Islam Darshan

राजकीय अन्याय व इस्लाम

Published : Wednesday, Mar 02, 2016

सध्या पूर्वेत जो राजकीय अन्याय आढळतो व ज्याची प्रतिक्रिया घरात पुरुषाने पत्नीवर व मुलांवर आपला राग काढण्यात होते, ती इस्लामची निपज आहे काय?

या राजकीय अन्यायाबाबत इस्लामला जबाबदार ठरविले जाऊ शकत नाही कारण तो अन्याय व अत्याचारासमोर मान तुकविण्याची शिकवण देत नसून ताठ मानेने त्याला सामोरे जाण्याची शिकवण देतो. तसेच शासक व शासितांचे परस्पर संबंध न्यायाच्या अधिष्ठानावर स्थापन करतो, एकदा द्वीतीय खलीफा माननीय उमर (र) यांनी सांगितले,

‘‘ऐकून घ्या व आज्ञेचे पालन करा.’ तर एका माणसाने डोके वर करुन उत्तर दिले, ‘आपण पांघरलेली चादर आपण कोठून मिळविली हे जोपर्यंत आपण सांगत नाही, तोपर्यत आम्ही ऐकूनही घेणार नाही व आज्ञेचे पालनही करणार नाही.’ हे उत्तर ऐकून माननीय उमर (र) रागाने लाल झाले नाहीत, उलट त्यांनी त्या व्यक्तीच्या साहसाचे कौतुक व तारीफ केली आणि सर्वांसमोर सत्याचा उल्लेख करुन सांगून टाकले. त्यावर त्या व्यक्तीने पुन्हा उभे राहून म्हटले, आता आपली आज्ञा व्हावी, पालन करण्यास आम्ही हजर आहोत.’’

कोणत्याही शासकाने आपल्या राष्ट्रातील लोकांना अत्याचाराचे लक्ष्य बनवू नये व जनतेत इतके साहस असावे की त्यांनी निर्भीडपणे आपल्या शासकाच्या तोंडावर आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवावी. घरामध्ये आपल्या कुटुंबीयांशी त्यांचे संबंध न्याय, प्रेम व बंधुत्वाच्या पायावर दृढ व्हावेत, अशा प्रकारची शासनपद्धत आम्ही पुन्हा एकदा स्थापन करु इच्छितो.

उच्च मानवी आदर्श व इस्लाम

उच्च मानवी आदर्शाच्या अधःपतनास इस्लाम कारणीभूत आहे काय? याचे उत्तरही नकारात्मकच आहे. इस्लाम उच्च मानवी आदर्शाच्या पतनास कदापिही कारणीभूत नाही, तो तर माणसांना उच्च आदर्शाशी परिचित करुन त्यांना सज्जन बनवितो. त्यानेच पहिल्यांदा मानवाला हे शिकविले की, धन, शक्ती, सत्ता, अधिकार, मानसन्मान व प्रतिष्ठा मोजण्यासाठी सोटा अगर बडगा हे माप नसून पापभीरुता व सद्वर्तन हे त्याचे खरे प्रमाण आहे.

‘‘निस्संशय अल्लाहजवळ तुम्हापैकी सर्वाधिक मान त्याला असेल, जो तुम्हा सर्वांत जास्त पापभीरु आहे.’ (कुकर्मापासून दूर असणारा व सत्कृत्ये करणारा)’’ (कुरआन,अल हुजरात)

इस्लामने शिकविलेल्या या उच्च जीवन आदर्शांना एकदा समाजात दृढता प्राप्त झाली की, नंतर स्त्रीला ती केवळ शारीरिक दृष्टीने कमकुवत आहे म्हणून तिला अनादराच्या दृष्टीने पाहिले जाणार नाही. इस्लामी समाजात माणसाची आपल्या पत्नीशी होणारी वर्तणूक माणुसकीच्या व मानवतेच्या कसोटीवर असते. म्हणून इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांनी असे सांगितले आहे,

‘ज्याचे आपल्या कुटूंबियांशी चांगले वर्तन आहे तो तुम्हापैकी सर्वांत चांगला आहे व स्वतःच्या चांगल्या वर्तनाच्या दृष्टीने मी तुम्हा सर्वांत अधिक चांगला आहे.’ (हदीस)

प्रेषित मुहम्मद (स) यांच्या या विधानाने, त्यांना मानवी शास्त्राचे किती सखोल ज्ञान होते, हे कळून चुकते. त्याचबरोबर हे सत्यही आमच्यासमोर येते, की जेव्हा माणूस मानसशास्त्राचा रुग्ण असेल अथवा माणुसकीच्या स्थानाहून त्याचे अधःपतन झाले असेल तेव्हाच कोणताही पुरुष आपल्या पत्नीशी दुर्वर्तन करणे शक्य होते.

मानवाच्या प्रस्तुत अधोगतीला व जीवनातील त्याच्या पशुवत अवगुणांना इस्लाम कारणीभूत आहे काय? खचितच हे खरे नाही. कारण, माणसाचे इतक्या खालच्या दर्जावर पतन होऊन त्याचे पशुवत जीवन व्यतीत करावे, ही गोष्ट इस्लाम सहन करुच शकत नाही. उलट तो माणसाला आध्यात्मिक दृष्टीने इतका श्रेष्ठ करु इच्छितो, की त्यानंतर माणूस आपल्या इच्छावासनांचा दास होऊच शकत नाही, तसेच जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन पशुवत असूच शकणार नाही. इस्लामच्या दृष्टीने स्त्री पुरुष समागम केवळ पशूसारखा शारीरिक संबंध नसून ती त्यांची एक स्वाभाविक गरज आहे. म्हणून तो पतिपत्नीच्या समागमाला प्रामाणिक कृत्य मानतो, जेणेकरुन स्त्री पुरुष कामपिपासेच्या संकटात गुरफटून न जाता जीवनातील विविध क्षेत्रांत आपली नैसर्गिक कर्तव्ये, पूर्ण निष्ठेने व कळकळीने करीत राहते. कामवासना शमविण्याचा हा उचित मार्गही जर बंद केला गेला तर स्त्री-पुरुष अनीतीला बळी पडतील, हे त्याला माहीत आहे. म्हणून इस्लाम पतीपत्नीच्या समागमास वाईट समजत नाही परंतु मर्यांदेबाहेर विषयासक्ती तो पसंत करत नाही. कारण माणसाने आपली शक्ती उच्च ध्येयाच्या प्राप्तीसाठी खर्च करावी. अशी त्याची इच्छा आहे. पुरुषाने ईश्वरी मार्गात सतत प्रयत्नशील असावे व स्त्रीने घरात राहून मुलांचे संस्कार घडवावेत, तसेच इतर घरगुती कामे व्यवस्थेशीर पार पाडावीत. अशातऱ्हेने, इस्लाम स्त्री पुरुष या दोघांना जीवनाचे उच्च व पवित्र ध्येय देतो व त्यांना माणसासारखे जगण्यास शिकवितो.

नैतिक आदर्शामध्ये आढळणारे दोष इस्लामने आणले आहेत काय? याचे उत्तरही नकारात्मकच आहे, कारण इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांचे चरित्र माणसात आध्यात्मिक, पावित्र्य व मांगल्य निर्माण करतो, व त्याला स्वतःला व्यवहारात इतरांकडून जशी न्यायाची, संयमाची, तसेच मानवतेच्या आदराची अपेक्षा असते तसाच न्याय, संयम व मानवेतचा आधार इतरानांही आपल्या वर्तणुकीतून द्यावा, अशी शिकवण देते.

आमची सामाजिक वागणूक पौर्वात्य स्त्रीच्या मागासलेपणास कारणीभूत आहे काय? काही साहित्यिक म्हणतात तसे या वागणुकीने स्त्रीला विचारहीन संकुचित दृष्टीची व अडाणी करुन ठेवली आहे काय? मुळीच नाही, असेही नाही. आमची सामाजिक वर्तणूक आम्हाला शिक्षण प्राप्त करण्यापासून रोखत नाही, तसेच कष्ट करण्यापासून रोखत नाही. तसेच इतरांशी सहकार्य करण्याच्या मार्गातही अडसर घालीत नाही.

आमची ही रीत (रिवायत) ज्या गोष्टींना विरोध करते ती काही हानीकारक व मूर्खपणाचे कृत्यें होत. जसे स्त्रियांनी अनावश्यक तऱ्हेने घराबाहेर पडून रस्त्यावर नखरा व हावभाव करीत हिडणे वगैरे. अशा तऱ्हेच्या बाहेरच्या कृती व हालचाली करून स्त्री आपल्या स्त्रीत्वाची योग्यता व क्षमता संपूर्णपणे कार्यान्वित करू शकत नाही. त्यामुळे समाजात तिला कसलाही आदर व प्रतिष्ठा मिळू शकत नाही. या गोष्टींचा कोणीही इन्कार करू शकणार नाही अशी आमची खात्री आहे. स्त्रिया या मार्गाने गेल्या तर पश्चिमेतील सुसंस्कृत व उज्वल विचारांच्या ‘सोसायटी गर्ल’ चा अनुभव आम्हाला जे दाखवितो तसे स्त्रिया पुरुषांच्या कामवासनेला सहजपणे बळी पडतील. म्हणून जे लोक जुन्या चालरीतींचा विरोध करतात त्याचे खरे कारण, इस्लाम त्यांना ज्याची लत लागली आहे त्या कामविलासाची परवानगी देत नाही तेच आहे.

इस्लामवर आघात करण्याची एकही संधी वाया जाऊ न देणारा, इजिप्तमधील एक मुस्लिमेतर साहित्यिक२ आपल्या साप्ताहिक पत्रकाद्वारा मुस्लिम स्त्रियांना वारंवार अशी चेतना व प्रेरणा देत असे की, ‘आपली जुनाट पद्धत मोडून फेकून द्या, घराबाहेर पडा, धीटपणाने व साहसाने पुरुषात मिसळा, आणि कार्यांलयात तसेच कारखान्यात कामे करा.’ ही सर्व कामे, गरज आहे म्हणून तुम्हाला करावयाची आवश्यकता नसून, असे केल्याने मानववंशाची माता असण्याच्या भूमिकेतून जी कर्तव्ये तुमच्यावर लादली गेली आहेत, त्यापासून सुटका मिळविण्यासाठी हे सर्व करावयाचे आहे.

  1. ‘रिवायत’ चा आमचा अर्थ शुद्ध व खरीखुरी इस्लामी रिवायत आहे व इतरांकडून आयात केल्या गेलेल्या अपरिचित रिवायत असा आमचा हेतू नाही परंतू ही विचित्र आहे की जे रिवायतीविरुद्ध आहेत, ते आपल्या वार्तालापात व लिखाणात, या दोहोंतील फरक नजरेसमोर ठेवीत नाहीत.
  2. येथे ज्या साहित्यिकाचा उल्लेख केला आहे, त्याचे नाव सलमा मूसा असे होते. त्याचे लेख इस्लाम वैराचा एक नमूना होते. त्यात इस्लावर कसलीतरी शंकाकुशंका सतत असे. असाच प्रकार दुसरा एक ख्रिश्चन साहित्यिक जरजी जैदानचाही होता. इजिप्तमधील इस्लामविरोधी आघाडीतील हे शिरोमणी होते.

हे साहेब स्त्रियांना हेही सांगतात की, रस्त्याने चालताना जी स्त्री दृष्टी खाली ठेवून चालते, ती पुरुषाला घाबरत असते, परंतु अनुभवाने जेव्हा तिचे विचार उज्वल होतील तेव्हा ही भीती आपोआपच नष्ट होईल. ती धैर्याने पुरुषांचा सामना करु शकेल.

माननीय आयशा (र) ज्यांनी त्या वेळच्या राजकारणात भरपूर भाग घेतला होता, तसेच ज्यांनी युद्धांमध्ये सेनेचे नेतृत्व केले होते, त्यासुद्धा पुरुषांशी पडदा पाळीत होत्या. इतिहासाचा या साहित्यिकांना अशा गोष्टी सांगताना संपूर्ण विसर पडला. दृष्टी जमिनीवर खाली ठेवणे हे केवळ स्त्रियांचे वैशिष्ट्य नाही. इतिहासाची साक्ष आहे की इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) कुमारिकापेक्षाही अधिक लाजरे होते. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या या लाजरेपणाचे कारण, त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव होता काय? ते स्वतः अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स) आहेत, हे त्यांना ठाऊक नव्हते काय? इस्लामला विरोध करणारे, कोठवर अशा निरर्थक व मूर्खपणाच्या गोष्टी घडवित राहातील?

आज स्त्रीला ज्या अनादाराला तोंड द्यावे लागत आहे, ती वास्तवता असून त्याचा कोणी इन्कार करु शकत नाही. परंतु पाश्चात्य स्त्रीने जो अवलंब केला आहे तो त्यावरील तोडगा नाही. कारण पाश्चात्य स्त्रीला ज्या परिस्थितीशी तोंड द्यावे लागले होते ती एक विशिष्ट प्रकारची होती. तेथील स्त्रियांच्या मार्गभ्रष्टतेची जी रुपे दृष्टीस पडतात, तीसुद्धा त्याच परिस्थितीची निपज होती.

संबंधित लेख

  • व्याज निषिद्ध असण्याचे काय कारण आहे?

    ‘व्याज’ ही इतकी वाईट बाब व महापाप आहे की, अल्लाह व त्याच्या प्रेषितांनी त्या महापापीविरुद्ध युद्ध पुकारले आणि आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी म्हटले की, व्याजाचा व्यवहार करणे हे छत्तीस वेळा व्यभिचार करण्यासम पाप आहे. प्रश्न हा आहे की, इस्लाम धर्मास व्याजव्यवहाराचा एवढा तिरस्कार व घृणा असण्याचे मूळ कारण काय आहे? इतर पापांविषयी एवढा तिरस्कार नसून शेवटी याच पातककर्माशी एवढी तेढ असण्याचे काय कारण आहे? या प्रकरणात याच प्रश्नाचे समाधान करण्यात आले आहे.
  • इस्लाम व दहशतवाद

    आपला स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी दहशतवादाचा वापर करण्याची पद्धत जुनी आहे. कधी कधी व्यक्तीकडून ते काम झालेले आहे, कधी लोकांच्या समूहाकडून ते झाले आहे, तर कधी कधी सत्ताधीशांकडून व सरकारांकडूनही ते झाले आहे. आधुनिक युगाचा इतिहास हे स्पष्टपणे दर्शवितो की दहशतवादाचा आरंभ युरोपातून झालेला आहे आणि तेथेच त्याला राजकारणाचे साधनही बनविण्यात आले आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]