Islam Darshan

पाश्चिमात्यांच्या प्रगतीची वास्तवता

Published : Wednesday, Mar 02, 2016

इस्लाम मानवतेची एकमात्र आशा आहे आणि इस्लामशीच मानवतेचे भवितव्य निगडीत आहे. वर्तमान सिद्धान्तातील संघर्षामध्ये इस्लामी दृष्टिकोनाला यश प्राप्त होणे, हे मानवाच्या मुक्तीची शाश्वती होऊ शकते. इस्लामचे यश इतके महत्त्वाचे असूनसुद्धा ते प्राप्त होणे म्हणजेच हे असंभवनीय नाही. जशी गतकाळात होती तशीच इस्लामी व्यवस्था स्थापित करणे आजही शक्य आहे. फक्त अट अशी की त्याच्या सीमारेषेत सामील झालेल्या सर्व लोकांनी आजच जर अशी प्रतिज्ञा केली की ते इस्लामला सबंध जगावर प्रभावी व यशस्वी केल्याविना स्वस्थ बसणार नाहीत, तरी शक्य आहे. याकरिता त्यांना कुठल्याही बाह्य शक्तीची गरज उरणार नाही. प्रत्येक क्षणी डोक्यावर असलेल्या तिसऱ्या महायुद्धाच्या भयाचा शेवट, मानसिक दडपण, रोगराई तसेच मानसशास्त्रीय ताणतणावावरील उपाय म्हणजेच दुसऱ्या शब्दात आनंद, सुखसमाधान, शांतीपूर्ण प्रिय जीवन असाच अर्थ मानवाकरिता या इस्लामी विजयाचा होईल.

पाश्चिमात्यांच्या प्रगतीची वास्तवता

या समस्यांच्या आणखी एका पैलूवर एक दृष्टिक्षेप टाकू या, आज पाश्चिमात्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात जरी अनेक सफलता व यश प्राप्त केले असले, तरी मानवतेच्या क्षेत्रात ते अद्याप मागासलेले व रानटी आहेत. विज्ञानाने त्यांना भौतिक समृद्धी दिली परंतु सज्जन माणसे दिली नाहीत. मानवतेची प्रगती खुंटली आहे. त्यांची मने श्रेष्ठ मानवी मूल्यांनी रिक्त आहेत. आधुनिक संस्कृतीने अध्यात्मापेक्षा द्रव्यावरच अधिक जोर दिला आहे व अध्यात्माऐवजी भौतिक समृद्धीला प्रामुख्य दिलेले आहे. ह्याचा परिणाम असा निघाला की प्रत्येक व्यक्ती उच्च सामाजिक उद्देशापेक्षा व कल्याणापेक्षा आपला स्वार्थ, आपले सुख, वैभव व आपले स्वार्थपूर्ण उद्देशांची प्राप्ती अधिक महत्त्वपूर्ण मानू लागली आहे. माणूस आज शारीरिक स्वादाच्या व रुचीच्या शोधात व्यस्त असलेला दिसून येतो, त्याचे हेच खरे कारण आहे. यावरुन हे स्पष्ट होते की अशा अवस्थेला मानवाची प्रगती वा मानवतेचा विकास असे म्हटले जाऊ शकत नाही. कारण माणसाच्या व मानवतेच्या उन्नतीचा अर्थ केवळ भौतिक व वैज्ञानिक प्रगतीच नसून, भौतिकता व पाशवी इच्छा लालसेपासून मुक्ती हेही त्याच अर्थात सामील आहेत. केवळ इस्लामच मानवतेला खऱ्याखुऱ्या प्रगतीपथापर्यंत आणून सोडू शकतो, म्हणून हेच ते स्थान आहे जेथे इस्लाम आमचा मार्गदर्शक ठरतो.

खऱ्या प्रगतीचे प्रमाण

अतिवेगवान जहाजांना, विमानांना अणुबाँबना, रेडिओला व झगझगीत बल्बांना प्रगती म्हणत नाहीत, त्यांना प्रगती मानने चूक होईल. कारण या वस्तू प्रगतीचे मोजमाप करण्याचे कसलेही प्रमाण आम्हाला देत नाहीत. जर खरी प्रगती जाणून घ्यावयाची असेल, तर माणसाने आपल्या पाशवी भावना आपल्या काबूत ठेवल्या आहेत की त्यांच्या हातातील तो एक खेळणे बनला आहे हे पाहिले पाहिजे. जर माणूस आता आपल्या इच्छावासनांसमोर विवश व त्यांच्या अधीन असेल व त्यांच्या पलीकडे कुठल्याही गोष्टीचा विचार करुच शकत नसेल तर हे नक्की समजा की माणूस खऱ्या प्रगतीपासून फार फार दूर आहे. मानवी रुपाने वैज्ञानिक क्षेत्रामध्ये डोळे दिपविणारे अनेक यश मिळवूनसुद्धा त्याची अवस्था दयनीय आहे, त्याला प्रगत अथवा यशस्वी तर म्हटलेच जाऊ शकत नाही.

प्रगतीच्या मोजमापाचे हे प्रमाण धर्म व नीतीने स्वतः निर्मिले असे प्रमाण नाही. ते बाहेरून कोठूनतरी आणून माणसावर लादले गेले, ही अनुमानाची गोष्ट नसून, वास्तवता आहे. त्याची पाळेमुळे मानवी स्वभावधर्मात दूरवर पोहोचलेली आहेत. म्हणून हे एक अपरिहार्य सत्य आहे की या नैतिक व मानवतेचे कल्याणकारी प्रमाण सोडून देऊन, जर एखादी जात, सुख वैभवात अडकली गेली तर ती फिरुन पुन्हा कधी आपली पूर्वीची महानता, प्रतिष्ठा व वैभव टिकऊ शकेल अशायोग्य होऊच शकली नाही, अथवा मानवतेच्या सामुदायिक प्रगती व कल्याणाचे एखादे कार्य करू शकली नाही. प्राचीन ग्रीस असो अथवा इराण व रोमन साम्राज्याचा ऱ्हास असो, अथवा अब्बासी कालाच्या अखेर स्वतः मुस्लिमांच्या वैभवाचा झालेला ऱ्हास असो, या सर्वांत आम्हाला भोगविलासाचा विनाशकारी प्रभावच कार्यरत असल्याचे दिसतो. वर्तमानकाळातील इतिहासात भोगवादी फ्रान्स राष्ट्राच्या लज्जास्पद चारित्र्याला कोण विसरू शकतो, जे फ्रान्सने दुसऱ्या महायुद्धात प्रस्तुत केले. शत्रूसमोर हत्यार टाकून देण्यात त्या राष्ट्राने क्षणभरही विलंब केला नाही, उलट एका आठवड्यातच नतमस्तक होऊन, शत्रूसमोर शरण आले. तो शत्रूचा एकही वार सहन करु शकला नाही. कारण तेथील जनतेला आपल्या राष्ट्राच्या रक्षणापेक्षा कित्येक पटीने अधिक आपले प्राण, आपली मालमत्ता व आपले सुखवैभव यांचीच चिता पडली होती. आपल्या राष्ट्राच्या महानतेपेक्षा, त्याच्या किर्ती व नावापेक्षा अधिक चिता त्यांना या गोष्टीची होती की शक्य त्या तऱ्हेने त्यांची राजधानी पॅरीस व तेथील नृत्यगृहे, शत्रूच्या बाँबफेकीपासून सुरक्षित राहवीत.

काही अज्ञानी लोक, या संदर्भात अमेरिकेचे उदाहरण पुढे करतात आणि असे म्हणतात की तेथील लोक सर्व प्रकारच्या भोगविलासात, भौतिक जगाचा आस्वाद घेण्यात व सुख-वैभवात पूर्णपणे बुडालेले आहेत. परंतु असे असूनसुद्धा जगात त्यांना शक्ती, वैभव व प्रतिष्ठा प्राप्त आहे. भौतिक वस्तुंच्या उत्पादनाच्या दृष्टिने, त्यांचा देश जगातील उच्चस्थानावर आहे. खात्रीने या साऱ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण आमचे हे मित्र विसरतात की भौतिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून अमेरिका जगातील राष्ट्रसंघाच्या भावकीत अद्याप एक नवशक्ती आहे. हे सर्वांना ठाऊक आहे की यौवनामध्ये सुरुवातीला पुष्कळसे गुप्तरोग दडलेले असतात व प्रत्यक्षात त्यांचे कुठलेही चिन्ह दिसत नाही. कारण समाजव्यवस्थेत अजून एवढी प्रतिकार शक्ती शिल्लक असते की ते भिन्न भिन्न रोगांच्या बाह्यचिन्हांना, लक्षणांना प्रकट होऊ देत नाहीत. पण उघड्या डोळ्यांनी पाहून एखाद्या समाजाचे दर्शनी स्वास्थ अथवा झगमगाट पाहून फसू शकत नाही. तसेच रुचकर व मनोहर खुल्या वातावरणात लपलेल्या घातक रोगांची चिन्हे त्याच्या नजरेआड होऊ शकत नाहीत. वास्तविकपणे नैतिक दृष्टिकोनातून अमेरिकेची ही अवस्था पश्चिमेतील इतर राष्ट्रांपेक्षा काही अधिक चांगली नाही, हे खालील दोन गोष्टीवरुन सहज लक्षात येण्यासारखे आहे. त्यावरुन हेही कळून चुकते की आपण एकूण प्रगती व यश मिळविलेले असूनसुद्धा विज्ञान हे ईश्वरी कायद्याचेच एक अंग आहे. तोच ईश्वरी कायदा परिस्थिती व घटना यापासून स्वतंत्र असून अधिक श्रेष्ठ आहे.

‘‘तर तुम्हाला अल्लाहचे विधान कधीही बदललेले आढळणार नाही.’’ (३५:४२)

दोन बातम्या

काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रातील एका बातमीत असे दर्शविलेले होते की अमेरिकेच्या विदेशमंत्रालयाने आपल्या ३३ कर्मचाऱ्यांना संशयास्पद हालचालीकरिता व आपल्या देशाच्या गुप्त बातम्या शत्रुला दिल्याच्या आरोपासाठी नोकरीतून काढून टाकले. दुसऱ्या बातमीचा सारांश असा की अमेरिकन सैन्यात या क्षणी १,२०,००० सैनिक पळपुटे आहेत. तव्हा अमेरिकन राष्ट्र बाल्यावस्थेत जात आहे व जगावर आपले प्रभुत्व स्थापन करुन जगाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहत आहे, अशा काळी अमेरिकन सैन्याची एकूण संख्या पाहता पळपुट्यांची ही संख्या फार मोठी वाटते.

हा फक्त आरंभच आहे. जीवनात आपल्या वर्तमान भौतिकवादी जीवनपद्धतीपासून कोणत्याही परिस्थितीत जर अमेरिकन राष्ट्र परावृत्त झाले नाही तर त्याचा परिणाम शेवटी असाच होईल जसा त्याच्या पूर्वीच्या राष्ट्रांचा झाला आहे. कारण हाच अटळ सृष्टीनियम आहे.

या वार्तेने अमेरिकन चित्राची केवळ एकच बाजू आमच्यापुढे स्पष्ट होते, दुसऱ्या बाजूकडे डोकावून पाहिले तर आम्हाला हे कळून चुकेल की अपार भौतिक उत्पादन साधने असूनसुद्धा अमेरिकन राष्ट्र उच्च नैतिकमूल्ये व सिद्धान्ताच्या क्षेत्रात आश्चर्यजनक मर्यादेपर्यंत वांझोटे सिद्ध झाले आहे. याचे कारण सबंध राष्ट्राच्या रुपाने ते भौतिक सुखवैभवामध्ये व इच्छावासनामध्ये पूर्णपणे बुडाले आहे. अद्यापपर्यंत पाशवी भावनांपासून पूर्णपणे मुक्त होऊन, अडचणीचे व समस्यांचे अवलोकन करण्याचे भाग्य त्याला फार कमी प्रमाणात मिळाले. काळ्या निग्रोशी जे रानटीपणाचे वर्तन तेथे केले जात आहे ते त्या राष्ट्राच्या अगदी खालच्या दर्जाचे व दयनीय नैतिक पतन असल्याचे द्योतक आहे. पाशवी इच्छावासनांचा माणुसकीवर एवढा मोठा प्रभाव आहे की माणसे इच्छालालसांच्या पूर्तीतच किबहुना तिच्या भक्तीतच रत आहेत. हा मानवतेचा घोर अपमान आहे व तिच्या अस्तित्वात तो कधीही प्रगतीच्या मार्गाने पुढे जाऊ शकत नाही.

आजच्या जगाची ही प्रतिमा फार अंधकारमय आहे, पण मुक्तीचा एक मार्ग अजून शिल्लक आहे व तो इस्लामचा मार्ग आहे. ज्याप्रमाणे १३ व्या शतकापूर्वी, त्याने माणसाला पाशवी इच्छावासनांच्या पंजातून सोडविले, त्याप्रमाणे आजही तो माणसाला मुक्ती मिळवून देऊ शकतो. मनुष्याला त्याला इच्छावासनांच्या प्रभुत्वातून मुक्त करुन, त्याला तो असा बनवू शकतो की आपले आध्यात्मिक स्तर उंचावण्याकरिता तो आपल्या मनाची व बुद्धीची सर्व शक्ती खर्च करील, जेणेकरून त्याचे जीवन सदाचारांनी व पुण्याईने भरुन जाईल व चहूदिशांत त्याचेच कौतुक होईल.

संबंधित लेख

  • मानवजातीचे मूळ एक आहे

    पवित्र कुरआनने वारंवार हे सत्य स्पष्ट केले आहे की मानवजातीचा प्रारंभ एकाच जीवापासून झालेला आहे. त्याच्यापासून त्याची जोडी निर्माण केली आणि नंतर त्या दोघांपासून त्यांचा वंश वृद्धिगत झाला. परिवार आणि टोळ्या अस्तित्वात आल्या. जाती व जमातींनी जन्म घेतला आणि मानव वस्ती पृथ्वीच्या वेगवेगळ्या प्रदेशात व क्षेत्रात वाढत गेली.
  • ईश्वर आणि त्याची गुण वैशिष्ट्ये

    इस्लाममध्ये ईश्वराचे-अल्लाहचे स्वरुप अत्यंत स्पष्ट, पवित्र आणि बुद्धीला व आत्म्याला पटणारे आहे. त्यामध्ये कुठलीही अस्पष्टता, भेसळ, संदिग्धता किंवा बुद्धीविरुद्ध गोष्ट नाही. ईश्वर एक आणि एकमेव आहे. त्याच्या ईश्वरतत्वामध्ये कोणीही भागीदार नाही. तो या सृष्टीचा एकमेव निर्माता, पालनकर्ता, मालक, शासक, अन्नदाता आणि आदेश देणारा आहे. त्याच्या कोणत्याही गुणधर्मामध्ये कोणीही सहभागी नाही. तो स्वयंभू आहे, कायमस्वरुपी आहे आणि कायमस्वरुपी राहील. त्याला मृत्यु नाही, तो तहान-भूक, आसक्ती, सकल मानवी इच्छा, आकांक्षा आणि प्रत्येक प्रकारचे मानवी दोष आणि कमतरता यांपासून पवित्र आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]