Islam Darshan

इस्लामची अधिकार व कर्तव्यपूर्ती व्यवस्था

Published : Thursday, Feb 18, 2016

वर्तमानकाळामध्ये अपराध अगर गुन्हेगारीच्या धगधगणार्या ज्वालांचे एक मोठे कारण हे मानवी अधिकार पायदळी तुडविणेसुद्धा आहे. पाश्चात्य विचारसरणीच्या गोड विषारी प्रभावामुळे माणूस हा धर्माच्या बंधनांतून मुक्त झाला आणि या बंधनमुक्तीबरोबरच तो नैतिक पतन आणि प्रत्येक प्रकारच्या बेजबाबदारपणाच्या अत्यंत अंधकारमय दलदलीत किचपत पडला आहे. यातून बाहेर निघणे आता जवळपास अशक्य होऊन बसले आहे. माता-पिता, भाऊ-बहीण, सगे-सोयरे, शेजारी-पाजारी, मित्र-स्नेही, समाज-देश वगैरेंचे आपल्यावर काय आणि कोणते अधिकार आहेत, याचा त्याला मागमूसही राहिलेला दिसत नाही. आज माणूस केवळ आणि केवळ स्वतःकरिताच जगतो आहे. इतरांच्या अधिकारांची पूर्तता करण्याची नैतिक शिकवण आता इतिहासातच तेवढी दिसते. हेच कारण आहे की या अत्यंत प्रगत आणि आधुनिक काळात, मानवहित, सहानुभूती, त्याग, बलिदान, दया-माया आणि सहकार्य वगैरेसारख्या बाबींची पुरती विल्हेवाट लागलेली दिसत आहे. परिणामी सर्वत्र हाहाकार, उपद्रव आणि अपराध व गुन्हेगारीचा ज्वालामुखी फाटत असताना आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो आहोत. मात्र इस्लाम धर्माने याबाबतीत अत्यंत यशस्वी उपाययोजना केली आहे. ही उपाययोजना म्हणजे अधिकार आणि कर्तव्यपूर्ततेची परिपूर्ण व्यवस्था होय. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,

‘‘खबरदार व्हा की, तुमच्यापैकी प्रत्येकजण जवाबदार आहे. नेता हा जनतेप्रति जवाबदार आहे, ईश्वर जनतेसंबंधी त्याला जाब विचारणारच. पुरुषाला आपल्या परिवारासंबंधी ईश्वरासमोर जाब द्यावा लागणार आहे. पत्नी ही आपल्या पतीच्या घरदार व संसाराची देखभाल करण्याचे कर्तव्य पूर्ण करील आणि या कर्तव्यपूर्तीसंबंधी तिला ईश्वरासमोर जाब द्यावा लागणार आहे. नोकराला आपल्या मालकाने दिलेल्या काम आणि मालासंबंधी ईश्वरासमोर जाब द्यावा लागेल. खबरदार! तुमच्यापैकी प्रत्येकास आपल्या अधिकार आणि कर्तव्यासंबंधी ईश्वरासमोर जाब द्यावा लागणार आहे.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
उपरोक्त प्रेषितवचनामध्ये मालकापासून ते नोकर व गुलामापर्यंतच्या अधिकार आणि कर्तव्याच्या जवाबदारीचा उल्लेख करण्यात आला आहे. आणखीन इतर ठिकाणीसुद्धा प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,

‘‘निश्चितच तुमच्यावर तुमच्या प्राणाचा अधिकार आहे, तुमच्या शरीराला तुमच्यावर अधिकार आहे, तुमच्या परिवारजनांचा तुमच्यावर अधिकार आहे, तुमच्या बायकोचा तुमच्यावर अधिकार आहे, येणार्या पाहुण्याचा तुमच्यावर अधिकार आहे.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)

इस्लामने मानवाधिकार आणि कर्तव्यपूर्तीची केवळ विचारसरणी देऊन मानवजातीस वार्यावर सोडले नसून एकन्-एक अधिकार व कर्तव्याचे तंतोतंत मोजमापसुद्धा प्रदान केले आहे. मानवांच्या इतर मानवांप्रति काय काय जबाबदार्या आहेत, त्या मोजून-मापून कायदेशीररित्या ठरवून दिल्या आहेत. प्रत्येक अधिकाराचे नियमानुसार प्रमाण दिले आहेत. असे प्रमाण जगातील इतर कोणत्याच धर्मामध्ये नाहीच मुळी. आता आपण पाहू या की ज्या मानव समाजात आपण राहतो, अर्थात माता-पिता, परिवारजन अगर बायको-मुले, नातलग व गणगोत, शेजारी-पाजारी, स्नेही व मित्रमंडळी, अनाथ, दुर्बल व याचक, विधवा आणि अबला स्त्रिया, गरजवंत, रोगग्रस्त, सामान्यजन, मानव-बांधव, प्राणीमात्र आणि सृष्टीतील इतर सर्वच घटकांचे आपल्यावर काय अधिकार आहेत, त्यांच्या आपल्यावर कोणकोणत्या जवाबदार्या आहेत.

संबंधित लेख

  • ईश्वर आणि त्याची गुण वैशिष्ट्ये

    इस्लाममध्ये ईश्वराचे-अल्लाहचे स्वरुप अत्यंत स्पष्ट, पवित्र आणि बुद्धीला व आत्म्याला पटणारे आहे. त्यामध्ये कुठलीही अस्पष्टता, भेसळ, संदिग्धता किंवा बुद्धीविरुद्ध गोष्ट नाही. ईश्वर एक आणि एकमेव आहे. त्याच्या ईश्वरतत्वामध्ये कोणीही भागीदार नाही. तो या सृष्टीचा एकमेव निर्माता, पालनकर्ता, मालक, शासक, अन्नदाता आणि आदेश देणारा आहे. त्याच्या कोणत्याही गुणधर्मामध्ये कोणीही सहभागी नाही. तो स्वयंभू आहे, कायमस्वरुपी आहे आणि कायमस्वरुपी राहील. त्याला मृत्यु नाही, तो तहान-भूक, आसक्ती, सकल मानवी इच्छा, आकांक्षा आणि प्रत्येक प्रकारचे मानवी दोष आणि कमतरता यांपासून पवित्र आहे.
  • इस्लामचा दुसरा स्तंभ नमाज

    नमाज कर्तव्यपूर्तीतील पहिली महत्त्वाची पायरी आहे. दुसरे कोणतेही कर्तव्य याबरोबरीचे नाही. श्रध्दावंताचे (मुस्लिम) प्रत्येक कृत्य आज्ञाधारकता आहे. परंतु प्रार्थनेचे (नमाज) कृत्य सर्व कृत्यांपेक्षा श्रेष्ठतम आहे. नमाज प्रार्थना म्हणजे अल्लाहशी दृश्य स्वरुपात आणि परिणामस्वरूपात शरणागती आहे. नमाजकडे एक दृष्टीक्षेप या सत्यतेला स्पष्ट करते. नम्रता, लीनता, स्तुती आणि स्तुतीगान हे सिध्द करते की दास्यतेचे आणि विनम्रतेचे दुसरे एखादे असे नमाजच्या स्वरूपातील उदाहरण मिळणे अशक्य आहे. नमाजमध्ये झुकून दोन्ही हाथ बांधून उभे राहणे, कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होणे, नम्रतेने नतमस्तक (सजदा) होणे आणि सातत्याने स्तुतीगान आणि प्रेमपूर्वक अल्लाहची भीती बाळगून असणे ही सर्व नमाजची अंगभूत लक्षणे आहेत. दिव्य कुरआन आणि प्रेषितकथन (हदीस) हे नमाजच्या सद्गुणांनी आणि सर्वोत्कृष्ठतेने भरलेले आहेत.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]