामूहिक व व्यवहारी जीवनाच्या हितासाठी पुरेसे होऊ शकते. कारण असे केल्याने कमीतकमी इतरांकडून नियमांची व कायद्याची भीक मागण्याच्या अपमानापासून तरी आम्ही वाचू शकू.

संबंधित लेख

  • अपराधांच्या शिक्षेची इस्लामी कल्पना

    जी शिक्षा एखाद्या व्यक्तीस गुन्ह्यांपासून रोखण्यासाठी देण्यात येते, तिला शरियतमध्ये ‘अकूबत‘ असे म्हणतात. शिक्षेची इस्लामी कल्पना व स्वरुप इस्लामध्ये गुन्हेगारास शिक्षा देण्याचे तीन प्रकार आहेत. शरियतने ज्या अपराधांची शिक्षा निश्चित ठरवून दिली आहे, ती शिक्षा या प्रकारात मोडते. उदाहरणार्थ, चोरी करणार्याचे हात कापणे, व्यभिचाराची शिक्षा दगडाने ठेचून ठार मारणे अगर कोरडे मारणे, दारु पिण्याची शिक्षा चाळीस कोरडे मारणे, वगैरे होय. दुसरा प्रकार हा देहदंडाच्या शिक्षेसंबंधी आहे. उदाहरणार्थ, हत्येची शिक्षा मृत्यूदंड, कान कापण्याची शिक्षा कान कापणे, नाक कापण्याची शिक्षा नाक कापणे, हात कापण्याच्या अपराधाची शिक्षा हात कापणे, अर्थातच शरीरास ज्याप्रकारे इजा पोचविण्याचा अपराध केला असेल, अगदी तंतोतंत तशीच शिक्षा देणे हा शिक्षेचा दुसरा प्रकार आहे
  • कुफ्रची वास्तवता व त्यापासून होणारे नुकसान

    जो उपजत मुस्लिम आहे आणि संपूर्ण आयुष्यभर अजाणतेपणे मुस्लिम राहिला. परंतु आपल्या ज्ञानशक्ती व बुद्धीचे सहाय्य घेऊन त्याने आपल्या ईश्वराला ओळखले नाही आणि आपल्या ऐच्छिक कार्यक्षेत्रात त्याने ईश्वराच्या आज्ञा झुगारुन दिल्या. हा मनुष्य काफीर (विद्रोही, श्रद्धाहीन, सत्याचा इन्कार करणारा) आहे. ‘कुफ्र’ चा खरा अर्थ लपविणे, झाकणे असा आहे. अशा माणसाला विद्रोही (काफीर) अशासाठी म्हटले जाते की त्याने आपल्या प्राकृतिक स्वभावावर नादानीचे पांघरूण घातले आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]