Islam Darshan

इस्लाम व लैंगिक समस्या

Published : Sunday, Feb 14, 2016

पाश्चिमात्य मानसशास्त्रज्ञ धर्मांवर असा आरोप करतात की तो माणसाला आपली जीवनशक्ती ठेचून व दाबून ठेवण्याची शिकवण देतो. सरतेशेवटी त्याला कायमचा पापभावनांच्या अशा दलदलीत झोकून देतो, की त्याला त्याचे प्रत्येक कृत्य पाप असल्यासारखे वाटू लागते. त्याचे प्रायश्चित्त केवळ अशा स्वरुपातच होऊ शकते की त्याने जीवनातील सर्व आनंदाचा व प्रसन्नतेचा त्याग करावा. आपल्या या प्रतिपादनाच्या समर्थनार्थ हे लोक असेही म्हणतात की युरोप जोपर्यंत धर्माच्या पंजात अडकलेला होता, तोपर्यंत त्याला सर्व प्रकारच्या अज्ञानरुपी अंधकाराने वेढले होते. जेंव्हा तो या धर्माच्या जोखडापासून मुक्त झाला तेव्हा दबलेल्या भावना व उर्मी उफाळून आल्या व इच्छा आकांक्षारुपी बगीच्यात वसंत ऋतूचे दृश्य दिसू लागले.

धर्मावर शंका

म्हणून हे मानसशास्त्राज्ञ असा प्रश्न विचारतात की तुम्ही पुन्हा आपल्या धर्माकडे वळण्याचा सल्ला देत आहात काय? तुम्ही प्रगतीच्या मार्गात पुन्हा धर्मश्रद्धेचे अडथळे घालू इच्छिता काय? आमच्या होतकरु पिढीला पावलोपावली हटवून व अडवून त्यांचे जिणे दुःसहय करुन सोडावे काय?

पाश्चिमात्यांचे त्यांच्या धर्माबाबत हे असे मत आहे. या समयी आमचा विषय धर्माचे सामान्यरुप नसून केवळ इस्लाम आहे. म्हणून आम्ही त्याच्या या मताची कुचेष्टा करु इच्छित नाही व ते चुकीचे असल्याचेही काही सांगू इच्छित नाही. इस्लाम व लैंगिक संबंधावर चर्चा करण्यापूर्वी व इस्लामचा लैंगिक अतृप्तीचा खरा अर्थ चांगल्या रीतीने समजून घ्यावयास हवा कारण सुशिक्षित व अशिक्षित सर्वच त्याचा चुकीचा अर्थ लावीत असतात व कित्येक परिस्थितीत आपल्या चरितार्थ करतानाही चुका करीत असतात.

लैंगिक अतृप्तीचा खरा अर्थ

लैंगिक अतृप्ती समागमापासून अलिप्त राहण्याचे नाव नसून ते एक ओंगळ व घाणेरडे कृत्य आहे की कोणताही धर्म अगर शिष्ट माणूस त्यासंबंधी विचार करणेही पसंद करत नाही. या अर्थाने लैंगिक अतृप्ती एक अंतःसज्ञाचे रूप धारण करते व कामक्रीडा पुन्हा पुन्हा करुनही ती समाप्त होत नसते. म्हणून जी व्यक्ती कामपिपासू असते तिला असहाय्यपणे कामक्रीडेची निकड होऊन बसते. अशा व्यक्तीला ते कृत्य ओंगळ व घाणेरडे जरी वाटत असेल तरी दिवसातून अनेक वेळा त्याने कामक्रीडा केली तरी तो लैंगिक दृष्टीने रोगीच राहील. जेव्हा जेव्हा तो हे कृत्य करील तेव्हा त्याच्या मनात असे द्वंद्व असेल की त्याला करावयाचे होते काय आणि तो करुन बसला काय. या जाणतेपणी अगर अजाणतेपणी होणाऱ्या अस्वस्थपणापासून भिन्न भिन्न मानसशास्त्रीय रोग व गुंतागुंत निर्माण होत असते.

फ्राइडची साक्ष

लैंगिक अतृप्ती अथवा आत्मसंयमनाची ही व्याख्या लेखकाने आपल्या मनाने केली आहे असे कोणी समजू नये, ते तसे नाही. कारण आत्मसंयमनाची ही व्याख्या व तिचा अर्थ आम्ही सिग्मन फ्राइडकडून घेतला आहे. फ्राइड आयुष्यभर धर्मावर अशी टीका-टोमणे मारीत असे, की धर्म माणसातील लैंगिक शक्ती दडपून टाकतो व त्याला चेतनाहीन व गतिहीन करुन टाकतो. म्हणून आपल्या ‘दी कंट्रीब्यूशन ऑफ सेक्शुल थिअरी’ या पुस्तकात (पृष्ठ ८२) तो असे लिहितो की आत्मसंयमन व समागमाचे पथ्य ज्याला या क्रियेतील तात्पुरता अवरोध म्हणता येईल, या दोहोंत फरक करणे आवश्यक आहे.

इस्लामचा दृष्टिकोन

लैंगिक अतृप्ती कामवासनेला ओंगळ व घाणेरडे समजण्याचा परिणाम आहे ज्याचा समागमेच्छेला तात्पुरता अवरोध करण्याशी कसलाही संबंध नाही, ही गोष्ट समजल्यानंतर या बाबतच्या दृष्टिकोनाचा आढावा घेऊ या.

इस्लाम प्रकृती व निसर्ग यांचा स्वीकार करतो.

इस्लामने माणसाच्या नैसर्गिक व प्राकृतिक भावनांना निकोप व पवित्र ठरविण्यात जे औदार्य सिद्ध करुन दाखविले आहे तसे जगातील अन्य कोणत्याही धर्माने केले नाही. कुरआनमध्ये असे सांगितले गेले आहे,

‘‘माणसासाठी इच्छाआकांक्षा, स्त्रिया, संतती, चांदी-सोन्याच्या राशी, निवडक घोडे, जनावरे व शेतजमीन अतिशय आवडती केली गेली आहेत.’’ (कुरआन ३:१४)

ही आयत माणसांच्या आवडत्या वस्तूंचा उल्लेख करून त्यातील वास्तवता मान्य करते. त्या वस्तू माणसांना का प्रिय वाटतात अशी शंका आयतीत उपस्थित केली गेली नाही तसेच त्यांच्या आसक्तीबद्दल मानवभावनेची हेटाळणीही केली गेली नाही.

इस्लाम इच्छा वासनांच्या दास्यत्वाला चांगल्या दृष्टीने पाहत नाही, ही गोष्ट खरी आहे; तसेच माणसाने त्या बाबतीत अतिरेक करणेही त्याला पसंद नाही. कारण तसे घडले तर संपूर्ण जीवनव्यवस्थाच उध्वस्त होऊन जाईल, मानवतेचा दृष्टिकोन सतत उन्नतीचा व जनहिताचाच असतो. पण मानसावर स्वैर इच्छावासनांचा अमल असतो तोपर्यंत त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण ती माणुसकीच्या शक्तचे झरेच आटवून टाकते व माणसाला पशूपेक्षा हीन दर्जांवर नेऊन सोडते.

आत्मसंयमन व लैंगिक अतृप्ती मधील फरक

माणूस इतका हीन होऊन पाशवी प्रवृत्तीला बळी पडावा हे इस्लामला आवडत नाही व तसे तो इच्छित नाही. पण या महान उद्देशात व त्या अनभिज्ञ लैंगिक अतृप्तीत तसेच आत्मसंयमनात जमीन अस्मानाचे अंतर आहे. कारण त्यामध्ये लैंगिक गरज व त्यापासून निर्माण होणाऱ्या विकार वासनांना ओंगळ व नकोसे स्वरुप देऊन त्यांच्याकरिता संस्कारगत पावित्र्य व आध्यात्मिक उच्चता यांचा बळी दिला जातो.

माणसाच्या आत्म्याच्या पावित्र्याबद्दल व निर्मलपणाबद्दल चर्चां करताना तत्त्व म्हणून, इस्लाम माणसाच्या सर्व नैसर्गिक भावना मान्य करतो. तो नकळत त्यांच्या नरडीला नख लावीत नाही. उलट व्यवहारी जीवनात त्या पूर्णपणे प्रकट होण्यास पुरेपूर अवसर देतो, जेणेकरून एका मर्यांदेपर्यंत त्यापासून आनंद उपभोगता येऊ शकेल. परंतु त्याच्यापासून व्यक्तीला अगर समाजाला कोणतेही दुःख व त्रास होऊ नये. आपल्या इच्छा-आकांक्षांच्याच मागे जी व्यक्ती सतत लागलेली असते त्याची योग्यता व क्षमता अकाली नष्ट होते. मोहमयी इच्छा-आकांक्षाच्या जाळ्यात गुरफटून जाऊन तो निरुपयोगी बनतो व आपल्या इच्छावासनापलीकडे तो कशाचाही विचार करु शकत नाही.

जेव्हा एखाद्या समाजात माणसांची सर्व शक्ती व त्याची सर्व क्षमता भौतिक भोगविलास प्राप्त करण्यातच खर्च होते, तेव्हा त्या समाजाची हानी होत असते. कारण अल्लाहने केलेल्या नियमानुसार आपली शक्ती जीवनातील विविध अंगांची रचना व सजावट करण्याऐवजी, त्याचा विरोध करुन आपली सर्व शक्ती जीवनातील क्षुल्लक व तुच्छ गोष्टीवरच खर्च करुन संपवितात. त्याच्या परिणाम स्वरुप कौटुंबिक संबंध नष्ट व नाश पाऊन सामाजिक जीवन अस्ताव्यस्त होऊन कोलमडून पडते. मग समाजाची जी अवस्था निर्माण होते त्याचा कुरआन मध्ये असा उल्लेख आहे,

‘‘तू त्यांना एक (तुम्हात मिसळलेले) मानतो, परंतु त्यांची मने इतःस्ततः विखुरलेली आहेत.’’ (कुरआन ५६:४१)

इतरांना अशा राष्ट्रावर चढाई करुन व त्यास नष्ट करुन टाकण्याची हीच संधी मिळत असते, ही गोष्ट आधुनिक फ्रान्सच्या उदाहरणाने चांगल्या रितीने स्पष्ट होते.

इस्लाम माणसाला जीवनातील आनंदापासून वंचित करीत नाही.

इस्लाम काही व्यक्तींवर बंधने केवळ एवढ्याकरिता घालतो, की त्याने आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करुन स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे अगर समाजाचे काहीही नुकसान अगर हानी न करता, स्वतःच्या जीवनातील आनंद मनसोक्त लुटावा. उलट इस्लामने स्पष्ट शब्दांत खालील आयतीत असे सांगितले आहे,

‘‘हे मुहम्मद (स) त्यांना सांगा अल्लाहच्या आवडत्या व आकर्षक गोष्टी ज्यांना अल्लाहने आपल्या दासांकरिता उत्पन्न केल्या होत्या, त्यांना निषिद्ध कोणी केले, व अल्लाहच्या पवित्र वस्तूंना कोणी वर्ज्य केले.’’ (७:३२)

‘‘व जगातील तुझा वाटा विसरु नकोस.’’ (२८:७७)

‘‘आम्ही तुम्हाला दिलेल्या त्या निर्मळ वस्तुंचेच भक्षण करा.’’ (७:१६०)

‘‘खा, प्या व मर्यादेचे उल्लंघन करु नका.’’ (७:३१)

इस्लाम कामवासनेचे महत्त्व उघड व स्पष्ट शब्दांत स्वीकारतो. इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांनी आपल्या शुभमुखाने म्हटले,

‘‘तुमच्या या जगात मला सुगंध व स्त्री सर्वांत अधिक प्रिय आहे व नमाजमुळे माझ्या नेत्रांना शीतलपणा प्राप्त होतो.’’ (तफसीर इब्ने कसीर)

या हदीसमध्ये स्त्रीची तुलना जगातील सर्वोत्कृष्ठ सुगंधाशी केली असून तसे स्थान स्त्रीला दिले गेले आहे. त्याचबरोबर नमाजचा उल्लेख ईश्वराचे सान्निध्य प्राप्त करण्याचे प्रमुख साधन म्हणून केला गेला आहे.

आणखी एकेसमयी जेव्हा इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले की माणसाला आपल्या पत्नीजवळ गेल्यानेही पुण्य लाभते, तेव्हा लोकांनी आश्चर्याने विचारले ‘माणसाला आपली कामवासना शमविण्यातही पुण्यप्राप्ती आहे काय?’ त्यावर त्यांनी उत्तर दिले, ‘माणसाने आपली कामवासना निषिद्ध केल्या गेलेल्या वाममार्गाने शमविली तर तो गुन्हेगार होत नाही काय? म्हणून तो उचित मार्गाने जव्हा आपली कामवासना शमवितो, तेंव्हा त्याला पुण्य लाभते.’ (मुस्लिम)

तात्पर्य असे की इस्लामी व्यवस्थेत कोणाही माणसाची कामेच्छा अतृप्त राहू शकत नाही. नवतारुण्यात माणसाला तीव्र कामेच्छा असते त्यात गैर काही नाही व त्याने ती दडपून किवा नष्ट करून ठेवण्याचा प्रयत्न करावा, अशीही गरज नाही.

तरुणांना इस्लामची मागणी

इस्लाम तरुणांशी केवळ एकच अशी मागणी करतो, की त्यांनी आपल्या कामवासनेच्या नरडीला नख लावण्याऐवजी आत्मसंयमनाने तिचे नियमन करावे व आपल्या इच्छाशक्तीने व निश्चयाच्या बलाने तिला काबूत ठेवावे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर आपली कामेच्छा नष्ट करण्याऐवजी अगर दाबून ठेवण्याऐवजी तिच्या तृप्तीची उचित संधी मिळेपर्यत ती तहकूब ठेवावी. अशा तऱ्हेच्या तात्पुरत्या तहकुबीला फ्राइडसुद्धा काम अतृप्तीचा पर्याय मानत नाही. अशा तऱ्हेने शरीरावर कसलाही हानिकारक परिणाम होत नाही व काम अतृप्तीच्या कारणाने ज्या प्रकारच्या मानसशास्त्रीय गुंतागुंत व पेच निर्मांण होऊ शकतात तशी गुंतागुंतही निर्मांण होत नाही.

आत्मसंयमनाची ही मागणी कोणताही आदेश नसून त्याच्या पाठीमागे एक मोठा हितकर सल्ला कार्यांन्वित आहे. त्याचा मानव जीवनातील आनंदापासून माणसाला वंचित करण्याचा नसून, उलट त्यांना योग्य तऱ्हेने जीवन व्यतीत करण्यायोग्य बनवण्याचा आहे. ज्या राष्ट्रातील लोक आपल्या इच्छा-आकांक्षा काबूत ठेवू शकत नाहीत व निकड भासल्यावरही आपल्या मनोविकारापासून वंचित होणे पसंत करु शकत नाहीत, त्या राष्ट्राला आपले नेतृत्व गमवावे लागते. या गोष्टीला इतिहास साक्ष आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय ओढाताणीतसुद्धा यश त्याच राष्ट्राच्या वाट्यास येते ज्यातील लोक संकटे व अडचणी सहन करण्याची क्षमता बाळगतात आणि वेळ पडल्यास आपल्या इच्छाआकांक्षापासून व आपल्या आवडत्या वस्तूपासून विरक्ती दर्शवू शकतात. इस्लाममध्ये रोजे (उपवास) चा मूळ हेतूही तोच आहे.

काही मोकळ्या विचाराचे स्त्री पुरुष रोजावर (उपवासावर) आपली अक्कल उलगडीत आहेत. ते म्हणतात, ‘‘रोजा ! छे ते एक ढोंग आहे. कसल्यातरी निरर्थक आदेशासाठी जेव्हा अशा आदेशांचा बुद्धीशी संबंध नाही व त्यावर आचरण व पालन करुन कसलाही लाभप्रद उद्देश प्राप्त होऊ शकत नाही, अशासाठी माणसाला भुकेलेला व तहानलेला राखण्याचे प्रयोजन तरी काय आहे.’’

स्वच्छंद विचार असणाऱ्या या महाशयांना आम्ही फक्त एवढेच सांगू इच्छितो की, जे लोक एखाद्या श्रेष्ठ उद्दिष्टांसाठी, काही तासापुरते आपल्या इच्छारुपी बेफाम अश्वाला लगाम घालू शकत नाहीत, ती काय माणसे आहेत? इच्छाआकांक्षाचे हे भक्त मानवतेची कसलीही सेवा कधीच करु शकत नाहीत. आपल्या आवडत्या वस्तूचा त्याग करण्याचे साहस जो बाळगत नाही तो सत्याच्या बाजूने असल्याशी झगडण्यासाठी धैर्य व निश्चय कधीतरी दाखवू शकतात काय?

रशियन कम्युनिस्टांमध्ये आपला उद्देश साध्य करण्यासाठी कष्ट व संकट सहन करणाच्या शक्तीचा अभाव असता तर ते स्टालिनग्राडचा लढा पाय रोवून भक्कमपणाने देऊच शकले नसते; पण इस्लामी संस्काराची टिगल व टवाळी ते करीत असतात. कम्युनिजमचे ध्वजधारक राज्याच्या म्हणजे त्याच्या प्रत्यक्ष शासनशक्तीकरिता तर ते सतत आत्मनिग्रह करण्यास तत्पर व कटिबद्ध असतात; पण जेव्हा राज्याला तसेच सर्व प्राण्यांना व माणसांना निर्माण करणाऱ्या अल्लाहच्या नावावर ते मागितले गेले तर भुवया वर चढवतात व ते मोठा कल्लोळ व आरडाओरडा सुरु करतात.

धर्म आपल्या अनुयायांच्या डोक्यात ते जन्मजात पापी असल्याचे भरवून ठेवून त्यांचे जीवन कडवट करुन टाकतो. पापाचा विचार भुतासारखा माणसाच्या मानगुटीवर सतत बसतो, असे ही म्हटले जाते. काही धर्मांच्या बाबतीत ते खरे असणे शक्य आहे; पण इस्लाम तर त्याहून अगदी वेगळा आहे. कारण इस्लाम शिक्षा व नरकाग्नीपेक्षा दया व क्षमा यावर कितीतरी अधिक भर देणारा धर्म आहे.

इस्लामनुसार पाप हे सदैव माणसाच्या डोक्यावर धिरट्या घालीत असणारे एखादे भूत नाही. तसेच आयुष्यभर माणूस ज्यात चाचपडत, ठेचकाळात भटकत राहावा व त्यातून बाहेर पडण्यास मार्गच सापडू नये असा घोर अंधकार वा गर्द छायाही नाही. आदरणीय आदम (अ) यांचे पाय जे डळमळले, ती गोष्ट टांगत्या तलवारीसारखी सतत मानवतेच्या डोक्यावर टांगलेली आहे आणि तिच्यापासून मुक्त होण्यासाठी आम्ही एखादे प्रायश्चित्त करावे अशी काही आवश्यकता नाही.

‘‘त्यावेळी आदम (अ) यांनी आपल्या पालनकर्त्यांकडून काही वचने शिकून क्षमायाचना केली, जिचा त्याच्या पालनकर्त्याचे स्वीकार केला.’’ (२:३७)

अर्थात आदम (अ) यांना आपल्या अपराधाची क्षमायाचना करण्यासाठी सोपस्करांच्या व विधीरुढींच्या दीर्घ व कठीण मार्गाने जावे लागले नाही. इकडे त्यांनी अंतःकरणापासून क्षमायाचना भाकली व तिकडे अल्लाहच्या दरबारात तिचा स्वीकार झाला.

संबंधित लेख

  • वर्तमान काळातील अपराध : महिलांवरील अत्याचार

    ‘मुले म्हणजे देवाघरची फुले!‘ असे आपण म्हणतो, ऐकतो. असो! मात्र अत्याचारांनी अंतिम कळस गाठलेला दिसतो. लहान-लहान आणि कोवळी मुलेसुद्धा या अमानुष अत्याचारांना बळी पडली. अल्पवयीन मुला-मुलींवर भयानक प्रकारचे लैंगिक अत्याचार होत असल्याचे आताच आपण पाहिले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालानुसार, जगातील अत्यंत प्रगत आणि न्याय, स्वातंत्र्याच्या गप्पा मारणार्या खुद्द अमेरिकेत तीन लाख अल्पवयीन मुली वेश्या व्यवसाय करीत आहेत. या अल्पवयीन मुलींपैकी बर्याच मुली अगदी १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत.
  • ईश्वरभक्तांचे विश्वबंधुत्व

    नमाजसाठी मुस्लिमांना हाक देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. अशी पद्धत जगातील कोणत्याच धर्मीय वा निधर्मी समाजात प्रचलित नाही. नमाजसाठी हाक देण्याचा एकाच प्रकारचा शब्दसमूह (अजान) जगातील प्रत्येक मस्जिदीतून दिवसातून पाच वेळा पुकारला जातो. ‘अजान’ देणाऱ्याची व ज्यांना बोलाविण्यात येत आहे त्यांची मातृभाषा कोणतीही असो, ‘अजान’ अरबी भाषेतच पुकारली जाते. जगातील कोणत्याही भागातील मुस्लिमास ‘अजान’ ऐकताच नमाजकरिता हाक दिली जात आहे असे समजते. अजानने हेही लक्षात येते की, त्यांना (अर्थात सर्व इस्लाम धर्मियांना) कोठे बोलाविले जात आहे?
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]