Islam Darshan

इस्लामची सामाजिक जीवनव्यवस्था

Published : Sunday, Feb 14, 2016

संपूर्ण मानवजात ही स्त्री-पुरुष या दोघांनी मिळून बनलेली आहे. इतर सजीव प्राण्यांप्रमाणे मानव जोडीने निर्माण केला गेला आहे पुरुष आणि स्त्री यांच्या दरम्यान वैवाहिक संबंध असणे काही पाप किंवा गुन्हा नाही किंवा त्यात आक्षेपार्ह असे काहीही नाही. उलट मानवी वंश वाढविण्याकरिता संततीची काळजी घेणे, देखभाल करणे, प्रशिक्षण देणे, आपसांत प्रेमसंबंध, हे सर्व स्त्री व पुरुष दोन्हींच्या चारित्र्य, सत्कर्म व सदाचारासाठी आणि ईशधर्माचे अनुकरण व उत्कर्षाकरिता गरजेचे आहे. हे व्यावहारिक, भौतिक काम नसून नैतिकतेचे, ईशधर्माचे काम आहे आणि बक्षिसास पात्र असे सत्कर्म आहे. पवित्र वैवाहिक संबंधातून कुटुंब व समाज अस्तित्वात येतो. त्याने वास्तविक इस्लामी समाजाची इमारत तयार व प्रस्थापित होते. विवाह हा स्त्री-पुरुष दोघांच्या स्वतंत्र इच्छेने आणि कुटुंब व समाज यांच्या संमतीने अस्तित्वात येतो. अगदी जवळच्या नातेवाईकांचा अपवाद वगळता एखाद्या सूचनेनुसार स्त्री-पुरुष एकमेकांशी विवाह करु शकतात. अश्रद्ध (नास्तिक); इन्कार करणारे, अनेकेश्वरवादी यांच्याशी वैवाहिक संबंध अयोग्य व अवैध आहेत. तथापि यहुदी आणि ख्रिश्चन स्त्रियांशी विवाह वैध आहे, परंतु गौण आहे मान्यतेस पात्र नाही. पुरुष एकापेक्षा अधिक विवाह विशिष्ट परिस्थितीनुसार करु शकतो. परंतु ही संख्या जास्तीत जास्त चार आहे आणि या अटीवर आहे की, पुरुष जर स्त्रीच्या आणि तीच्या संततीच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारण्यास समर्थ असेल आणि त्यांचे न्याय्य हक्क त्यांना बहाल करीत असेल, तरच त्याने एकापेक्षा अधिक विवाह करावे अन्यथा एकपत्नीव्रत स्वीकारावे. चार पत्नींची परवानगी हा आदेश किंवा कायदा नाही. ही परवानगी काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, काही विशिष्ट गरजा भागविण्याकरिता, अडीअडचणी दूर करण्याकरिता आहे. उदाहरणार्थ - स्त्री वांझोटी, निपुत्रिक व कायमची आजारी असेल किंवा अनाथ मुलांच्या पालनपोषणाचा प्रश्न दूर करण्यासाठी असेल, स्त्री पुरुषांना अवैध संबंधापासून, स्वैराचारापासून रोखण्यासाठी असेल. या विशिष्ट परिस्थितीमध्ये व उच्च उद्देशाकरिता न्यायाच्या अटींचे पालन होत असेल, तरच अधिक पत्नींची परवानगी आहे. बहुपत्नित्व ही पद्धत समाजामध्ये रुढ नाही आणि ती होऊही शकत नाही. कारण एकापेक्षा जास्त स्त्रियांशी विवाह करू शकेल इतक्या स्त्रिया समाजामध्ये नाहीतच किंवा अधिक स्त्रियांची आणि त्यांच्या संततीच्या पालनपोषणाची जबाबदारी पूर्ण करु शकेल एवढी भौतिक साधनसामुग्री प्रत्येक पुरुषाजवळ नाही. तसेच पुरुषात सगळ्या पत्नींमध्ये आपापसात समतोल निर्माण करण्याची ताकद असू शकते असे नाही. हेच एक कारण आहे ज्यामुळे मुस्लिमांमध्ये ही बहुपत्नित्वाची परंपरा फार कमी आहे. स्त्री-पुरुषांमध्ये विवाहाशिवाय संबंध बळजबरीने अथवा दोघांच्या संमतीने ठेवणे हा सर्वांत मोठा गुन्हा आहे आणि ते अतीभयानक अशा शिक्षेस पात्र आहेत. स्त्रियांची लज्जा, मानमर्यादा, आदर यांच्या रक्षणासाठी, तसेच पुरुष व समाज यांच्या सहजीवनासाठी व आदर्श समाजाच्या निर्मितीकरिता स्त्री व पुरुष यांची कार्यक्षेत्रे ठळकपणे वेगवेगळी केली आहेत. घराची सांसारिक व्यवस्था, देखभाल, संततीचे पालनपोषण व प्रशिक्षण याव्यतिरिक्त माणुसकीचे धडे व आपल्या पतीची सेवा करणे स्त्रीची जबाबदारी आहे. पुरुषावर पत्नी, संतती यांच्या पालनपोषणाची जबाबदारी, तसेच आर्थिक व शैक्षणिक जवाबदारी आहे.

समाजामध्ये अनेक लोक असंख्य अफवा व गैरसमजांना बळी पडतात. नैतिक मूल्ये रूजण्यासाठी व मर्यादेसाठी पडदा पद्धत व संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख स्त्री व पुरुषांना जरुरी आहे. विवाहानंतर जर आपसात पटत नसेल, निभाव लागत नसेल, तसेच परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्नसुद्धा निष्फळ ठरत असेल, तर तलाक (घटस्फोट) व खुला (स्त्रीकडून घटस्फोट) यासारखे मार्ग वापरुन दोघेही विवाहबंधनातून मुक्त होऊ शकतात. विवाहबंधनातून मुक्त झाल्यानंतर त्यांना पुनर्विवाह करण्याचा हक्क आहे. विधवा स्त्री ही कुलटा किंवा अपवित्र नाही. तिला फक्त जिवंत राहण्याचाच नव्हे, तर दुसरा विवाह करण्याचासुद्धा अधिकार आहे. दुसरा विवाह करणे म्हणजे पाप नसून ते एक सत्कृत्य असून सदाचाराचे आणि ईश्वराजवळ बक्षीसास पात्र असे कृत्य आहे. कुटुंबातील, समाजातील वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये आपसात न्याय, सदाचार, सद्वर्तणूक आणि असीम प्रेम यांची देवाणघेवाण झाली पाहिजे.

पतीचे कर्तव्य आहे की, आपल्या पत्नीचे, संततीचे पालनपोषण योग्य रीतीने करावे, तिचे चारित्र्य जोपासावे, तिचे संरक्षण करावे, तिच्याशी दयेने, नरमीने, क्षमाशील वृत्तीने, प्रेमाने वागणे. पत्नीची जबाबदारी आहे की, सर्व वैध गोष्टींबाबत पतीचे म्हणणे ऐकावे, पतीची प्रेमाने सेवा करावी.

ईश्वराची गुलामी आणि प्रेषितांच्या आज्ञापालनानांतर आईवडिलांचे आज्ञापालन आणि त्यांच्याशी सद्वर्तन करणे फार महत्त्वाचे आहे. मात्र ईश्वराची अवज्ञा होत असेल, तर त्यांचे म्हणणे ऐकू नये. संततीचे पालनपोषण आणि संगोपन आईवडिलांची जबाबदारी आहे. सर्व नातेवाईकांना आपसामध्ये माणुसकीचा हक्क आहे आणि सुख-दुखःमध्ये सामील होणे, त्यांच्या कामी येणे, मदत करणे, दया व कृपा करणे, सहानुभूती दर्शविणे, आणि नातेवाईकांचे हक्क अदा करणे या गोष्टींना नैतिक धर्मामध्ये फारच महत्त्व आहे. सर्व मुस्लिम एकमेकांचे बांधव, मदत करणारे आणि दुःख निवारण करणारे आहेत. मुस्लिम तो आहे जो कोणावर अकारण अन्याय करीत नाही व शिवीगाळ करीत नाही. एका श्रद्धावंताने दुसऱ्याशी वाईट वागणे म्हणजे ईश्वराची अवज्ञा आणि त्याचा अपमान करण्यासारखे आहे. खरा मोमीन, (श्रद्धाळू) तो आहे जो आपल्या बंधूकरिता जी गोष्ट पसंत करतो, तीच स्वतःकरिता पसंत करतो. शेजारी कोणी असला तरी न्याय व सद्वर्तनाचे त्याच्याशी वागा. जो शेजाऱ्याला त्रास देतो तो मुस्लिम व ईश्वरावर श्रद्धा ठेवणारा नाहीच. सर्व मानव आदम व हव्वाची संतती आहे. म्हणून ते एकाच वंशातील आहेत आणि सर्व मानव आपसांत बांधव आहेत. त्यांच्या सुखदुःखामध्ये भाग घेणे आणि आपल्या कुवतीप्रमाणे त्यांच्या कामी येणे, ही प्रत्येक मुस्लिमाची नैतिक व सार्वत्रिक जबाबदारी आहे. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्ती आणि नोकरसुद्धा सद्वर्तनाचे अधिकारी आहेत. प्रत्येक माणसाचा प्राण, धनसंपत्ती, लाज, इज्जत आदरास व दयेस पात्र आहे. त्याच्यावर अकारण अत्याचार व अतिक्रमण करणे हा फार मोठा गुन्हा असून तो अत्यंत कठोर शिक्षेस पात्र आहे. आत्महत्या हा सुद्धा माफ न करण्यासारखा गुन्हा आहे. मुस्लिम समाज आणि इस्लामी शासनाची जवाबदारी आहे की, दुर्बल, लाचार, गरीब लोकांचे हक्क त्यांना बलाढ्य प्रस्थापित लोकांकडून मिळवून देणे. तसेच वाममार्ग, अन्यायास प्रतिबंध करुन न्याय व सुव्यवस्था प्रस्थापित करणे, ही सुद्धा इस्लामी शासनाची जबाबदारी आहे. ईशधर्म व सत्याची सातत्याने कायमची प्रस्थापना आणि समाजामध्ये न्याय व सदाचार प्रस्थापित करुन इस्लामी राज्यव्यवस्था किंवा शासन प्रस्थापित करणे याकरिता शेवटपर्यंत प्रयत्न करणे, ही प्रत्येक मानवाची जबाबदारी आहे.

संबंधित लेख

  • ईश्वराला रचनात्मकता प्रिय आहे तर विघातकता अप्रिय आहे

    स्वामी व मालक म्हणून त्याची अशी इच्छा आहे की, त्याच्या जगाची व्यवस्था चोख केली जावी, तिला जास्तीतजास्त सावरले जावे, त्याने प्रदान केलेल्या साधनांना आणि त्याने दिलेल्या शक्ती व गुणांचा जास्तीतजास्त चांगल्या पध्दतीने उपयोग केला जावा. तो या गोष्टीला मुळीच पसंत करीत नाही की, त्याच्या जगात बिघाड व्हावा, त्याला उजाड व ओसाड केले जावे, त्याच्या जगाचे अव्यवस्थेने, दुर्गंधी व घाणीने आणि जुलूम व अत्याचारींनी वाटोळे करून टाकावे.
  • आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांचे ‘नबुवत’ (प्रेषित्व) आणि प्रेषित्वाचे प्रमाण

    हा तो काळ होता जेव्हा या जगातील समस्त मानवजातीकरिता एक प्रेषित अर्थात आदरणीय मुहम्मद (स.) यांना अरबस्थानातील भूमीवर जन्माला घालण्यात आले. त्यांना इस्लामची परिपूर्ण शिकवण व परिपूर्ण विधान देऊन त्याचा प्रसार सर्व जगभरात करण्याच्या सेवा कार्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. जगाच्या भूगोलाकडे पाहा, आपणास हे कळून चुकेल की साऱ्या जगाच्या प्रेषित्वासाठी पृथ्वीवर अरब भूमीपेक्षा अधिक उपयुक्त स्थान दुसरे कोणतेही असू शकत नाही. हा देश आशिया व आफ्रिका खंडापासून अगदी मध्यवर्ती असून युरोपही येथून नजीकच आहे. युरोपातील सुसंस्कृत जाती त्यावेळी विशेष करून युरोपच्या दक्षिण भागात स्थायिक होत्या. अरबस्थानापासून त्या स्थानाचे अंतर अरबस्थान व भारत त्यांच्या दरम्यान असलेल्या अंतराइतकेच आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]