Islam Darshan

इस्लामने आखून दिलेले कौटुंबिक नीतीनियम

Published : Thursday, Feb 18, 2016

स्त्री-पुरुषाच्या एकत्र येण्याने मानवी समाजरचना उदयास येते. त्यातून सामाजिक रचना आकार घेते. हे वर्तुळ (आकार) म्हणजे कुटुंब आणि त्याला नियंत्रित करणारे नीतीनियम म्हणजे कौटुंबिक नियमावली होय. इस्लामने आखून दिलेले कौटुंबिक नीतीनियमांची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

१) स्त्री-पुरुषाचे हे एकत्रित राहणे एक सामाजिक करार करून शक्य होते त्यास ‘निकाह’ असे म्हणतात. हे पवित्र बंधन आहे जे दोघांच्या संमतीने आणि समाजासमोर करार करून घडते. मनुष्याचे एखाद्या स्त्रीबरोबर याव्यतिरिक्त संबंध हे अनैतिक ठरतात. ते अत्यंत हीन कृत्य आहे. त्यासाठी कठोर शिक्षा आहे. लग्न हे काही शारीरिक गरज म्हणून नाही तर ते एक पवित्र आणि धार्मिक गरज आहे.

‘‘स्त्रीशी विवाहबद्ध व्हा. जो कोणी माझ्या परंपरेचा अस्वीकार करील तो माझा नाही.’’ (बुखारी)

ब्रम्हचर्य इस्लामविरोधी कृत्य आहे.

‘‘अल्लाहचे प्रेषित (स.) यांनी आपल्या एका सहकाऱ्याचा अविवाहित राहण्याचा प्रस्ताव नामंजूर केला होता.’’ (बुखारी)

लग्नाच्या करारनाम्यास कुरआनने ‘‘महान वचन’’ म्हणून नमूद केले आहे. या प्रतिज्ञेचा स्वीकार करून दोघांवर काही जबाबदारी येते. या करारामुळे सामाजिक एकता वृध्दिगत होते. मनुष्य या बंधनामुळे विश्वस्थाची भूमिका पार पाडतो. कुरआनोक्ती आहे,

‘‘पुरूष स्त्रियांवर विश्वस्त आहेत.’’ (कुरआन ४: ३४)

या सामाजिक एकतेला आबाधित ठेवण्यासाठी मनुष्यावर खालील जबाबदाऱ्या टाकण्यात आलेल्या आहेत.

१) मनुष्याला आपल्या पत्नीचा, मुलाबाळांचा सांभाळ करावा लागतो. त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविणे त्याची जबाबदारी आहे. अल्लाहने कुरआनमध्ये याबाबत आदेश दिलेले आहेत.
ही जबाबदारी काही नैतिक जबाबदारी फक्त नाही ती अनिवार्य आणि कायदेशीर जबाबदारी आहे. जर ही जबाबदारी पार पाडण्यास कोणी हलगर्जीपणा केला तर शासन त्याला ती जबाबदारी उचलण्यास भाग पाडील.

२) पुरुषाने आपल्या स्त्रीला आणि मुलाबाळांना धार्मिक प्रशिक्षण आणि शिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे. कुरआनोक्ती आहे,

‘‘हे लोकहो! ज्यांनी श्रध्दा ठेवली आहे, वाचवा स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना त्या अग्नीपासून जिचे इंधन मनुष्य आणि दगड असतील.’’ (कुरआन ६६:६)

अशा प्रकारे पुरुषावर आपल्या मुलाबाळांची पत्नीची दोन प्रकारची जबाबदारी आहे. एक त्यांच्या भौतिक गरजा भागविणे आणि दुसरी जबाबदारी त्यांना पारलौकिक जीवनात यशस्वी बनविण्यासाठीची आहे. प्रत्येकजन हा आपल्या आश्रिताबद्दल जबाबदार आहे. राजा हा प्रजेबद्दल जबाबदार आहे. विवाहित स्त्री ही आपल्या पतीच्या संसाराची रक्षणकर्ती आहे. आणि तिला त्याबद्दल विचारणा होईल.

कुरआन याबद्दल स्पष्ट आदेश देत आहे,

‘‘पुरुष स्त्रियांवर विश्वस्त आहेत या आधारावर की अल्लाहने त्यांच्यापैकी एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठत्व दिले आहे. आणि या आधारावर की पुरूष आपली संपत्ती खर्च करतात. मग ज्या प्रामाणिक स्त्रिया आहेत. त्या आज्ञाधारक असतात आणि पुरुषांच्या गैरहजेरीत अल्लाहच्या देखरेखीत व संरक्षणात त्यांच्या हक्कांचे रक्षण करतात.’’ (कुरआन ४: ३४)

त्याचप्रमाणे मुलांची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा करावी आणि आज्ञा पाळावी. त्यांची आज्ञा न पाळणे हा माफ न करता येणारा गुन्हा आहे.

‘‘अल्लाह जसे इच्छिल तसे गुन्हे माफ करील फक्त मातापित्यांची अवज्ञा करण्याचा गुन्हा सोडून.’’ (मिश्कात)

म्हणून लग्न हे धार्मिक कर्तव्य आहे. लग्नामुळे येणाऱ्या जबाबदाऱ्यांना कुरआनने ‘‘अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा’’ असे म्हटले आहे.

‘‘या अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा आहेत त्यांचे उल्लंघन करू नका आणि या मर्यांदाचे उल्लंघन करतील ते निःसंशय अत्याचारी आहेत.’’ (कुरआन २: २२९)

स्त्री आणि पुरुष दोघांवर ही मर्यांदाचे उल्लंघन न करण्याचे बंधन आहे. प्रत्येक सुसंस्कृत आणि कर्तव्यनिष्ठ सभ्यगृहस्थाला मर्यादांचे पालन करावे लागते. परंतु वैवाहिक जीवनात जर एकत्र राहणे अशक्य कोटीचे असेल तर या मर्यादांचे उल्लंघन ‘तलाक’ (घटस्फोट) देऊन करता येईल अथवा स्त्रीने खुला देवून. याबद्दल अल्लाहने कुरआनमध्ये स्पष्ट आदेश दिला आहे,

‘‘तुम्हाला भय वाटत असेल की ते दोघे अल्लाहने घालून दिलेल्या मर्यांदावर कायम राहू शकत नसतील तर त्यांच्यामध्ये असा समेट घडविण्यामध्ये कोणताच अपराध नाही की पत्नीने आपल्या पतीला प्रतिदान देऊन स्वतःला मुक्त करून घ्यावे.’’ (कुरआन २: २२९)

अशा परिस्थितीत शासनालासुध्दा हस्तक्षेप करता येतो आणि लग्नबंधन मोडता येते. लग्नसंबंधाच्या महत्त्वाला लक्षात घेऊन हे असे करणे आश्चर्यकारक वाटते. परंतु इस्लाममध्ये कोणत्याही परिस्थितीत अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादांना तोडता येत नाही. अल्लाहच्या मर्यादांचे उल्लंघन करून वैवाहिक जीवन जगता येत नाही.

संबंधित लेख

  • रोजा (उपवास)

    सर्वच प्रेषितांच्या काळात ‘रोजा’ अनिवार्य स्वरुपात होता आणि प्रेषित मुहम्मद (स) यांच्यावरसुद्धा ही उपासना अनिवार्य करण्यात आली. दिव्य कुरआनात म्हटले आहे की, ‘‘रोजा तुमच्यावर अनिवार्य करण्यात आला, जसा तुमच्या पूर्वीच्या लोकांवर करण्यात आला होता.’’ (संदर्भ : दिव्य कुरआन)
  • इस्लाम द्रोह्यांची कटकारस्थाने त्यांच्यावरच उलटली

    विश्वाच्या सर्वांत जास्त पावन मानवाचा संदेश हळूहळू प्रामाणिक आणि न्याय पसंत करणार्या सज्जनांपर्यंत पोहोचत गेला आणि हळूहळू प्रेषित मुहम्मद(स) यांच्या अनुयायांत भर पडत गेली आणि विरोध करणार्या ‘मक्का’वासीयांचा विरोधही तीव्र होत गेला. विरोधकांच्या प्रेषितविरोधी प्रोपगंड्याचादेखील प्रेषितांना लाभ होत राहिला. त्यांच्या विरोधी प्रोपगंड्यामुळे प्रेषितांचा संदेश दूरदूर पसरत गेला. परिणामी बर्याच प्रतिष्ठित जणामध्ये आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना भेटण्याची उत्कंठा वाढत गेली. लोक प्रेषितांची भेट घेऊ लागले.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]