Islam Darshan

पाश्चिमात्यांची संकुचित दृष्टी

Published : Friday, Feb 12, 2016

सृष्टीबद्दल ज्ञान प्राप्त करण्याचे माध्यम या दृष्टीने विज्ञानाला महत्त्व फार मोठे आहे आणि या दृष्टीनेच आतापर्यंतच्या कार्यक्षेत्राची यादीसुद्धा फार प्रभाव पाडते. पण त्याचे हे सारे यश त्याक्षणी निराशेमध्ये रुपांतरित होऊन गेले. ज्याक्षणी पाश्चिमात्यांनी विज्ञानाला ईश्वर मानले आणि त्याला आपल्या प्रेमाचा, निष्ठेचा, श्रद्धेचा एकमात्र केंद्र मानले. त्याच्या या खेदजनक चुकीचा परिणाम असा झाला की त्यांनी व्यवहारातील विज्ञानाच्या अनुभवांच्या मर्यादित साधनाखेरीज ज्ञान मिळविण्याच्या इतर साधनांपासून अलिप्त करुन घेऊन स्वतःला वंचित करुन घेतले. मानवता आपल्या इष्ट ध्येयाप्रत जाण्याऐवजी त्याच्यापासून दूर गेली. माणसामध्ये विकासाची व प्रयत्नांची जी अपार शक्ती आहे ती पाश्चिमात्यांच्या संकुचित दृष्टिकोनाला व भौतिक विज्ञानाच्या अनिवार्य मर्यादांना बळी पडली, कारण बुद्धिरुपी पंखांनी उड्डान करणारे हे विज्ञान मानवतेच्या उंच उड्डानाबरोबर भरारी मारु शकत नाही. ती बुद्धी व आत्मा या दोहोंपासून सहाय्य घेते आणि तेव्हा कोठे आपल्या निर्माणकर्त्याशी सान्निध्य प्राप्त करते आणि तेव्हा कोठे सत्याचे स्पष्ट व शुद्ध विचार समजण्यायोग्य होत असते.

विज्ञानाचे वाढते महत्त्व

विज्ञानच सर्वस्व आहे असा दावा करणारांचा एक समज असा आहे, की विज्ञानच ब्रह्मांडातील व जीवनातील दडलेली रहस्ये उकलून दाखवू शकते, म्हणून विज्ञान ज्याला अनुमोदन देते ते सत्य व शेष सगळे निरर्थक आहे. भावनेच्या ओघात वाहणारे हे लोक ही गोष्ट विसरतात की आपल्या सर्व आश्चर्यजनक कार्यानंतरही विज्ञान आपल्या प्रारंभिक काळातच आहे. अजूनही अनेक रहस्ये व समस्या अशा आहेत की ज्यांच्या बाबतीत विज्ञानाची माहिती अपूर्ण व अविश्वसनीय आहे. याचे कारण त्याचे प्रभावक्षेत्र मर्यादित आहे. त्याचे निरीक्षण बाह्यांगी आहे व त्यात वास्तवतेच्या तळापर्यंत पोहोचण्याची क्षमता नाही. परंतु हे सर्व पाहूनसुद्धा हे लोक असा दावा करतात की आत्मा नावाची एखादी गोष्टच मुळात आस्तित्वात नाही. त्यांच्या दृष्टीने ज्ञानेंदि्रयांची मर्यादा ओलांडून कोणी माणूस परोक्षात दडलेल्या जगाशी आपले संबंध जोडू शकत नाही. असे नाते स्वप्नसृष्टीतील असो किवा ‘टेलिपथीचे’ माध्यम म्हणून असो, वर्तमानकाळातील आत्म्याचा इन्कार करण्याची कल्पना कसल्याही प्रत्यक्ष अनुभवावर आधारभूत नाही. त्याचे खरे कारण असे की आजच्या व्यवहारातील विज्ञान व त्याच्या मर्यादित अस्त्रांची पोच वास्तवतेपर्यंत नाही. म्हणून ते सर्व नैसर्गिक व प्राकृतिक रहस्यांचे अनावरण करण्यात मोठ्या भयानक रितीने अपयशी ठरले आहे. कदाचित निसर्गाच्या दृष्टीने ही श्रेष्ठ सत्ये मानवी बुद्धीच्या कक्षेत व त्याच्या प्रत्यक्ष पकडीच्या बाहेर ठेवण्यासाठी चातुर्याची व कल्याणाची निकड होती. परंतु अज्ञानी लोकांना हीच गोष्ट मार्गभ्रष्ट होण्याचे व इन्कार करण्याचे कारण ठरले आणि त्यांनी स्वतःची अशी समजूत करुन घेतली की जगात आत्म्याचे आस्तित्व मुळातच नाही.

वर्तमान युगाचे ज्ञानपूर्ण अज्ञान

तात्पर्य असे की वर्तमान युगात माणूस ज्ञानपूर्ण अज्ञानात पडलेला आहे. यावरुन याचा अंदाज करता येईल की आज इस्लामची किती मोठी गरज आहे. कारण याच तऱ्हेने माणूस नव्या जुन्या निरर्थक वादाच्या दलदलीतून बाहेर पडू शकतो. मानवाचा मूर्खपणा आम्हाला आरंभी मूर्तिपूजेच्या रुपाने प्रकट झाला आणि आज तोच विज्ञानाच्या पूजेच्या रुपाने अस्तित्वात आहे. मानवी बुद्धीला व आत्म्याला त्याकाळापर्यंत वास्तविक स्वातंत्र्य मिळू शकत नाही, जोवर तो त्या जुन्यापुराण्या निरर्थक गोष्टींपासून मुक्त होत नाही आणि त्याचा एकच मार्ग आहे आणि तो आहे इस्लाम. हेच ते ठिकाण आहे, जेथे इस्लाम मानवतेची एकमात्र आशा बनून समोर येतो. इस्लामच धर्म व विज्ञान यामधील तथाकथित विरोधाचे रुपांतर समझोत्यामध्ये करु शकतो. याखेरीज या संकटात पडलेल्या जगाला शांती व सुरक्षितता यांनी अलंकृत करु शकतो. जी शांती व सुरक्षितता पाश्चिमात्यांच्या मूर्खपणामुळे मानवतेने गमावलेली आहे.

प्राचीन ग्रीस, वर्तमान युरोपियन संस्कृतीला जबाबदार आहे. हा सांस्कृतिक वारसा रोमन साम्राज्याच्या माध्यमाने युरोपापर्यंत पोहोचला. प्राचीन ग्रीस संस्कृतीत, माणूस व त्याच्या देवदेवतांमधील आपापसांतील संबंधाचे चित्र भयानक आहे. ते एकमेकांविरुद्ध असून एकमेकांचे शत्रू आहेत. त्यांच्यात कायमस्वरुपाचा संघर्ष व झगडा असल्याचे दृश्य दिसते. म्हणून माणसाला निसर्गाच्या दबलेल्या रहस्यांचा शोध लावण्यामध्ये जे यश प्राप्त झाले ते त्याच्या जवळील देवदेवतांच्या विवशतेचा पुरावा देते व मानवाने जबरदस्तीने झटापट करुन ते मिळवलेले आहे. जर कदाचित या द्रोही व विवश देवदेवतांच्या हातात काही असते तर त्यांनी माणसाला आपल्या संशोधनकार्यातील कुठल्याही भागात सफल होऊ दिले नसते आणि मानव त्या सर्व सुखसोयी व सुविधा ज्याने निसर्गाच्या भांडारातून प्राप्त केल्या आहेत त्यापासून तो वंचित राहिला असता. या ग्रीसच्या दृष्टिकोनातून विज्ञानाचे प्रत्येक नवे यश हेच जणू आपल्या कलहप्रिय देवदेवतांविरुद्ध मानवाने मिळविलेली विजयाची व यशाची घोषणा असून त्याच्या सर्वश्रेष्ठतेचा पुरावा आहे.

युरोपचा सांस्कृतिक आत्मा

हाच ग्रीसचा संस्कृतीरुपी अमंगल आत्मा, वर्तमान युरोपच्या अचेतन देहात आज आढळतो. तो कधी वास्तवाचा अर्थ सांगताना प्रकट होतो तर कधी ईश्वराच्या बाबतीत युरोपियनांच्या वागण्यामध्ये प्रकट होतो. याचे कारण असे आहे की आजचा युरोपियन वैज्ञानिक विज्ञानाच्या यशाला अशा तऱ्हेने पुढे ठेवतो की जणूकाही ते यश मानवाने एखाद्या महान शक्तीशी युद्धात जिकूनच घेतले आहे व परिणामस्वरुप जणू निसर्गाच्या शक्तीला त्याने आपल्या अधीन करुन टाकले आहे. न पाहिलेल्या ईश्वरासमोर माणूस जेव्हा विनम्र होऊन शरण गेल्याचे दाखवितो, त्याचे मुख्य कारण माणसाची स्वतःची असहाय्यतेची ‘‘विवशतेची भावना’’ आहे. पण विज्ञानाला निसर्गावर जे विशाल यश मिळत आहे त्याच्या परिणामस्वरुप मानवी भावना हळू हळू नष्ट होतील व शेवटी असा दिवस उगवेल जेव्हा माणूस स्वतःच स्वतःचा ईश्वर होईल. अर्थात याकरिता माणसाला जीवन व मृत्यू यातील बाबीचे व रहस्यांचे ज्ञान प्राप्त होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळेत जिवाची निर्मिती करण्यात मानव समर्थ बनणे आवश्यक आहे. म्हणूनच की काय वर्तमान वैज्ञानिक प्रयोगशाळेत जिवांची निर्मिती करण्याच्या कार्यास अग्रक्रमांकाने महत्त्व देतात कारण, त्यांच्यामते या कार्यात यश मिळाल्याच्या पश्चात त्यांच्यामध्ये आणि त्या न पाहिलेल्या ईश्वरामध्ये काही फरक उरणार नाही व तो स्वतःखेरीज इतर कुठल्याही शक्तीला शरण जाण्याच्या गरजेपासून परावृत्त होईल.

वर्तमान पाश्चिमात्य जग आज ज्या आध्यात्मिक रोगांचे लक्ष्य बनले आहे, हे सर्वांत जास्त भयानक आहे. त्याने मानवी जीवनाला एका महाभयंकर शिक्षेचे स्वरुप दिले आहे. माणसामाणसांत बेबनाव व फूट घालून नरकाची अवस्था निर्माण केली आहे, माणसे आपापसांत एकमेकांशी संघर्षरत आहेत. जीवनात शांती, स्थैर्य, तसेच समाधान उरलेले नाही. तसेच सौंदर्य व रुचीही उरलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये आशेचा किरण उरला आहे इस्लाम! नास्तिक पाश्चिमात्यांनी आणलेल्या सर्वनाशापासून वाचण्यासाठी ईश्वरी हुकूमाचे व कायद्याचे पालन केल्याखेरीज आता इतर कुठलाही मार्ग उरलेला नाही. तो मानवाला जीवनाचा एक स्वास्थपूर्ण दृष्टिकोन देतो आणि त्याला असे दर्शवितो की जगात ज्ञान साधनेद्वारा जे भौतिक व आध्यात्मिक यश मिळत असते ते खऱ्या अर्थाने त्यांच्या कृपाळू पालनकर्त्याचीच कृपा आहे व त्या कृपेचेच ते फळ होय. या यशांना जर तुम्ही तुमच्यासारख्याच इतर मानवांची सेवा करण्याचे साधन वा माध्यम बनविले तर तो तुमच्याशी संतुष्ट होईल व तुम्हाला इनाम देईल. तुमचा पालनकर्ता तुमच्या ज्ञान प्राप्त करण्याच्या वेडाने केलेल्या निसर्गशोधाने रागावत नाही, कारण त्यांनी निर्मिलेल्या सृष्टीमध्ये कोणी स्वतःच्या ज्ञानबलावर त्याच्या ईश्वरी दर्जाला धोका निर्माण करु शकेल असे बिलकूल भय नाही. त्याचा कोप फक्त अशाच वेळी भडकतो व अशाच लोकांवर होतो जे आपले संपादित ज्ञान, मोठेपण व वैज्ञानिक शोध आपल्यासारख्याच इतर मानवांच्या कल्याणाची कामे करण्याऐवजी त्याच्या सर्वनाशाकरिता उपयोग करतात.

 

संबंधित लेख

  • सार्वजनिक कल्याण आणि इस्लामी कायदा

    या गोष्टीशी समस्त इस्लामी विद्वान आणि मोठमोठे टोकाचे विचारवंत पूर्णपणे सहमत आहेत की, इस्लामी कायद्याच्या म्हणजेच शरियतच्या समस्त नियम आणि कायद्यात मानवकल्याण आणि हित दडलेले आहे. आपण जर थोडा विचार केला तर हे स्पष्ट आणि सिद्ध होईल की, शरियत अर्थात इस्लामी कायद्याने ज्या ज्या गोष्टींचे आदेश दिले आहेत, त्या-त्या गोष्टींमध्ये मानवासाठी लाभ असून ज्या-ज्या कर्मांपासून रोखले गेले आहे,
  • मानवाचे मौलिक अधिकार

    आम्हा मुसलमानांसाठी मानवाच्या मौलिक अधिकारांची कल्पना काही नवी कल्पना नाही. हे शक्य आहे की दुसर्या लोकांच्या दृष्टीने या हक्कांचा इतिहास युनोच्या चार्टरपासून सुरू होत असेल अथवा इंग्लंडच्या मॅग्राकार्टापासून प्रारंभ झाला असेल. परंतु आमच्यासाठी या कल्पनेचा आरंभ फार पूर्वीच झाला आहे. या प्रसंगी मानवाच्या मौलिक अधिकारांवर प्रकाश टाकण्यापूर्वी संक्षेपात मी हे सांगणे आवश्यक समजतो की मानवी हक्कांच्या कल्पनेचा आरंभ कसा झाला.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]