Islam Darshan

इस्लामी कायदा आणि उपासना

Published : Sunday, Feb 28, 2016

भक्तीचे स्वरुप: धर्म म्हणजे दुसऱ्या शब्दांत अल्लाहची भक्ती करणे आहे. अल्लाहची उपासना (ईबादत) म्हणजेच धर्म होय. भक्तीचे महत्त्व व स्वरुप लोकांना अल्लाहची भक्ती करण्यास सांगणे आहे. आज्ञाधारकता आणि भक्ती उपासनेमुळे मनुष्याचे मन शुध्द आणि उदात्त बनते आणि मनुष्य अल्लाहची प्रसन्नता आणि कृपा प्राप्त करण्यास योग्य बनतो. ही एक साधारण कल्पना आहे धर्माबद्दलची आणि त्याचे आपण खंडन करू शकत नाही. कुरआननुसार हे एक उघड सत्य आहे. प्रत्येक प्रेषिताचे जीवनध्येय हेच होते,

‘‘अल्लाहची भक्ती करा आणि अनिर्बंध बनलेल्या (खोट्या ईश्वरांच्या) उपासनेपासून अलिप्त राहा.’’ (कुरआन १६: ३६)

प्रेषित मुहम्मद (स.) यांनीसुध्दा हाच संदेश आणि शिकवण लोकांना दिली आहे. कुरानोक्ती आहे,

‘‘लोक हो! उपासना (भक्ती) करा आपल्या पालनकर्त्यांची ज्याने तुम्हाला आणि तुमच्या पूर्वीच्यांनाही निर्माण केले.’’ (कुरआन २: २१)

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की मनुष्याला या जगात निर्माण करण्याचा एकमेव उद्देश हाच आहे की त्याने अल्लाहची भक्ती करावी. अल्लाहने कुरआनमध्ये स्पष्ट आदेश दिला आहे,

‘‘मी जिन्न आणि माणसांना याशिवाय कोणत्याही अन्य कामासाठी निर्माण केले नाही की त्यांनी माझी भक्ती करावी.’’ (कुरआन ५१: ५६)

म्हणून मनुष्यजातीला निर्माण करण्याचा उद्देश अन्य कोणताही नसून अल्लाहची भक्ती करणे हाच आहे. याच कार्यासाठी अल्लाहने अनेकानेक प्रेषित पाठविले जेणेकरून त्यांनी या उद्देशाचे (अल्लाहची भक्ती करण्याचे) स्मरण लोकांना करून द्यावे. अशा प्रकारे या दोन गोष्टी एकमेकांत गुंफलेल्या आहेत. मनुष्यजातीच्या निर्मितीचा उद्देश स्पष्ट करण्यात आला आणि प्रेषितांचे कार्य उघड केले. त्यांचे कार्य अगदी सरळ आणि अन्य कोणतेही नव्हते. प्रत्येक प्रेषितांचे जीवनकार्य मनुष्यजातीला एकाच अल्लाहची भक्ती करण्याचे स्मरण करून देणे होते.

भक्तीचा अर्थ: भक्तीचे महत्त्व आणि स्वरुप लक्षात घेता हे स्पष्ट होते की भक्ती आणि इस्लाम एकमेकांशी संबंधीत आहेत. इस्लाम एक परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे. ही जीवनव्यवस्था सर्वसमावेशक आहे. मनुष्याच्या पूर्ण जीवनाचे नियंत्रण ही व्यवस्था करते. धर्माच्या मर्यादित आणि चुकीच्या संकल्पनेमुळे धर्माला अनेक कप्यांमध्ये विभाजित करण्यात आले.

व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केला तर भावनाशील व्यक्तीला म्हणावे लागेल की ही एक असामान्य गोष्ट आहे. भक्तीचा इस्लामी कायद्याशी प्रत्यक्ष आणि जवळच्या संबंध आहे, भक्तीच्या इस्लामी संकल्पनेमुळे श्रध्दा, उपासना, श्रध्देची वैशिष्ट्ये याबद्दल जास्त गांभीर्याने आणि औत्सुक्याने लक्षपूर्वक आचरणात आणणे अल्लाहची खरी भक्ती आहे. याबद्दलचे अज्ञान मनुष्याला विनाशाकडे ढकलून देते. अज्ञानापोटी एखादी व्यक्ती त्याच्या मर्जीनुसार भक्तीकडे पाहते आणि त्याला जे आवडत नाही त्या विभागाकडे दुर्लक्ष करते.

भक्ती या शब्दाचा अर्थ आणि स्वरुप कुरआन व हदीसनुसार काय आहे? या प्रश्नाचे उत्तर सविस्तरपणे आपण पाहू या.

शब्दशः अर्थ: शब्दाचा कोशार्थ हा आहे की ‘‘भक्ती म्हणजे लोटांगण घेणे’’, ‘‘भक्ती म्हणजे आज्ञाधारकता (लिसाने अरब)’’. तो अल्लाहची प्रार्थना करतो म्हणजे अल्लाहची भक्ती करतो. भक्तीचा अर्थ एकाजवळ एक तर दुसऱ्याजवळ दुसरा असू शकतो, परंतु वास्तविकता तशी नाही. भक्तीचा खरा अर्थ वर नमूद केल्याप्रमाणेच आहे. उदा.- पूर्ण आज्ञाधारकता, नतमस्तक होणे, लोटांगण घेणे, दुसऱ्यासमोर स्वतःला तुच्छ लेखणे इ. स्वाभाविकपणे नतमस्तक होणे अथवा लोटांगण घेण्यासाठी पूर्ण आज्ञाधारकता आवश्यक असते आणि पूर्ण आज्ञाधारकता म्हणजेच भक्ती होय. ज्या ईश्वराजवळ असीम दया आणि परम कृपा आहे त्याच्याचसमोर मनुष्य पूर्ण आज्ञाधारकता स्वीकारून स्वतःला तुच्छ लेखून लोटांगण घेतो. ही आज्ञाधारकता आणि नतमस्तक होणे अथवा लोटांगण घेणे भक्तीचाच एक प्रकार आहे. म्हणून स्वाभाविकपणे प्रार्थना, नमाज ही भक्तीच आहे.

वर नमूद केलेल्या खुलाशावर आपण विचार केला तर आपणास इस्लामला अपेक्षित भक्तीची पूर्ण कल्पना येईल. तसेच भक्तीचे स्वरुपसुध्दा स्पष्ट होईल. अल्लाहचा भक्त कोण आहे? अल्लाह सार्वभौम आहे आणि मनुष्याचा खरा अन्नदाता आहे. म्हणून त्याच्यासमोर वरवरचे आणि दिखाव्याचे लोटांगण घेणे अथवा नतमस्तक होणे हे बुध्दीला न पटण्यासारखे आहे. ही खरी भक्ती नाही. हे असे आहे जसे अग्नीविना आग प्रज्वलित करणे होय. थोडक्यात अल्लाहसमोर पूर्ण आज्ञांकित होणे म्हणजे पूर्ण लोटांगण (नतमस्तक) घेणे, पूर्ण आज्ञाधारकता स्वीकारने हीच भक्ती होय.

धार्मिक संकल्पना: वरील विवेचनावरून भक्तीचा शब्दशः अर्थ आपण पाहिला. आता त्याचा धार्मिक अर्थ पाहू या. हे निर्विवादित सत्य आहे की प्रेषित या भूतलावर मनुष्याच्या मार्गदर्शनासाठी येत गेले. त्यांनी अल्लाहची भक्ती (इबादत) करण्यासाठी मनुष्यजातीला स्पष्टपणे बजावून सांगितले. मनुष्यजात अल्लाहची भक्ती करण्यासाठी निर्माण केली गेली आहे, तर मग सर्व प्रेषितांचे कार्य एकच एक असणार ते म्हणजे अल्लाहची भक्ती करण्याचा हुकूम मनुष्यजातीला देणे व स्मरण करून देणे आहे आणि त्याद्वारे मनुष्याला अल्लाहचा सच्चा सेवक (गुलाम) बनविणे. अशा प्रकारे सर्व प्रेषितांनी जे सांगितले आणि शिकवण दिली ती फक्त एक अल्लाहची भक्ती होती.

अशा प्रकारे प्रेषितांना मनुष्यजातीसाठी एकच एक उद्देश आणि कार्य सोपवून पाठविले गेले होते ते म्हणजे एका अल्लाहची भक्ती करणे आणि अल्लाहचा सच्चा गुलाम (दास) बनून राहाणे. कोणत्याही प्रेषिताने याव्यतिरिक्त दुसरे कार्य केले नाही. सर्वसामान्य मनुष्याला सोपवलेले कार्य तो पार पाडण्याचे प्रयत्न करतो आणि त्यापासून विमुख होत नाही. तर प्रेषितांना सोपविलेल्या कार्यापासून ते विमुख होणे अशक्यप्राय गोष्ट आहे. अल्लाहच्या आज्ञाधारकतेचे प्रेषित हे एक आदर्श उदाहरण आहेत. त्यांची दृष्टी त्यांच्या कार्यावर स्थितरावलेली होती. त्यांनी मनुष्यजातीला दिव्य संदेश दिला. त्यांनी स्वतःचे असे काहीच सांगितले नाही. अशा प्रकारे ते आपल्या ध्येयापासून कधीही विचलित होणारच नव्हते. जे काही सांगितले आणि शिकवण दिली ती दुसरे तिसरे काही नसून अल्लाहची भक्ती (इबादत) आहे. प्रेषितांनी दिलेली शिकवण मग ती श्रध्देविषयीची असो अथवा सामाजिक, सांस्कृतिक विषयांची असो, काहीएक फरक पडत नाही. नमाज अदा करण्यासाठी घालून दिलेल्या विधीनियमांचे पालन तंतोतंत करणे तितकेच महत्त्वाचे आहे जितके सामाजिक आणि वैयक्तिक जीवनासाठी घालून दिलेल्या विधीनियमांचे पालन करणे आहे. दुसऱ्या शब्दांत, भक्ती म्हणजे (अल्लाहची भक्ती) धर्माचे आणि सर्व इस्लामी कायद्यांचे परिपूर्ण पालन करण्याचे आदेश आहेत. याच कारणासाठी मनुष्यनिर्मिती करण्यात आली आणि प्रेषितांना या भूतलावर अल्लाहने पाठविले. मनुष्य जितक्या जास्त प्रमाणात अल्लाहच्या आदेशांचे (इस्लामी कायद्याचे) पालन करील तितक्या जास्त प्रमाणात तो अल्लाहचा परिपूर्ण भक्त ठरेल. याच्या विरोधात जितक्या कमी प्रमाणात तो इस्लामी कायद्याचे पालन करील तितकाच कच्चा तो अल्लाहच्या भक्ती (इबादत) साठी सिध्द होईल.

मूलभूत सत्य आणि वैश्विक प्रामाणिक (धार्मिक) तत्त्वांनुसार भक्तीचा अर्थ वर नमूद केल्याप्रमाणेच आहे. कुरआननुसार मानवनिर्मितीचा मूळ उद्देश अल्लाहची भक्ती हाच आहे. म्हणून मनुष्याची प्रथम आणि शेवटची स्थिती अल्लाहच्या गुलामाचीच आहे. म्हणूनच या सत्त्याला कुरआन पुन्हा पुन्हा सांगत आहे. आता आपण गुलामाची वास्तविक स्थिती काय आहे ते पाहू या. गुलामाला एखादा मालक खरेदी करतो तेव्हा तो गुलाम त्याचा चोवीस तास गुलामच राहातो. तो गुलाम दिवसभर मालकाची सेवा करत राहातो. परंतु वस्तुस्थिती ही आहे की गुलामाचा मालक त्याचा खरा मालक नसतोच. त्याने तर त्या गुलामाच्या फक्त कार्यशक्तीलाच विकत घेतले आहे. परंतु मनुष्य ईश्वराचा परिपूर्ण गुलाम असतो की त्याच्या प्रत्येक अवयवावर, अणुरेणुवर ईश्वराचा ताबा असतो. त्याच्याकडे जे काही आहे ते ईश्वराचे आहे. मनुष्याचे सर्वकाही ईश्वराचेच असते, त्यात कुणाचीही भागीदारी नसते. खऱ्या मुस्लिमाचा विचार केला तर तो फक्त जन्मतःच अल्लाहचा गुलाम नाही तर साक्षीपूर्वक व शपथपूर्वक आश्वासन देऊन अल्लाहचा गुलाम बनतो. कुरआन या सत्यतेला स्पष्ट करीत आहे,

‘‘अल्लाहने श्रध्दावंतांचे (मुस्लिमांचे) जीव आणि वित्त स्वर्गाच्या मोबदल्यात खरेदी केले आहेत.’’ (कुरआन ९: ३)

म्हणून एक श्रध्दावंत (मुस्लिम) अल्लाहचा गुलाम आहे. तो फक्त त्याच्या कार्यशक्तीनुसारच नाही तर सर्व दृष्टीने अल्लाहचा गुलाम आहे. तो अल्लाहची निर्मिती आणि खरेदी केलेला गुलाम आहे. हा सौदा त्याच्या स्वच्छेने झाला आहे. मनुष्यावर बळजबरी अत्याचार करून नव्हे. मुस्लिम (श्रध्दावंत) जन्मजात अल्लाहचा गुलाम असतो ज्याने स्वतःला पूर्णपणे अल्लाहपाशी विकून टाकले आहे. तो अल्लाहच्या आज्ञाधारकतेसाठी जे काही करतो त्या कृत्यास त्याच्या गुलामीच्या स्थितीपासून वेगळे करता येतच नाही. तो दुसरे तिसरे काही नसून गुलाम आहे म्हणून त्याचे प्रत्येक कृत्य आज्ञाधारकतेचेच असते. तो दैनंदिन लहानातील लहान कामे ईशआदेशानुसार करतो. ती सर्व कामे ईशभक्तीत मोडतात.

वरील सर्व चर्चा अनुमानिक स्वरुपाची आहे आणि मूलभूत धार्मिक तत्त्वांवर आधारित आहे. परंतु अनुमान स्वरुपाची चर्चा असूनसुध्दा पुढे ती ईशआदेशांचा आधार आपोआप घेते आणि त्यास चर्चेसाठी आव्हान देणेसुध्दा अशक्य होते.

संबंधित लेख

  • राजकारण धर्मकारणाचा अविभाज्य अंग

    सार्वभौमत्व हा अल्लाहचा मौलिक विशेष गुण आहे आणि तो मनुष्याच्या राजकीय जीवनाचा मूलाधार सूचित करतो की अल्लाहच्या सार्वभौमत्वात कोणी दुसरा भागीदार नाही. हा या सत्याचा दाखला आहे की मनुष्याचे राजकीय जीवन धर्माच्या कक्षेतील आहे. धर्मापासून राजकारणाला वेगळे यामुळेच करणे अशक्य आहे. आपण जर धर्म आणि राजकारण वेगवेगळे ठरविले तर अल्लाहच्या सार्वभौमत्वाला काही अर्थ राहात नाही. दिव्य प्रकटनात राजकीय तत्त्वांचा समावेश आहे, तसेच इस्लामची एक परिपूर्ण राजकीय व्यवस्था आहे. धर्म आणि राजकारणाची फारकत करणे इस्लामविरोधी आहे.
  • धर्म आणि राजकारण (आजचा ज्वलंत प्रश्न)

    इस्लाम ही एक सर्वसमावेशक अशी परिपूर्ण जीवनपध्दती आहे. याबद्दलचा खुलासा आपण मागील प्रकरणांतून पाहिला आहे. राजकारण हा धर्मकारणाचा एक भाग कसा आहे? तसेच धर्मव्यवस्थेचे राजकीय व्यवस्था एक महत्त्वाचे अंग कसे आहे? याचे अद्याप स्पष्टीकरण पूर्णतः न झाल्यामुळे लोकमनात संभ्रम आहे. या दोघांच्या संबंधाचा येथे स्पष्ट खुलासा होणे गरजेचे आहे. राजकारणाला आपण क्षुद्र समजून त्याची अवहेलना करू शकत नाही. आधुनिक जगात तर त्याचे महत्त्व इतके वाढले आहे की अतिमहत्त्वाची खाजगी कामेसुध्दा आज राजकारणाच्या कक्षेत मोडतात.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]