Islam Darshan

इस्लामी समाजाची काही खास वैशिष्ट्ये

Published : Sunday, Feb 14, 2016

इस्लाम हा सर्वव्यापी आणि कर्मसिद्ध धर्म आहे. तसेच त्याने समाजात कमालीचा समतोल साधला आहे. यामुळेच इस्लामी तत्त्वांवर उभा करण्यात आलेला समाज हा एक आदर्श समाज असल्याचे इतिहासाने गौरविले आहे. पुढे आपण याची काही खास वैशिष्ट्ये थोडक्यात अभ्यासणार आहोत, जेणेकरून या गोष्टींचा अनुमान येईल की, समाजात नैतिक मूल्ये जोपासण्यासाठी इस्लामी कायद्यांनी कोणत्या गोष्टी तर्क करण्याचा आणि कोणत्या गोष्टी आत्मसात करण्याचा आदेश दिला आहे.

समता

काही स्वार्थी वृत्तींच्या महाभागांनी नेहमीच आपला स्वार्थ साधण्यासाठी, सत्ता भोगण्यासाठी, आयतीच व विनाकष्ट मौजमजा करण्यासाठी, संपत्ती नेहमीच आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी मानवजातीस विविध वर्गांत विभाजित केले. जातीच्या, वर्ण व वंशाच्या, भाषा आणि प्रदेशाच्या तसेच धर्माच्या आधारांवर श्रेष्ठ आणि कनिष्ठ असण्याचे कुभांड रचले. उच्चकुलीन, श्रेष्ठ जातीचा, श्रेष्ठ वंशाचा, विशिष्ट भाषा आणि प्रदेशाचा भासवून आणि यानुसार जुलमी व अत्याचारी कायदा बनवून काहीजणांनी इतरांवर नीच, कनिष्ठ, कलंकित आणि अस्पृष्य असण्याचा फतवा लावला आणि मग सुरु झाली एक विदारक व भीषण शोकांतिका, एक अतिभयानक दुर्दैवाची हृदयद्रावक कहानी, जी आजही विज्ञानयुगात संपता संपत नाही. मानवानेच जाती-धर्म आणि वर्ण-वंशाच्या आधारे मानवांवरच अगदी प्राण्यापेक्षाही जास्त भयंकर अत्याचार आणि जुलूम करून मानवसंहाराचा इतिहास मानवाच्याच रक्ताने लिहिला. ही शोकांतिका आजही अतिप्रगत आणि अत्याधुनिक काळात आपल्याला आपल्याच डोळ्यांनी पहायचे दुर्दैव ओढावलेले आहे. एवढेच नव्हे तर आज मानवांमध्ये गरिबी-श्रीमंतीच्या आधारांवरसुद्धा एवढी दुही आणि मोठी दरी निर्माण झाली आहे की, कारमध्ये फिरणार्या श्रीमंताच्या कुत्र्याला ब्रँडेड कंपणीची बिस्किटे आणि मानवांना मात्र सडलेल्या कचर्यांच्या ढिगार्यांवरून पोट भरावे लागते. मानवतेने यापूर्वी कधीच एवढी दयनीय, कलुषित व शापित अवस्था इतिहासात पाहिल्याचे आढळत नाही. गरिबांच्या कल्याणासाठी उपलब्ध होणारा शासनाचा पैसा नेत्यांच्या व राजकारण्यांच्या तिजोरीत जमा होत राहतो. गरिबी आणि दारिद्र्यांवर मोठमोठे कार्यक्रम, योजना आणि संमेलने भरतात, चिकन, रम, व्हिस्कीच्या पाट्यार् रंगतात आणि दरिद्री गरिबांचे मात्र कधीच कल्याण होत नाही. दीन-दलितांच्या स्त्रियांवरील आणि मुलांबाळांवरील सवर्णांचे अत्याचार थांबता थांबत नाहीत. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत उतरलेल्या देशांमध्ये स्त्रियांची नग्न धिंड काढणे, हत्या करणे, मानसिक व लैंगिक शोषण करणे वगैरे सर्रासपणे चालूच आहे. कारण एकच की, त्यांचा कोणी वालीच नाही आणि कायदासुद्धा हतबल आहे.

मात्र इस्लामने मुळात सर्वप्रथम अशी श्रद्धात्मक विचारसरणी प्रदान केली आहे की इस्लाम स्वीकारल्यावर त्याला हे समजतच नाही की मानवांमध्ये फरक अगर भेदभाव असू शकतो. कारण इस्लामने शिकवणच अशी दिली आहे की श्रेष्ठ असण्यासाठी किंवा श्रेष्ठ होण्यासाठी जात-पात, श्रीमंती, वंश अगर भाषा व प्रदेश हे आधार मुळीच नाहीत. तर सदाचार आणि ईशपरायणतेमुळेच मानव हा श्रेष्ठ होऊ शकतो. कोणी म्हणेल की, मी उच्चकुलीन, श्रेष्ठ जातीचा, म्हणून मी कोणावरही अन्याय व अत्याचार केले तर चालते, कोणाचेही शोषण करण्याचा मला अधिकार आहे. कारण मी जन्मतःच श्रेष्ठ वंशाचा, श्रीमंत आहे. मात्र इस्लामने अशी अन्यायी व जुलमी विचारसरणी समूळ नष्ट करून टाकली आणि केवळ सदाचार आणि ईशपरायणतेस मानवाच्या श्रेष्ठत्वाचा आधार बनवून समस्त विश्वातील समस्त मानवजातीला समता व बंधुत्वाच्या सुरेख माळेत गुंफले. ईश्वराने सडेतोडपणे म्हटले आहे,

‘‘हे लोकहो! ईश्वराने तुम्हाला एका पुरुष आणि एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि परिवार बनविले, जेणेकरून तुम्ही एकमेकांचा परिचय द्यावा. वस्तुतः ईश्वराजवळ तुमच्यांपैकी सर्वांत जास्त प्रतिष्ठित तो आहे, जो तुमच्यांपैकी सर्वांत जास्त ईशपरायण आहे. निश्चितच ईश्वर सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हुजरात - १३)

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी याचे स्पष्टीकरण करताना म्हटले आहे,
‘‘लोकहो! तुम्हा सर्वांचा ईश्वर(आणि पालनकर्ता व निर्माता) एकच आहे, तुम्हा सर्वांचा पिता(आदम) एकच आहे.(म्हणून तुम्ही सर्वच समान आहात.) म्हणून कोणताही अरब अरबेतरापेक्षा श्रेष्ठ नाही, कोणताही गौरवर्णीय कृष्णवर्णीयापेक्षा श्रेष्ठ नाही. तसेच कोणताही अरबेतर अरबापेक्षा श्रेष्ठ नाही, कोणताही काळा कोणत्याही गोर्यापेक्षा श्रेष्ठ नाही.(अर्थात वर्ण व वंशाच्या आधारावर कोणताही माणूस कोणापेक्षा श्रेष्ठ नसतो.) श्रेष्ठ माणूस हा सदाचार आणि ईशपरायणतेच्याच आधारावर असू शकतो.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्नदे अहमद)
एवढेच नव्हे तर प्रेषित मुहम्मद(स.) यांनी हेदेखील सांगितले की,

‘‘तो माणूस मुस्लिम असूच शकत नाही, जो स्वतःला(कोणत्याही वर्ण, वंश व भाषा प्रदेशाच्या आधारावर) स्वतःला श्रेष्ठ समजतो आणि इतरांना तुच्छ समजतो. स्वश्रेष्ठत्वासाठी जो माणूस युद्ध करतो, आपला प्राण देतो, तो मुस्लिम असूच शकत नाहीत.‘‘(संदर्भ : प्रेषित वचन संग्रह - अबू दाऊद)

पडदा पद्धती

स्त्री-स्वातंत्र्याच्या नावावर स्त्रियांना नग्न करून अमाप संपत्ती गोळा करण्यासाठी भडवेगीरी करणार्या भांडवलशाहीलाही ही गोष्ट आज मान्य करावी लागत आहे की स्त्री-पुरुषांच्या स्वैर मिलनामुळे भांडवलशाह यूरोपीयन देश आज कोणत्या रसातळाला पोचले आहेत, लैंगिक-गुन्हेगारी, खून व रक्तपाताने कसा कळस गाठला आहे. मात्र ही गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी इस्लामने या गुन्हेगारीच्या ऐन मुळावरच घाव घातला आणि समाजातील हे घोर आणि अघोरी पातककर्म नष्ट करण्यासाठी पडदा पद्धत प्रदान करून स्त्रियांच्या शालीनतेचे आणि आया-बहिणींच्या इज्जतीचे रक्षण केले व समाजात माजणारी अराजकता संपविली. पडदा पद्धतीचा अर्थ केवळ एवढाच नाही की, स्त्रियांनी आपले शरीर आणि चेहर्यावर पडदा ठेवावा. तर अशा सर्व कर्मपद्धती आहेत, ज्यामुळे समाजात लैंगिक अराजकता माजू नये. उदाहरणार्थ, स्त्री-परुषांची स्वैर भेट, वायफळ आणि वाह्यात गप्पा-टप्पा, हस्तांदोलन, परस्त्रियांच्या आवाजातील रंजन, मिलनाची इच्छा आणि लैंगिक उत्तेजना मिळणार्या सर्वच बाबींवर नियमांची बंधने घालण्यात आली. याकरिता इस्लामी कायद्याने सर्वप्रथम आत्मसुधार करण्याचे यशस्वी प्रशिक्षण दिले आणि ईशपरायणता व पापकर्मांची घृणा स्त्री-पुरुषांच्या मनात ठसविली. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,

‘‘ज्याने आपल्या पालनकर्त्यासमोर(जाब देण्यास) उभे राहण्याचे भय बाळगले होते आणि मनाला वाईट इच्छेपासून दूर ठेवले होते, स्वर्ग त्याचे ठिकाण असेल.‘‘(संदर्भ : सूरह-ए-नाजआत - ४०,४१)

आणखीन एके ठिकाणी म्हटले आहे, ‘‘व्यभिचाराच्या जवळही फटकू नका. हे अत्यंत वाईट कर्म आहे आणि खूप वाईट मार्ग आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-बनीइस्त्राईल - ३२)

याबरोबरच इस्लामने मानवाच्या स्वभाव गुणधर्मात असलेली लाज-लज्जेची भावना वृद्धिगंत करून त्यास अश्लीलता आणि या आधारावर उद्भवणार्या गुन्हेगारीविषयी घृणा निर्माण केली. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘दोन्ही डोळे व्यभिचार करतात आणि हा व्यभिचार म्हणजे परस्त्रीला आणि परपुरुषाला लैंगिक भावनेने पाहणे होय. दोन्ही हात व्यभिचार करतात आणि हा व्यभिचार म्हणजे परपुरुषाला अगर परस्त्रीला स्पर्श करणे होय. दोन्ही पाय व्यभिचार करतात आणि मुख सुद्धा व्यभिचार करते अर्थात परस्त्रीचे चुंबन घेणे हे मौखिक व्यभिचार होय. मन व्यभिचार करते अर्थात मनामध्ये व्यभिचाराचा विचार येतो आणि लैंगिक अवयव शेवटी हे दुष्कर्म करतो.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्नदे अहमद)

उपरोक्त सादर करण्यात आलेल्या प्रेषित वचनाचा अर्थ हाच आहे की व्यभिचाराची सुरुवात ही नजरेपासूनच होते, मनात लैंगिक विचार काहूर माजवितात आणि मग हे दुष्कृत्य घडते. अर्थात माणसाच्या मनात लाज-लज्जा असली तर हे कृष्णकृत्य घडत नाही. म्हणूनच इस्लामी कायद्याने स्त्री-पुरुषांना आपल्या नजरा खाली ठेवून वावरण्याचा आदेश दिला आहे. याव्यतिरिक्त स्त्रियांना आपल्या सौंदर्याचे आपल्या पतीशिवाय इतर ठिकाणी प्रदर्शन करण्याची मनाई केली आहे. कुरआनात ईश्वराने म्हटले आहे,

‘‘हे प्रेषिता(स.)! श्रद्धावंत पुरुषांना सांगा की त्यांनी आपल्या दृष्टीची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे. ही त्यांच्यासाठी अधिक पवित्र पद्धत आहे. जे काही ते करतात, ईश्वर त्याची खबर घेणारा आहे. हे प्रेषिता(स.)! श्रद्धावंत स्त्रियांना सांगा की, आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे आणि आपला साज-शृंगार दाखवू नये, त्याव्यतिरिक्त जे सहजासहजी प्रकट होईल आणि आपल्या छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा.”(संदर्भ : सूरह-ए-नूर - ३०, ३१)

हे सर्वकाही असूनसुद्धा माणूस अश्लीलता आणि व्यभिचाराकडे वळू शकतो. अशा परिस्थितीत या गोष्टीची आवश्यकता आहे की, त्याच्या स्वभावगुणधर्मात असलेल्या भावना जागृत करून त्याला या कृष्णकृत्यापासून दूर ठेवण्यात यावे. याचे एक उत्तम उदाहरण आणि उपाय प्रेषित वचनसंग्रहात पाहायला मिळते. एकदा प्रेषित मुहम्मद(स.) यांच्याकडे एक तरुण हजर झाला आणि म्हणाला, ‘‘हे प्रेषिता! मला व्यभिचार करण्याची परवानगी द्या.‘‘ त्याच्या या विचित्र प्रश्नावर प्रेषित मुहम्मद(स.) म्हणाले,

‘‘बाबा रे! तुझ्या मातेसोबत कोणी व्यभिचार केलेला तुला आवडेल काय? तो म्हणाला....‘‘नाही!‘‘
‘‘तुझ्याप्रमाणेच इतरांनाही ते आवडणारे नाही.‘‘ प्रेषित उत्तरले. मग परत म्हणाले, ‘‘तुझ्या मुलीसोबत, तुझ्या बहिणीसोबत कोणी व्यभिचार केला तर तुला आवडेल काय?‘‘
‘‘नाही! मुळीच नाही!‘‘
‘‘मग इतरांनासुद्धा ते आवडणार नाही.‘‘ प्रेषित उत्तरले. अर्थातच ज्याप्रमाणे माणूस आपल्या माता, मुलगी आणि बहिणीच्या इज्जतीचे रक्षण करतो आणि त्यांच्यावर इतरांनी डोळा ठेवणे सहन करीत नाही, त्याचप्रमाणे इतरांनाही हेच वाटते. मग आपणही आपल्याप्रमाणेच इतरांची अवस्था जाणावी. याच जाणिवेमुळे माणूस आपल्यातील लैंगिक दुराचारावर ताबा मिळवू शकतो.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह-मुस्नदे अहमद)

आजच्या या अत्यंत प्रगत आणि अत्याधुनिक काळामध्ये मानवाने एवढी प्रगती केली की या प्रगतीच्या झिंगेत रक्ताचे नातेसुद्धा विसरून गेला. आपलीच पोटची मुलगी, आपलीच बहीण आणि तुम्ही जर वाचायचे धैर्य कराल तर जन्मदाती मातेबरोबरसुद्धा लैंगिक अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. प्रश्न असा आहे की, जेव्हा नात्यातील पावित्र्यच नष्ट झाले तर गुन्हेगारीवर आळा कसा आवळायचा? याचे एक स्पष्ट उत्तरसुद्धा इस्लामने दिले आहे. ते असे की अशा अपराध्यांना इतकी कठोर शिक्षा दिली पाहिजे की, ही शिक्षा पाहून परत हे कृष्णकृत्य करण्याचे कोणालाही धाडस होणार नाही. जो माणूस हे भयंकर पाप करील त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा आदेश प्रेषित मुहम्मद(स.) यांनी दिला आहे.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह-इब्ने - माजा)

सत्याचा आदेश देणे आणि असत्यापासून रोखणे

इस्लामी कायद्यात हे एक अत्यंत महत्त्वाचे दंडविधान तर आहेच, शिवाय प्रत्येक माणसाचे हे परम कर्तव्यच आहे की, त्याने भलाईचा आणि सत्याचा आदेश द्यावा आणि वाईट कर्म घडत असल्याचे पाहून, तसेच अन्याय व अत्याचार होत असलेले पाहून आपल्या शक्ती व सामर्थ्यानुसार ते थांबवावेत. अर्थातच इस्लामने उभारलेली ही व्यवस्था खूप व्यापक आहे. या सद्कार्यात संपूर्ण धर्माची शिकवण आणि प्रचार व प्रसार सामील आहे. मात्र या ठिकाणी यावर सविस्तर वर्णन करण्याची संधी नाही. या ठिकाणी केवळ या व्यवस्थेच्या वैधानिक स्वरुपावर थोडक्यात चर्चा करण्यात येत आहे, जेणेकरून या इस्लामी दंडविधानाच्या माध्यमाने गुन्हेगारी निर्मूलनाचे कार्य कशाप्रकारे होते, हे लक्षात येईल.

जगातील कोणतेही राष्ट्र असो की समाज असो, त्यात सुधारकार्य होत नसेल तर पुण्य-पाप, बरे-वाईट, सत्य-असत्य व यासारख्या सर्वच प्रवृत्ती कमी-जास्त प्रमाणात असतात आणि हे स्वाभाविकसुद्धा आहे. मात्र चिंता आणि काळजीची बाब अशी आहे की, समाजात असत्य, अन्याय व अत्याचाराला वेळीच वेसन घातली नाही आणि वाईट कर्म रोखण्याचा प्रयत्नच करण्यात आला नाही, तर अशी विस्फोटक परिस्थिती निर्माण होते, जशी आज आहे. बळी तो कान पिळीसारखी अवस्था निर्माण होते. अन्याय आणि गुन्हेगारीपासून लोकांना रोखणे म्हणजे लोकांचे कर्म स्वातंत्र्य हिरावून घेण्याची विक्षिप्त व्याख्या करून अपराध्यांसाठी मोकळे रान सोडण्याचे पातक आज सर्रासपणे चालू आहेत. आज प्रत्येकजण म्हणे स्वतंत्र आहे. स्वातंत्र्य हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. काहीही करण्याचा, कोणावरही अत्याचार करण्याचा, कोणतेही अनैतिक कर्म करण्याचा, व्यभिचार करण्याचा, नग्न नाचण्याचा, सर्वकाही करण्याचा त्याला जन्मजात हक्क आहे म्हणे. हा अधिकार हिरावून घेण्याचा समाजाला, आई-वडील आणि परिवारजणांनासुद्धा अधिकार नाही म्हणे. हेच कारण आहे की आज सर्वत्र अपराधी कर्मांनी शिखर गाठले आहे. स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार बोकाळला आहे. जगण्याचे स्वातंत्र्य आणि स्वैराचारी जीवन यातील फरकच नष्ट झाला आहे. पावसाळ्यात स्वैरपणे वागणार्या कुत्र्या-कुत्रींसारखी अवस्था मानवाची झालेली आहे. अशा या धगधगणार्या स्फोटक परिस्थितीत केवळ एकच पर्याय शिल्लक दिसतो आणि तोपर्याय म्हणजे इस्लामचे हे दंडविधान लागू करणे होय आणि प्रत्येक व्यक्तीस सत्याचा आग्रह आणि काळ्या गुन्हेगारीपासून इतरांना रोखण्याचा अधिकार देण्यात यावा. कुरआनात हे सद्कार्य प्रत्येकाचे परम कर्तव्य असल्याचे म्हटले आहे,

‘‘आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला मानवाच्या मार्गदर्शन आणि सुधारणेकरिता उभे करण्यात आले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून रोखता आणि ईश्वरावर श्रद्धा बाळगता.‘‘(संदर्भ : सूरह-ए-आइल इम्रान - ११०)

प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘ज्या ठिकाणी तुम्ही एखादे वाईट कर्म होत असलेले पाहाल, तर ते वाईट कर्म तुम्ही आपल्या बळाचा प्रयोग करून रोखा, हे शक्य नसेल तर तोंडाने त्याचा विरोध करा, हेही शक्य नसेल तर कमीतकमी मनात त्याविषयी घृणा बाळगा, मात्र हा श्रद्धेचा अंतिम दर्जा आहे.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्लिम)

आणखीन एके ठिकाणी प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘अन्यायी व अत्याचारीस अन्याय व अत्याचार करताना पाहून त्या पातकास जर लोक रोखत नसतील(आणि आपल्याला काय घेणे देणे म्हणून अन्यायी व अत्याचारीस रान मोकळे सोडतील) तर समजा की ईश्वराचा कोप उपस्थित आहे.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - तिर्मिजी)

अपराधी हा गरीब असो की श्रीमंत असो, अधिकारी असो की नोकर असो, लहान असो की मोठा असो, समर्थ असो की असमर्थ असो, दुराचारापासून आणि अन्याय व अत्याचारापासून इतरांना रोखण्याचा प्रत्येकालाच पूर्ण अधिकार आहे. कारण जगातील प्रत्येकाला आपल्या कर्माचा हिशेब द्यावा लागणार आहे. मागे यासंबंधी आपण सविस्तरपणे प्रेषित मुहम्मद(स.) यांचे वचन वाचलेच आहे. त्यात त्यांनी याबाबतीत प्रत्येकालाच खबरदार केले आहे.

इस्लामी कायद्यात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे की ज्याप्रमाणे मुलाचे माता-पिता आपल्या मुलाने केलेल्या चुकांची विचारपूस करु शकतात, त्याचप्रमाणे मुलांनासुद्धा या गोष्टीचा पूर्ण अधिकार आहे की त्यांचे आई-वडील एखादी चूक करीत असतील तर त्यांनी आई-वडिलांना त्यापासून रोखावे. नसता मुलांना या गोष्टीचा जाब द्यावा लागणार. त्याचप्रमाणे पत्नी आपल्या पतीला, नोकर मालकाला, लहान मोठ्याला दुराचार आणि गुन्हेगारीपासून रोखण्याचा पूर्ण अधिकार बाळगतात. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,

‘‘इस्लाम धर्म हा मुळात इतरांचे हित जोपासण्याचे आणि सर्वांचेच भले करण्याचे नाव आहे, ईश्वरासाठी, प्रेषितासाठी, मार्गदर्शनासाठी आणि सर्वसाधारण मुस्लिमांसाठी.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)

सत्य स्थापना, भल्याचा आदेश देणे आणि दुराचारापासून रोखण्याचे हे कर्म केवळ वैयत्तिक नसून सामूहिक जवाबदारीचे कर्म आहे. त्यामुळे इस्लामी शासनाचेसुद्धा हे सर्वप्रथम आणि सर्वोच्च कर्तव्य आहे. इस्लामी शासकाचे हे सर्वप्रथम कर्तव्य असेल की, त्याने सत्याची आणि भलाईची आज्ञा लागू करावी आणि असत्य, अन्याय व अत्याचार तसेच गुन्हेगारीस आळा घालण्याची व्यवस्था लागू करावी.

संबंधित लेख

  • खंदक’ची लढाई

    आपण मक्कावासीय कुरैश कबिल्याच्या इस्लामद्रोही कारवायांकडे वळू या. ‘कुरैश’ आणि मदीनातील मुस्लिम शक्तींमध्ये एक मोठा फरक होता. ‘कुरैश’जणांतील ‘अज्ञान व्यवस्थेचा’ आत्मा अत्यंत थकलेला आणि कुजलेला होता. त्या समाजाचा एखादा अवयव प्रत्येक वेळी तुटून मदीनाच्या झोळीत येऊन पडत. त्या तुलनेत इकडे मदीनातील मुस्लिम शक्ती रचनात्मक, सिद्धान्तनिष्ठ, संदेशवाहक आणि जनसमर्थित शक्ती असल्यामुळे ती गतीशील, सक्रीय असून सतत विकास पावत होती.
  • भ्रष्टाचारापासून बचावाचा इस्लामी उपाय

    र्तमानकाळात ईर्ष्या आणि लालसेने माणूस पार पिसाळून गेला आहे. जास्तीतजास्त संपत्ती कशी मिळविता येईल, यासाठी ना-ना काळ्या-पांढर्या पद्धतींचा तो अवलंब करीत आहे. यामुळेच आज सर्वच भ्रष्टाचार आणि काळ्या बाजाराचा वणवा पेटला आहे. मामुली चपराशापासून उच्चाधिकार्यांपर्यंत सर्वच यात बरबटलेले आहे. जो जितका शासनकर्त्यांच्या जवळचा चमचेगिरी करणारा आहे, तितका जास्त भ्रष्ट आहे. याचे कारण असे आहे की, आज माणूस संपत्ती आणि पैशांनाच जास्त महत्त्व देत आहे. पैसा असला की, वैभव, प्रतिष्ठा, समाजावर वचक, प्रसिद्धी आणि ऐशो- आरामाचे जीवन, असे जणू समीकरणच तयार झाले आहे. यासाठी वाटेल त्याचा गळा चिरायचा,
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]