Islam Darshan

प्रतिष्ठेचा मापदण्ड केवळ सदाचार आहे

Published : Saturday, Feb 13, 2016

मनुष्याचे दुर्दैव असे आहे की त्याने रंग व वंश, घराणे व टोळी, राष्ट्र व स्वदेश आणि भाषा व कथनातील तफावतीला निसर्गाच्या निशाण्या समजून त्यांच्यापासून बोध घेतला नाही, तर त्यांना प्रतिष्ठा व अवमान आणि उच्चता व नीचतेचे प्रमाण बनवून टाकले, वस्तुतः प्रतिष्ठा व अवमानाचा संबंध रंग, रूप, राहणीमान व वार्तालापाशी नाही तर अल्लाहवरील विश्वास व कृतीशी आहे. जो मनुष्य स्वतःला अल्लाहचा सेवक सिद्ध करतो, त्याला भिऊन जीवन व्यतीत करतो आणि त्याच्या कृपाप्रसादाला पात्र बनण्यासाठी प्रयत्न करतो तोच खरा प्रतिष्ठित व सज्जन होय. जो मनुष्य गुणांनी रिक्त असेल त्याच्यासाठी अल्लाहजवळ प्रतिष्ठेचे कोणतेही स्थान नाही, मग लोकांच्या दृष्टीत तो कितीही उच्च पदस्थ का असेना. कुरआनने फार स्पष्टपणे सांगितले आहे.

‘‘हे लोकहो, आम्ही तुम्हाला एक पुरुष आणि एका स्त्रीपासून जन्मास घातले व आम्ही तुम्हाला विभिन्न-जाती आणि टोळ्यात विभाजित केले जेणे करून एकमेकाला ओळखू शकावे. निःसंशय तुमच्यात सर्वांत सज्जन अल्लाहजवळ तो आहे जो सर्वात अधिक सदाचारी आहे. निस्संदेह अल्लाह जाणणारा व माहीतगार आहे.’’ (हुजुरात : १३)
कुरआनच्या या आयतीने प्रतिष्ठा व अवमानाचे सर्व खोटे प्रमाण नष्ट केले.यात स्पष्टपणे हे जाहीर केले गेले आहे की जन्मतः कोणासही कोणत्याही प्रकारे श्रेष्ठत्व प्राप्त नाही. येथे कोणीही मातेच्या उदरातून निष्पाप, चुका न करणारा म्हणून जन्म घेत नाही आणि कोणीही पापाचे गाठोडे आपल्या शिरावर लादून आणीत नाही. त्याच्या हातात न उच्चतेचे प्रमाणपत्र असते न नीचतेचा परवाना. मनुष्याची महानता व श्रेष्ठत्व त्याच्या सत्कर्म व सदाचाराशी संबंधित आहे. अल्लाहच्या दरबारात वांशिक प्रतिष्ठा व घराणे आणि टोळीविषयी नव्हे, तर सदाचाराविषयी प्रश्न केला जाईल. ज्याच्या मनात सदाचार असेल तेच त्याच्या बक्षीस व सन्मानास पात्र ठरतील. ज्यांचे जीवन अल्लाहच्या भयापासून रिक्त असतील त्यांना अल्लाहच्या पकडीपासून कोणीही वाचवू शकणार नाही.

चुकीच्या आदर्शाची सुधारणा
जगातील विभिन्न जाती व टोळ्यांनी प्रतिष्ठा व अपमानाच्या ज्या खोट्या आदर्शांना स्वीकारले होते. प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यापैकी एकेकाला मुळासकट उखडून फेकून दिले व संपूर्ण मानवजातीसाठी सदाचार व ईशपरायणतेला प्रतिष्ठेचे आदर्श ठरविले.

जातीय व वांशिक अभिमानावर टीका
जातीय व वांशिक अभिमानाने नेहमीच दुसऱ्या जाती व इतर वंशीयांना समान दर्जा देण्यास नकार दिलेला आहे आणि त्यांच्याशी समान व्यवहाराची अनुमती दिलेली नाही. प्रेषित मुहम्मद (स) यांनी अंतिम निरोपाच्या हज प्रसंगी जे अनुपम व्याख्यान दिले होते. त्यात यावर कठोर प्रहार केला होता व मानवजातीच्या एकतेची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते की,

‘‘हे लोकहो, ऐका, निःसंशय तुमचा पालनकर्ता एक आहे व तुमचा पिता (सुद्धा एक आहे. ऐका, एखाद्या अरबाला एखाद्या अरबेतरावर एखाद्या अरबेतराला एखाद्या अरबावर, एखाद्या गौरवर्णियाला एखाद्या श्यामवर्णियावर, एखाद्या श्यामवर्णियाला गौरवर्णियावर सदाचाराव्यतिरिक्त कोणत्याही आधारावर कसलेही श्रेष्ठत्व प्राप्त नाही. (ज्याच्या ठायी जितका सदाचार असेल तितकाच तो श्रेष्ठत्वधारी बनेल.)’’ (मसनद अहमद ५-४११)

अंतिम निरोपाच्या हज प्रसंगी संपूर्ण अरबस्तान त्यांच्या अधिपत्याखाली होता. त्यांचा सुद्धा संबंध अरबस्तानशी होता आणि त्यांच्या सर्व सोबत्यांचा संबंधदेखील अरबस्तानाशीच होती. म्हणून अरबांमध्ये आपल्या श्रेष्ठत्वाची व उच्चतेची भावना निर्माण होऊ शकत होती. त्यांनी या भावनेला मूळ धरू दिल नाही आणि सांगितले की सर्व मानव एकाच अल्लाहचे सेवक आणि एकाच पित्याची संतती आहेत. त्यांच्यात श्रेष्ठत्व त्या माणसाला प्राप्त आहे जो सदाचारी व ईशपरायण असेल.
आपले एक सोबती माननीय अबूजर (र) यांना प्रेषित मुहम्मद (स) यांनी हीच गोष्ट अशा प्रकारे कथन केली.

‘‘पाहा, तुम्ही एखाद्या गोऱ्या आणि काळ्यापेक्षा अधिक चांगले नाही पण अपवाद असा की तुम्ही सदाचारात त्याच्यापेक्षा पुढे मजल मारावी.’’ (मसनद अहमद ५/१५८)

घराणे व टोळीच्या अभिमानाची अलोचना
घराणे व टोळीच्या अभिमानाने सुद्धा मानवाच्या एकतेला हानी पोचविली आहे. प्रेषित मुहम्मद (स) यांनी यासदेखील मनाई केली आहे. माननीय अबू हुरैरा (र)यांचे कथन आहे की प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘लोकांनी (अज्ञान युगात) मृत वाडवडिलांवर गर्व करण्याचे पूर्णतः सोडून द्यावे. कारण ते तर जहन्नुम (नरक) चा कोळसा बनले आहेत, नाहीतर ते अल्लाहपाशी त्या शेणकिड्यापेक्षा अधिक तुच्छ बनतील जो घाणीला आपल्या नाकाने ढकलत फिरतो. महान अल्लाहने तुमच्यातून अज्ञान युगातील अहंकार व वाडवडिलांविषयीचा गर्व दूर केला आहे. माणसे केवळ दोन प्रकारचे आहेत. ईमानधारक व ईशभीरू अथवा कुचरित्र आणि दुर्दैंवी लोक, सर्वच्या सर्व आदमची संतती आहेत आणि आदम मातीपासून निर्माण केले गेले होते.’’ (तिर्मिजी)

माननीय समरा बिन जुंदब (र) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘‘कुलीनता तर संपत्ती आहे आणि महानता व सज्जनता सदाचाराने प्राप्त होते.’’ (तिर्मिजी)

वांशिक श्रेष्ठतेचा संबंध घराण्याशी आहे. परंतु जगाच्या दृष्टीत धनसंपत्ती खरी महत्वाची आहे. ज्याच्याजवळ संपत्ती आहे त्याची वांशिक श्रेष्ठता उच्चकोटीची असते. सज्जनता व श्रेष्ठत्व एक वेगळीच गोष्ट आहे. ही सदाचार व ईशपरायणतेने उत्पन्न होते.
माननीय अबू हुरैरा (र) यांचे कथन आहे की प्रेषित मुहम्मद (स) यांना प्रश्न केला गेला - ‘‘मन अक्रमुन्नास?’’ लोकांत सर्वात महान कोण आहे? प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले ‘‘अतकाहुम’’ जो त्या सर्वात अधिक सदाचारी आहे. निवेदन केले गेले की आम्ही एक दुसरीच गोष्ट विचारू इच्छितो. प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले की तुम्ही वांशिक श्रेष्ठतेविषयी विचारीत आहात. या अर्थाने सर्वात महान आदरणीय युसूफ (अ) आहेत. ते स्वतः प्रेषित होते आणि एका पैगंबराचे याकूब (अ) चिरंजीव होते. ते सुद्धा एका पैगंबरांचे इसहाक (अ) पुत्र होते आणि ते अल्लाहचे मित्र प्रेषित इब्राहीम (अ) चे पुत्र होते. यात या गोष्टीकडे निर्देश केला आहे की घराण्याचे वांशिक श्रेष्ठत्व सुद्धा त्याचवेळी श्रेष्ठत्व व महानतेचे कारण बनते जेव्हा त्यात सदाचार आढळतो. महान अल्लाहचे पैगंबर सर्वात जास्त त्याला भिणारे व पुण्य आणि सदाचारात सर्वात अग्रेसर असतात. प्रेषित युसूफ (अ) यांना हे श्रेष्ठत्व प्राप्त आहे की ते सुद्धा पैगंबर होते व त्यांच्या पूर्वीच्या तीन महान व्यक्तीसुद्धा अल्लाहचे पैगंबर होत्या. पैगंबरांच्या मित्रांनी निवेदन केले. ‘आमचा मुद्दा हा देखील नाही.’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, तुम्ही जर अरबस्तानातील साठ्याविषयी विचारीत असाल तर त्याचे उत्तर असे आहे की जे अज्ञानयुगात अधिक चांगले होते ते इस्लामच्या काळात सुद्धा अधिक चांगले असतील. या अटीवर की त्यांनी इस्लामच्या काळात ज्ञान प्राप्त करावे.’’ (बुखारी, मुस्लिम)
यात सुद्धा प्रेषित मुहम्मद (स) यांनी अज्ञान काळातील वांशिक प्रतिष्ठेऐवजी धर्माच्या ज्ञानाला अग्रकम दिला आहे. काल जे आपल्या सद्गुण आणि योग्यतेच्या दृष्टीने अधिक चांगले होते. आज सुद्धा तेच अधिक चांगले ठरतील. परंतु अट अशी आहे की त्यांनी धर्माचे ज्ञान प्राप्त करावे आणि त्यात ज्ञानाची सखोल दृष्टी निर्माण व्हावी.
आपल्या घराण्याचा गर्व सुद्धा केला जातो आणि दुसऱ्याच्या घराण्याचा व वांशिक प्रतिष्ठेचा उपहास केला जातो. टोमणे दिले जातात आणि तिरस्कार सुद्धा केला जातो. वस्तुतः पहिलीही गोष्ट खरी नाही आणि दुसरी सुद्धा नाही. दोष सर्वांत असतात. कोणीही त्यापासून मुक्त असत नाही. पूर्णत्व केवळ अल्लाहला प्राप्त आहे. माननीय उकबा बिन आमिर (र) चे कथन आहे की प्रेषित मुहम्मद (स) यांनी म्हटले,
‘‘निस्संदेह तुमची ही वांशिक प्रतिष्ठा अशासाठी नव्हे की त्याच्याद्वारे एखाद्याला लज्जित केले जावे. तुम्ही सर्वजण आदमची संतती आहात. (सर्वात उणीवा आहेत) ज्याप्रकारे साअ (माप) ची कमतरता तुम्ही पूर्ण केल्याशिवाय सोडून द्या. कोणासही कोणावर धर्म व सदाचाराशिवाय कोणत्याही अन्य कारणामुळे कसलेही श्रेष्ठत्व नाही. माणसाच्या विनाशासाठी त्याची व्यर्थ बडबड, कंजुषपणा व फटकळपणा पुरेसा आहे.’’ (मसनद, अहमद)

संपत्तीच्या गर्वावर टीका
सधनता व निर्धनतेच्या आधारावर सुद्धा माणसांचे विभाजन झाले आहे. श्रीमंतांनी गरीब व निर्धनांना दाबून ठेवले आणि क्रूरपणे त्यांना लुबाडले. यामुळे हळूहळू जहागिरदार आणि श्रमिकांचे दोन गट अस्तित्वात आले आणि त्यांच्या दरम्यान संघर्ष सुरू झाला. आज हा संघर्ष आपल्या पराकोटीला पोचला आहे. भांडवलदार मजुरांचा अन्यायी लाभ घेऊ इच्छितो आणि मजूर आपल्या हक्कापेक्षा अधिकची मागणी करीत आहे. एवढ्यावरच गोष्ट थांबली नाही, तर माणसाच्या आर्थिक स्थिती त्याची प्रतिष्ठा व अपमानाची प्रमाण बनली. भांडवलदाराने, जो केवळ आपल्या भांडवलामुळे चैन करतो, समाजात प्रतिष्ठेच स्थान प्राप्त केले आणि जो बिचारा परिश्रमाने मजुरी करून आजीविका कमवितो त्याला तुच्छ व अपमानित समजले जाऊ लागले.
इस्लामने या दोन्ही गोष्टींना उखडून टाकले आहे. त्याने एकीकडे तर दारिद्रयाचा प्रश्न सोडविला, श्रीमंतांच्या संपत्तीत गरिबांचा हक्क ठरवून दिला, संपत्तीच्या संचय व व्यय करण्यावर नैतिक व कायदेशीर निर्बंध लादले, प्रत्येकाला ‘रोजी’ कमविण्यासाठी उत्तेजित केले, योग्य साधनांची प्राप्ती करण्यात सहाय्य केले आणि जो मनुष्य रोजीसाठी धावपळ करू शकत नाही त्याच्या आर्थिक जबाबदारीचा भार उचलला. दुसरीकडे जाहीरपणे उद्घोष केला की मालमत्ता व संपत्ती प्रतिष्ठेची साधने नव्हेत. जगाने जर त्याला प्रतिष्ठेचे मापदण्ड बनविले आहे, तर ती चूक केली आहे. त्याला हे मापदण्ड सोडून द्यावे लागेल. भविष्यात अंतिम दिनी महान अल्लाह माणसाच्या संपत्तीला नव्हे, तर त्याचे आचरण पाहील. तेथे यशस्वी तोच होईल ज्याचे आचरण चांगले असेल. व्यभिचारी माणसाला अल्लाहच्या पकडीतून कोणतीही गोष्ट वाचवू शकणार नाही.
पवित्र कुरआनमध्ये स्पष्ट शब्दांत सांगितले आहे,
‘‘ही तुमची संपत्ती आणि तुमची संतती नव्हे, जी तुम्हाला आमचे निकटवर्ती स्थान प्रदान करतील. होय, जे ईमान आणतील आणि पुण्यकर्म करतील, तर अशा लोकांसाठी त्यांच्या कर्मांच्या दुप्पट फळ मिळेल आणि ते उच्चस्थानी सुखा समाधानाने राहतील आणि जे लोक आमच्या निशाण्यांना पराभूत करण्यासाठी धावपळ करतात तर ते सर्व प्रकोपात हजर केले जातील.’’ (सबा : ३७-३८)
संपत्तीचे नेतृत्व व सत्तेचेसुद्धा प्रमाण राहिले आहे. ज्या लोकांच्या हातात खजिन्याच्या किल्ल्या होत्या, त्यांनीच सामान्यतः गरीब लोकांवर राज्य केले आणि त्यांच्याशी पशुपेक्षा अधिक वाईट व्यवहार केला. इस्लामने हे प्रमाणदखील बदलले. पवित्र कुरआनने बनी इस्त्राईलच्या एका प्रसंगाने हे सत्य समजावून दिले आहे की, मनुष्य संपत्तीमुळे नेतृत्वास पात्र बनत नाही, तर त्याच्यासाठी उत्तम बौद्धिक व शारीरिक पात्रतेची आवश्यकता असते. बनी इस्त्राईलने आपल्या एका पैगंबराला विनंती केली की आम्ही आपल्या शत्रूशी (अमालका) सामना करू इच्छितो म्हणून आपण आमच्यासाठी एका सेनापतीची निवड करा. तत्कालीन पैगंबरांनी एक सुपात्र व्यक्ती तालूतची निवड केली. जातीचे लोक या निवडीने रूष्ट झाले आणि म्हणाले,
‘‘त्याला आमच्यावर सत्ता गाजविण्याचा हक्क कसा प्राप्त होऊ शकतो? याच्यापेक्षा अधिक सत्ता गाजविण्यासाठी आम्ही पात्र आहोत. त्याला आर्थिक संपन्नता आणि सामर्थ्य सुद्धा दिले गेले नाही.
पैगंबरांनी हा अडाणीपणा ऐकून उत्तर दिले,

‘‘अल्लाहने त्याला तुमच्यासाठी निवडले आहे आणि त्याला ज्ञान व शरीरात आधिक्य प्रदान केले आहे. अल्लाह आपला अधिकार ज्याला इच्छितो त्याला देतो. अल्लाह सर्वव्यापी व जाणणारा आहे.’’ (बकरा : २४७)
अर्थ असा की तालूतची आर्थिक स्थिती काही असो व नसो, त्याच्यात असाधारण ज्ञान व प्रचंड कार्यशक्ती आहे. अल्लाहपाशी याच गुणांचे महत्व आहे. म्हणून त्यालाच सेनापती बनविले पाहिजे आणि काही कारण नाही की त्याचे सेनापतित्व स्वीकारले जाऊ नये.
हदीसमध्ये सुद्धा हे सत्य विविध प्रकारे समजावून दिले गेले आहे की अल्लाहपाशी संपत्तीची किमत नाही, तर पुण्यकर्म व सदाचाराची आहे.

‘‘माननीय सहल बिन सअद साअदी (र) म्हणतात की - एक परुष रस्त्याने गेला. (काहींच्या कथनावरून कळते तो कुरैश होता. आर्थिकदृष्टया सुस्थितीत होता आणि त्याने चांगले वस्त्र परिधान केले होते.) प्रेषित मुहम्मद (स) यांनी सहाबा (सोबती) कडे विचारणा केली की ‘‘याच्यासंबंधी तुमचे काय मत आहे?’’ एका व्यक्तीने निवेदन केले की, ‘‘हा तर उच्चकुलीनांपैकी आहे. असा योग्य आहे की, एखाद्या ठिकाणी विवाहाची इच्छा व्यक्त केल्यास त्याचा विवाह होईल. जर एखाद्याची शिफारस त्याने केली तर ती शिफारस मान्य केली जाईल.’’ थोड्या अवधीनंतर एक दैन्यावस्थेतील मनुष्य त्या मार्गाने गेला. प्रेषित मुहम्मद (स) यांनी लोकांना त्याच्याविषयी विचारले. तेव्हा म्हटले गेले की, ‘‘हा मुस्लिम फकीरापैकी एक आहे. तो यास पात्र नाही की एखादे ठिकाणी त्याने लग्नाची मागणी करावी आणि त्याचे लग्न व्हावे अथवा एखाद्याची शिफारस केल्यास ती मान्य केली जावी.’’ प्रेषित (स) म्हणाले, ‘‘ज्याला तुम्ही उच्चकुलीन म्हटले त्याच्यासारख्या लोकांनी जर ही संपूर्ण पृथ्वी भरली तरी सुद्धा त्या सर्वापेक्षा असला एक फकीर बेहतर आहे.’’ (बुखारी)

माननीय अबू हुरैरा (र) यांचे कथन आहे की प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘महान अल्लाह तुमचे मोहरे आणि धनसंपत्ती पाहात नाही, तर तो तुमची मने व तुमची कृत्ये पाहतो.’’ (मुस्लिम)

संबंधित लेख

  • ‘उहुद’च्या युद्धानंतरची परिस्थिती

    ‘बद्र’च्या विजयाच्या प्रभावात कमी येणे आणि काही रूढीवादी कबिल्यांचे इस्लामद्रोही कबिल्यांकडे आकर्षित होणे हे ‘उहुद’च्या युद्धानंतर स्वाभाविक होते. अपराधी वृत्ती आणि उपद्रवी तत्त्वांत वाढ होऊ लागली. ‘उहुद’ युद्धानंतर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीस ‘मदीना’ शहरास आवर घालणे केवळ यामुळे शक्य झाले की, मुस्लिम समुदाय आणि आंदोलनाचे नेतृत्व अतिशय खंबीर होते. प्रत्येक उपद्रव सक्तीने निपटून कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यात आली.
  • कुटुंबाचे महत्त्व आणि आवश्यकता

    पृथ्वीवर जेव्हापासून मनुष्याचा जन्म झालेला आहे, तो मिळून-मिसळून राहत आहे आणि सामाजिक जीवन व्यतीत करीत आहे. हा त्याचा स्वभाव आहे. तो आपल्या स्वभावाच्या दृष्टीने समाजात राहणे पसंत करतो. आपल्या सहजातीय लोकांशी मिळून - जुळून राहू इच्छितो. याचसोबत तो त्यांच्या सहयोगचासुद्धा मोहताज आहे. त्याशिवाय तो आपल्या जीवनाच्या आवश्यकताच पूर्ण करू शकत नाही. तर त्याच्याशिवाय त्याचे अस्तित्व आणि जीवनसुद्धा मोठ्या संकटात पडून जाईल
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]