Islam Darshan

इस्लाममध्ये माता-पित्यांचे अधिकार

Published : Thursday, Feb 18, 2016

या जगामध्ये ईश्वरानंतर सर्वांत जास्त उपकार आपल्यावर आपल्या जन्मदात्याचेच आहेत. जन्मापासून तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहचेपर्यंत माता-पिताच हर-प्रकारे देखभाल करतात. आपली प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी ते तन-मन-धनाची बाजी लावतात. याबाबतीतही पित्यापेक्षा मातेचा दर्जा जास्तच आहे. कारण ती नऊ महिन्यापर्यंत आपल्या पोटात मूल वाढविते आणि खरे पाहता जगातील कोणतीही लेखणी अशी नाही, जी मातेचे उपकार वर्णन करू शकेल. तिच्या बलिदान आणि त्यागाचे वर्णन करणे हे कोणालाच शक्य नाही. तिचे असीम प्रेम, अमर्याद ममत्व, अथांग दयेचा सागर, तिला पाहून पाषाणालाही फुटणारे पाझर, अगदी सर्वत्र उदासीनता आणि दुःखांचे भयानक सावट असताना तिच्या कुशीत मिळणार्या स्वर्गरुपी शांती-समाधानाची ऊब आणि विसावा, तिच्या डोळ्यांतून पाझरणारे ममत्वाचे कधीही न संपणारे झरे, अर्थात माता ही मानवाला ईश्वराने प्रदान केलेली सर्वात मोठी देणगी! या जगात माता-पित्यांच्या उपकारांना खरोखरंच तोड नाही. म्हणूनच इस्लामने मानवांवर सर्वप्रथम अधिकार हे मातापित्यांचेच असल्याचे बजावले आहे. कुरआनात ईश्वराने माता-पित्याचे अधिकार अशा रीतीने वर्णन केले की,

 1. माता-पित्यांचे आभारी व कृतज्ञ राहावे.(संदर्भ : सूरह-ए-लुकमान - १४)
 2. त्यांच्याशी चांगले व उत्तमोतम वर्तन करावे.(संदर्भ : सूरह-ए-बनीइस्त्राईल - २३)
 3. त्यांचा यथायोग्य आदर करावा. (संदर्भ : सूरह-ए-बनी इस्त्राईल - २३)
 4. त्यांच्याकरिता आपली संपत्ती खर्च करावी.(संदर्भ : सूरह-ए-बकरा - २१५)
 5. त्यांच्या प्रत्येक आवडी-निवडीना महत्त्व द्यावे.(संदर्भ : सूरह-ए-बनीइस्त्राईल - २३)
 6. त्यांच्यासमोर अत्यंत नम्रतेने वागावे.(संदर्भ : सूरह-ए-बनी इस्त्राईल - २४)
 7. त्यांच्यासाठी ईश्वरासमोर प्रार्थना करावी.(संदर्भ : सूरह-ए-बनी इस्त्राईल - २४)

जोपर्यंत माता-पित्यांची छत्रछाया आपल्यावर असेल, तोपर्यंत त्यांची मनोभावाने सेवा करावी. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना मोक्ष मिळण्याची प्रार्थना करावी. माता-पित्यांचे आपल्यावर किती जास्त अधिकार आहेत, याचा अनुमान कुरआनाच्या या ईश्वरी आदेशावरूनही लावता येतो की, ‘‘जर माता-पित्यांनी तुमच्यावर दबाव आणला की, माझ्या(ईश्वराच्या) समवेत कोणासही भागीदार ठरवावे तर, त्यांचे म्हणणे मुळीच ऐकू नकोस. जगात त्यांच्याशी सद्व्यवहार करीत राहा परंतु अनुकरण त्या व्यक्तीचे कर जो माझ्याकडे रुजू झाला.‘‘(संदर्भ : सूरह-ए-लुकमान - १५)

प्रेषित मुहम्मद(स.) यांनी असेदेखील म्हटले आहे की, ‘‘माता-पिता जर तुमच्यावर अन्याय व अत्याचार करीत असतील तरी तुम्ही ते निमूटपमे सहन करावे आणि त्यांच्याशी उत्तम व्यवहार करावा.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)

संबंधित लेख

 • सुरक्षाबलांची अमानवीयता

  ही प्रवृत्ती फक्त सर्वसामान्यांमध्ये आढळली जात नाही, तर प्रशासनाच्या त्या लोकांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे जे शांती स्थापनेसाठी जबाबदार आहेत. यातना आणि कैदेतील मृत्यु आता रोजच्या घटना बनलेल्या आहेत. मानवाधिकारांच्या आंतरराष्ट्रीय सिम्पोजीयमच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष जस्टीस वी. एस. मलमैध आपल्या एका भाषणात म्हणतात की देशातील पोलीस स्टेशनांमध्येसुध्दा यातना देण्याच्या घटना होत आहेत.
 • माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास(र.) दिव्य कुरआनाचे प्रवक्ते

  श्रद्धावंतांची माता सन्माननीय मैमुना(र.)यांचे एक किशोरवयीन भाचे होते. त्या आपल्या या भाच्यावर जिवापाड प्रेम करीत असत. या भाच्याचेसुद्धा आपल्या मावशीवर आणि आपल्या मावसा असलेल्या आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्यावर खूप प्रेम होते. म्हणूनच ते आपल्या मावशी मावसाच्या घरीच जास्त वेळ काढीत आणि त्यांची छोटी-मोठी कामेसुद्धा हसत-बागडत करीत असत. मोबदल्यात आदरणीय प्रेषितांचा आशीर्वाद घेत असत.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]