Islam Darshan

इस्लाम व वर्ग व्यवस्था

Published : Sunday, Feb 14, 2016

‘‘व अल्लाहने तुमच्यापैकी काहींना काहीपेक्षा उपजीविकेच्या साधनांमध्ये प्राधान्य दिले आहे.’’ (अन-नम्ल, ७१)

‘‘व आम्ही एकाला दुसऱ्यापेक्षा दर्जामध्ये उंची देऊन ठेवली आहे’’ (अज-जुर्रुफ, ३२)

शंकाकुशंका काढणारे कम्युनिस्ट असे म्हणतात की कुरआनमध्ये अशा आयती असताना, कोणता मुस्लिम इस्लाममध्ये वर्गीय पद्धतीच्या अस्तित्वाचा इन्कार करु शकतो?

वर्गीय पद्धतीचा अर्थ

मध्यकालीन युरोप तीन ठळक वर्गांत विभागलेला होता. १) प्रतिष्ठित वर्ग २) धर्मोपदेशकांचा वर्ग ३) सामान्य प्रजा

धर्मोपदेशकांच्या वर्गाला ओळखण्याची खूण त्यांच्या पेहरावात होती. सत्तेच्या व शक्तीच्या दृष्टीने हा वर्ग मोठमोठ्या बादशहांच्या, किबहुना सम्राटांच्या तोडीचा होता, म्हणूनच चर्चचा सर्वेसर्वा पोप, बादशहाला नियुक्त करण्याचा अगर त्यांना पदच्युत करण्याचा स्वतःला अधिकार असल्याचे समजत होता. अशी अवस्था त्या बादशहांना कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह होऊ शकत नव्हती, म्हणून त्यांनी चर्च व पोपच्या बंधनातून मुक्त होण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न केले. चर्चच्या आर्थिक साधनांची स्थिती अशी होती की त्यांच्या बळावर तो स्वतःची नियमित फौज बाळगू शकत असे.

उरला प्रतिष्ठित वर्ग तर त्यांना वाडवडिलांकडून वारसाहक्काने प्रतिष्ठा प्राप्त होत असे त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाचा अगर चारित्र्याचा प्रतिष्ठेशी कसलाही संबंध नव्हता. त्यांच्या मते प्रतिष्ठितांना जन्मानेच प्रतिष्ठा मिळत असे व त्याने कितीही नीचाहून नीच कृत्य केले अगर वाईटापेक्षा वाईट कुकर्म केले तरी ते प्रतिष्ठितच राहात असत व त्यांच्या जन्मसिद्ध प्रतिष्ठेला कसलीही बाधा पोहचत नसे.

कायदे करण्याचा एकाधिकार

जहागिरदारी काळात या प्रतिष्ठितांच्या समूहाला, आपल्या जहागिरीत राहणाऱ्या लोकांवर पूर्ण अधिकार प्राप्त असत. तेच सर्व न्यायालयीन व शासकीय अधिकारांचे धनी होते व त्यांच्या इच्छेने त्यांच्या मुखातून निघालेल्या शब्दांना कायद्याचा दर्जा प्राप्त होता. त्याकाळी जी प्रातिनिधिक मंडळे असत. त्यांच्यातही या प्रतिष्ठित वर्गातील व्यक्तींचाच समावेश असे. याची स्वाभाविक फलनिष्पत्ती अशी झाली की जेव्हा हे लोक कायदे करीत त्या कायद्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या स्वार्थाची व त्यांच्याच संरक्षणाची तरतूद असे. त्यांना या लोकांनी पावित्र्याचा असा मुलामा चढविला होता की त्यांना समाप्त करण्याचा विचारही कोणाच्या मनात येवू शकत नव्हता.

सामान्य जनतेची दयनीय अवस्था

सामान्य जनतेला कोणतेही संरक्षण उपलब्ध नव्हते. व त्यांना पूर्ण अधिकारही मिळाले नव्हते, उलट दारिद्रय, गुलामी व मानखंडना त्यांना वाडवडिलांकडून वारसाहक्कानेच येत असे व हाच वारसा ते आपल्या नंतरच्या वंशजांना देत असत.

श्रीमंत मध्यमवर्गाचा (बुर्जवा) जन्म

नंतर जी स्पष्ट आर्थिक प्रगती झाली, तिच्या परिणामस्वरुप श्रीमंत मध्यमवर्ग अस्तित्वात आला व हळू हळू त्याला तेच महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले जे अगोदरच्या काळातील प्रतिष्ठित वर्गाचे वैशिष्ट्य होते. याच वर्गाच्या नेतृत्वाखाली जनतेने फ्रान्समध्ये क्रांती केली व या क्रांतीनेच प्रत्यक्षांत वर्गीय भेदभावांचा शेवट केला व जगाला स्वातंत्र्य, बंधुत्व व समानतेची घोषणा दिली.

वर्तमान युगातील भांडवलशहा

वर्तमानकाळात जुन्या प्रतिष्ठित लोकांची जागा आता भांडवलशहांनी घेतलेली आहे. हा बदल अगदी न कळत रितीने झाला. त्याच बरोबर आर्थिक प्रगतीमुळे होणारे पुष्कळसे इतर बदलही झाले. परंतु या सर्व घडामोडीत, महत्त्वाच्या नियमांत कसलाही फेरबदल झाला नाही. म्हणून आजसुद्धा धन व दौलत, सत्ता व शक्ती सर्वकाही भांडवलशाही वर्गाच्याच हातात आहे व त्यांना हवा तसा ते सरकारी यंत्रणेचा उपयोग करतात. लोकशाही देशातील निवडणुकांचे स्वरुप पहाता असे कळते की जनतेला पुरेपूर स्वातंत्र्य प्राप्त आहे. पण तेथेही काही अशा चोरवाटा असतात की ज्यांच्याद्वारे भांडवलशहा लोकसभा-विधानसभांवर व सरकारी कार्यालयांवर कब्जा करतात. तसेच सर्व उचित-अनुचित मार्गांनी आपल्या सर्व निद्य उद्देशांची पूर्तता करुन घेऊ शकतात.

या संदर्भात हेही लक्षात ठेवले पाहिजे की लोकशाहीचा सर्वांत मोठा राखणदार असणाऱ्या खुद्द ब्रिटनमध्येच आजतागायत ‘‘हाऊस ऑफ लॉर्डस्’’ च्या नावाने एक वरचे भवन अस्तित्वात आहे. तेथे आजसुद्धा प्राचीन काळातील जहागिरीचा एक असा कायदा प्रचलित आहे की जहागिरदाराच्या मृत्यूनंतर त्याची संपूर्ण इस्टेट ज्येष्ट पुत्राला मिळते. या कायद्याचा हा उघड उघड उद्देश इस्टेट व मालमत्ता काही प्रभुत्व लोकांच्या हातात राखण्याचाच आहे, जेणेकरुन कुटुंबातील सर्व मालमत्ता व धन एकाच ठिकाणी केंद्रित राहावे व त्यामुळे मध्यकालीन जहागिरदारांना असलेल्या सामाजिक प्रतिष्ठेचा दर्जा त्यांच्या कुटुंबात शिल्लक राहावा.

वर्गीय पद्धतीचा मूळ पाया

धन हीच खरी शक्ती आहे. या कथित विचाराच्या मूळ पायावरच वर्गीय पद्धत उभारलेली आहे, म्हणून ज्या वर्गाजवळ धन असते तोच वर्ग निश्चितपणे राजनैतिक शक्तीचा ही धनी होतो. देशाचे कायदे करण्यात त्याचा हात असतो. तो प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष रितीने असेच कायदे करीत असतो की त्यांचा मानस त्यांच्याच हितांचे रक्षण करण्याचा व दुसऱ्या वर्गाचे सर्व कायदेशीर हक्क हिरावून घेऊन त्यांना सदैव आपल्या अधीन ठेवण्याचा असतो.

वर्गीय पद्धतीच्या व्याख्येच्या उजेडात पूर्ण विश्वासाने असे म्हणू शकतो की इस्लाममध्ये अशा तऱ्हेच्या वर्गीय पद्धतीला कसलाही वाव नाही. अशी वर्गीय पद्धत इस्लामी इतिहासात कधी आढळलीही नाही. या सत्याचे स्पष्टीकरण खालील वास्तवतेपासूनही होते.

धनसंचय करण्यास अवरोध

संपत्ती व मालमत्ता, काही प्रमुख व्यक्तींच्याच हातात मर्यादित ठेवण्याचा उद्देश असणारा कोणताही कायदा, इस्लामी कायद्यामध्ये अस्तित्वात नाही. कुरआन मजीदमध्ये स्वच्छ व स्पष्ट शब्दात असे सांगितले आहे,

‘जेणेकरुन धन तुमच्यातील धनिकांच्याच दरम्यान फिरत राहू नये.’ धनाचे सतत भ्रमण राहावे व त्याचे सतत विकेंद्रीकरण व वाटप व्हावे, हा उद्देश सतत नजरेसमोर ठेवूनच इस्लामने मानवी जीवनासाठी सर्व कायदे केले, त्याचे हेच कारण आहे. इस्लामच्या वारसा कायद्यानुसार मृताच्या पश्चात उरलेली सर्व संपत्ती, त्याच्या सर्व वारसांमध्ये, मग ती संख्या कितीही मोठी असो, वाटली गेली पाहिजे.

इस्लाममध्ये वारसाहक्क कोणत्याही एकाच व्यक्तीला मिळत नाही. याला अपवाद असा की जेव्हा मृताचे कुणी भाऊ बहीण अगर नातेवाईक आस्तित्वात नाहीत असा आहे. परंतु अशा अपवादामध्येही इस्लामने अशीही व्यवस्था केली आहे की साऱ्या संपत्तीचा व मालमत्तेचा धनी एक व्यक्तीच होऊन बसू नये. उलट त्यामध्ये अशा इतर हक्कदारांसाठीही काही हिस्सा काढला जावा ज्यांचा मृताशी नात्याचा कसलाही संबंध नाही. आधुनिक युगात वारसाचा कर आढळतो. हे त्याचेच एक प्रारंभिक रुप आहे. कुरआनस्पष्टोक्ती आहे,

‘‘आणि जेव्हा (वारसामध्ये संपत्तीचे) वाटपाचे वेळी (लांबचे) नातेवाईक अस्तित्वात असतील आणि अनाथ व गरीब लोक असतील तर त्यांनाही (त्या संपत्तीत) त्यातून काही द्या व त्यांच्याशी चांगुलपणाने बातचित करा.’’ (अन निसा : ८)

धनसंचयाने निर्माण होणाऱ्या समस्यांची इस्लामने अशा तऱ्हेने सोडवणूक केली. इस्लामी वारसा कायद्यानुसार मालमत्ता एखाद्या विशेष वर्गाला वारसाहक्काने मिळत नाही. उलट मृतांच्या वारसामध्ये तिचे वाटप होते व त्यांच्यानंतर याच धनाचे व संपत्तीचे पुढे त्यांच्या वारसामध्ये वाटप होत राहते. म्हणूनच इस्लामी समाजात धन काही व्यक्तींच्या जवळच साठून राहिले नाही तर सर्व समाजामध्ये चलन असते. या गोष्टीला इतिहास साक्ष आहे.

इस्लाममध्ये कायदे करण्याचा अधिकार केवळ एका विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादित नाही या त्याच्या वैशिष्ट्याकडे नेणारा इस्लामचा हा स्वभाव आहे. इस्लामी पद्धतीत कोणीही कोणताही कायदा करण्याचा अधिकार बाळगत नाही. याचे कारण असे की इस्लाम सर्व माणसांना एकाच ईश्वरी कायद्याखाली आणू इच्छितो. हा कायदा ईश्वराने उतरविलेला आहे व तो माणसामाणसात कोणताही भेदभाव करण्याला उचित समजत नाही.

वर्गविरहित समाज

याचा अर्थ असा आहे की इस्लामी समाज एक वर्गविरहित समाज असतो. कारण वर्गाचे अस्तित्व व कायद्याची संरक्षणे यांचा आपसांत खोल संबंध असतो. जेथे कायद्याची संरक्षणे नसतील व कोणताही वर्ग आपल्या इच्छेनुसार कायदे करून आपल्या स्वार्थाखातर इतरांचे नुकसान करण्याची ताकद बाळगत नसेल, तर तेथे वर्गीय भेदभावसुद्धा कधीही जन्म घेत नाही.

कुरआन आयतींचा अर्थ

क्षणभर त्या दोन आयतींचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करु या, ज्या आयती या प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या आहेत, त्यांचा वरवरचा अभ्यास काही लोकांच्या मनात शंका व भ्रम निर्माण होण्यास कारणीभूत होऊ शकतो.

कुरआनमध्ये असे सांगितले आहे,

‘‘व अल्लाहने तुमच्यातील काहीना काहीपेक्षा उदरनिर्वाहाच्या साधनामध्ये प्राधान्य दिले आहे.’’

‘‘व आम्ही एकाला दुसऱ्यापेक्षा दर्जामध्ये श्रेष्ठता देवून ठेवली आहे.’’

यामध्ये एकाच सत्याचा उल्लेख आहे

या आयतीत केवळ एकच सत्य वर्णन केले गेले आहे, जे कोणत्याही इस्लामी पद्धतीत अगर बिगर इस्लामी पद्धतीत आढळू शकते. यामध्ये जे काही वर्णन केले गेले आहे, ते केवळ इतकेच आहे की माणसामध्ये निर्वाहाच्या साधनांच्या बाबतीत व त्यांच्या दर्जाच्या बाबतीत भिन्नता अस्तित्वात आहे. रशियाचेच उदाहरण घ्या. तेथे सर्व लोकांना सारखाच मोबदला मिळत असतो काय किवा काहींना इतरांच्या तुलनेत अधिक मोबदला मिळत असतो? सैन्यात दाखल होणाऱ्या सर्वच सैनिकांना समान हुद्दे दिले जातात की काहींना इतरापेक्षा श्रेष्ठत्व प्राप्त होत असते. जर हा भेद तेथेही अस्तित्वात आहे, तर त्याचे कारण माणसामध्ये आढळणाऱ्या अनिवार्य भिन्नतेखेरीज दुसरे काय असू शकते? वरील आयतीमध्ये अशी भिन्नता असण्याचे कोणतेही विशेष कारण दाखविले गेले नाही, व तिची उत्पत्ती संपत्तीपासून आहे, कम्युनिझमपासून आहे अथवा इस्लामपासून आहे हेही दाखविले गेले नाही. तसेच या श्रेष्ठता (अगरभिन्नता) इस्लामी मानदंडाच्या दृष्टीने न्यायपूर्ण आहेत की अन्यायकारक आहेत या बाबतीतही या आयतीमध्ये मौन आहे. ही गोष्ट बाजूला ठेवून ही गोष्ट केवळ एक सत्य या स्वरुपात सांगितली गेली आहे की जगात प्रत्येक ठिकाणी कशारीतीने आढळून येते. ही गोष्ट उघड आहे की जगात जे काही घडत आहे की जगात जे काही घडत असते ते सर्व ईश्वराला चांगल्या तऱ्हेने ज्ञात असते.

आतापर्यंत ही गोष्ट स्पष्ट झाली पाहिजे की इस्लामी समाज एक असा समाज आहे, ज्यामध्ये वर्ग आढळत नाही व कायद्याचे संरक्षणही त्यात नाही. संपत्ती व मालमत्तेचे सदर्भांत लोकांमध्ये जो फरक आढळतो त्याचा वर्गीय पद्धतीची गोंधळ करता कामा नये. याचे कारण असे की जोपर्यंत जगातील साधनांची व मालमत्तेची ती तफावत एखाद्या कायद्याच्या अथवा वैयक्तिक श्रेष्ठत्वाच्या रुपात प्रकट होत नाही तोपर्यंत त्याचे परिणाम स्वरुप कोणताही वर्ग निर्माण होऊ शकत नाही. जर कायद्याच्या दृष्टीने सर्व माणसे सैद्धान्तिक दृष्टिकोनातून समान आहेत तसेच तथ्यांच्या बाबतीतही समान तर धन व संपत्तीची ही तफावतसुद्धा वर्गीय भेदभावाच्या रुपाने प्रकट होऊ शकत नाही.

येथे ही गोष्ट स्पष्ट व्हावी की इस्लामने व्यक्तीना जमिनीच्या मालमत्तेचा जो अधिकार दिला आहे त्यांच्या परिणामस्वरुप जमीनमालकांना कसलेही असे विशेष संरक्षण प्राप्त नाही की ज्याच्या बळावर त्यांनी दुसऱ्याना गुलाम बनवावे किवा त्यांना आपल्या उद्देशपूर्तीचा रंगमंच बनवावे. जर खऱ्या इस्लामी पद्धतीत भांडवलवादी पद्धतीचा जन्म झाला असता तर तेथे ही अशीच अवस्था निर्माण झाली असती, कारण इस्लाममध्ये शासकांना शासन करण्याचा अधिकार भांडवलशहाच्या वर्गांचे समर्थन करण्याच्या उपकारात प्राप्त होत नाही तर तो संबंध राष्ट्राच्या पाठिब्याने व निवडीने होतो. ईश्वरी आदेशांचे पालन करणे हे इस्लामी शासकाचे कर्तव्य असते.

सत्य तर असे आहे की सर्व व्यक्ती संपत्तीच्या दृष्टीने समान आहेत, असा कोणताही समाज या जगात अस्तित्वात नाही. कम्युनिष्ट समाजातही अशी समानता आढळत नाही. तरीसुद्धा त्याचा असा दावा आहे की त्याने सर्व वर्ग नष्ट करुन टाकले आहेत. त्याचे सारे कर्तृत्व केवळ इतकेच आहे की त्याने छोट्या छोट्या भांडवलशहाना नष्ट करुन एका शासकांच्या अशा वर्गाला जन्म दिला ज्याने दुसरे वर्ग नष्ट करुन टाकले.

संबंधित लेख

  • धर्म आणि राजकारण (आजचा ज्वलंत प्रश्न)

    इस्लाम ही एक सर्वसमावेशक अशी परिपूर्ण जीवनपध्दती आहे. याबद्दलचा खुलासा आपण मागील प्रकरणांतून पाहिला आहे. राजकारण हा धर्मकारणाचा एक भाग कसा आहे? तसेच धर्मव्यवस्थेचे राजकीय व्यवस्था एक महत्त्वाचे अंग कसे आहे? याचे अद्याप स्पष्टीकरण पूर्णतः न झाल्यामुळे लोकमनात संभ्रम आहे. या दोघांच्या संबंधाचा येथे स्पष्ट खुलासा होणे गरजेचे आहे. राजकारणाला आपण क्षुद्र समजून त्याची अवहेलना करू शकत नाही. आधुनिक जगात तर त्याचे महत्त्व इतके वाढले आहे की अतिमहत्त्वाची खाजगी कामेसुध्दा आज राजकारणाच्या कक्षेत मोडतात. त्यामुळे मनुष्यजीवनावर राजकारणाचा स्वाभाविकपणे दूरगामी परिणाम होत आहे. डोळे उघडून पाहिल्यास कळून येते की सर्व तत्त्वज्ञान, आदर्श आणि श्रध्दा राजकारणाच्या एका फटक्यात नाहीसे होतात.
  • इस्लामी विधिज्ञ माननीय अब्दुल्लाह बिन उमर(र.)

    अब्दुल्लाह बिन उमर(र.)यांची गणना मुस्लिम जणसमुदायाच्या धर्मगुरुंमध्ये होते. त्यांना सामान्यतः ‘इब्ने उमर(र.)’(अर्थात उमरपुत्र) या नावाने संबोधित करण्यात येते. कारण ते माननीय उमर फारुक(र.)ज्यांच्या बाबतीत आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी गौरवोद्गार काढले, ‘‘माझ्यानंतर कोणी जर प्रेषित असते, तर ते माननीय उमर फारूक(र.)असते, परंतु माझ्यानंतर कोणीही प्रेषित नाही.’’ इब्ने उमर(र.)यांच्या आईचे नाव ‘जैनब बिते मजऊन’(र.)होते. त्या ‘जमुह’ परिवारातील ‘मजऊन’ यांच्या कन्या होत्या. प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या त्या सोबती श्रद्धावंतांच्या माता अर्थात प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या पत्नी सन्माननीय हफ्सा बिंन्ते उमर फारूक(र.)मा. अब्दुल्लाह बिन उमर(र.)यांची सख्खी बहीण होती. त्यांना प्रेषितांचे सोबती असण्याचे सौभाग्य लाभले होते.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]