Islam Darshan

इस्लामची नैतिक जीवनव्यवस्था

Published : Saturday, Feb 13, 2016

सत्य, प्रामाणिकपणा, न्याय, दया, सद्व्यवहार, वचनपूर्ती, क्षमा, वैध प्राप्तीवर समाधान, अवैध कमाईचा निषेध, आंतरबाह्य आचरणामध्ये एकता ही सदाचारी विश्वमानवतेची उत्तमोत्तम गुणवैशिष्ट्ये आहेत. ही गुणवैशिष्ट्ये ज्या व्यक्तींमध्ये व समाजांमध्ये आढळून येतात, ते मानवतेचे आधारस्तंभ आणि आश्रयदाता असतात. असत्य, धोकेबाजी, वचन पराङमुखता, अन्याय, निर्दयता, ढोंग, दुराचार ही अत्यंत वाईट अशी गुणधर्मे आहेत. ही गुणधर्मे ज्या व्यक्तीमध्ये, समाजामध्ये आढळतात, तो सैतानाचा गुलाम आणि इतर माणसांसाठी, समाजांसाठी एक ओझे व महासंकट असतो. इस्लाममध्ये सदाचार व चारित्र्य यांचे महत्त्व अत्युच्च आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे निवेदन आहे की, ‘‘मी उत्तम नैतिकता, चारित्र्याची उन्नती व संपन्नता उभारण्यासाठी ईश्वराकडून पाठविले गेलो आहे.’’ त्यांनी सदाचार, चारित्र्य आणि सत्शीलतेविषयी तपशीलवार निवेदन केले आहे. त्याची महती गायली आणि स्वतःला प्रेषित मुहम्मद (स) यांनी उत्तम आदर्श म्हणून समोर ठेवले व एका उत्तम सत्चारित्र्यवान समाज आणि एक नमुनेदार चारित्र्यसंपन्न राज्याची स्थापना केली.

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ऐहिक व पारलौकिक जीवनाचे यश आणि अल्लाहच्या प्रसन्नतेकरिता श्रद्धेबरोबरच, सत्कृत्य, सदाचार व सत्चारित्र्य जीवनासाठी अनिवार्य बनविले. त्यांनी स्पष्ट शब्दांत जगाला बजावले की, दुराचारी जीवनाचा परिणाम म्हणजे दैवी संकट, आपत्ती व प्रलय आहे. पुढे त्यांनी असे निवेदन केले आहे की, खालील चार सवयी अथवा त्यापैकी एखादी जरी सवय एखाद्यामध्ये असली तरीही तो ढोंगी आणि कपटी असतो. जोपर्यंत त्या सवयी सोडून देत नाही तोपर्यंत तो बोलेल तर खोटे बोलेल, एखाद्यास वचन दिले तर ते पाळणार नाही, ठेव ठेवली तर लुबाडेल; भांडणे झाली तर तो न्यायापासून दूर होईल आणि शिवीगाळ करण्यावर उतरेल.

प्रेषितांनी निवेदन केले आहे की, सत्य हेच मानवाला सन्मार्गाकडे, स्वर्गाकडे घेऊन जाते. म्हणून सत्याचा अवलंब करा आणि असत्यापासून दूर राहा, कारण ते ईश्वराची नाराजी व अवज्ञेचे कारण आहे, पारलौकिक जीवनातील
अपयश, संकट आणि प्रलय आहे. पुढे त्यांना सांगितले की, लज्जा विश्वासाचा व श्रद्धेचा अंश आहे. लज्जा सत्कर्मी झऱ्याचा उगम आहे. पुढे त्यांनी असेही निवेदन केले की, जे शरीर अवैध संपत्तीवर पोसले जाते ते नरकाच्या अग्नीचे भक्ष्य आहे व ते त्याकरिताच अस्तित्वात असते.

इस्लामचा चौथा आधारस्तंभ म्हणजे रोजा! संपूर्ण रमजान महिन्याचे रोजे अनिवार्य आहेत. रोजाच्या (उपवास) वेळी पहाटेच्या सूर्योदयापूर्वीपासून ते सूर्यास्तापर्यंत खाणे-पिणे आणि शारीरिक सबंध वर्ज्य असतात. रोजाचा आत्मा ईशपरायणता आहे. रोजाचा उद्देश व हेतू हा आहे की, श्रद्धावान दास दुष्कर्म व वाममार्गापासून आणि ईश्वराच्या अवज्ञेपासून लांब रहावा आणि सदाचारी, सन्मार्गी बनावा. गरिबाच्या आणि भुकेलेल्याच्या दुःखदायक वेदना त्याला समजाव्यात आणि त्याने त्यांच्या उपयोगी पडावे. एक मुस्लिम पवित्र रमजान महिन्यात ‘सुन्नत’ (प्रेषितांच्या आचरण पद्धतीनुसार) व ‘नवाफील’ (ऐच्छिक) नमाज, पवित्र कुरआन पठन, ईश्वराचे स्मरण, प्रार्थना, क्षमायाचना आणि पापाची माफी मागून, गोरगरिबांची जास्तीत जास्त सेवा व मदत करण्याचा प्रयत्न करतो. रमजानच्या अनिवार्य उपवासाशिवाय वर्षभर निरनिराळ्या दिवशी (ऐच्छिक) उपवास करु शकतो.

हज हे पाचवे अनिवार्य कर्तव्य आहे. संपूर्ण आयुष्यभरात कमीतकमी एकदा ते पार पाडणे अगत्याचे आहे. जो कोणी पवित्र ‘मक्का’ शहरापर्यंत जाणे येणे याकरिता आर्थिक व शारीरिक दृष्टीने सक्षम आहे, त्याचे हे अनिवार्य कर्तव्य आहे. हजचे उद्देश व वैशिष्ट्य हे आहे की, सर्वजण केंद्रस्थानी ‘मक्का’ येथे जमा होतात व एकाच ईश्वराच्या उपासनेची ग्वाही देऊन नामस्मरण करतात. एकेश्वरी मध्यवर्ती केंद्र काबागृह येथे एका विशिष्ट वेळी एकत्रित येऊन एकमेकांना भेटतात, आपपसांत दैवी नाते जोडतात, दैवी प्रेम, ईश्वराशी जवळीक, आपुलकी व भक्तीचे नाते अधिक दृढ करतात. त्याचबरोबर इस्लामी विश्वबंधुत्व, एकोपा, आंतरराष्ट्रीय संबंध, एकता, एकात्मतेची घोषणा आणि एकेश्वरवादाची पताका उंचावतात.

या सर्व उपासनेपासून अल्लाहचा (ईश्वराचा) कोणताच व्यक्तिगत फायदा नाही. त्याला त्याची गरजही नाही. एवढेच नव्हे तर ईश्वराच्या सामर्थ्य, श्रेष्ठत्व, सार्वभौमत्व, मोठेपणामध्ये वाढ होणार आहे असेही नाही. या सर्व उपासना एका श्रद्धाळू दासामध्ये सत्चारित्र्य व सत्शीलता, त्याच्या आंतरबाह्य नैतिकतेमध्ये सुधारणा, ईशभिरुता, सदाचार, समता, बंधुत्व, शिस्त व सामूहिकता निर्माण करतात. ईश्वराशी जवळीक निर्माण करणे व परलोकामध्ये यश मिळवण्याकरिता या सर्व उपासना आहेत.

परलोकात प्रत्येकाचा हिशेब घेतला जाईल व प्रत्येकाचा जीवनवृत्तांत ईश्वरासमोर वाचला जाईल. मानव, देवदूत साक्ष देतील. जे काही कर्म तो जगामध्ये करत होता त्याची साक्ष जमीन देईल. एवढेच नव्हे तर त्याचे स्वतःचे शरीर व अवयवदेखील साक्ष देतील. न्याय करणारा (अल्लाह) सर्वश्रेष्ठ, सामर्थ्यवान शासक आहे. तो ज्ञानी, सर्वज्ञ आणि प्रत्येक व्यक्तीच्या एकेक कर्माचा, कृत्याचा एवढेच नव्हे तर त्याच्या अंतर्मनामध्ये असणाऱ्या इच्छा- आकांक्षासुद्धा जाणणारा आहे. त्यावेळी कोणाची शिफारस कामी येणार नाही. कोणी स्वतःला लपवू शकणार नाही किंवा ईश्वराच्या पकडीतून निसटू शकणार नाही. ईश्वर-अल्लाह बेधडक, योग्यच न्याय करील. ज्या व्यक्तीं ईश्वराच्या श्रद्धाळू आणि आज्ञाधारक दास (भक्त) असतील, त्यांना श्रद्धा व सत्कर्माबद्दल (दशपटीत किंवा) अगणित बक्षिसे, फळ, लाभ देईल. त्यांच्यावर स्वर्गातील अनंत अतुलनीय देणग्यांचा वर्षाव करेल. अशा देणग्या व बक्षिसे जी डोळ्यांनी कधीच पाहिले नसतील, कानांनी ऐकले नसतील, की मनामध्ये त्यांनी कधीच कल्पनासुद्धा केली नसेल. निरंतर व अमर्याद जीवनामध्ये अनंत देणग्या व बक्षिसे! तिथे ना मृत्यू असेल ना म्हातारपण, ना आजारपण आणि ना दुःख, वेदना नसणार की भीती व संकटे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वाचा मालक व शासक ज्याच्याजवळ अमर्याद खजिने आहेत, तो प्रसन्न होऊन त्यांना आपल्याजवळ बसवून त्यांच्याशी बोलेल, आपले दर्शन देऊन त्यांना उफत करेल.

याउलट जे लोक ईश्वरीय न्यायालयासमोर अनेकेश्वरवादी, अश्रद्ध व विद्रोही सिद्ध होतील, ते नरकाच्या भयंकर आणि अमर्यादित संकटात पडतील. ज्या व्यक्ती ईश्वराचे विश्वासू आणि श्रद्धाळू भक्त होते, परंतु त्यांच्या हातून काही मोठे गुन्हे वा पाप घडले होते आणि त्यांनी आपल्या पापाची क्षमा मागितली नव्हती, पश्चात्ताप केला नव्हता, त्यांनी आपल्या पापाबद्दल पुरेशी शिक्षा नरकामध्ये भोगल्यानंतर त्यांना अल्लाह स्वर्गामध्ये घेईल. परलोक विश्वातील, मरणोत्तर जीवनातील उन्नती व प्रगती हीच खरी सफलता आहे. यासाठी मानवाने जीवनात त्रास सहन केला पाहिजे. परलोक जीवनातील असफलता खरी असफलता आहे. त्याची भीती बाळगून त्यापासून वाचण्याकरिता सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे.

संबंधित लेख

  • लैंगिक अपराधांवर इस्लामी उपाय

    भूक लागणे, तहान लागणे, राग, क्षोभ, स्नेह, प्रेम, ममत्व या जशा नैसर्गिक गरजा आहेत, त्याचप्रमाणे लैंगिक भावनासुद्धा अगदी नैसर्गिक आहेत. भुकेल्यास भाकर मिळाली नाही, तहानलेल्यास पाणी मिळाले नाही तर ज्याप्रमाणे तो आपली विवेकशक्ती हरवून बसतो, त्याचप्रमाणे लैंगिक तृष्णा जर भागली नाही तर माणूस विवेकशक्ती हरवून बसतो, वेडापिसा होतो. मग जर त्याला सहजरित्या आणि वैध मार्गाने ही तृष्णा भागविता आली नाही, तर निश्चितच तो आपली ही नैसर्गिक गरज पूर्ण करण्याकरिता पिसाळलेल्या श्वापदाप्रमाणे दिसेल त्या वाटेने स्वैर धावत असतो, सापडेल त्याला फाडत असतो, सर्वत्र उपद्रव माजवित असतो. आज याच उपद्रवाचा भीषण उद्रेक सर्वत्र पाहायला मिळतो.
  • इस्लाम व जिहाद

    पाश्चात्य साम्राज्यांनी मध्ययुगीन कालखंडापासून जिहाद विरूद्ध प्रचंड प्रचार केला, जिहादचे भयानक चित्र रेखाटले आणि लोकांची मते कलुषित करण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. हे सर्व अशा वेळी झाले, जेव्हा त्यांच्या स्वतःच्याच अत्याचारांनी अर्धे जग पीडित बनले होते. आजसुद्धा युरोप आणि अमेरिका स्वतःच्या आर्थिक आणि राजकीय हितासाठी तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्रे बाँबफेकी विमाने व आधुनिक शस्त्रास्त्रानिशी वाटेल त्या देशावर हल्ला करून तुटून पडतात. त्यांचे तसे कृत्य अगदी तर्कसंगत व योग्य आहे, असे सभ्य व शिष्ट शब्दात जगाला पटविण्याचे प्रयत्न केले जातात पण इस्लाम व जिहाद हे शब्द त्यांच्या कानांवर पडल्याबरोबर दुष्प्रचाराची ‘टेप रेकॉर्ड’ लगेच सुरू केली जाते.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]