Islam Darshan

मानवजातीचे मूळ एक आहे

Published : Saturday, Feb 13, 2016

पवित्र कुरआनने वारंवार हे सत्य स्पष्ट केले आहे की मानवजातीचा प्रारंभ एकाच जीवापासून झालेला आहे. त्याच्यापासून त्याची जोडी निर्माण केली आणि नंतर त्या दोघांपासून त्यांचा वंश वृद्धिगत झाला. परिवार आणि टोळ्या अस्तित्वात आल्या. जाती व जमातींनी जन्म घेतला आणि मानव वस्ती पृथ्वीच्या वेगवेगळ्या प्रदेशात व क्षेत्रात वाढत गेली. जसे एके ठिकाणी म्हटले आहे,
‘‘हे लोकहो ! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच्यापासूनच त्याची आद्य जोडी सुद्धा निर्माण केली आणि त्या दोहोंपासून असंख्य पुरुष व स्त्रियांचा प्रसार केला. तुम्ही अल्लाहचे भय बाळगा ज्याच्या नावाने आपापसात एकमेकाचे हक्क मागता आणि आपापसातील संबंधाविषयी सुद्धा भीत रहा. निःसंशय अल्लाह तुम्हाला पाहत आहे.’’ (सुरतुन्निसा : १)

मानवजातीची एकता भंग करणे विकृती होय
ही या गोष्टीची घोषणा आहे की संपूर्ण मानव जात मूलतः एकाच आई-बापाची संतती आहे. ते एकमेकांचे बंधू आहेत. जे जगाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पसरले आहेत. महान अल्लाहने त्यांच्या दरम्यान बंधुत्व व भाऊकीचे जे संबंध दृढ केलेले आहेत त्यांना तोडण्याची इस्लाम कदापि अनुमती देत नाही आणि या दिशेने पडणाऱ्या प्रत्येक पावलाचा तो विरोध करतो. त्याच्या दृष्टीने या कुटूंबव्यवस्थेला नष्ट-भ्रष्ट करण्याचा प्रत्येक प्रयत्न उपद्रव व विकृतीचा समानार्थी होय. पवित्र कुरआनने आदरणीय मूसा (अ) आणि फिरऔनची कथा अत्यंत विस्तारपूर्वक सांगितली आहे. फिरऔनने अल्लाहशी विद्रोह केला आणि उद्धटपणा अंगिकारिला व संपूर्ण समाजाला अनेक वर्गात विभाजित केले. एक वर्ग शासकांचा होता व दुसरा शासितांचा. महान अल्लाहने आदरणीय मूसा (अ) द्वारे हा संघर्ष संपुष्टात आणला. अत्याचारपीडितांना सहाय्य केले आणि अत्याचारींना पृथ्वीतलावरून नामशेष केले. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘निस्संदेह फिरऔनने पृथ्वीवर उद्धटपणा केला आणि तेथील लोकांना अनेक वर्गांत विभाजित केले. त्यांच्यापैकी एका वर्गाला (बनी इस्त्राईल) निर्बल करून टाकले. त्यांच्या मुलांना कापीत असे आणि त्यांच्या स्त्रियांना जिवंत ठेवीत असे. निःसंशय तो विकृती करणाऱ्यांपैकी होता. आम्ही त्या लोकांवर उपकार करू इच्छित होतो, जे पृथ्वीवर निर्बल करून ठेवले गेले होते, त्यांना नेता बनवू इच्छित होतो आणि त्यांना उत्तराधिकारी बनवू इच्छित होतो आणि फिरऔन व हामान आणि त्यांच्या लष्करांना त्यांच्याद्वारे तसेच काही दाखवू इच्छित होतो ज्याने ते भयभीत होत होते.’’ (कसस : ४ - ६)

वर्ण, वंश आणि भाषा वगैरेंतील अंतर निसर्गाची चिन्हे होत

 

 

मानवात रंग रूप, वंश व गोत्र, भाषा व कथन, अस्तित्व, कला व्यवसाय, जात व स्वदेशातील अंतराला इस्लाम अल्लाहच्या असंख्य चिन्हांपैकी एक चिन्ह मानतो. मानवातील हा फरक दर्शवितो की या सृष्टीवर त्याच्या निर्मात्या व स्वामीला पुरेपूर प्रभाव व अधिकार प्राप्त आहे. तो ज्याला इच्छितो त्याला सुस्वरूप निर्माण करतो व ज्याला इच्छितो त्याला कुरुप बनवितो. ज्याला इच्छितो, धन प्रदान करतो आणि ज्याला इच्छितो त्याला त्यापासून वंचित करतो. ज्याला इच्छिल पृथ्वीच्या हवे त्या प्रदेशात तो जन्मास घालतो आणि इच्छेप्रमाणे भाषा शिकवितो. जर कोणी त्यांच्यातील एखाद्या गोष्टीस आपल्या श्रेष्ठत्व अथवा कनिष्ठतेचा पुरावा मानत असेल तर तो निसर्गांच्या एका मोठ्या निशाणीपासून धडा घेत नाही. तो त्या दृष्टीपासून वंचित आहे ज्यात अल्लाहच्या प्रमाणांचे अध्ययन करण्याची योग्यता असते.

‘‘त्याच्या संकेतांपैकी एक असे आहे की त्याने तुम्हाला मातीपासून निर्माण केले. मग आता तुम्ही मानव जगात पसरलेले आहात. हे देखील त्याच्या संकेतांपैकी एक आहे की त्याने स्वतः तुमच्यातून तुमच्या जोड्या निर्माण केल्या जेणेकरून तुम्ही त्यांच्यापासून सुख प्राप्त करावे आणि त्याने तुमच्या दरम्यान मैत्री व दयेच्या भावना ठेवल्या. निस्संदेह यात विचारवंतांसाठी महान संकेत आहेत. त्याच्या संकेतांपैकी आहे आकाश व पृथ्वीची निर्मिती करणे आणि तुमच्या भाषा व रंगांतील फरक, निःसंशय यात जाणत्यासाठी मोठी चिन्हें आहेत. त्याच्या संकेतांपैकी रात्री तुमचे निजणे आणि दिवसा त्याच्या कृपा प्रसादाचा (अन्न) शोध घेणे सुद्धा आहे. निस्संदेह यात बरीचशी संकेत आहेत त्या लोकांसाठी जे म्हणणे ऐकतात.’’ ( २०-२३)

या आयतीत काही महत्वाच्या सत्य बाबींचे निवेदन केले गेले आहे.

 1. महान अल्लाहने मनुष्याला मातीपासून निर्माण केले. या निवेदनाद्वारे माणसाच्या जातीय, वांशिक, आर्थिक, शैक्षणिक व वैचारिक सर्व प्रकारच्या अभिमानाचे उच्चाटन केले आहे. मनुष्य मग तो एखाद्या देशाचा राजा का असेना. एखाद्या अधिकार संपन्न जात आणि टोळीशी त्याचा संबंध का असेना. मोठ्यात मोठा भांडवलदार आणि उद्योजक असो. ज्ञान व विद्वत्ता आणि सामर्थ्य व शक्तीचा पर्वत का असेना. ही वस्तुस्थिती आहे की त्याने मातीपासून जन्म घेतला आहे. मातीचे वैशिष्टय दीनता नम्रता आहे. मातीच्या या पुतळ्यात गर्व त्याचवेळी येऊ शकतो जेव्हा त्याला स्वतःची वस्तुस्थिती कळत नाही आणि आपले सामर्थ्य विसरून जातो.

 2. जगाने स्त्री व पुरुषाला सुद्धा निम्नतर व उच्चतर अशा स्तरात विभाजित केले होते. पुरुष उच्चतर होता व स्त्री निम्नतर होती. आज सुद्धा हे विभाजन व्यवहारात उरलेले आहे. पवित्र कुरआनच्या या निवेदनाने की अल्लाहने पुरुषाची जोडी त्याच्याच प्रकारातून निर्माण केली, या खोट्या विभाजनाचे खंडन होते. पुरुषाची जोडी त्याच्याच प्रकारापासून आहे. कोणत्या अन्य प्रकारापासून नव्हे म्हणून त्यांच्यापैकी कोणी निम्नतर असणे अथवा श्रेष्ठतर असण्याचा प्रश्नच निरर्थक आहे. अल्लाहने त्यांच्यात स्नेह व प्रेम भरले आहे त्यांच्यात तिरस्कार अथवा शत्रुत्व निर्माण करणे किवा आढळणे पूर्णपणे नैसर्गिक आहे.

 3. सांगितले (अल्लाहच्या निशाण्यापैकी एक निशाणी आकाश व पृथ्वी निर्माण करणे सुद्धा आहे.) निसर्गाच्या या निशाणीला कोणी अमान्य करू शकत नाही. यात या गोष्टीकडे देखील सूक्ष्म इशारा आहे की लक्षावधी मैलांचे अंतर आणि लांबी असून देखील अल्लाहच्या आज्ञेने पृथ्वी व आकाशामध्ये ऐक्य निर्माण केले आहे. ते एखाद्या संघर्षविना अल्लाहने ठरविलेल्या व्यवस्थेच्या अधीन भ्रमण करीत आहेत. जर पृथ्वीतलावरील लोक सुद्धा त्याच्या आज्ञांचे पालन करतील तर त्यांची सर्व भांडणे व संघर्षाचे प्रश्न संपुष्टात येऊ शकतील आणि त्यांच्या दरम्यान ऐक्य उत्पन्न होऊ शकेल.

 4. रंग, रूप आणि भाषेच्या अंतराला देखील निसर्गाची एक निशाणी ठरविले. ही गोष्ट स्पष्ट आहे की निसर्गाच्या निशाण्या त्यापासून बोध घेण्यासाठी असतात. भांडण तंट्यासाठी नसतात.

 5. या जगात प्रत्येक मनुष्य, निद्रा, जागरण व पोटा पाण्यासाठी धावपळ करण्यास बाध्य आहे. ही देखील निसर्गाची एक निशाणी आहे जी दर्शविते की जगातील कोणताही मनुष्य आवश्यकतापासून बेपर्वा नाही आणि या आवश्यकतांचे स्वरूपदेखील एकसारखे आहे. ज्या अर्थी आवश्यकतेने सर्वांना एक करून टाकले आहे तर त्यांच्या दरम्यान नीचता व उच्चतेचा प्रश्न निरर्थक आहे. या वस्तुस्थितीकडे कुरआनने दुसऱ्या जागी सुद्धा विस्तारपूर्वक व काही जागा संक्षेपात लक्ष वेधले आहे. जर मनुष्याने शांत मनाने त्यावर विचार केला तर मानव जातीला तिची भिन्नता असून देखील एक मानण्यास बाध्य व्हावे लागेल.

संबंधित लेख

 • एका सदाचारी जीवनव्यवस्थेची गरज

  आपण सृष्टीव्यवस्थेकडे बारकाईने लक्ष दिले तर जरूर आपणास कळेल की संपूर्ण व्यवस्थेत सुनियोजितता आणि शिस्त आहे. एक अत्यंत उच्च दर्जाचे संतुलन आणि शिस्त सृष्टीव्यवस्थेत आपणास पाहवयास मिळते. कोणत्याच प्रकारची बेशिस्त आणि अव्यवस्था दिसून येत नाही. आणि कधीही त्यातील संतुलन बिघडले आहे असे दिसून येत नाही. समस्त मानवजातसुध्दा याच सृष्टीचा एक भाग आहे. या संबंधानुरूप व्हायला हेच पाहिजे होते की आणि ही संतुलित व्यवस्थेची निकड आहे की माणुसकीच्या परिघातसुध्दा तशाच प्रकारची शिस्तबध्दता आणि संतुलित व्यवस्था असावी.
 • इस्लाम आणि मनुष्य

  ज्यांना ज्यांना अल्लाहने इच्छा आकांक्षा आणि निवडीचे स्वातंत्र्य दिलेले आहे त्या निर्मितींपैकी मनुष्यसुध्दा एक आहे. तो फक्त त्यापैकी एक नाही तर त्यांच्यापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण अशी निर्मिती आहे. म्हणूनच मनुष्याला अल्लाहने दिव्य प्रकटन तथा दिव्य आदेश देऊन मार्गदर्शन केले आहे. दिव्य कुरआननुसार जेव्हा प्रथम मानवाला पृथ्वीवर अल्लाहने पाठविले त्यावेळी अल्लाहने आदेश दिला,
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]