Islam Darshan

जातीय उपद्रवाची तत्कालीक कारणे

Published : Sunday, Feb 14, 2016

जनसामान्यांच्या मानसिकतेचा विचार केल्यास त्यांच्यात दंगल करण्याची किवा रक्तपात करण्याची इच्छा आढळून येत नाही. त्यांचा स्थायीभावच अशा प्रकारच्या पाशवीपणाला नकार देत असतो. उपद्रव निर्माण करण्यात त्यांना गोडी वाटत नाही. उलट उपद्रवाबद्दल त्यांच्या मनात भयाची भावना आढळते. दुसरीकडे उच्च व समंजस वर्गालाही जातीय उपद्रवाबद्दल घृणा वाटत असते. जनसाधारण अतिउच्च समंजस वर्ग, या दोन्ही प्रकारच्या माणसांना जातीय उपद्रवाची इच्छा नसते, तर प्रश्न असा उद्भवतो की हे जातीय उपद्रव का निर्माण होतात? वास्तविकता अशी आहे की प्रत्येक जातीसमूहात असा एक उपद्रवकारी अंश आढळतो, ज्यांना गुन्हेगारी कृत्ये करण्यास मोठे आकर्षण असते व त्याचबरोबर दंगलीमध्ये लुटालूट करुन बेसुमार धन-संपत्ती गोळा करण्याची संधी त्यांना मिळत असते. या दोन्ही प्रेरणा मिळून त्या उपद्रवप्रिय समाजकंटकांना, जातीय दंगली भडकविण्यासाठी उद्युक्त करतात. दंगल सुरु होईपर्यंत हे लोक पडद्यामागे राहून, लोकांच्या भावना चेतवून व त्यांच्या मानसिकतेचा विस्फोट करणारी वक्तव्ये करुन वातावरण अधिकाधिक तापवीत राहतात. हे कार्य इतक्या चलाखीने व धूर्तपणाने केले जाते की त्यांच्या कुटिल-कारवाया समजणे, जनसामान्यांना तर कठीण असतेच, पण समंजस जनविशेषांनाही त्यांचे आकलन अवघड होते. हिसाचाराचा प्रत्यक्ष उद्रेक जेव्हा आरंभ होतो, तेव्हा आपल्या अंगच्या विशेष गुणवत्तेमुळे, हा उपद्रवप्रिय जनसमूह दंगलीची सूत्रे आपल्या हातात घेतो किवा जनसामान्यच मजबूर होऊन दंगलीचे नेतृत्व त्यांच्या हाती सोपवितो. असे झाले म्हणजे संपूर्ण परिस्थिती त्या उपद्रवकारी समाजकंटकांच्या ताब्यात येते. असे झाल्यावर समाजातील महान दिग्गजही त्यांच्याविरुध्द ‘ब्र’ काढू शकत नाहीत.

 1. लोकांच्या भावना जास्तीत जास्त भडकविणार्यांसाठी निरनिराळ्या क्लृप्त्या योजणे, दुसर्या समूहाला भयांकित करण्यासाठी धमक्या देत राहणे, विरोधी समूहाने दंगलीची किती जय्यत तयारी केली आहे हे भासविण्यासाठी धादांत खोट्या अफवा ते पसरवितात. आपल्या जातीसमूहास भ्याड, डरपोक असे संबोधून त्यांची अस्मिता डिवचत राहाणे, विरोधी जातीसमूहाच्या तथाकथित अपराधांवर सतत प्रक्षोभ निर्माण करणारी वक्तव्ये करुन निराधार अफवा पसरविणे अशा ललितकलांचे सर्व गुण, या विघ्नसंतोषी समूहामध्ये ठासून भरलेले असतात.

 2. सर्वसाधारपणे या प्रलयंकारी जातीय दंगलींची सुरुवात अफवांमुळे होत असते. या अफवांना जन्म देणारे कारागीर इतके निपुण असतात की जनसामान्यांची मानसिकता दृष्टीसमोर ठेवून अशा प्रकारच्या अफवा पसरवितात ज्या ऐकल्यानंतर विवेकशक्ती, संयम व भान राखणे होत नाही. अफवामुळे निर्माण होणारा हा भयावह प्रक्षोभ इतका तीव्र व प्रबळ असतो की त्याला आवर घालणे राजकीय पक्षांच्या व शासकीय तंत्रांच्या काबूत राहात नाही.

 3. मानसिक व व्यावहारिक प्रशिक्षणाचा जनसाधारण व जनविशेष या दोहोंचा अभाव, या उपद्रवकारी घटकांना फार मोठ्या प्रमाणात सहाय्यभूत ठरत असतो. काही माणसे दुष्ट हेतुने नव्हे तर केवळ प्रशिक्षणाअभावी सनसनाटी अफवा पसरविण्यात सक्रिय असतात. भली व समंजस माणसेसुध्दा इच्छा, अनुमान व सूचना यांच्यातील फरक समजून न घेतांना आढळतात. आपले अनुमान अगदी बातमी असल्यासारखे सांगतील त्याचप्रमाणे दुसर्या माणसाच्या अनुमानावर बातमी असल्याप्रमाणे विश्वास ठेवतील.

 4. या मानसिक व व्यावहारिक प्रशिक्षणाचे एक स्वरुप भ्रम आणि भित्रेपणा आहे. भयाची अवस्था आपल्या भ्रमांना व कल्पनाशक्तीला ताणून व वाढवून विविध प्रकारच्या संशयांना व कुविचारांना जन्म देत असते. असे लोक काल्पनिक संकटाने भयभीत होऊन मुकाबला करण्यासाठी जय्यत तयारी सुरु करतात. जी तयारी भयाच्या भावनेने सुरु केली जाते, ती मैदानात टिकू शकत नाही, हे उघड आहे. म्हणूनच तो उपद्रवकारी भ्याड वर्ग दंगलीमध्ये महत्त्वपूर्ण कार्य करुन जातो. प्रथम दंगलीची तयारी केली जाते आणि जेव्हा तिचा भडका उडतो, तेव्हा या भयग्रस्त लोकांमध्ये जे सज्जन व सभ्य असतात, ते गप्प बसून राहातात. पण त्यांच्यात जे विघ्नसंतोषी व उपद्रवी घटक असतात, ते मात्र या जातीय दंगलरुपी प्लेगचा प्रसार करण्यासाठी उंदरांचे काम करीत राहातात.

 5. आपला समाज एक प्रकारच्या कूपमंडूक प्रवृत्तीमध्ये संकुचितपणामध्ये लिप्त आहे. ही हीनभावना आपल्या श्रेष्ठत्वाचा दावा साधारणपणे सततच करीत असते. जे बहुसंख्येत आहेत ज्यांच्यापाशी सत्ता व शस्त्रे आहेत, त्यांनाही या न्यूनगंडाच्या रोगाने ग्रासले आहे. या न्युनगंडामुळे ते आपल्या शक्तीचे कृत्रिम प्रदर्शन वारंवार दर्शवित असतात. दुसर्या समूहांनाही शक्तीप्रदर्शन करण्यास उद्युक्त करतो. ज्या जातीसमूहाच्या हातात राजकीय सत्ता आहे त्याला काल्पनिक व चुकीच्या प्रतिष्ठांचे रक्षण करण्यास उद्युक्त करतो. ते सणावाराच्या दिवशी शस्त्रांचे प्रदर्शन व आम रस्त्यावर शस्त्रे चालविण्याचे कसब दाखवितात. हीच हीनभावना त्यावेळी प्रदर्शनाचे स्वरुप धारण करीत असते. एखादा कफल्लक माणूस कधी कधी आपण श्रीमंत असल्याचा अविर्भाव दाखवित असतो, अगदी त्याच प्रकारची मानसिकता यातही असते.

 6. जेव्हा एखादी दंगल घडून येते, तेव्हा जनतेचे तीन गट पडतात. ज्यांच्यामध्ये दंगल चालू असते ते दोन समूह. तिसरा एक बलशाली गट असतो, तो शासकीय कर्मचार्यांचा असतो, परंतु निःपक्षपातीपणाने कृती करण्याची सर्वाधिक जबाबदारी शिरावर असलेला हा गटही दंगलखोर एका समूहाशी सहानुभूती बाळगून दुसर्या समूहाशी आकसाने व वैर वैमनस्याच्या भावनेने कार्य करीत असतो, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. दंगलीशी सबंधित असलेल्या एका जातीसमूहापैकीच हा शासकीय कर्मचारीवर्ग असल्याने त्यांच्या पाशवी कृत्यांमध्ये तो बरोबरीने वाटा उचलत असतो. हा कायदा व सुव्यवस्था राखणारा शासकीय वर्गच भावनावश होऊन किवा अंतस्थ कारस्थानाने एका बाजूला झुकतो. तो उपद्रव मोडून काढण्याऐवजी शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्याच्या नावाखाली स्वतःच अत्याचार व विध्वंस करण्यात भाग घेऊ लागतो. या समूहाला शासनाचे कवच - कुंडल लाभलेले असते. शस्त्रास्त्रांनी ते सुसज्ज असतात. म्हणूनच निःशस्त्र दंगलखोरांपेक्षा या शस्त्रसज्ज पक्षपाती तिसर्या समूहाचा प्रभाव दंगलीवर मोठा पडून हाहाकार माजतो. इंग्रज लोकांनी शासकीय खात्यातील लोकांना आणि पोलीसदलाला, आपण शासक आहोत आणि जनता शासित आहे असे प्रशिक्षण देऊन त्यांची मानसिक घडण केली आहे. तसे प्रशिक्षण इंग्रजांच्या हिताचे होते. परंतु अजूनही तोच खाक्या चालू आहे आणितसेच प्रशिक्षण स्वातंत्र्य मिळून अर्धशतक होत आले तरी चालू आहे आणि ही अत्यंत खेदाची बाब आहे. हा शासकीय समूह स्वतःला सेवक आणि जनतेला स्वामी मानण्याऐवजी, स्वतःला शासक व जनतेला शासित समजतो. देशाच्या प्रत्येक भागात पोलीसांचे ज्याप्रकारचे वर्तन समोर येत आहे आणि ज्याबद्दल प्रत्येक वर्गातील लोकांनी आपल्या तक्रारी व गार्हाणी मांडली आहेत, त्या सर्वांचे मुख्य कारण हेच आहे.

  आता ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे की ज्या जातीसमहाच्या हातात वृत्तपत्रांपासून ते मशीनगनपर्यंत सर्व सामर्थ्य असेल आणि त्याचबरोबर त्यांची मनमस्तकही आकसाने व वैरभावाने दूषित झालेली असतील, तर आपल्या पक्षपाती कृत्याला न्यायाचे नाव देऊ शकतील आणि आपल्या अत्याचाराला शांती - व्यवस्था प्रस्थापनाचे नाव देऊ शकतील. हे काही त्यांना अवघड नाही. हा शासकीय वर्ग जेव्हा स्वतःला शासक समजतो आणि मोठमोठ्या प्रतिष्ठित आणि आदरणीय व्यक्तींना शासित मानतो, तर त्यांचे स्वागत तो बुटाच्या ठोकरीने करणार नाही, तर काय त्यांना विनंती-आर्जवे करुन करील? त्यानंतर प्रतिष्ठित माणसांना पोलीस अधिकार्यांनी वारंवार बोलवणे, त्यांना अटक करुन नंतर सोडणे, सोडल्यानंतर पुन्हा अटक करणे, हाही एक विचित्र प्रकार घडत असतो. असे व्यवहार करताना त्यात आपल्या अधिकारशक्तीचे प्रदर्शन, लोकांना भयभीत करुन ठेवणे, जातीयवादी पक्षपात आणि आपण इंग्रजांचे वारस आहोत, हे दाखविण्याची भावना असतेच. त्याचबरोबर बिचार्यांचा मुलाबाळांच्या गरजांची निकड व विवंचना सतत पिच्छा पुरवित असते. देशातील सर्व लोकांप्रमाणे त्यांचे राहाणीमान उंचवायचे असते.

 7. लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये जनता हीच सर्व शक्तीचे व सत्तेचे उगमस्थान असते. दुसर्या शब्दांत असे म्हणता येईल की जनतेच्या डोक्यावर पाय देऊनच सत्तेच्या खुर्चीवर चढता येऊ शकते. म्हणूनअशा जातीय दंगली राजकारणी कार्यप्रणालीसाठी व व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेची लालसा बाळगणार्यांसाठी एक सुवर्णसंधी असतात. दबलेला जातीयवाद चेतवून प्रक्षोभ निर्माण करणे, नंतर उपदेशपर वक्तव्याचे डोस पाजण्यासाठी पुढे येणे जेथे आग लावून सफलता मिळण्याचा संभव असेल तेथे पेटवून टाकणे, जेथे आग विझवून लोकांची मने जिकण्याची सफलता मिळू शकते, तेथे आग विझविणे, या सर्व गोष्टी आजच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीची हस्तकला व कसब आहे. विभिन्न जातीसमूहामध्येच वैर-वैमनस्याची रस्सीखेच असल्याशिवाय धर्मनिरपेक्ष लोकतंत्राचे काम चालूच शकत नाही. भांडवलदार व श्रमिकवर्गातील संघर्ष, राज्याराज्यातील शांतीभाव व पक्षपात, भाषिक झगडे, जातीयवाद अशा प्रकारचे सर्व कलह, हे वास्तविकतः लोकतंत्रासाठी अगदी आवश्यक व अनिवार्य आहेत. हिदू लोक मुसलमानांशी भांडत आहेत, अथवा शिखांचा ख्रिश्चनांची कलह चालू आहे, की बंगाली माणसे आसामी लोकांची हत्या करीत आहेत अगर भांडवलदार लोक श्रमिक-मजुरांची हाडे फोडीत आहेत, याच्याशी लोकतंत्राच्या ध्वजधारकांना कसलेही सोयरसुतक नाही. त्यांना केवळ कलह हवा असतो. त्यामुळेच त्यातील एका पक्षाची बाजू उचलून धरुन, देशाची व आपल्या जातीसमूहाची सेवा करण्याची त्यांना संधी मिळत असते.

 8. मानसिक व नैतिक अधोगतीच्या अशा वर्तमान स्थितीमध्ये जेव्हा एखादी अप्रिय घटना घडून येते, तेव्हा स्वाभाविकपणे त्या दुःखद घटनेच्या जबाबदारीचे खापर एकमेकांच्या माथ्यावर फोडण्याचे चक्र सुरु होते. प्रत्येक पक्ष आपणास अत्याचारपीडित व निर्दोष असल्याचे आणि विरुध्दपक्षाला अत्याचारी आणि अपराधी असल्याचे सिध्द करण्यात आपले संपूर्ण चातुर्य लावतो. अशा रीतीने एक जातीय दंगल भविष्यकाळातील अनेक दंगलींचे बीजारोपण करते. ज्या लोकांना जातीय दंगल वास्तविकपणे पसंत नसते, ते लोक लोकांची मने जुळविणारी भावनात्मक आवाहने करणे आणि शांतता, सलोखा व बंधुभाव राखण्याची आवाहने करणे, एवढेच पुरेसे मानून संतुष्ट होऊन बसतात. दुसर्या पक्षाचे म्हणणे ऐकून व जाणून घेण्याची, त्यांचा दृष्टिकोन जाणून घेण्याची, दुसर्या पक्षाच्या भूमिकेत उतरुन त्यांची व्यथा समजून घेण्याचा शांत डोक्याने प्रयत्न करण्याची आवश्यकताच त्यांना वाटत नाही. दुसर्यांच्या उणिवा त्यांना दिसतात आणि त्यांचा उल्लेख करतात, त्यांनी स्वतःच्या अंतःकरणातही डोकावून पाहावे. इतकेच नव्हे तर जेव्हा आपल्या लोकांच्या उणिवा डोळ्यांसमोर येतात, तेव्हाही ते कबूल करण्याचे धाडस होत नाही.

या व अशा प्रकारच्या अनेक कारणांची शिकवण स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या तत्त्वांमध्ये आणि विचारांमध्ये मिसळून लोकांनी या देशाच्या शरीराची चाळण करुन टाकली आहे. आपल्या देशाचा खंडप्राय विस्तार, येथील नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता आणि भारतीय माणसाच्या मनाची धार्मिक व नैतिक ठेवण लक्षात घेता, या महान देशाची स्थिती अशी होती की ब्रिटिशांच्या देणग्यांबरोबरच प्रगतीशील सामाजिक सिध्दान्त व सात्त्विक नैतिक विचारधारणा असती, तर भौतिकतेत गुरफटलेल्या आणि नैतिक अधोगतीच्या गर्तेत पडलेल्या जगाला, या महान देशाने मानवतेचा धडा देऊ शकला असता. तसे तर आजही आम्ही स्वतःला आशिया खंडाचे नेते आणि तिच्या फलस्वरुप दररोज घडून येणार्या जातीय दंगलींमुळे आणि विध्वंसामुळे आपल्यातील जाणिवेची मान लाजेने खाली झुकली आहे. तसेच संपूर्ण जगात प्रतिष्ठा व प्रभाव असणार्या देशामध्ये आपले नेते जेव्हा भेटी देतात, तेव्हा बाह्य जगतातही त्यांना लज्जित व्हावे लागते. सत्यप्रियतेच्या दृष्टीने पाहिले, तर या जातीय दंगली, हा एक आरसा आहे. त्या आरशामध्ये प्रत्येक भारतवासी व प्रत्येक समुदाय आपला चेहरा पाहू शकतो. आता या आरशात पाहिल्याने चेहर्यावर जे डाग व कलंक दिसतात, ते पुसून चेहरा स्वच्छ करावा अथवा तो आरसाच भिरकावून द्यावे आणि आपल्या अंतरात्म्याला थोपटून झोपी घालावे हे दोन्हीही पर्याय त्यांच्या हातात आहेत.

दंगलींच्या उपद्रवाची व दुरावस्थेची जबाबदारी माझ्यावर नसून, ती इतरांची ती आहे, असा समज कोणत्याही व्यक्तीने अथवा समुदायाने करुन घेतला असल्यास, तो फसगत व भ्रमात पडलेला आहे. जातीय भावनेच्या विषाने त्याची न्यायबुध्दी कुंटीत झालेली आहे. आपल्या दूषित विचारधारणांच्या वर येऊन पाहिल्यास त्याला दिसून येईल की या जातीयवादरुपी स्नानगृहात जो कोणी प्रवेश करतो, तो मानवतेची नैतिकतेची वस्त्रे काढूनच नग्न बनतो. त्यात काही फरक असलाच तर श्रेणीचा असतो प्रकाराचा नव्हे.

आशेचा किरण

या भिन्न काळोखात आपणाला एक आशेचा किरण दिसून येतो की आपल्या संपूर्ण लोकसंख्येची मानसिकता नासलेली नाही. प्रत्येक वर्गात अशा माणसांची बरीच मोठी संख्या आहे, जे साधारणतः अनैतिकतेपासून अलिप्त आहेत. तथापि दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे दुराचारी लोक संगठित होऊन निर्विघ्नपणे आपले कार्य करीत राहातात, परंतु सदाचारी लोक मात्र असंघटित व विखुरलेले आहेत. त्यांच्यात कसलाही संफ व संबंध नसतो. त्यांच्यात कसलाही कार्यक्रम नसतो. या कारणांमुळे ते पूर्णतः प्रभावहीन झाले आहेत. आपल्या सभोवताली होणार्या दुष्कृत्यांना पाहून एखादा ईश्वराचा दास कधी कधी कळवळून ओरडून उठतो, परंतु त्याला पाठिबा देणारा आवाज कोणत्याही दिशेने त्याला ऐकू येत नाही, तेव्हा तो निराश होऊन अगतिकपणे गप्प बसून राहातो. एखादा माणूस सत्य व न्यायाची गोष्ट उघडपणे बोलून जातो, परंतु संघटित असणारा दुराचार, बलपूर्वक त्याचे तोंड बंद करुन टाकतो. मानवतेचा खून होताना पाहताना एखाद्याला सहन होत नाही व त्या दुष्कृत्याच्या विरोधात बोलून जातो. तथापि अत्याचारी संघटनेच्या शक्तीद्वारा त्याला दडपून टाकले जाते. त्याचा असा दुःखद परिणाम पाहून, ज्यांच्या अंतःकरणात भलेपणाची धुगधुगी अद्याप कायम असते, तेही गर्भगळीत व भयभीत होऊन जातात. ही अवस्था आता नष्ट व्हायला हवी. आपला देश ईश्वरी कोपचे लक्ष्य ठरावा व त्या कोपात भलेबुरे सर्व लोक भरडून निघावेत, अशी जर आपली इच्छा नसेल, तर अंतःकरणात मानवतेबद्दल थोडीशीही कणव असणार्या सर्व लोकांनी खडबडून जागे होऊन उभे राहायला हवे. भलेपणा व सदाचारापासून ज्यांचा संबंध पूर्णपणे तुटलेला नाही, अशा सर्व बंधूंना असे कळकळीचे आवाहन आम्ही करतो की या जातीयतेच्या वावटळीला रोखण्याची त्यांची जबाबदारी त्यांनी जाणावी, त्यांनी आपले स्थान ओळखावे, खोलवर जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि अशा परिस्थितीत काय करायला हवे? हा प्रश्न त्यांनी आपल्या अंतरात्म्याला विचारावा, उदंडपणा व उद्दामपणाच्या या अवस्थेत कळवळून केवळ स्वस्थ बसून राहायला हवे, की त्याला थोपविण्यासाठी काहीतरी कृती करण्याची आवश्यकता आहे? तसेच आपल्यापैकी प्रत्येकाची या संदर्भात व्यक्तिगत काय जबाबदारी आहे हे ओळखावे.

संबंधित लेख

 • धार्मिक संकल्पना

  जगात सध्या तीन प्रमुख धार्मिक संकल्पना प्रचलित आहेत, १) एका संकल्पनेनुसार हे जग बंदी शाळा आहे. मनुष्याचे शरीर पिजंरा आहे. त्याच्या इच्छा-आकांक्षा म्हणजेच त्या पिजऱ्याचे गज आहेत. एखाद्या व्यक्तीला या तुरुंगातून मुक्ती तुरूंगाच्या भिती तोडल्यानंतरच मिळते. याचप्रमाणे व्यक्तीचा आत्मा मुक्त अथवा स्वतंत्र त्याच वेळी होईल जेव्हा ती व्यक्ती आपल्या हाताने शरीररूपी तुरूंगाचे गज तोडेल. याचाच दुसरा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीने या जगाचा सन्यास घ्यावा आणि देवाशी तादाम्य पावण्यासाठी एकांतवास पत्कारावा. त्यांने स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना मारून टाकावे आणि अशा प्रकारे ईश्वर आणि स्वतःच्या दरम्यानचा पडदा फाडून ईशसान्निध्य प्राप्त करून घ्यावे. या परिस्थितीत व्यक्तीला विद्यमान जगाचा त्याग करावाच लागतो.
 • इस्लामच्या आधारस्तंभांचे विशेष महत्त्व

  मानवी शरीर अनेक अवयवांचे मिळून बनले असले तरी त्याच्या प्रत्येक अवयवाचे महत्त्व एकसारखे नाही. त्याचप्रमाणे भक्तीचे अनेक अंग आहेत आणि त्यांच्यापैकी प्रत्येक भागाचे महत्त्वसुध्दा एकसारखे नाही. जसे मानवी शरीरात मेंदू, हृदय यांचे विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे भक्तीमध्येसुध्दा इस्लामनुसार, नमाज, रोजा, हज यांचे विशेष महत्त्व आहे. हे इस्लामचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या विशेष महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]