Islam Darshan

बहुसंख्याकांची जबाबदारी

Published : Thursday, Mar 03, 2016

आमच्या बहुसंख्यांक बंधूना असे म्हणणे कदाचित व्यर्थ ठरेल की ईश्वराने हा देश यासाठी तुमच्या स्वाधीन केला आहे की तुम्ही काय कर्तृत्व करुन दाखविता. तुमचा तर असा समज आहे, की हा महान देश तुमच्या बलिदानांच्या फलस्वरुप तुम्हाला लाभला आहे. तुम्ही तसेच समजत राहा परंतु थोडेसे थांबून हा विचार करा की स्वतंत्र व शासक लोकसमुदायाची जबाबदारी काय असते? त्यांच्यात कोणते गुण असले पाहिजे? एखाद्या शासकवर्गात सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाचा गुण जो असायला हवा तो औदार्याचा. या मूलभूत गुणांशिवाय वीरता व साहस निर्माण होऊ शकत नाही, जो शासन करण्यासाठी अत्यावश्यक आहे आणि त्यांच्या अभावी कोणताही लोकसमुदाय आजवर कधी विजय मिळवू शकला नाही की श्रेष्ठ राहू शकला नाही. त्याचप्रमाणे सत्तेची नशाही तो पचवू शकलेला नाही. तुम्ही मोठी अनुकंपा दाखवून व तुमच्या गरजांच्या मसलतीनुसार अल्पसंख्याकांना शासनात सहभाग दिल्याचे दाखवित आहात, परंतु प्रत्यक्षात आणि व्यवहारात मात्र तुम्हीच शासकपदावर आहात. म्हणून या देशात वसणार्या अन्य लोकसमुहांपेक्षा तुमची जबाबदारी अधिक मोठी आहे.

बहुसंख्यांक असणे ही काही कमालीची गोष्ट नाही. ज्या गुणांमुळे एखाद्या लोकसमूहला आदर व बल प्राप्त होते, ते गुण आपल्यात निर्माण करणे हे वास्तविकतः अधिक भूषणावह आहे. आपण जरा आपल्या अंतरंगात डोकावून पाहावे की ते गुण व वैशिष्ट्ये तुमच्यात आहेत काय? जर असलेच तर अल्पसंख्याकच काय पण जगातील मोठमोठ्या शक्तीही तुमच्याशी टक्कर घेऊन नष्ट होऊन जातील. यासाठी ईश्वराचे आभर मानायला हवेत. पण जर हे भांडवल तुमच्यापाशी नसेल, तर सर्वाधिक चिता करण्याचा विषय हाच आहे. जातीसमूहांना विजयी करण्यास आवश्यक असणारे हे हत्यार तुम्हाला अमेरिका देणार नाही की अन्य कोणीही देणार नाही. ते हत्यार तर तुम्हाला तुमच्या अंतःकरणाच्या मुशीत ओतूनच निर्माण करावे लागेल.

आपण नवनिर्मिती युगातून जात आहोत. अशा प्रसंगी अल्पसंख्याकांना ठेचून काढण्यात आणि बलहीनांना दाबून ठेवण्यात मोठे शौर्य नाही. उलट एक यथोचित दृष्टिकोन बाळगून व औदार्याचे व सहिष्णुतेचे गुण आपल्यात निर्माण करुन आपल्या जातीसमुदायाची उचित जडणघडण करावी. आपल्यात अशी सहृदयता निर्माण करावी की अत्याचारपीडित लोकांनी तुमचा आश्रय शोधावा. प्रामाणिकपणा, प्रांजळपणा व सत्यप्रियतेचे असे गुण आपल्यात उत्पन्न करावेत की परजातीचे लोकही तुम्हावर प्रेम करु लागावेत. तुमच्यात मोठमोठ्या सच्छील व उच्च नीतिचारित्र्याचे लोक नक्कीच आहेत. ही गोष्ट तोंडपूजा म्हणून केवळ देखाव्यासाठी सांगितली जात नाही. प्रत्यक्षात अशी माणसे अस्तित्वात आहेत. पंरतु माफ करा! तुमचे सामूहिकव्यवहार व वागणूक जी समोर दिसत आहे, ती वेगळीच आहे. ज्या जाती तुमच्यात हजारो वर्षापासून मिसळल्या आहेत, त्यांनाही तुमच्या व्यवहाराचा उबग येऊन, तुमच्यापासून हळूहळू तुटत आहेत. तुमचा असा व्यवहार पाहून एका विचारवंताने म्हटले आहे, ‘‘त्यांना ईश्वराने सर्व काही दिले आहे, परंतु विशाल हृदय, विशाल दृष्टी आणि उच्च धैर्य दिले नाही.’’ काल्पनिक कुशंकेचा वास लागल्याबरोबर तुमची संवेदनशीलता आवश्यकतेपेक्षा अधिक वाढते आणि इतरांना असे म्हणण्याचा अवसर मिळतो की जगात हाच एक असा बहुसंख्यांक जातीसमुदाय आहे, ज्यांना अल्पसंख्यांकांकडून धोक्याची जाणीव होत आहे. ज्या प्राचीन संस्कृतीचे तुम्ही पुनरुज्जीवन करु इच्छिता, त्या संस्कृतीमध्ये निर्बलांना ठेचलेच जाते, त्यांना बंधुभावाने मिठी मारली जात नाही? अहिसा, प्रेम व शांती-सलोखा ही वैशिष्ट्ये असलेली तुमची प्राचीन संस्कृती लाठ्यांनी व बंदुकीच्या गोळ्यांनीच पसरते? तुम्हाला ज्यांचा अभिमान वाटतो ते महान वीरपुरुष व योध्दे, असे भयभीत होऊनच राहात होते? आमच्या माहितीनुसार तर त्यांचे तत्त्व असे होते की ‘झुकलेल्या शिरांवर व दुर्बल शरीरावर जी तलवार उठते, ती वीरांच्या वर्तनाने व व्यवहाराने तुमचा जो परिचय तुम्ही करुन देत आहात, तो तुमच्या उज्वल संस्कृतीचा खराखुरा परिचय आहे? जरा हाच विचार करा. संपूर्ण देशाला एकात्म करण्याचे स्वप्न तुम्ही तुमच्या हातांनी विखुरत आहात, हे चांगले लक्षात घ्या. तुमच्या भाल्याच्या टोकाने अनेक निद्रिस्त माणसे जागी होतील आणि राष्ट्रीय एकात्मतेचे तुमचे स्वप्न उद्ध्वस्त करुन सोडतील. तुम्हाला मोठेपणाच हवा असेल, तर त्यासाठी केवळ बहुसंख्य असणेच पुरेसे नाही. त्यासाठी विशाल हृदयाची व प्रचंड धैर्याची आवश्यकता आहे. क्षमाशीलतेचे धैर्य नसू दे, कमीतकमी न्यायशक्ती तरी स्वतःमध्ये उत्पन्न करा.

अल्पसंख्यांकांना मारून व ठार करुन त्यांना संपवून टाकण्याची तुमच्या मनात सुप्त इच्छा असेल आणि देशात स्मशान शांतता निर्माण करावयाची असेल, तर मात्र आम्हाला काहीही म्हणायचे नाही. तेही करुन पाहा.

राजकीय सत्ता हेच स्वामित्व नाही

 

आपले जे बंधु राजकीय सत्तेच्या खुर्चीवर विराजमान आहेत, त्यांनी चांगले समजून घ्यायला हवे की ते या देशाचे मालक नाहीत. त्या खुर्चीवर निरंतर बसून राहण्याचा त्यांनी ठेका घेतलेला नाही. ते ईश्वराला या देशाचा स्वामी मानत असोत अथवा जनतेला स्वामी मानत असोत, एक दिवस त्यांना ही खुर्ची सोडावी लागणार आहे. त्या खुर्चीचे कर्तव्य त्यांनी कितपत पार पाडले, या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे. ईश्वराला जर ते देशाचा स्वामी मानतात व स्वतःला त्याचा प्रतिनिधी, त्याच्याबद्दलच्या सर्व उत्तरदायित्वाची नीट जाणीव ठेऊन त्याच्या इच्छेनुसार कार्य केले, तर ती वास्तवतेची स्वीकार ठरेल. तुमचे जीवन एक जबाबदार जीवन ठरेल आणि तुमचा सर्व व्यवहार संतुलित असेल. सत्तेच्या त्या मदापासून तुम्ही पूर्णतः अलिप्त असाल, जी भल्याभल्यावर आपला अंमल चढवून त्यांना मदांध व बेहोश करुन सोडते. तुम्ही जनतेला जर, देशाचे स्वामी मानत असतात, तर तुम्ही जनतेचे प्रतिनिधी या नात्याने काम केले पाहिजे. कसल्या दुष्कृत्याला जनतेने कधी क्षमा दाखविली नाही. तुमच्या प्रत्येक कृतीवर इतिहासकारांची नजर आहे. सद्यस्थितीत दोन्ही गोष्टी तुमच्या आखत्यारीत आहेत. तुम्ही असे कार्यही करु शकता की त्यासाठी अनेक पिढ्या तुमच्या कृत्यांवर अभिमान बाळगतील, इतिहासकार आदरपूर्वक तुमचे नाव उच्चारील. तसेच तुम्ही अशी कृतीही करु शकता, ज्यामुळे तुमच्या नावावर भावी पिढ्या थुंकतील व इतिहासतज्ज्ञ आपल्या कृत्यांना ‘काळी कृत्ये’ म्हणून संबोधतील नीट ध्यानात ठेवा. सत्तेच्या खुर्चीवर असताना तुम्हाला स्वतःची जी छबी दिसते, ती तुमच्या प्रतिमेचे खरे चित्र नव्हे. तुमची खरी प्रतिमा उद्या इतिहासकाराच्या लेखणीतून उतरेल.

सत्ता मिळविण्याच्या लालसेने झपाटलेल्या आणि त्यासाठी न्याय, अन्याय, उचित, अनुचित या बाबी धाब्यावर बसवून आटापिटा करणार्यांनीही ही गोष्ट चांगली लक्षात ठेवावी.

संबंधित लेख

  • सत्याच्या आवरणात असत्य

    अल्लाहने मनुष्याची निर्मिती इतक्या उत्तमरीत्या केली आहे की त्याला ईश चमत्कारच मानायला हवे. म्हणूनच तो सैतानाच्या उघड उघड बहकावण्याच्या प्रयत्नाला सहज बळी पडत नाही. सैतान नाईलाजास्तव उपद्रव निर्माण करण्याच्या दुष्ट हेतूने कल्याणकारी स्वरुप धारण करून मानवाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो. स्वर्गात(जन्नतमध्ये) असताना आदम(अ.) यांना ‘‘स्वर्गातून बाहेर पडण्याकरिता अल्लाहची अवज्ञा करा.’’ असा उघड सल्ला न देता ‘‘चला मी तुम्हाला असा वृक्ष दाखवितो ज्यास अमरत्व व अंतहीन शाहीवैभव प्राप्त आहे.’’ असे सांगून फसविले.
  • राजकीय सत्ता हेच स्वामित्व नाही

    या समयी भारत देश सैध्दान्तिक व व्यावहारिक गदारोळाच्या वावटळीत आहे. अशी अवस्था कोणत्याही देशात, एक निश्चित दिशा घेण्याआधी होत असते. एका बाजूला युरोपचे भौतिकवादी विचार व दृष्टिकोन आहेत, जे या देशावर लादले जात आहेत आणि याच विचारांवर आधारित व्यावहारिक पध्दती बनल्या आहेत. राजकीय सत्तेच्या बळावर या देशाला त्यांच्या मुशीत ओतले जात आहे. दुसर्या बाजूला देशाची प्राचीन, धार्मिक व नैतिक प्रकृती आहे. या प्रकृतीचे जठर अद्याप नास्तिकवादाची व भौतिकवादाची माशी पचवू शकण्यास पूर्णतः तयार नाही. नंतर धार्मिक स्वभाव असलेल्या जाती,
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]