Islam Darshan

न्यायालय व कौटुंबिक झगडे

Published : Thursday, Feb 18, 2016

पत्नीच्या वर्तणुकीची चालरीत जर वैवाहिक जीवनाच्या कटुतेचे कारण असेल, तर त्यात सुधारणा कोणी करावयाची असा प्रश्न आहे. न्यायालय हे काम करु शकते काय? पती-पत्नीच्या अंतर्गत बाबतीत हस्तक्षेप करुन न्यायालय प्रकरण जास्त बिकटच करीत असून, त्यात कसलीही सुधारणा करु शकत नाही, हेच सत्य आहे. त्यांच्यातील मतभेद अगदी क्षुल्लक व तात्पुरते असणे शक्य आहे. परंतु न्यायालयात रुजू झाल्याने त्यांना जास्त गुंतागुंतीचे व हानीकारक स्वरुप येऊ शकते. कारण जेव्हा एखादे प्रकरण न्यायालयात रुजू होते तेव्हा वादीचा तसेच प्रतिवादीचा अहंकार त्यांना कोणतीही तडजोड करण्यायोग्य राहू देत नाही. म्हणून लहान सहान कौटुंबिक भांडणे न्यायालयापर्यत न घेऊन जाणे, हीच योग्य पद्धत आहे. न्यायालयाने केवळ महत्त्वाच्या तसेच मोठमोठ्या व गंभीर प्रकरणातच हस्तक्षेप केला पाहिजे व तेसुद्धा तडजोडीचे सर्व दरवाजे अपयशी ठरुन बंद झाल्यावरच करावे. कोणीही समंजस माणूस जीवनात प्रत्येक क्षणी उद्भवणाऱ्या तक्रारी, गाऱ्हाणी व अशा लहानसहान बाबी न्यायालयात नेत नसतो. तसे झाले तर आम्हाला घरातच एक न्यायालय स्थापण करावे लागेल व अशा न्यायालयांना रात्रंदिवस या कौटुंबिक तक्रारींचे निराकरण करण्यात व्यग्र असावे लागेल.

पुरुषाचे चारित्र्य

घरातील एकंदर सुधारणा स्वतः करु शकणारी अशी एखादी शक्ती घरामध्ये असणे, कोणत्याही परिस्थितीत आवश्यक आहे. ही गोष्ट स्पष्ट आहे. म्हणून कुटुंबप्रमुखाच्या नात्याने पुरुष घरची सर्व कर्तव्ये पार पाडतो. वर दिलेल्या आयतीत त्याला असा आदेश देण्यात आला आहे, की पत्नीचा स्वाभिमान न दुखावता तिला तोंडी समज देऊन तिच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा. त्याच्या परिणामस्वरुप पत्नीने आपल्यात सुधारणा करुन घेतली तर प्रश्नच मिटतो. परंतु ती जर आपल्या चुकीचेच समर्थन करीत राहिली तर पतीने तिला शयनगृहात वेगळे ठेवावे. ही शिक्षा पहिल्या शिक्षेपेक्षा (तोंडी समज) अधिक कठोर आहे. यावरुन हे स्पष्ट होते की इस्लाम स्त्रीच्या मानसशास्त्राचे किती खोलवर ज्ञान बाळगतो. आपल्या सौंदर्याच्या व रुपाच्या तोऱ्यात स्त्री कधीकधी इतकी अहंकारी व वरचढ होत असते, की आपल्या पतीची उघड उघड अवज्ञा करण्यापर्यंत तिची मजल जाते. या दृष्टीने तिला शयनगृहात वेगळे ठेवल्याने ती आपल्या सौंदर्याने, रुपाने तसेच नाजुक हावभावाने पतीला विवश करु शकत नाही, असा अर्थ होईल. असे केल्याने तिची सौंदर्याबद्दलची घमेंड व अहंकार थोडा कमी होऊन ती योग्य वागणूक करु लागते. परंतु या शिक्षेनंतरही जर तिच्यात सुधारणा झाली नाही तर त्याचा अर्थ असा होईल की तिचा अहंकार इतका आहे की शारीरिक शिक्षेविना इतर कोणत्याही प्रकारे तिच्यात सुधारणा होऊच शकत नाही. जर अशी अवस्था निर्माणच झाली तर शेवटचा उपाय म्हणून तिला मारझोड करण्याची पतीला परवानगी आहे. पण अशा मारझोडीचा उद्देश पत्नीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा असावा, परंतु तिला छळण्याचा नसावा. म्हणूनच इस्लामी कायद्यानुसार अशी मारझोड किरकोळ स्वरुपाची असावयास हवी.

स्त्रीशी अशी कठोर वागणूक, तिचा अनादर व तिचा स्वाभिमान दुखवण्यासमान आहे काय? नाही अशी गोष्ट नाही. कारण, समस्येच्या या पैलूवर चर्चा करताना पहिल्यांदा आम्हाला हे लक्षात ठेवले पाहिजे की अशा मारझोडीचे स्वरुप, सावधानतापूर्वक योजलेल्या एखाद्या उपायासारखे आहे. जेव्हा सुधारणा घडवून आणण्याचे इतर सर्व मार्ग अपयशी ठरतात तेव्हाच त्याचा अवलंब केला जातो.

शिक्षा, एक मानसशास्त्रीय गरज

दुसरी गोष्ट आम्हाला लक्षात ठेवली पाहिजे, की काही मानसशास्त्रीय दोष व पेच असे असतात, की त्यात सुधारणा घडवून आणण्याकरिता मारझोड व शारीरिक शिक्षेखेरीज दुसरा मार्ग शक्यच नसतो. मानसशास्त्रज्ञ आम्हाला दर्शवितात, की जीवनांतील सुधारणा अवस्थामध्ये वर सांगितलेले सुधारणेचे मार्ग तोंडी समज व उपदेश तसेच शयनगृहात एकांतवास वगैरे परिणामकारक ठरतात. परंतु काही मानसशास्त्रीय विकृती व रोग, जसे कामक्रीडा करताना परपीडा करण्यात आनंद मानणे, असे असतात की अशा विकृत व्यक्तीचा इलाज व उपचार केवळ शारीरिक शिक्षा देऊनच शक्य असतो. अशा मानसिक रोगास पुरुषापेक्षा स्त्रियाच अधिक प्रमाणात बळी पडतात. अशा प्रकारच्या विकृत स्त्रियांना अवमान व मारझोड करुन घेण्यातही एक प्रकारचा आनंद वाटतो. या उलट, पुरुष सर्वसाधारणपणे ज्या विकृतीला बळी पडतात तिला परपीडक कामवासना (सँडिजम) म्हणतात. याला बळी पडलेल्या पुरुषांना कामक्रीडा करताना स्त्रीला पीडा, क्लेश व यातना करण्यात एक विकृत आनंद मिळत असतो. जर स्त्रीमध्ये अशी परपीडक कामवासनेची विकृती असेल तर ती सुधारण्याचा इलाज, मारझोड व शारीरिक शिक्षा दिल्यानेच शक्य आहे. जेणेकरून तिची मानसशास्त्रीय गरजही भागविली जाईल व तिला पूर्ववत चेतना प्राप्त होऊन ती शुद्धीवर येईल. दिसावयास ही गोष्ट कितीही विचित्र वाटली तरी हे सत्य आहे, की परपीडक कामवासना असलेला पुरुष व परपीडक कामवासना असलेली स्त्री त्यांचे परस्परांतील संबंध जरी बिघडत असले तरी ते जीवनात एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकतात. अशा तऱ्हेची परपीडक कामवासनेच्या पुरुषांची व परपीडक कामवासनेच्या स्त्रियांची उदाहरणेही मानवी जीवनात काही कमी आढळत नाहीत. अशा पत्नीही आढळतात ज्या वेळोवेळी आपल्या पतीला भरपूर बडवतात व त्यांच्या परपीडक कामुक पतीचा स्वभावसुद्धा असे बडवून घेतल्यानेच सुधारतो. ही पतीची मानसशास्त्रीय गरज पत्नी चागल्या तऱ्हेने भागवित असते. अशी जोडपीही एकमेकांबरोबर आनंदात नांदत असतात. म्हणून जेव्हा पती किवा पत्नीमध्ये ही सवय विकृतीप्रत पोचते तेव्हाच मारझोडीचा अवसर निर्माण होतो. त्याखेरीज अशी अवस्था शक्य होत नाही. कसेही झाले तरी इस्लामी कायदा पत्नीला मारझोड करण्याची पतीला जी परवानगी देतो, त्याचे स्वरुप सावधानतेने केले गेलेल्या उपाययोजनांसारखीच असते. लहानसहान चुकांसाठी आपल्या पत्नीला मारझोड करण्याची कोणत्याही पतीला परवानगी नाही. कुरआनच्या आयतीत सुधारणांच्या उपायांचा क्रमवार उल्लेख हेच सत्य प्रकट करते. इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांनी पुरुषांना त्यांचा हा अधिकार केवळ त्याच वेळी वापरण्याची परवानगी दिली आहे, जेव्हा अन्य सर्व उपाय उपयोगी ठरु शकत नाहीत, त्यांचे सांगणे असे आहे,

‘जसे गाढवाला बडवले जाते, तशा रीतीने तुम्हापैकी कोणीही आपल्या पत्नीला मारझोड करु नये व दिवसाच्या शेवटच्या भागातच (रात्री) तिच्याशी समागम केला जावा.’ (बुखारी)

पतीच्या दुर्वर्तनावर उपाय

जर पत्नीला पतीकडून दुर्वर्तनाची भीती असेल तर अशा स्थितीत कायदा थोडासा भिन्न आहे. अल्लाहचे सांगणे असे आहे,

‘‘जर एखाद्या स्त्रीला आपल्या पतीकडून उघड उघड चिडखोरपणाचे, घमेंडखोरपणाचे, आततायीपणाचे व बेपवाईचे भय वाटत असेल, तर दोघांनी या प्रकरणात आपसात तडजोड केली तर तो गुन्हा नाही व अशी तडजोड अधिक चांगली आहे.’’ (कुरआन ४:१२९)

काही लोक या बाबतीतही स्त्री-पुरुषात समानतेची मागणी करु शकतात; पण प्रश्न केवळ तात्त्विक अगर काल्पनिक न्यायाचा नसून मानवप्रकृतीशी त्याचा मेळ बसतो. स्त्री, मग ती मागासलेल्या ‘पूर्व’ची असो की सुसंस्कृत ‘पश्चिमे’ची असो, पतीने केलेल्या मारहाणीचे उट्टे पतीला मारहाण करुन काढण्यात यावे व त्याला मारहाण करावी, ही गोष्ट तिला कदापिही आवडणार नाही. तिच्या हातून बडवला जाणारा व मार खाणाऱ्या कमकुवत पतीला, ती आदराच्या दृष्टीने पाहूच शकत नाही. जसे पत्नीला मारहाण करण्याचा अधिकार पतीला आहे, त्याचप्रमाणे पतीला मारहाण करण्याचा अधिकार पत्नीलाही मिळावयास पाहिजे, जेणेकरुन तिला पतीला यथेच्छता बडविता येईल. अशी मागणी कोणाही स्त्रीने आतापर्यंत केली नाही, त्याचे हेच कारण आहे.

स्त्रीने निमूटपणे आपल्या पतीचे जुलूम अत्याचार व अन्याय सहन करीत राहावे व त्याविरुद्ध ब्रसुद्धा काढू नये, असा इस्लामचा दृष्टिकोन मुळीच नसून तो त्याचा महत्त्वाचा पैलू आहे. उलट अशा स्थितीत इस्लाम तिला असा अधिकार देतो की तिची इच्छा असल्यास तिने पतीपासून विभक्त व्हावे.

चर्चेचा सारांश

वरील चर्चेवरुन खालील गोष्टी आमच्यासमोर येतात.

  1. स्त्री ही समाजाचे एक अंग आहे. सामाजिक कल्याणासाठीच पत्नीवर काही कर्तव्यें टाकली गेली असून ते केवळ क्रौर्याचे किवा बळाचे प्रदर्शन नव्हे.
  2. पत्नीच्या अधिकांश कर्तव्याप्रमाणेच पतीवरही याच प्रकारची कर्तव्यें ठरलेली आहेत. ज्या काही मोजक्या प्रसंगी पुरुषाला स्त्रीपेक्षा कसलेतरी श्रेष्ठत्व प्राप्त आहे, त्याचे कारण त्यांच्या प्रकृतीतील भिन्नता होय. त्याचा उद्देश स्त्रीला तुच्छ लेखण्याचा अगर तिचा अनादर करण्याचा नाही.
  3. स्त्रीपेक्षा पुरुषाला जे श्रेष्ठत्व प्राप्त आहे, त्याच्या मोबदल्यात स्त्रीलाही असा कायदेशीर अधिकार आहे, की पतीने जर तिच्याशी दुवर्तन केले तर तिने पतीचा त्याग करावा

संबंधित लेख

  • हिदुस्थानाची प्राचीन परंपरा

    दिव्य कुरआनने प्रदान केलेल्या प्रकाशात जेव्हा आम्ही हिदुस्थानाच्या प्राचीन आणि आधुनिक परंपरा व रूढीचे निरीक्षण करतो तेव्हा त्यात आम्हाला सत्याच्या उरलेल्या खाणाखुणा ठळकपणे दिसतात. विविध रूढी परंपरा आणि कल्पनांमुळे सत्याला किती का शंकास्पद केले असले तरी सत्याच्या खाणाखुणा पूर्णपणे पुसल्या गेल्या जात नाही.
  • इस्लाम व दहशतवाद

    आपला स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी दहशतवादाचा वापर करण्याची पद्धत जुनी आहे. कधी कधी व्यक्तीकडून ते काम झालेले आहे, कधी लोकांच्या समूहाकडून ते झाले आहे, तर कधी कधी सत्ताधीशांकडून व सरकारांकडूनही ते झाले आहे. आधुनिक युगाचा इतिहास हे स्पष्टपणे दर्शवितो की दहशतवादाचा आरंभ युरोपातून झालेला आहे आणि तेथेच त्याला राजकारणाचे साधनही बनविण्यात आले आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]