Islam Darshan

ईश्वराला रचनात्मकता प्रिय आहे तर विघातकता अप्रिय आहे

Published : Saturday, Feb 13, 2016

स्वामी व मालक म्हणून त्याची अशी इच्छा आहे की, त्याच्या जगाची व्यवस्था चोख केली जावी, तिला जास्तीतजास्त सावरले जावे, त्याने प्रदान केलेल्या साधनांना आणि त्याने दिलेल्या शक्ती व गुणांचा जास्तीतजास्त चांगल्या पध्दतीने उपयोग केला जावा. तो या गोष्टीला मुळीच पसंत करीत नाही की, त्याच्या जगात बिघाड व्हावा, त्याला उजाड व ओसाड केले जावे, त्याच्या जगाचे अव्यवस्थेने, दुर्गंधी व घाणीने आणि जुलूम व अत्याचारींनी वाटोळे करून टाकावे.

मानवजातीपैकी जे लोक जगाचे इच्छुक बनून उभे राहिले आहेत, त्यांच्यापैकी ईश्वराला असेच लोक मान्य असतात ज्यांच्यात जास्तीतजास्त सृजनशीलता असते. अशांनाच तो जगाच्या व्यवस्थेचे अधिकार सोपवित असतो.

ईश्वर पाहत आहे की, हे लोक किती सृजनशील आहेत आणि किती असृजनशील. जोपर्यंत त्यांच्या सृजनशीलतेचे प्रमाण त्यांच्या असृजनशीलतेपेक्षा जास्त असते, तसेच त्यांच्यापेक्षा चांगला सृजनशील व त्यांच्यापेक्षा कमी उपद्रवी असा अन्य एखादा उमेदवार मैदानात असत नाही, तोपर्यंत त्यांच्या सर्व वाईट गोष्टी व त्यांच्या सर्व अपराधासमवेत जगाची व्यवस्था त्यांच्याच अधिकारात राहते. परंतु जेव्हा ते सृजनशील कमी प्रमाणात आणि उपद्रवी जास्त प्रमाणात सिध्द होतात, तेव्हा ईश्वर त्यांना दूर फेकतो आणि त्याच्या जागी दुसर्या उमेदवाराला त्याच अनिवार्य अटीवर व्यवस्था सोपवितो.

हा नियम अगदी एक स्वाभाविक नियम आहे. हा नियम अशाच स्वरूपात असला पाहिजे याची ग्वाही आपली बुध्दी देते. आपणापैकी एखाद्या व्यक्तीची एखादी बाग असेल व ती त्याने एखाद्या माळ्याच्या सुपूर्द केली असेल, तर ती व्यक्ती त्या माळ्याकडून प्रथम कोणत्या गोष्टीची अपेक्षा करील, हे आपणच सांगा बघू? बागेचा मालक आपल्या माळ्याकडून याशिवाय अन्य काय अपेक्षा करू शकतो की त्याने बागेत रचनात्मक कार्य करावे, तिचे वाटोळे करू नये. खचितच त्याची इच्छा अशीच असेल की, त्याची बाग जास्तीतजास्त उत्तम स्थितीत ठेवली जावी, जास्तीतजास्त तिचा विकास केला जावा. तिच्या सौंदर्यात, तिच्या स्वच्छतेत, त्याच्या उत्पन्नात अधिकाधिक वाढ केली जावी. जो माळी त्याला असा दिसेल की, तो खूप मेहनतीने मन लावून व्यवस्थित आणि उत्तमपणे त्याच्या बागेची सेवा करीत आहे. बागेची निगा व्यवस्थित करीत आहे, त्याच्या चांगल्या झाडांची जोपासना करीत आहे, तिला निकृष्ट झाडे आणि पालापाचोळ्यापासून स्वच्छ करीत आहे, त्यात आपल्या खुबी व आपल्या नावीन्यप्रियतेद्वारे उत्कृष्ट फळे आणि फुलांच्या नवनवीन जातींची भर घालीत आहे, तर निश्चितपणे तो त्या माळ्यावर प्रसन्न होईल, त्याला बढती देईल. तो अशा लायक व कर्तव्यदक्ष आणि स्वामीनिष्ठ माळ्याला काढून टाकणे पसंत करणार नाही.

याउलट जर त्याला असे दिसले की, माळी नालायक आहे, कामचुकारही आहे, जाणूनबुजून अथवा अजाणपणे त्याच्या बागेचे वाईट इच्छित आहे, संपूर्ण बाग घाणीने माखली आहे, वाफे फुटले आहेत, कोठे जरूरी नसतानाही पाणी वाहत वाहे, तर कोठे जमिनीचे खंडचे खंड शुष्क होत चालले आहेत, झुडपे व गवत आणि पालापाचोळा वाढत जात आहे, फलधारी झाडांना निर्दयतेने कापून व तोडून फेकले जात आहे, चांगली झाडे सुकत आहेत आणि काटेरी झाडे वाढत आहेत. तर मग आपणच विचार करा की, बागेचा मालक अशा माळ्याला कसे पसंत करू शकतो? कोणती शिफारस, कोणत्या विनंत्या आणि कोणती विनम्र विनवणी, कोणते वडिलोपार्जित हक्क अथवा इतर कपोलकल्पित हक्कांचा आदर त्याला आपली बाग अशा माळ्याच्या ताब्यात ठेवण्यावर राजी करू शकते? जास्तीतजास्त सवलत तो केवळ इतकी देईल की, त्याला ताकीद देऊन पुन्हा एकदा संधी देईल. परंतु जो माळी ताकिदीनेसुध्दा शुध्दीवर येत नसेल आणि बाग उजाड व ओसाडच करीत असेल, तर याशिवाय अन्य काय उपाय आहे की, बागेच्या मालकाने त्याचा कान धरून त्याला बाहेर काढावे व दुसरा माळी त्याच्या जागी ठेवावा.

आता जरा येथे थोडे थांबून विचार करा. आपल्या लहानशा बागेच्या व्यवस्थेतसाठी आपण वरीलप्रमाणे पध्दतीचा अवलंब करतो. ईश्वराने आपली इतकी विशाल पृथ्वी इतक्या साधनसामग्रीसमवेत मनुष्यांच्या सुपूर्द केली आहे, त्याने इतके विस्तृत अधिकार त्यांना आपल्या जगावर व त्याच्या वस्तूंवर दिले आहेत. तो ईश्वर या प्रश्नाकडे दुर्लक्ष कसे करू शकतो की, लोक ईश्वरनिर्मित जगाचे सृजन करीत आहेत की उजाड करीत आहेत. आपण सृजन करीत असाल तर असे कोणतेच कारण नाही की, उगीच ईश्वराने आपणास दूर हटवावे. परंतु आपण सृजन तर काहीच करू नये उलट त्याची वैभवसंपन्न बाग बिघडवित आहात आणि उजाडतच आहात! तर मग सरतेशेवटी ईश्वर त्याच्या बागेवर (पृथ्वी) तुमचा कोणताही हक्क मान्य करणार नाही. काही तंबी व ताकीद देऊन शुध्दीवर येण्याच्या दोन-चार संधी देऊन सरतेशेवटी तो तुम्हाला व्यवस्थापनेतून बेदखल केल्याशिवाय राहणार नाही.

याबाबतीत ईश्वराचा दृष्टिकोन मनुष्याच्या दृष्टिकोनापासून त्याचप्रमाणे भिन्न आहे, ज्याप्रमाणे माणसामाणसांमध्येच एखाद्या बागेच्या मालकाचा दृष्टिकोन त्या बागेच्या माळ्याच्या दृष्टिकोनापेक्षा भिन्न असतो. असे गृहीत धरा की, माळ्याचे एखादे घराणे दोन-चार पिढ्यांपासून एखाद्या व्यक्तीच्या बागेत काम करीत आले आहे. सदरहू घराण्याच्या आजोबा किवा पणजोबा आपल्या लायकी व गुणांमुळे तेथे ठेवला गेला होता. मग त्याच्या मुलांनीसुध्दा काम चांगले केले, तेव्हा मालकाने विचार केला की, उगीचच यांना हटविण्याची व नवीन माणसे ठेवण्याची गरज काय? जेव्हा हेसुध्दा काम चांगलेच करीत आहेत, तेव्हा यांचा हक्क इतरांपेक्षा जास्त आहे. अशाप्रकारे सदरहू घराण्याचा त्या बागेत जम बसला.

आता मात्र त्या घराण्याचे लोक अत्यंत नालायक, बेशिस्त, कामचुकार आणि कर्तव्यशून्य निघाले आहेत. बागवानीचा कोणताही गुण त्यांच्यात नाही, संपूर्ण बागेचा सत्यानाश करून टाकत आहेत. यावरही त्यांचा असा दावा आहे की, आम्ही वडिलांच्या काळापासून या बागेत राहत आलो आहोत. आमच्या पणजोबांच्या हस्तेच सर्वप्रथम ही बाग समृध्द झाली होती. म्हणून हा आमचा जन्मसिध्द हक्क आहे. आम्हाला बेदखल करून अन्य एखाद्याला येथील माळी बनविणे कोणत्याही प्रकारे वैध ठरू शकत नाही. असा दृष्टिकोन त्या नालायक माळ्याचा आहे.

परंतु बागेच्या मालकाचा दृष्टिकोनही असाच असू शकतो का? तो असे म्हणणार नाही की, माझ्याजवळ अग्रक्रम माझ्या बागेच्या सुव्यवस्थेला आहे? ही बाग तुमच्या पणजोबांसाठी लावली गेली नव्हती. तर तुमच्या पणजोबांना या बागेसाठी नोकर ठेवले गेले होते. या बागेवर तुमचे जे काही हक्क असतील ते सेवा आणि लायकीच्या अटीशी निगडीत आहेत. बागेत रचनात्मक कार्य कराल तर तुमच्या सर्व हक्कांचा आदर केला जाईल. आपल्या जुन्या माळ्याशी माझे काय शत्रुत्व असू शकते की, काम चांगले करीत असले तरी त्यांना उगीचच काढून टाकावे? परंतु ज्या बागेच्या चांगल्या व्यवस्थेसाठी तुम्हाला ठेवले गेले होते त्यालाच तुम्ही बिघडवित आणि उजाडित आहात. त्याअर्थी मला तुमचा कोणताच हक्क मान्य नाही. इतर उमेदवार उपलब्ध आहेत, बागेची व्यवस्था मी त्यांच्या स्वाधीन करीन. तुम्हाला मात्र त्यांच्या हाताखाली सेवक बनून राहावे लागेल.

यावरही जर तुम्ही नीट झाला नाहीत, हाताखालचे सेवक म्हणूनसुध्दा तुम्ही कुचकामी असल्याचे किबहुना काही बिघाडच करणारे असल्याचे सिध्द झाले, तर तुम्हाला येथून बाहेर हाकलले जाईल. तुमच्या जागी सेवक म्हणून दुसर्यांना येथे आणून बसविले जाईल.

सकारात्मकता

मालक आणि माळ्याच्या दृष्टिकोनात असा जो फरक आहे, अगदी तसाच फरक जगाचा स्वामी आणि जगवासीयांच्या दृष्टिकोनातसुद्धा आहे. जगाचे विविध लोकसमूह पृथ्वीच्या ज्या प्रदेशात वसले आहेत त्यांचा दावा असाच आहे की, हा प्रदेश आमची मातृभूमी आहे. पिढ्यान्पिढ्या आम्ही व आमचे वाडवडील येथेच राहात आलो आहे. या देशावर आमचे जन्मसिध्द हक्क आहेत, म्हणून येथे आमच्या स्वतःचीच व्यवस्था असली पाहिजे. कोणा दुसर्याला हा हक्क प्राप्त नाही की, त्याने बाहेरून येऊन येथील व्यवस्था राखावी. परंतु पृथ्वीचा स्वामी, ईश्वराचा दृष्टिकोन असा नाही. त्याने कधीही अशा राष्ट्रीय हक्कांना मान्य केलेले नाही. प्रत्येक देशावर तेथील रहिवाशांचा जन्मजात हक्क आहे. त्यापासून त्यांना कोणत्याही परिस्थितीत वंचित केले जाऊ शकत नाही, हे त्याला मान्य नाही.

तो तर हेच पाहत असतो की, कोणता लोकसमूह आपल्या देशात काम कोणते करीत आहे. तो लोकसमूह रचनेचे व सकारात्मक काम करीत असेल, पृथ्वीची सुधारणा आणि विकासात जर तो आपल्या शक्तीचा उपयोग करीत असेल, तो दुष्कृत्यांचे पीक रोखण्यात आणि सत्कृत्यांच्या शेती सिचनात लागला असेल, तर सृष्टीचा स्वामी निःसंशय तेथील व्यवस्था तेथील लोकांच्या हातात राहू देतो. तुम्ही पूर्वीपासून येथे वस्ती करून आहात आणि पात्रही आहात, म्हणून इतरांपेक्षा तुमच्या हक्काला अग्रक्रम आहे.

परंतु मामला जर याउलट असेल, रचनात्मक कार्य काही नसावे. सर्वचे सर्व बिघाडाचीच कामे केली जात असतील, चांगल्या गोष्टी काहीच नसतील आणि वाईट गोष्टींनीच ईश्वराचे सर्व भूतल भरत असेल, जे काही पृथ्वीतलावर ईश्वराने निर्माण केले आहे त्याला निर्दयतेने नष्ट केले जात असेल, त्याचा कोणताही बेहतर उपयोग घेतलाच जात नसेल, तर मग ईश्वराकडून प्रथम काही सौम्य तर काही तीव्र स्वरूपाचे आघात केले जातात, जेणेकरून या लोकांनी शुध्दीवर यावे व आपले वर्तन सुधारावे. मग यावरही तो लोकसमूह नीट होत नाही, तेव्हा त्या देशाच्या व्यवस्थेतून त्यांना बेदखल केले जाते. त्या लोकसमूहाच्या तुलनेत अधिक पात्र असलेल्या दुसर्या एखाद्या लोकसमूहाला तेथील राज्य दिले जात असते. इतक्यावरच प्रकरण संपते असे नाही, तर हाताखालचे बनल्यानंतरसुध्दा देशवासी जेव्हा कोणतीही लायकी अथवा योग्यता दाखवित नाहीत, आपल्या आचरणाद्वारे हेच दाखवित असतात की, त्यांच्याकडून रचनात्मक कार्य तर काहीच होणार नाही, उलट काही बिघाडच होणार आहे. तेव्हा ईश्वर अशा लोकसमूहाला नष्ट करून टाकतो व इतरांना तेथे आणतो. ते त्यांच्या जागी बसतात.

याबाबतीत ईश्वराचा दृष्टिकोन नेहमी तोच असतो जो स्वामीचा असला पाहिजे. तो आपल्या पृथ्वीच्या दावेदारांचे आणि इच्छुकांचे वडिलोपार्जित अथवा जन्मजात हक्क पाहत नसतो. तो हे पाहत असतो की, यांच्यापैकी कोण सकारात्मक कार्यासाठी जास्तीतजास्त योग्यता आणि बिघाडाची सर्वांपेक्षा कमी प्रवृत्ती राखणारा आहे. एकाच वेळेतील एकूण उमेदवारांपैकी जे या दृष्टीने सर्वाधिक योग्यतेचे दिसतात त्यांचीच निवड होते. जोपर्यंत त्यांच्या बिघाडापेक्षा त्यांची ‘रचना’ जास्त असते किवा त्याच्या तुलनेत जास्त चांगली रचना करणारा व कमी उपद्रवी इतर कोणी मैदानात येत नाही, तोपर्यत व्यवस्था त्यांच्याच हातात राहू दिली जाते.

ऐतिहासिक साक्ष

हे जे काही मी सांगत आहे, ईश्वराने सदैव आपल्या पृथ्वीची व्यवस्था याच नियमानुसार राखली आहे. इतिहास याची साक्ष देतो. दूर जाण्याची गरज नाही. खुद्द आपल्या देशाचाच इतिहासात पाहा. या ठिकाणी जे लोक वसले होते, त्यांचे रचनात्मक गुण जेव्हा संपुष्टात आले तेव्हा ईश्वराने येथील व्यवस्थापनेची आर्य लोकांना संधी दिली. त्यावेळच्या लोकसमूहात आर्य लोक सर्वापेक्षा जास्त चांगली योग्यता बाळगत होते. येथे येऊन त्यांनी एका वैभवशाली संस्कृतीचा पाया उभारला, त्यांनी बर्याचशा विद्या व शास्त्रांचा शोध लावला, त्यांनी जमिनीतील खजिने बाहेर काढले व चांगल्यासाठी त्यांना उपयोगात आणले. त्यांनी बिघाडापेक्षा अधिक प्रमाणात रचनात्मक कामे करून दाखविली. जोपर्यत त्यांच्यात हे गुण राहिले तोपर्यंत इतिहासाच्या सर्व प्रकारच्या घडामोडींनंतरसुध्दा ते या देशाचे व्यवस्थापक राहिले.

इतर उमेदवार चाल करून पुढे येत राहिले, परंतु परतवून लावले गेले. कारण आर्य असताना दुसर्या व्यवस्थापकाची गरज नव्हती. इतरांच्या हल्ल्याचे महत्त्व केवळ इतकेच होते की, जेव्हा कधी आर्य बिघडू लागत तेव्हा इतर एखाद्याला पाठविले गेले की त्यांना तंबी द्यावी. परंतु आर्य जेव्हा उपद्रवी बनत गेले, त्यांनी रचनात्मक कामे कमी आणि बिघाडाची कामे जास्त करण्यास सुरूवात केली, त्यांच्या नैतिकतेने तळ गाठले ज्याची चिन्हे वाममार्गाच्या चळवळीत अद्यापही आपण पाहू शकता. आर्यानी मानवजातीची विभागणी करून खुद्द आपल्याच समाजाला जाती व वर्णभेद, भाषाद्वारे विभागून टाकले.

आपल्या सामूहिक जीवनाला एखाद्या जिन्याचे रूप दिले की, ज्याच्या प्रत्येक पायरीवर बसणारा आपल्या वरील पायरीवर बसणार्यांचा दास तर आपल्या खालच्या पायरीवर असलेल्याचा ईश्वर बनला. तेव्हा त्यांनी ईश्वराच्या कोट्यवधी दासांवर असा अत्याचार केला की, आजतागायत अस्पृश्यतेच्या रूपात तो अस्तित्वात आहे. त्यांनी ज्ञानाची द्वारे सामान्य माणसासाठी बंद करून टाकली, त्यांचे पंडित ज्ञानाच्या खजिन्यावर सर्प बनून बसले. त्यांच्या शासकवर्गाजवळ आपल्या जबरदस्तीने लादलेल्या हक्कांच्या वसुलीखेरीज आणि दुसर्यांच्या श्रम व कष्टांवर ऐश्वर्याचा उपभोग घेण्याशिवाय इतर कोणतेच काम राहिले नाही.
तेव्हा सरतेशेवटी ईश्वराने त्यांच्याकडून देशाची व्यवस्था हिरावून घेतली आणि मध्य आशिया खंडाच्या त्या लोकांना येथे काम करण्याची संधी दिली, जे त्या वेळी इस्लामी चळवळीने प्रभावित झाले होते. त्यामुळे ते लोक जीवनाच्या अधिक चांगल्या खुबी व गुणांनी संपन्न झाले होते.

मध्य आशियातून आलेले हे मुस्लिम लोक शतकानुशतकें या देशाच्या व्यवस्थेवर विराजमान राहिले. खुद्द या देशातील बहुतेक लोकांनी इस्लामचा स्वीकार केला व त्यांच्यात ते सामील झाले. या लोकांनी बरेच काही बिघडविले, यात शंका नाही. परंतु जितके बिघडविले त्यापेक्षा जास्त त्यांनी रचनात्मक कामे केली. कित्येक शतकांपर्यत हिंदुस्तानात रचनात्मक जे काही कार्य झाले आहे, ते त्यांच्या हातांनी झाले आहे किवा त्यांच्या प्रभावाखाली झाले आहे. त्यांनी ज्ञानाचा प्रकाश पसरविला, विचारात सुधारणा घडवून आणली, संस्कृती आणि कुटूंबव्यवस्थेत बरीच काही सुधारणा केली. देशाची साधनसामग्री तत्कालीन प्रमाणानुसार इष्ट उपयोगात आणली आणि शांतता, सुव्यवस्था आणि न्यायाची चोख व्यवस्था निर्माण केली. ही व्यवस्था इस्लामच्या वास्तविक प्रमाणापेक्षा फारच खालच्या दर्जाची होती. तथापि त्यापूर्वीच्या स्थितीशी आणि सभोवती असलेल्या इतर देशांच्या स्थितीशी तुलना केली असता तिचा दर्जा फार उच्च होता.

यानंतर हे मुस्लिम पूर्वी लोकसमूहाप्रमाणेच बिघडू लागले. त्यांच्यातसुध्दा रचनात्मक शक्ती कमी होऊ लागल्या, तर बिघाडाच्या प्रवृत्ती वाढत जाऊ लागल्या. त्यांनीसुध्दा उच्चनीचता, जातीय भेदभाव आणि वर्ण भेदभाव निर्माण करून, स्वतः आपल्या समाजाची फाटाफूट केली. त्यामुळे नैतिक, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अतोनात हानी झाली. त्यांनीसुध्दा न्याय थोडे तर अन्याय जास्त करणे सुरू केले. तेसुध्दा राज्याच्या जबाबदार्या विसरून केवळ त्यांचे अयोग्य फायदे उपभोगण्याकडे लक्ष देऊ लागले. त्यांनीसुध्दा रचना, प्रगती आणि सुधारणेची कामे सोडून ईश्वराने प्रदान केलेल्या शक्ती व साधनांना वाया घालविणे सुरू केले. जरी त्यांचा उपयोग घेतला असला तरी जीवनाला बिघडविणार्या कामातच घेतला. सुखासीनता आणि चैनी-विलासात ते इतके गाफील बनले की, जेव्हा अंतिम पराभव पत्करून यांच्या राज्यकर्त्यांवर जेव्हा दिल्लीच्या लाल किल्ल्याबाहेर पडण्याची पाळी आली तेव्हा त्यांचे राजपुत्र तेच जे देशाच्या राज्याचे उमेदवार होते ते जीव वाचविण्यासाठी पळूही शकत नव्हते. कारण जमिनीवर चालणे त्यांनी सोडले होते.

मुस्लिमांची सर्वसामान्यपणे नैतिक अवस्था इतक्या खालच्या पातळीपर्यंत पोचली होती की, त्यांच्या सामान्य माणसापासून ते मोठमोठ्या जबाबदार लोकापर्यंत कोणातही आपल्या स्वतःखेरीज इतर कोणत्याही गोष्टीसाठी एकनिष्ठता व प्रामाणिकपणा उरला नव्हता, जेणेकरून ते स्वार्थापोटी आपला धर्म, राष्ट्र आणि देश विकण्यापासून परावृत्त झाले असते. त्यांच्यात सहस्त्रावधी व लक्षावधी धंदेवाईक शिपाई निर्माण होऊ लागले. त्यांची नैतिक अवस्था एखाद्या पाळीव कुत्र्यासमान होती की, हवे त्याने भाकर देऊन त्यांना पाळावे व हवे त्याने त्यांच्याकरवी शिकार करवावी.

मुस्लिमांमध्ये याची जाणीवही उरली नव्हती की, हा अत्यंत हीन व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांचे शत्रू खुद्द त्यांच्याच हातांनी त्यांचाच देश जिकत आहेत. त्यात काही तुच्छता आणि मानहानीची गोष्टही आहे, याची जाणीव त्यांना नव्हती. गालिबसारखा कवीसुध्दा मोठ्या अभिमानाने म्हणतो,

‘‘सौ पुश्त से है पेश-ए-आबा सिपाहगिरी’’
(शंभर पिढ्यांपासून वडिलोपार्जित धंदा शिपाईगिरी आहे.)

ही गोष्ट उद्गारताना आमच्या इतक्या महान कवीला जरासुध्दा असा विचार आला नाही की, धंदेवाईक शिपाईगिरी काही अभिमानाची गोष्ट नव्हे तर बुडून जीव देण्यासारखी गोष्ट आहे.

जेव्हा मुस्लिमांची दशा अशी झाली तेव्हा ईश्वराने त्यांना पदच्युत करण्याचा निर्णय घेतला. म्हणून हिदुस्तानाच्या व्यवस्थेचे अधिकारपद पुन्हा नवीन उमेदवारासाठी मोकळे झाले. त्या वेळी चार उमेदवार मैदानात होते मराठे, शीख, इंग्रज आणि काही मुस्लिम नवाब. पूर्वग्रहदोषाचा चष्मा काढून आपण स्वतःच न्यायपूर्ण दृष्टीने त्या काळाचा इतिहास आणि त्यानंतरच्या परिस्थितीचे निरीक्षण कराल तर इतर उमेदवारांपैकी कुणातही त्या रचनात्मक शक्ती नव्हत्या ज्या इंग्रजामध्ये होत्या. तसेच जितका बिघाड इंग्रजात होता, त्यापेक्षा कित्येक जास्त प्रमाणात तो मराठे, शीख आणि मुस्लिम उमेदवारांत होता.

जी काही इंग्रजांनी रचनात्मक कार्ये केली तशी इतर उमेदवारांपैकी कोणीही केली नसती. जे काही त्यांनी बिघडविले त्यापेक्षा फारच जास्त इतरांनी बिघडविले असते, असे आपणास दिसेल. एका दृष्टीने पाहिले असता इंग्रजांत अनेक पैलूंनी असंख्य दोष आपणास दिसतील. परंतु तुलनात्मक दृष्टीने पाहिल्यास समकालीन आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा त्यांचे दोष फार थोडे आणि त्यांच्या खुबी फार जास्त होत्या. हेच कारण आहे की, कसल्याही हक्काविना माणसांनी स्वेच्छेने बनविलेला हा कायदा की, प्रत्येक देश खुद्द देशाच्या लोकांसाठीच आहे, मग त्यांनी रचना करो वा बिघाड! मानवनिर्मित कायद्याला पुन्हा एकदा ईश्वरी कायद्याने मोडून काढले. ईश्वरी कायद्याने अटळ ऐतिहासिक निर्णयाद्वारे असे सिध्द केले आहे की नाही? देश तर ईश्वराचा आहे. त्याची व्यवस्था कुणाच्या सुपूर्द करावी हे ठरविण्याचा हक्क त्यालाच आहे. हा निर्णय तो कोणत्याही वांशिक अथवा राष्ट्रीय वा वडिलोपार्जित हक्काच्या आधारावर घेत नसतो, तर एकंदरीतपणे भले कोणत्या व्यवस्थेत आहे या आधारावर तो निर्णय घेत असतो.

म्हणा की, हे ईश्वरा, देशाच्या स्वामी, तू हवे त्याला सत्ता देत असतो व हवे त्याकडून सत्ता हिरावून घेत असतो. हवे त्याला प्रतिष्ठा देत असतो तर हवे त्याला अपमानित करीत असतो, कल्याण तुझ्याच हातात आहे व तू प्रत्येक गोष्टीवर प्रभुत्व राखतो. (कुरआन२:२६)

अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ ईश्वराने हजारो मैल अंतरावरून अशा लोकसमूहाला आणले ज्यांची संख्या येथे तीन-चार लाखांपेक्षा जास्त कधीच राहिली नाही. त्यांनी येथीलच साधने व येथीलच माणसांच्या सहाय्याने येथील हिदू, मुस्लिम आणि शीख अशा सर्व शक्तींना जेरीस आणून या देशाची व्यवस्था आपल्या हातात घेतली. येथील कोट्यवधी रहिवाशी त्या अल्पसंख्य इंग्रजांच्या आज्ञाधीन बनून राहिले. एक एक इंग्रजाने एकटेच एकेका संपूर्ण जिल्ह्यावर राज्य केले आहे. अशा अवस्थेत की त्यांच्या जातीची अन्य कोणतीही व्यक्ती त्यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्याजवळ उपस्थित नव्हती. या संपूर्ण काळात हिदुस्तानी लोकांनी जे काही केले ते हाताखालचे सेवक म्हणून केले आहे, शासक म्हणून नव्हे.

आम्हा सर्वांना हे मान्य करावेच लागेल व न केल्यास ते वास्तवतेला खोटे ठरविणे होईल की जोपर्यत इंग्रज येथे राहिले त्या संपूर्ण काळात रचनात्मक जी काही कामे झाली आहेत, ती इंग्रजांच्याच हातांनी किवा त्यांच्या प्रभावाने झाली आहेत. ज्या स्थितीत हिदुस्तान त्यांच्या हाती आला होता त्याच्या तुलनेत पाहिले तर बिघाड झाला तरी रचनात्मक बरेचसे कार्य झाले आहे. ते कार्य स्वतः देशवासीयांच्या हातून पार पाडण्याची कदापि अपेक्षा केली जाऊ शकत नव्हती. या गोष्टीचा आपण इन्कार करू शकत नाही. म्हणून १८ व्या शतकाच्या मध्य काळात ईश्वराने जो निर्णय घेतला होता तो काही चुकीचा नव्हता.

आता पाहा, इंग्रज जी काही रचनात्मक कार्य करू शकत होते त्यांनी पूर्ण केले आहे, त्यांच्या रचनेच्या हिशेबात आता काही विशेष अशी भर पडू शकत नाही. त्यात जी काही भर ते करू शकतील ती दुसरेही करू शकतात, परंतु दुसरीकडे इंग्राजाच्या बिघाड करण्याच्या हिशोबात फार वाढ झाली आहे. जितक्या काळापर्यत ते तेथे राहतील रचनेच्या तुलनेने ते बिघाडच जास्त करतील. त्यांच्या अपराधाची यादी इतकी लांबलचक आहे की एकाच बैठकीत ती सांगितली जाणे कठीण आहे. तसे पाहता त्याची गरजही नाही, कारण ती पूर्णतः सर्वसमक्ष आहे. आता तर येथील व्यवस्थेतून ते बेदखल केले जावेत असाच ईश्वरी लेखाचा निर्णय आहे, ते स्वतःच सरळपणे येथून जाण्यास तयार झाले आहेत. हा त्यांनी मोठाच शहाणपणा दाखविला आहे. एरव्ही सरळपणे गेले नसते तर वाईट रीतीने ते घालविले गेले असते. कारण यापुढे त्यांच्या हातात येथील व्यवस्था राहावी ही गोष्ट ईश्वराच्या अटळ कायद्याला अमान्य होती.

संबंधित लेख

  • लोकशाही पद्धतीने शासकांची निवड व इस्लाम

    पुष्कळशा राष्ट्रांत सध्याच्या काळात आपल्या शासकांची निवड खुल्या सार्वत्रिक निवडणुकीने केली जाते. तसेच आपण निवडलेल्या प्रतिनिधींना त्यांची कर्तव्ये व्यवस्थित रितीने पार पाडण्यात जर अपयश आले तर त्यांना पदच्युत करण्याचा किवा अधिकारापासून दूर करण्याचा अधिकार लोकांना असतो. खरे तर हे इस्लामी पद्धतीच्याच एका वैशिष्ट्याचे नवीन प्रदर्शन आहे. हेच वैशिष्ट्य इस्लामने तेरा शतकांपूर्वी जगासमोर सादर केले होते. माननीय अबू बक्र (र) व माननीय उमर (र) यांच्या काळात हा नियम लागू करणे हा चमत्कार होता, पण आज तो चमत्कार राहिला नसून, एक वास्तवता बनली आहे.
  • मानवतेचा आदर्श

    मानव-जीवनाला कल्याण व सदाचाराच्या मार्गावर चालविण्यासाठी एखाद्या आदर्शाची आवश्यकता असते. आदर्श खरे पाहता मापदंडाचे काम करतो. यावर मापून तोलून हे कळते की एखाद्या व्यक्तीच्या व्यवहाराचा किती भाग खरा व किती भाग खोटा आहे. मापदंड अथवा आदर्श काल्पनिक देखील असतात, जे कथा-गोष्टीच्या रूपाने उपदेशांत सांगितले जातात व ते ऐकून लोक आनंदित होतात. परंतु त्याचा कोणताही प्रत्यक्ष लाभ वैयक्तिक किवा सामाजिक जीवनात होत नाही. आदर्श बनण्यासाठी केवळ इतकेच आवश्यक नाही की ते शक्य व व्यावहारिक असावे, तर हे देखील गरजेचे आहे की तो आदर्श एखाद्याचे जीवन बनलेले असावे व त्याने त्यावर चालून आदर्शाचा प्रत्यक्ष नमुना प्रस्तुत केला असावा.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]