Islam Darshan

इस्लाम आणि मानवजातीची एकता

Published : Saturday, Feb 13, 2016

भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळातील सर्व माणसांना जर एका ठिकाणी एकत्र जमा केले गेले आणि त्यांना त्यांच्या भावना व अनुभव आणि त्यांच्या गरजांच्या बाबतीत प्रश्न विचारला गेला तर सर्वांची उत्तरे एकसारखी असतील. कोणताही माणूस असा निघणार नाही जो आनंद व दुःखाच्या भावना आणि नैसर्गिक आवश्यकतांपासून मुक्त असेल अथवा त्याच्या भावना दुसऱ्यांच्या भावनांपासून आणि त्याच्या नैसर्गिक गरजा दुसऱ्यांच्या नैसर्गिक गरजांपासून भिन्न असतील. परंतु असे असून सुद्धा माणसे वेगवेगळ्या जाती व टोळ्यांत विभाजित झाले आहेत आणि प्रत्येक जात दुसऱ्या जातीशी युद्धात निमग्र आहे. जणु प्रत्येक टोळी आणि प्रत्येक मनुष्याचा स्वभाव वेगळा आणि त्यांच्या गरजा भिन्न व परस्परविरोधी आहेत. आशियाच्या रहिवाशाला आपल्या जीवनासाठी ज्या गोष्टीची गरज आहे. अमेरिकावासी त्यांच्याबद्दल बेपर्वा आहे. युरोपच्या मूळ गरजा आफ्रिकेच्या मौलिक गरजांपेक्षा भिन्न आहेत. रोमन गृहस्थाच्या ज्या भावना व अनुभूती आहेत त्यापेक्षा वेगळ्या भावना अनुभूती ग्रीकाच्या आहेत.

जीवनाला एका उद्देश्याची गरज आहे
वस्तुस्थिती अशी आहे की सर्वच माणसे आपल्या नैसर्गिक भावना, तात्विक लाभ व मूळ गरजांच्या दृष्टीने एकतेच्या सूत्रात बांधलेले आहेत. तर कोणती अशी गोष्ट आहे, जी त्यांना संघर्ष व टकरावकडे नेते व एकमेकाला हानि पोचविण्यास व रक्त सांडण्यास प्रवृत्त करते? याचे उत्तर असे आहे की मनुष्य या जगात आपल्या जीवनासाठी एखादा असा उद्देश्य इच्छितो जो त्याच्या इच्छा व आकांक्षांचे केंद्र असेल. त्याच्या सभोवती आपल्या सर्व शक्तींना व योग्यतांना त्यांने खर्च करावे आणि आपले प्राण व संपत्ती आणि वेळ अर्पण करावे. त्याला प्राप्त करून त्याने शांती व समाधानाचा अनुभव करावा. ते त्याच्या जीवनाची प्राप्ती आहे. अशा प्रकारच्या एखाद्या उद्देश्याविना त्याला शांति लाभू शकत नाही. इतकेच नव्हे तर तो जिवंत देखील राहू शकत नाही. या जीवन उद्देश्याला प्राप्त करण्यासाठी माणसात विरोध होता आणि हाच विरोध त्यांच्या सर्व भांडणांचे मूळ आहे.

जीवनाचे चुकीचे उद्देश्य
कुणी म्हटले आहे की मानवाच्या जीवनाचा उद्देश्य घराणे व जातीची सेवा होय. जातीच्या लाभासाठी धडपड, तिचे समर्थन, तिचा पक्ष घेणे व शत्रूपासून तिचे संरक्षण करणे माणसाचे पवित्र कर्तव्य आहे कारण जातच माणसाचे संगोपनगृह आहे तीच त्याला व्यक्तित्व देते आणि धावपळीला पात्र बनविते. त्याच्या सर्व शक्ती व पात्रता जातीच्या उपकारांचे फळ असते. म्हणून त्या शक्तींचा उत्तम व्यय देखील जातीची सेवाच होऊ शकते. तो मनुष्य यशस्वी होय, ज्याच्या शक्ती व योग्यता त्याच्या जातीच्या उपयोगी पडतात.
त्याचे उत्तर असे दिले गेले की मनुष्याच्या शक्ती व योग्यतांना केवळ ती जातच वाढवीत नाही, ज्यात तो जन्माला येतो, तर त्याच्या प्रगती व संगोपनात बरेचसे अन्य घराणे व जाती सामील असतात. म्हणून हे बरोबर होणार नाही की माणसाने केवळ आपल्या जातीसंबंधी विचार करावा आणि तिच्या लाभासाठी सर्वकाही करावे. त्याच्या सेवेचे व त्यागाचे क्षेत्र आपल्या जातीपर्यंतच सीमित असता कामा नये, तर त्या सर्व जातीपर्यंत विस्तीर्ण असावयास हवे, जे एक भाषा बोलतात, कारण भाषाच विभिन्न जातींना जोडण्याचे साधन आहे. त्यानेच विचारात समानता निर्माण होते व जाती एक दुसऱ्याजवळ येतात आणि एक दुसऱ्याचे सहकारी सहाय्यक बनतात.

परंतु भाषेच्या विस्तारालादेखील बहुतेक काही शंभर भाषेच्या विस्ताराला देखील बहुतेक काही शंभर व काही हजार मैलांचे अंतर समाप्त करते. माणसाच्या लाभाचे क्षेत्र यापेक्षा अधिक विस्तृत प्रदेशावर व फार दूरवर पसरलेले असते. तो अशा लोक व जमातींशी सुद्धा संबंध ठेवण्यास विवश आहे, ज्यांची भाषा त्याच्या भाषेपासून जरी भिन्न असते तरी ज्यांच्याशी त्याचा घनिष्ठ आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक संबंध असतो व जे त्याच्याशी निकटता व नाते असल्याचा अनुभव करतात. हा संबंध व संलग्नता सामान्यतः पृथ्वीच्या त्या बागापर्यंत पसरलेल्या माणसांच्या दरम्यान आढळते ज्याला पर्वत, नद्या, उत्पादनाची साधने, हवापाणी व ऋृतूंच्या समानतेने एक केलेले असेल. व तो भौगोलिक दृष्टीने अन्य प्रदेशापेक्षा भिन्न समजला जात असावा. मानव पृथ्वीच्या या संपूर्ण प्रदेशापासून आणि त्यांच्या प्रत्येक वस्तूपासून लाभ घेत आला आहे, त्याच्यापासूनच त्याची संस्कृती आणि सभ्यता अस्तित्वात येते म्हणून म्हटले गेले आहे की माणसासमोर त्या संपूर्ण प्रदेशाची सेवा असणे आवश्यक आहे. मग त्यात कितीही भाषा बोलल्या जात असोत, कितीही जाती व टोळ्या वसलेल्या असोत व कितीही वर्ण व वंशाचे लोक वसलेले असोत. हीच कल्पना राष्ट्र व स्वदेशाचा पाया आहे. राष्ट्रीयता व स्वदेश भावनेची काही अन्य कारणे सुद्धा आहेत. या सर्व बाबी नजरेआड केल्या तरी ही एक वस्तुस्थिती आहे की राष्ट्र व स्वदेशाची सेवा आणि
त्याची सहायता व समर्थन जीवनाचा एक महान उद्देश्य राहिला आहे. वर्तमान काळ सुद्धा त्याला उच्चतम जीवन-उद्देश्य मानतो. त्याच्या दृष्टीने राष्ट्र व स्वदेशासाठी जिवंत राहणे व मरण पत्करणे व वाटेल त्या किमतीवर तिचे संरक्षण करणे माणसासाठी उच्च स्थान प्राप्त करणे होय. जो मनुष्य या उद्देश्यासाठी प्राणार्पण करील तो या गोष्टीस पात्र समजला जातो की त्याचे स्मरण होत राहावे. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या फोटोसमोर आदराने नमस्कार केला जावा व त्याच्या स्मरणाला ऐतिहासिक पृष्ठात सुरक्षित केले जावे.

चुकीचे उद्देश्य मानवजातीच्या विभाजनाला कारणीभूत
जीवनाची ही सर्व उद्दिष्टे माणसांना एकत्र जोडणारी नाही तर तोडणारी आहेत. कारण त्यापैकी प्रत्येक उद्देश्य सीमित आहे. ते विशेष स्तर व समूहाच्या लाभासाठी अस्तित्वात आले आहेत. त्यांच्यापैकी कोणताही उद्देश्य या गोष्टीची चर्चा करीत नाही की सर्व माणसांचा लाभ कशात आहे. हे एक सत्य आहे की कोणत्याही सीमित उद्देश्याच्या अधीन विविध वंश, जाती व देशांचे एकत्र येणे शक्य नाही. जर एखाद्या माणसाच्या प्रेमाचे केंद्र, आपली जमात व आपली टोळी असेल त्याच्याशी ते लोक, जमाती व टोळ्यांनी का संलग्न राहावे ज्यांच्या लाभ व हानीमध्ये त्याला कोणतीही रुची नसावी? जर कोणाची दृष्टी आपल्या समभाषिक लोकांपर्यंत जाऊन स्थिरावली तर अन्य भाषिकांनी त्याच्याशी का संबंध ठेवावा आणि प्रेम करावे? जर माणसाच्या जीवनाचा उद्देश्य काही विशिष्ट पर्वत आणि नद्यांच्या दरम्यान सीमित असेल तर त्या उद्देश्याशी त्या लोकांना काय रूची असेल जे या क्षेत्राबाहेर आहेत आणि जे त्या पर्वत व नद्यांचा लाभ घेत नाहीत.

चुकीचे उद्देश्य शत्रुत्वाला जन्म देतात
वस्तुस्थिती अशी आहे की या चुकीच्या उद्देश्यांनी लोकसमुहात फूट पाडली व त्यांच्या दरम्यान तिरस्कार व शत्रुत्वाचे बी पेरले आहेत. प्रत्येक मनुष्य आपल्या खेळात बंदिस्त होऊन विचार करतो आणि दुसऱ्यांचे प्रश्न व अडचणीबद्दल त्याला गोडी राहिलेली नाही. सत्य असो किवा असत्य आपल्या स्तर व आपल्या समूहाच्या समर्थनाला परमकर्तव्य समजतो. आंतरराष्ट्रीय संबंध सुद्धा लाभाच्या अधीन झाले आहेत. आपल्या जमातीच्या लाभासाठी दुसऱ्या जमातीला हानी पोचविण्यापासून देखील अलिप्त राहिले जात नाही. पंथ पंथांशी संघर्ष करीत आहेत आणि जाती जातींशी युद्ध करीत आहेत. मानवजात शांती व सुरक्षेपासून फारच दूर होत चालली आहे. युद्धाचे काळेकुट्ट ढग सर्वत्र जमले आहेत. मनुष्य निरंतर भयछत्राखाली जगत आहे की न जाणे केव्हा त्यांच्यातून अग्रीचा वर्षाव होईल व वस्त्या वैराण होतील व स्मशान भूमीत परिवर्तित होतील.

विश्वव्यापी बंधुत्वाची कल्पना व त्यातील उणीवा
याच्या सोडवणुकीसाठी विश्वव्यापी मानवी बंधुत्वाची कल्पना प्रस्तुत केली जाते. म्हणजे सर्व जमातींनी आपल्या संयुक्त लाभासाठी एकत्र यावे व त्यांच्या वाट्यासाठी एकजुटीने संघर्ष करावा. स्वतःही जिवंत राहावे आणि दुसऱ्यांनासुद्धा जिवंत राहू द्यावे. परंतु ही एक काल्पनिक संकल्पना आहे. जगाने अद्याप त्याचे समर्थन केलेले नाही. माणसाचे सर्व निर्णय व धैर्य त्याच्या दृष्टिकोनाच्या अधीन असतात. दृष्टिकोनाच्याच आधारे तह व युद्ध मैत्री व शुत्रुत्व होते. यांच्यामुळेच संफ व संबंधांत दृढता अथवा निर्बलता येते. दृष्टिकोनात विरोध असेल तर मतभेद निश्चितपणे जन्म घेतील. जो मनुष्य साम्यवादावर विश्वास ठेवीत असेल त्याच्यासाठी भांडवलशाहीकडे तडजोडीचा हात पुढे करणे असंभव आहे. राष्ट्रप्रेमी बुद्धी राष्ट्रीयतेच्या विरोधकाला सहन करू शकत नाही. वैचारिक मतभेदाचा इतिहास दर्शवितो की यामुळे माणसांच्या दरम्यान नेहमी वाद व युद्ध होत राहिले आहे. हे कसे संभव आहे की आज हीच गोष्ट मैत्री व प्रेमाचे साधन बनावे? हा असा नैसर्गिक प्रश्न आहे ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही आणि विश्वव्यापी बंधुत्वाची संकल्पना मांडणाऱ्याकडून आजपर्यंत त्याचे उत्तर दिले जाऊ शकले नाही.

मानवी एकतेचा इस्लामी पाया
इस्लामने याचे बरोबर उत्तर दिले आहे. त्याने केवळ असेच नव्हे की सर्व माणसांना एक मानवी एकता ठरविले आहे तर त्यासाठी फारच मजबूत व पक्का पाया उपलब्ध करून दिला हे त्याने सांगितले की संपूर्ण मानवजातीचा अल्लाह सुद्धा एकच आहे व त्यांचे मूळ सुद्धा एकच आहे. म्हणून ते आपली सर्व प्रकारची विभिन्नता असून देखील एक एकता आहेत. इस्लाम याच सत्याकडे येण्याचे जगाला आवाहन करीत आहे. त्याचा प्रसार करण्याचा व प्रभावी बनविण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या मार्गात जे दूषित पूर्वग्रह येतील त्यांना दूर करणे आवश्यक समजतो. इस्लामने उपलब्ध केलेल्या या पायाला मान्य केले तर भेदाभेदाच्या अंधकारातून एकतेच्या सूऱ्याचा उदय होऊ शकेल. आणि ज्या जाती व जमाती परस्पर संघर्षात मग्न आहेत त्या एकत्र येऊन जीवन जगू शकतील.

संपूर्ण मानवजात एकाच अल्लाहची सेवक आहे
इस्लामने अल्लाहची योग्यतम संकल्पना दिली आहे. हाच त्याच्या शिकवणीचा प्राण आहे. तो या सत्याला पुराव्याच्या पूर्ण शक्तीसह प्रस्तुत करीत आहे की ही लांब रूंद सृष्टी जिच्या विस्ताराची कल्पना केली जाऊ शकत नाही ती एकाच अल्लाहद्वारे निर्मित आहे. त्याचीच याच्यावर सत्ता चालते. मनुष्य देखील त्याच्या अगणित निर्मितीप्रमाणे एक निर्मिती होय. तोच त्याचा निर्माता, स्वामी, उपास्य व सत्ताधिकारी आहे. त्यानेच त्याच्यासाठी हवा, पाणी, प्रकाश, उष्णता व गारवा निर्माण केला, महासागर व जमिनीचा ताबा घेतला. तोच त्याचा अन्नदाता व पालनपोषण करणारा आहे, त्याच्याच हातात मृत्यू व जीवन, रोग व आरोग्य आणि दारिद्रय व खुशाली आहे. तोच त्याची प्रार्थना ऐकतो व इच्छापूर्ती करतो. तोच अडचणी दूर करणारा व गरजा पूर्ण करणारा आहे, तोच त्याचा खरा आधार आहे, जेव्हा सर्व आधार तुटतात तेव्हा त्याचाच आधार उपयोगी पडतो, तोच आश्रय देणारा आहे, त्याने आश्रय न दिल्यास त्याला कोठेही आश्रय मिळू शकत नाही आणि त्याने जर मदतीचा हात दिला नाही तर कोणी सुद्धा त्याला मदत करू शकणार नाही. त्याचे उपकार इतके अधिक आहेत आणि मनुष्य त्या उपकारात इतका बुडालेला आहे की तो त्यांची गणनाही करू शकत नाही आणि त्यांचे खऱ्या अर्थाने आभारसुद्धा मानू शकत नाही.
‘‘अल्लाह तोच आहे ज्याने आकाश व पृथ्वीला निर्मिले व आकाशातून पाणी उतरविले मग त्याद्वारे तुमच्या उपजीविकेसाठी निरनिराळी फळे निर्माण केली व त्यानेच तुमच्यासाठी नौका उपलब्ध केली जेणेकरून समुद्रात त्याच्या आज्ञेने चालावे आणि त्याने तुमच्यासाठी सूर्य व चंद्राला ताब्यात घेतले जे निरंतर चालत आहेत व त्यानेच तुमच्यासाठी रात्र व दिवसाला ताब्यात घेतले आणि जे काही तुम्ही मागितले म्हणजे ज्या वस्तूची तुमच्या अस्तित्व व जीवनासाठी आवश्यकता होती त्या सर्व दिल्या. जर तुम्ही अल्लाहच्या देणग्यांची गणना करू इच्छित असाल तर ते करू शकत नाही. निःसंशय मनुष्य मोठाच अन्यायी व मोठा कृतघ्न आहे.’’ (सूरह इब्राहीम - ३२ : ३४)

सर्वांच्या जीवनाचा उद्देश्य अल्लाहची आराधना होय
मनुष्य आपल्या याच स्वामी व ईश्वराच्या आराधनेसाठी निर्माण केला गेला आहे. या जगात हीच त्याची खरी स्थितीसुद्धा आहे आणि हीच त्याला शोभा देते. अशा तऱ्हेनेच तो अल्लाहच्या उपकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकतो आणि स्वतः सेवक असल्याचा पुरावा देऊ शकतो.
‘‘हे लोकहो ! उपासना करा आपल्या पालनकर्त्यांची ज्याने तुम्हालाही निर्माण केले व त्या लोकांनाही निर्माण केले जे तुमच्या पूर्वी होऊन गेले आहेत. आशा आहे तुम्ही त्याच्या कोपापासून वाचू शकाल. तोच आहे ज्याने तुमच्यासाठी पृथ्वीला बिछायत व आकाशाला छत बनविले आणि आकाशातून पाणी उतरविले व त्याद्वारे फळांचे अन्न तुमच्यासाठी काढले म्हणून अल्लाहबरोबर कुणाला भागीदार करू नका आणि तुम्ही जाणता (की हे काही धर्मानुकूल नव्हे).’’ (२ : २१-२२)

हीच प्रेषितांची शिकवण आहे
हीच शिकवण त्या सर्व प्रेषितांची व प्रिय सेवकांची होती जे महान अल्लाहकडून मानवांच्या मार्गदर्शनासाठी जगाच्या विविध भागात व निरनिराळ्या काळात येत राहिले आणि ज्यांची परंपरा अंतिम प्रेषित मुहम्मद (स) पर्यंत चालू राहिली.
‘‘आम्ही तुमच्या अगोदर ज्या कोणा प्रेषिताला पाठविले त्याच्याकडे हीच दिव्य वाणी पाठविली आहे की माझ्या व्यतिरिक्त कोणीही उपास्य नाही. म्हणून तुम्ही माझीच उपासना करा.’’ (अंबिया २५)
या उद्देश्यासाठी सर्वजण एकत्र येऊ शकतील
जीवनाचा हा उद्देश्य कोणा एका व्यक्ती, वर्ग व जात आणि देशाचा नव्हे तर संपूर्ण मानवजातीचा उद्देश्य आहे. श्रीमंताचा, गरीबाचा, प्रगत लोकांचा, मागासलेले व पुढारलेल्यांचासुद्धा, भारतीयांचा, चिनी लोकांचा, आशियावाल्यांचा सुद्धा, युरोपियनांचा सुद्धा, रशियनांचा व अमेरिकनांचा सुद्धा. महान अल्लाहने व्यक्ती व जमातीसाठी वेगवेगळे उद्देश्य सांगितलेले नाहीत तर सर्वांसाठी एकच उद्देश्य ठरविला आहे आणि पृथ्वीवर वसलेल्या प्रत्येक व्यक्ती व प्रत्येक समूहाकडून आपल्या उपासनेची अपेक्षा केली आहे.हाच जगाचा एकमेव उद्देश्य आहे जो पूर्व व पश्चिम आणि उत्तर व दक्षिणेतील सर्व लोकांचा उद्देश्य असू शकतो आणि ज्यासाठी वर्ण व वंश आणि जात व देशाचे भेद असून देखील ते एकत्र येऊ शकतात. त्याच्यासंबंधी ना इराणी असे सांगू शकतात की हा केवळ अरबासाठी आहे आणि ना अरब त्याला इराणींचा उद्देश्य ठरवू शकतात. ना पूर्वेला तो दूरचा वाटेल ना पश्चिमेला, कारण ही प्रत्येक माणसाच्या हृदयाची हाक आहे. याच्यामुळे त्याची नैसर्गिक तहान भागते. त्याच्यात प्रत्येक वर्ण व वंश आणि पृथ्वीच्या प्रत्येक प्रदेशातील माणसासाठी आकर्षण आहे. आपल्या निर्मात्या व स्वामी आणि उपकारकर्त्यांकडे वाटचाल करणे व त्याच्याजवळ जाणे माणसाचा स्वभाव आहे कारण पावलोपावली तो त्याच्याकडे जाण्यास आणि त्याच्या पदराखाली आश्रय घेण्यास बाध्य आहे. अडचणीत तो त्याचा आधार शोधतो आणि आनंदात त्याच्या उपकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. त्याच्या उपासना व गुलामीत त्याचा वैयक्तिक लाभ आहे आणि त्याच्याशी विद्रोह आणि त्याच्या अवज्ञेत त्याची वैयक्तिक हानी आहे.

याशिवाय महान अल्लाहचे कोणीही जातीबांधव नाहीत. त्याचे एखादे घराणे आणि टोळी नाही. त्याचे अस्तित्व पृथ्वीच्या कोणत्याही प्रदेशापर्यंत सीमित नाही. तो प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे आणि तो प्रत्येकाला पाहतो व त्याची प्रार्थना ऐकतो व सहाय्य करतो. त्याच्याशी प्रत्येक मनुष्य संबंध जोडू शकतो, गौरवर्ण सुद्धा नि कृष्णवर्ण सुद्धा, मजूर व मालक सुद्धा, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी व गुरु सुद्धा, शासक व शासित सुद्धाः सर्वजण त्याच्या दृष्टीने समान आहेत. सर्वजण त्याच्याकडे वाटचाल करू शकतात आणि त्याच्याशी जवळीक व प्रेमाची इच्छा करू शकतात. कोणतीही व्यक्ती आपल्या कुळाच्या मोठेपणामुळे त्याच्याजवळ उच्च पद प्राप्त करू शकत नाही आणि प्रतिष्ठा व उच्च पदाने सुद्धा. त्याच्यापर्यंत पोहचण्यात दुर्दशाही आडकाठी बनत नाही आणि खुशाली सुद्धा पाठीराखी व सहाय्यक होत नाही. तो त्या प्रत्येक माणसाला पुढे सरसावून घेण्यास तयार आहे जो त्याच्याकडे सरसावतो. मग तो आफ्रीकन असो अथवा अमेरिकन, इंग्रजी बोलत असो अथवा हिदी. जो मनुष्य स्वतःला त्याच्या गुलामीत समर्पित होऊ इच्छितो तर त्याच्यासाठी कोणताही अडथळा नाही. ज्या कोपऱ्यातून जो कोणी त्याचा धावा करील त्याच्या त्या आळवण्याला ओ देण्यास तो तयार आहे.

‘‘जेव्हा माझे सेवक माझ्यासंबंधी तुम्हाला प्रश्न विचारतील तेव्हा सांगा की मी त्यांच्याजवळ आहे. हाक मारणारा जेव्हा मला हाक देतो तेव्हा मी त्याची हाक ऐकतो. म्हणून त्यानेसुद्धा माझी आज्ञा पाळली पाहिजे. माझ्यावर विश्वास ठेवावा. (अशा प्रकारे) आशा आहे ते मार्गदर्शन प्राप्त करतील.’’ (२ : १८६)
ही कल्पना की या सृष्टीचा एक अल्लाह आहे. सर्व मानव त्याचे सेवक आहेत आणि त्याच्याच उपासनेसाठी जन्मले आहेत. एक ईश्वराचा ही कल्पना मानवातील धर्मांधता नष्ट करून त्यांना एका एकतेत परिवर्तित करते. ही कल्पना मान्य केल्यावर माणसात सन्मान आणि अपमानाचे खोटे भेदभाव कदापि उचल खाणार नाहीत. अल्लाहची आराधना करण्याची अनुभूति सेवक व स्वामी, शासक व शासित, मजूर व मालक, गोरे व काळे, अरब व इराणी, सर्वांना एका रांगेत उभी करते आणि उच्चनीचतेचे अंतर विसरून सर्वजण त्याच्यापुढे नतमस्तक होतात.

संबंधित लेख

  • इस्लाम धर्माने दारू आणि इतर सर्व मादक पदार्थांच्या सेवनास निषिद्ध ठरविले

    इस्लाम धर्माने दारू आणि इतर सर्व मादक पदार्थांच्या सेवनास निषिद्ध ठरविले आहे. त्याचप्रमाणे या घोर अपराधावर ‘हद‘ जारी करण्याचा आदेश दिला आहे. ईश्वराने म्हटले आहे, ‘‘हे श्रद्धावंतांनो! ही दारू आणि जुगार व वेदी आणि शकून ही सर्व अमंगल सैतानी कामे होत, यांच्यापासून दूर राहा. सैतानाची हीच इच्छा आहे की, याद्वारे तुमच्यात शत्रुत्व व कपट निर्माण करावे आणि तुम्हास ईशस्मरण आणि नमाजपासून रोखावे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ९०)
  • ईश्वराच्या अस्तित्व विषयासंबंधी निराधार प्रश्न

    एखादे सुंदर, विविध रंगांच्या व विविध प्रकारच्या फुलांनी नटलेल्या नंदनवनात वावरत असताना आपल्या बुद्धीत नंदनवन फुलविणार्या व त्याची जोपासना करणार्या माळ्याविषयी विचार आल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याने हे सुंदर नंदनवन फुलविण्याकरिता जमिनीची मशागत केली, पाणी देऊन सुपीक बनविली, कष्ट पणाला लावले आणि विविध प्रकारच्या फुलझाडांची कौशल्यपूर्ण पेरणी करून हे अतिसुंदर नंदनवन अस्तित्वात आणले.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]