Islam Darshan

स्वतःच्या देहाचे व आत्म्याचे हक्क

Published : Friday, Feb 12, 2016

स्वतःच्या देहासंबंधीचे व आत्म्यासंबंधीचे हक्क.
मनुष्य आपल्या स्वतःवरच सर्वांत जास्त अत्याचार करीत असतो, हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरेतर ही बाब विस्मयकारकच आहे, कारण सकृतदर्शनी तर प्रत्येक माणसाची अशीच भावना असते की सर्वांत अधिक प्रेम त्याचे स्वतःवरच आहे. कोणताही व्यक्ती स्वतःचाच वैरी असल्याचे मान्यही करणार नाही, परंतु यावर थोडेसे विचार-चिंतन केल्यास यातील वास्तवता तुमच्या दृष्टीस पडेल.

माणसाची एक मोठी कमजोरी अशी आहे की त्याची एखादी इच्छा अधिक प्रबळ बनली की तो तिचा दास बनतो. तिच्या पूर्ततेसाठी तो समजून सवरून अगर अजाणतेपणी स्वतःचे बरेच नुकसान करून घेतो. तुम्ही पाहता की एखाद्या माणसाला एखाद्या व्यसनाची लत लागते. तो त्या व्यसनासाठी वेडा बनतो व स्वतःच्या प्रकृतीचे नुकसान, आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेचे नुकसान किंबहुना सर्व प्रकारचे नुकसान सहन करीत राहतो. दुसरा एखादा मनुष्य खाण्याच्या खाद्य व चवीचा इतका लोभी बनतो की कसलेही खाद्य स्वाहा करून टाकतो व आपल्या जीवाचा घात करून घेतो. तिसरा एखादा मनुष्य वैषयिक सुखाचा आसक्त बनतो व अशी कृत्ये करीत असतो की त्याचा अनिवार्य परिणाम त्याचा स्वतःचा नाशच असतो. चौथा एखादा मनुष्य आध्यात्मिक उन्नतीच्या तोऱ्यात असतो. तो आपल्या स्वतःच्या प्राणावरच उठतो आणि आपल्या आत्म्याच्या सर्वच इच्छावासना ठेचून टाकतो. आपल्या देहाच्या गरजांची पूर्तता करण्यासही इन्कार करतो, विवाहापासून दूर पळतो. खाणेपिणे वर्ज्य करतो, कपडे घालण्यात नकार देतो, किंबहुना श्वासोच्छवास करण्यासही तो राजी नसतो. गिरीकंदरात जाऊन बसतो आणि हे जग त्याच्यासाठी निर्माण केले नाही असे समजतो.

आम्ही केवळ उदाहरणासाठी माणसाच्या अतिरेकप्रियतेचे वर काही नमुने दिले आहेत. वास्तविकपणे अशा प्रकारची अगणित रुपे आपल्या सभोवताली रात्रंदिवस आढळून येतात.

इस्लामची ‘शरिअत’ मानवाचे कल्याण व सफलतेसाठी आहे. म्हणून ती माणसाला सावधान करते की, ‘‘तुझ्यावर तुझ्या स्वतःचेही काही हक्क आहेत.’’

शरिअत माणसाला अशा सर्व गोष्टींपासून रोखते व परावृत्त करते, ज्यापासून मानवाला हानी व नुकसान होते. उदा. दारू, ताडी, अफू, गांजा व अन्य मादक पदार्थ, डुकराचे मांस, हिंस्त्र प्राण्याचे मांस व विषारी जिवाणू, अमंगल प्राणी, रक्त तसेच मृत प्राण्यांचे मांस वगैरे; याचे कारण असे की या वस्तूंचा अनिष्ट परिणाम माणसाच्या आरोग्यावर, चारित्र्यावर, बौद्धिक व आत्मिक बळावर होतो. याउलट शरिअत स्वच्छ, निर्मळ व लाभकारक वस्तू माणसासाठी ‘हलाल’ ठरविते व ती माणसाला सांगते की निर्मळ व हितकारक अशा हलाल वस्तू तू स्वतःसाठी त्याज्य मानू नकोस. कारण की तुझ्या देहाचाही तुझ्यावर काही हक्क आहे.

शरिअत माणसाला नागडे होण्यापासून रोखते व त्याला आदेश देते की ईश्वराने तुझ्या देहासाठी जो वस्त्रांचा साज निर्माण केला आहे त्याचा लाभ घे आणि आपल्या देहाचे असे सर्व भाग झाकून घे, ज्या भागाचे प्रदर्शन असभ्यता व निर्लज्जपणा ठरते.

शरिअत माणसाला उपजीविकेसाठी झटण्याचा आदेश देते व निरूद्योगी न राहण्याचा आदेश देते. भिक्षा मागू नकोस, उपाशी मरू नकोस, ईश्वराने तुला ज्या शक्ती दिल्या आहेत त्याचा वापर कर असे सांगते. पृथ्वीवर व आकाशात तुझ्या सुखासाठी व पोषणासाठी ज्या वस्तू निर्माण केल्या आहेत त्यांना उचित मार्गाने प्राप्त कर.

शरिअत माणसाला विषयसुखाची वासना दाबून ठेवण्यापासून रोखते व माणसाला आदेश देते की आपल्या वैषयिक इच्छेच्या पूर्ततेसाठी ‘निकाह’ (विवाह) कर.

ती माणसाला आत्मक्लेश करण्यापासून परावृत्त करते आणि असे म्हणते की आराम व सुखकारक गोष्टी व जीवनाचा आनंद स्वतःसाठी त्याज्य करून घेऊ नकोस. जर तुला आत्मिक उन्नती, ईश्वराचे सान्निध्य व पारलौकिक जीवनातील सफलता हवी असेल तर त्यासाठी जगाचा त्याग करण्याची गरज नाही. याच जगात जीवन जगताना पूर्णतः इहलोकातील सर्व व्यवहार मन लावून करतानाच ईश्वराचे स्मरण करणे, त्याच्या अवज्ञेपासून दूर राहणे व त्याने निर्मिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, हेच या जगातील तसेच पारलौकिक जीवनातील सर्व साफल्याचे साधन आहे.

शरिअत माणसाला आत्महत्येपासून परावृत्त करते व म्हणते की, ‘‘तुझे प्राण ही वास्तविकपणे ईश्वराची मालमत्ता आहे. ती तुला एवढ्यासाठीच दिली गेली आहे की त्याचा वापर तू ईश्वराने निश्चित केलेल्या कालावधीपर्यंत करावा, ती प्राणरूपी मालमत्ता तू वाया दवडावी यासाठी दिली गेलेली नाही.’’

प्राणिमात्राचे व वस्तुमात्राचे हक्क

आता चौथ्या प्रकारच्या हक्कांचे थोडक्यात विवरण पाहू या. ईश्वराने मानवजातीला अन्य अगणित चराचरावर म्हणजे प्राणिमात्रावर तसेच वस्तुमात्रावर अधिकार बहाल केले आहेत. मनुष्य स्वतःच्या शक्तीने त्यांना आपल्या अधीन करतो. त्यांच्यापासून कामे करून घेतो व त्यांच्यापासून लाभ घेतो. बुद्धिनिष्ठ श्रेष्ठत्वाच्या कारणाने मानवप्राण्यास अशा प्रकारचा उपयोग करण्याचा पूर्ण हक्क आहे. त्याचबरोबर त्या अन्य प्राणिमात्रांचे व वस्तुमात्रांचेही काही हक्क मानवावर आहेत. ते हक्क असे की मानवाने त्याचा अकारण व्यय करू नये. कसल्याही आवश्यकतेखेरीज त्यांना इजा, त्रास अगर अपाय पोचवू नये. स्वतःच्या हितासाठी अनिवार्य अशी त्यांची किमान हानी करावी. तसेच त्यांचा वापर करण्यासाठी अधिकाधिक चांगल्या पद्धती निवडाव्यात.

यासंबंधी शरिअतमध्ये विपुल प्रमाणात आदेश वर्णिलेले आहेत. उदा. पशूंची हत्या केवळ त्यांचा उपद्रव व त्यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी तसेच अन्नासाठीच करण्याची अनुमती दिली गेली आहे परंतु केवळ क्रीडा अगर मनोरंजनासाठी त्यांची हत्या करण्यास अवरोध केला गेला आहे.

ज्यांचे मांस अन्न म्हणून उपयोगात येते, अशा प्राण्याची हत्या, त्यांचा गळा सुरीने कापण्याची (जिबाह) पद्धत निश्चित केली गेली आहे. प्राण्यांचे उपयुक्त मांस प्राप्त करण्याची ही सर्वोत्तम पद्धत आहे. याखेरीज ज्या पद्धती आहेत त्या जरा कमी क्लेशदायक असल्या तरी मांसाचे कित्येक उपयुक्त गुण त्यामुळे नष्ट होतात. याउलट मांसातील उपयुक्त गुण टिकविणारी दुसरी पद्धत असेल तर ती जिबाहच्या पद्धतीहून जास्त क्लेशदायक आहे. इस्लाम ही दोन्ही टोके टाळतो. इस्लामनुसार प्राण्यांचे हाल करून निर्दयपणे त्यांची हत्या करणे नापसंत आहे. विषारी जीवाणू व हिंस्त्र श्वापदाची हत्या करण्याची अनुमती केवळ एवढ्यासाठीच देतो की माणसाचा प्राण त्यांच्यापेक्षा अधिक मौलिक आहे. परंतु अशा प्राण्यांनाही हालहाल करून ठार करणे यासाठी संमती नाही. ओझे वाहणारे व प्रवासास उपयुक्त प्राण्यांना भुकेले ठेवण्याची व त्यांच्यापासून अवजड कष्टाची कामे करून घेण्याची तसेच त्यांना निर्दयपणे मारझोड करण्याची सक्त मनाई आहे. पक्ष्यांना अकारण बंदिस्त करून ठेवणेही अप्रिय ठरविले गेले आहे. प्राण्याचेच नव्हे तर वृक्ष, वनस्पतींना अकारण इजा व हानी करण्याची अनुमतीही इस्लाम देत नाही. तुम्हाला त्यांची फळे, फुले तोडून घेता येईल. परंतु वृक्षांचा अकारण नाश करण्याचा तुम्हास कसलाही अधिकार नाही. वृक्ष-वनस्पती तर सजीव आहेत. इस्लाम कोणत्याही निर्जीव वस्तूचाही निरर्थक व्यय धर्मसंमत मानत नाही. तसेच पाण्याची नासाडी करण्यास रोखतो.

संबंधित लेख

  • आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे स्थलांतर

    इस्लामी प्रचारकांच्या आंदोलकांसाठी मक्का शहरातील अन्यायपूर्ण वातावरण अत्यंत प्रतिकूल आणि जीवघेणे झाले होते. अत्याचारांची सीमा पार झाली होती. तर दुसरीकडे ‘मदीना’ शहरात इस्लामी आंदोलनासाठी वातावरण अतिशय अनुकूल झाले होते. यामुळे प्रेषित मुहम्मद (स.) यांचा उत्साह वाढत होता. प्रेषितांनी आपले सोबती मदीनेस पाठविले. आता केवळ माननीय अबू बकर(र) आणि अली(र) हे दोघेच मक्का शहरात राहिले.
  • माननीय हस्सान बिन साबित अन्सारी(र.) - इस्लामी कवि

    अरब समाजाचा आणि जगातील इतर राष्ट्रांचासुद्धा इस्लामपूर्व काळ हा अगदीच मार्गभ्रष्ट काळ होता. लिहिण्या-वाचण्याची कमतरता असलेल्या अरब समाजात मात्र कवनशास्त्र खूप प्रगत होते. अरब लोक अशिक्षित व असंस्कृत तर होतेच, परंतु अख्ख्या जगामध्ये कवनशास्त्रात त्यांचा कोणी स्पर्धक नव्हता. उच्च भाषाशैली आणि कविता त्यांच्या स्वभावातच होती. जणू अगदी लहानलहान मुलेसुद्धा कवनशास्त्रात तरबेज असत. एवढेच नव्हेतर गुलामांनासुद्धा कवनशास्त्रावर कमालींचे प्रभुत्व होते. त्या काळात मोठमोठी कविसंमेलने होत असत. या कविसंमेलनात दूरदूरचा प्रवास करून पुरुष व महिला मोठ्या संख्येत सहभागी होत असत.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]