Islam Darshan

नैतिक व्यवस्था

Published : Saturday, Feb 13, 2016

मनुष्याचे बाह्य आचरण हे अंतरंगाचे प्रतिबिंब असते. मनुष्याचा नैतिक दर्जा त्याच्या माणुसकी स्वभावावर परिणाम करतो. म्हणूनच आध्यात्मानंतर नैतिकतेला महत्त्व देण्यात आले आहे. मनुष्याच्या नैतिक आचरणाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. नैतिकव्यवस्था हा धर्माचा अर्क आहे. आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कथन आहे,

‘‘मला या धरतीवर यासाठी पाठविण्यात आले आहे की मानवतेचा आदर्श बनावे.’’ धर्मनिष्ठेचे दुसरे नाव नैतिक आचरण आहे.

याच कारणाने इस्लामने नैतिकतेविषयी तपशीलात जाऊन नैतिकतेवर अधिक भर दिला आहे. यासाठी इस्लामी समाजाचा स्वभाव विचारात घेणे आवश्यक आहे. इस्लामने चांगल्या व वाईट नीतीचे वर्गीकरण केले आहे का? काय त्यात परिस्थितीजन्य बदल अपेक्षित आहेत? या प्रश्नांची उत्तरे अगदी सहज देता येतील. इस्लाममध्ये नीतीबद्दलचे ध्येय-धोरण ठरविण्यासाठी मूलस्त्रोत अल्लाह आणि त्याचे प्रेषित मुहम्मद (स.) आहेत. हीच एक अशी उच्चतम शक्ती आहे जी प्रत्येक कृत्याचे नैतिक आणि अनैतिक अंग निश्चित करते. म्हणून हा प्रश्न इस्लाममध्ये उद्भवत नाही आणि हा कुणा व्यक्तीच्या बौध्दिकतेवर अथवा निर्णयावर अवलंबून मूळीच नाही. हे निर्विवाद सत्य आहे की काही प्रमाणात नीतीमत्ता समाजात सतत कार्यरत राहते. त्यामुळे नीतीमत्ता ही एकमेव इस्लामचेच वैशिष्ट्य नाही. इस्लामी नीतीमत्ता आणि इतर धर्मिय नीतीमत्ता असे वर्गीकरण करणे हास्यास्पद आहे. इस्लामने तर कोणतेच कृत्य या आधारावर चांगले किवा वाईट ठरविलेले नाही की लोक त्या कृत्याला फार कालावधीपासून चांगले म्हणत आले आहे. त्यामागे जनाधार आहे किवा मनुष्याच्या बौध्दिकतेवर अथवा अनुभवावर एखाद्या कृत्याला चांगले म्हणणे इस्लाम मान्य करीत नाही. इस्लाम एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय स्वतःच्या नीतीनियमांनीच करतो. म्हणूनच जास्त प्रमाणातील समाजमान्य नीतीनियम असे आहेत ज्यांना इस्लामने पूर्वीच मान्यता दिली आहे. परंतु असे काही नीतीनियम आहेत ज्यांना इस्लाम मान्यता देतो, परंतु इतरांजवळ त्याबद्दल वेगळी मते आहेत. तसेच काहींना इस्लाम वाईट ठरवतो. परंतु इतर त्यांना चांगले समजतात. इस्लामजवळ एक शाश्वत अशी प्रणाली आहे जी वाईट आणि चांगल्याबद्दल निर्णय घेते. म्हणूनच इस्लामी नीतीनियमांना आणि नैतिक व्यवस्थेला कायमस्वरुपी अधिष्ठान आहे. हे शाश्वत अधिष्ठान इस्लामच्या मौलिक तत्त्वांतून तयार झाले आहे. या मौलिक तत्त्वांवर परिस्थितीचा काहीएक परिणाम होऊ शकत नाही. सत्य आणि सदाचार हे नेहमीच उच्च स्थानी असतात. स्वतःला नुकसान होत असेल तरी निर्णय दिला जातो. शत्रुशी दिलेले वचनसुध्दा तोडण्याची परवानगी नाही. इस्लामी नैतिकतेला आचरणात आणण्यासाठी एक अंगभूत व्यवस्था सतत कार्यरत आहे. त्याला इस्लामी चारित्र्य म्हटले जाते. मौलिक महत्त्वाच्या इस्लामी नीतीनियमांचा आपण येथे आढावा घेऊ या. कुरआनोक्ती आहे,

‘‘उपकार कर ज्याप्रमाणे अल्लाहने तुझ्यावर उपकार केले आहेत. आणि जमिनीवर उपद्रव माजविण्याचा प्रयत्न करू नकोस. अल्लाहला उपद्रवी आवडत नाहीत.’’ (कुरआन २८: ७७)
‘‘जे राग गिळून टाकतात व दुसऱ्याचे अपराध माफ करतात असे सदाचारी लोक अल्लाहला अतिशय प्रिय आहेत.’’ (कुरआन ३:१३४)

‘‘खचितच अल्लाह प्रतिकार करतो त्या लोकांच्या बाजुने ज्यांनी श्रध्दा ठेवली आहे. निश्चितच अल्लाह कुणा अपहार करणाऱ्या कृतघ्नाला पसंत करीत नसतो.’’ (कुरआन २२: ३८)

‘‘नातेवाईकाला त्याचा हक्क द्या आणि गरीब व वाटसरूला त्याचा हक्क वायफळ खर्च करू नका. वायफळ खर्च करणारे सैतानाचे भाऊ आहेत.’’ (कुरआन १७: २६)

‘‘सत्कृत्यांचा आदेश दे. दुष्कृत्यांची सफाई कर, आणि जी काही आपत्ती येईल त्यावर संयम राख. या त्या गोष्टी आहेत ज्यांची ताकीद दिली गेली आहे, आणि लोकांशी तोंड फिरवून बोलू नकोस. पृथ्वीवर ऐटीत चालूदेखील नकोस, अल्लाह कोणत्याही अहंकारी व गर्व करणाऱ्या व्यक्तीला पसंत करीत नाही.’’ (कुरआन ३१:१७-१८)

‘‘विनाश आहे त्या प्रत्येक माणसासाठी ज्याला लोकांना टोमणे मारण्याची व (पाठीमागे) निदा करण्याची सवय आहे.’’ (कुरआन १०४: १)

याचप्रमाणे हदीसमध्येसुध्दा नीतीनियमांबद्दल विवेचन आहे.

आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘खरोखरच सत्यतेमुळे धर्मानिष्ठा येते व धर्म निष्ठेतून स्वर्ग प्राप्ती होते. आणि खोटारडेपणातून दुष्टपणा येतो आणि दुष्टपणा नरकाची वाट दाखवतो.’’ (बुखारी, मुस्लिम)

‘‘जरासा दिखाऊ पणासुध्दा श्रध्दाहीनतेकडे नेतो नव्हे श्रध्दाहीनता आहे.’’ (मिश्कात)

स्वतःचे क्रुरतेपासून रक्षण करा, कारण क्रुरता ही अंतिमदिनी वायुचक्रासारखी असेल. ज्याच्याजवळ चार दुर्गुण आहेत असा मनुष्य निश्चितपणे दांभिक असतो. जर कोणी त्यापैकी एखादा दुर्गुणाचा धनी असेल तर तो एक दुर्गुणी दांभिक ठरतो. ते चार दुर्गुण खालीलप्रमाणे आहेत,

(१) जो कोणी विश्वास घात करतो. त्याच्याकडे काही अमानत ठेवली असता तो नंतर नकार देतो. विश्वासघात करतो. (२) जो खोटे बोलतो. (३) जो कोणी दिलेले आश्वासन पाळत नाही. (४) जो भांडणात घाणेरडे शब्द आणि शिवीगाळ वापरतो.’’ (मुस्लिम)

‘‘नम्रता धारन करा, उध्दटपणा सोडून द्या आणि अपशब्द वापरु नका’’ (मुस्लिम)

‘‘पाठीमागे निदा करणारे स्वर्गापासून वंचित राहतील.’’ (मुस्लिम)

‘‘अल्लाह त्या लोकांवर कृपादृष्टी करणार नाही जे आपल्या सहकार्यांवर कृपादृष्टी करीत नाहीत.’’ (बुखारी)

‘‘फसवणारा, चिगुस (कृपण) आणि उपकार तोंडावर काढणारा स्वर्गात जाणार नाही.’’ (तिरमीजी)

या महत्त्वाच्या मूलभूत नीतीतत्त्वांचा अभ्यास केल्यानंतर विशेष प्रसंगासाठी इस्लामने ठरवून दिलेले नीतीनियम काय आहेत ते पाहू या.

१) मनुष्याचे प्रथम कार्यस्थळ त्याचे आपले घर आहे जेथे त्याला त्याच्या मुलाबाळांशी आणि बायकोशी संबंध येतो. प्रत्येकजण त्यांच्यासाठी त्याग करतो. इस्लामने याला फक्त आंतरिक ओढ म्हणून मान्यता दिली नाही तर धार्मिक कृत्य म्हणून सिध्द केले आहे. अल्लाह आदेश देत आहे,

‘‘त्यांच्याशी चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करा.’’ (कुरआन ४: १९)

आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे, ‘‘तुमच्यापैकी सर्वोकृष्ठ तो आहे जो आपल्या पत्नीशी चांगला आहे.’’ (तिरमीजी)

‘‘स्त्रियांसाठी हा उपदेश स्वीकारा, त्यांना चांगले वागवा.’’ (बुखारी, मुस्लिम)

२) मनुष्याच्या घरानंतर त्यांचे कुटुंब येते त्यात आईवडील, भाऊबहिणी आणि इतर जवळचे नातेवाईक येतात. आईवडिलांशी संबंध कसे असावेत या संदर्भात कुरआनोक्ती आहे, ‘‘आणि तुम्ही सर्वजण अल्लाहची भक्ती करा, त्याच्या समवेत कोणाला भागीदार बनवू नका, आईवडिलांशी नेक वर्तणूक ठेवा.’’ (कुरआन ४:३६)

‘‘तुझ्या पालनकर्त्याने निर्णय दिलेला आहे की तुम्ही लोकांनी इतर कोणाचीही भक्ती करू नये परंतु केवळ त्याची, आईवडिलांशी सद्वर्तन करा. जर तुमच्यापाशी त्यांच्यापैकी कोणी एक अथवा दोघे वृध्द होऊन राहिले तर त्यांच्यासाठी ‘ब्र’ शब्ददेखील काढू नका व त्यांना झिडकारून प्रत्युत्तरदेखील देऊ नका. तर त्यांच्याशी आदरपूर्वक बोला आणि नरमी व दयाद्रतेने त्यांच्यासमोर नमून राहा. आणि प्रार्थना करीत जा की, ‘‘हे पालनकर्त्या, यांच्यावर दया कर ज्याप्रमाणे यांनी दया व वात्सल्याने अर्भकावस्थेत माझे संगोपन केले.’’ (कुरआन १७: २३:२४)

आईवडिलांच्या संदर्भात प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे,

‘‘तुमचे आईवडील हे तुमचे स्वर्ग व नरक आहेत.’’ (इब्ने माजा)

‘‘सदाचारी मुलं आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांवर प्रेमाची एक दृष्टी टाकते ती एका मान्यताप्राप्त हजसारखी आहे.’’

आईवडील मुस्लिमेतर असतील अथवा इस्लामचे शत्रु असतील तरी त्यांचे हक्क आणि सेवा त्या मुस्लिम मुलांवर बंधनकारक आहे. कुरआनोक्ती आहे,

‘‘जर तुमच्यापाशी त्यांच्यापैकी (आईवडीलांपैकी) कोणी एक अथवा दोघे वृध्द होऊन राहिले तर त्यांच्याशी ‘ब्र’ शब्दसुध्दा बोलू नका. व त्यांना झिडकावून प्रत्त्युत्तरदेखील देऊ नका तर त्यांच्याशी आदरपूर्वक बोला.’’ (कुरआन १७: २३)

इतर नातेवाईकांसंबंधी चांगली वर्तणूक करण्यासाठी कुरआनमध्ये अल्लाहने आदेश दिलेले आहेत. वरील जे आदेश आईवडिलांसाठी आले आहे त्यानंतर त्वरित त्याच संकेतवचनात (आयत) पुढे अल्लाहने आदेश दिला आहे,

‘‘नातेवाईकाला त्याचा हक्क द्या आणि गरीब व वाटसरुला त्याचा हक्क’’ (कुरआन १७: २५)

‘‘आणि तुम्ही सर्वजण अल्लाहची भक्ती करा, त्याच्या समवेत कोणाला भागीदार बनवू नका, आईवडिलांशी नेक वर्तणूक ठेवा, नातेवाईक आणि अनाथ व गोरगरिबांशी चांगला व्यवहार करा.’’ (कुरआन ४: ३६)

अल्लाहच्या या आदेशावरून हेच सिध्द होते की तुमचे मातापिता जसे तुम्हाला जवळचे आहेत तुम्ही त्यांच्याशी नेक वर्तणूक ठेवा. तसेच नातेवाईकातसुध्दा जवळीक पाहून त्यांच्याशी तसा व्यवहार करा.

‘‘तुमच्यावर पहिला हक्क तुमच्या मातेचा नंतर पिता आणि त्यानंतर जवळच्या नातेवाईकांचा आहे.’’ (बुखारी)

एका मुस्लिमाने आपल्या नातेवाईकांशी या तत्त्वानुसार संबंध ठेवणे आणि हक्क अदा करणे आवश्यक आहे. नातेवाईकांशी सद्वर्तन याला ‘सिलारहमी’ म्हटले जाते. याचा अर्थ रक्ताच्या संबंधांना आबाधित ठेवणे. कुरआन या सद्वर्तनाला (सिला रहमी) माणुसकीचा पाया समजतो. आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सद्वर्तनांला (सिला रहमी) श्रध्दाशीलतेची एक गरज म्हणून, एक आवश्यक बाब म्हणून ठरविले आहे.

‘‘जो कोणी अल्लाहवर आणि पारलौकिक जीवनावर श्रध्दा ठेवतो त्याने आपल्या नातेवाईकांशी नेक वर्तणूक ठेवणे आवश्यक आहे.’’ (बुखारी)

‘‘जो कोणी रक्ताचे नातेसंबंध तोडतो तो स्वर्गात प्रवेश करु शकणार नाही.’’ (बुखारी)

३) कुटुंबानंतर शेजारी येतात. मुस्लिमांनी आपल्या शेजाऱ्यांशी कसे संबंध ठेवावेत याबद्दल खालील हदीस आपण पाहू या प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात,

‘‘जिब्रईल (अ.) यांनी पुन्हा पुन्हा मला शेजाऱ्यांच्या हक्कांबद्दल उपदेश केला आहे. मी विचार करु लागलो की माझा शेजारी माझा वारस आहे!’’ (बुखारी)

‘‘तो मनुष्य ज्याचा शेजारी त्याच्या अत्याचारांमुळे त्रस्त आहे असा मनुष्य (अत्याचारी) स्वर्गात प्रवेश करू शकणार नाही.’’ (मुस्लिम)

४) शेजाऱ्यानंतर विशाल क्षेत्र असलेला समाज आहे यात अनेक प्रकारच्या लोकांशी त्याला व्यवहार करावा लागतो. त्यांच्याशी कशा प्रकारची वर्तणूक करावी? याबद्दल कुरआन आपणास मार्गदर्शन करीत आहे,

‘‘आणि तुम्ही सर्वजण अल्लाहची भक्ती करा, त्याच्या समवेत कोणाला भागीदार बनवू नका, आईवडिलांशी नेक वर्तणूक ठेवा, नातेवाईक आणि अनाथ व गोरगरिबांशी चांगला व्यवहार करा आणि आप्त शेजारी, अनोळखी शेजारी, तोंडओळख असणारा साथीदार व वाटसरू आणि त्या दासी व दास जे तुमच्या ताब्यात असतील, त्यांच्याशी उपकाराचे व्यवहार करा.’’ (कुरआन ४:३६-३७)

वरील आयतीमध्ये समाजातील सर्व प्रकारच्या संबंधांना नमूद केले आहे. त्यासाठी सर्वसमावेशक ‘‘नेक वर्तणूक ठेवा’’ हा उपदेश करण्यात आला आहे.

५) सामाजिक जीवनानंतर राजकीय जीवनाचा संबंध येतो. इस्लामी समाजात व्यक्तीच्या स्थानाला सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून पूर्वनिश्चित केले आहे. म्हणजे प्रत्येकाची स्थिती अशी निश्चित केली आहे की त्यांने आदेश द्यावा किवा आदेश पाळावा. तो शासित अथवा शासक असतो. त्याने आपल्या सहकार्यांशी कशे वागावे या बद्दल प्रेषित (स.) खुलासा करतांना म्हणतात की -

‘‘ज्या व्यक्तीवर मुस्लिम समाजाचे नेतृत्व दिले गेले आहे परंतु तो मुस्लिमांसाठी कठीण परिश्रम उचलत नाही आणि त्यांच्या भल्याचेसुध्दा पाहत नाही तर अशी व्यक्ती स्वर्गात प्रवेश करू शकणार नाही.’’ (मुस्लिम)

प्रजेने आपल्या राजाबरोबर कसे वागावे याबद्दल खुलासा करताना प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात,

‘‘धर्म म्हणजे प्रामाणिकपणा आणि निष्ठा, त्यांना विचारण्यात आले कुणाची निष्ठा आणि कुणाशी प्रामाणिकपणा? त्यांनी उत्तर दिले की अल्लाहशी प्रामाणिकपणा, प्रेषित (स.) यांच्याशी प्रामाणिकपणा आणि मुस्लिमांच्या प्रमुखांशी प्रामाणिकपणा आणि सर्व मुस्लिमांशी प्रामाणिकपणा.’’ (मुस्लिम)

अशा प्रकारे अल्लाहवर निष्ठा आणि त्याचे भय ही आवश्यक अट आहे राजाने प्रजेशी व्यवहार करताना आणि प्रजेने राजाशी व्यवहार करताना.

६) सर्वांत शेवटी मुस्लिमेतरांशी कसे संबंध प्रस्थापित करावेत याबद्दलच्या नीतीनियमांचा खुलासा आला आहे. मुस्लिमेतरांशी कसे वागावे याबद्दल कुरआनोक्ती आहे,

‘‘हे श्रध्दावंतानो! अल्लाहसाठी सत्यावर अटळ राहणारे व न्यायाची ग्वाही देणारे बना-एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा. हे ईशपरायणतेशी अधिक निकटवर्ती आहे.’’ (कुरआन ५:८-९)

अशा प्रकारे इस्लाम मनुष्याच्या नैतिक जीवनाचा आधार मूलतत्त्वांच्या भक्कम आधारांवर ठेवतो. मुस्लिम जीवनव्यवहाराचा प्रत्येक अंग अनिवार्य अशा नीतीनियमांनी बांधलेला आहे.

संबंधित लेख

  • एका महान क्रांतीची सत्यकथा

    आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची जीवनचर्या काही दंतकथा नाही, तसेच केवळ एखाद्या व्यक्तीची व्यक्तिगत कथादेखील नाही, तर ती एका अशा महान आणि पावन क्रांतीची सत्यगाथा आहे की, तिचे उदाहरण इतिहासात मिळणे अशक्यप्राय आहे. या सत्यगाथेचे मूळ पात्र प्रेषित मुहम्मद(स) यांचे व्यक्तिमत्व होय. या सत्यगाथेतील इतर सहयोगी पात्र हे माननीय अबू बकर(र), उमर(र), हमजा(र), बिलाल, यासिर(र), उस्मान(र), सन्माननीय खदीजा(र) व आयशा(र) असो किवा विरोधी पात्र हे अबू लहब व त्याची पत्नी असो किवा कच्चे काळिज चावून खाणारी हिदा असो, या पात्रांवरुन सहयोग आणि संघर्षाच्या परिणामस्वरुपी इतिहासाचा तो सोनेरी अध्याय लिहिला गेला, ज्याच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत प्रेषित मुहम्मद(स) यांच्या पवित्र जीवन चरित्राचे व इस्लामास्तव आपले सर्वस्व त्यागणार्या सोबत्यांचे प्रतिबिब दिसते.
  • कुटुंब संस्थेचा नाश

    स्त्रीचे मूळ जीवनकार्य, मानववंशाची वाढ करणे आहे, असा इस्लामी दृष्टिकोन आहे. म्हणून स्त्रीने घराबाहेर पडणे इस्लामला पसंत नाही. काही असाधारण अथवा तात्पुरत्या निकडीच्या परिस्थितीखेरीज शेतात व कारखान्यात जाऊन कामे करत हिडण्याची परवानगी देत नाही. घरात कोणीही पुरुष, पती, बाप किवा भाऊ अगर इतर नातेवाईक, कुटुंबातच नसतील जे तिचा भार वाहू शकतील, अशाच वेळी ती कामाकरिता किवा मजुरीकरिता घराबाहेर पडू शकते. याच्या उलट कम्युनिझम पुरुषाप्रमाणे कारखान्यात व शेतात कामे करण्याची स्त्रियांवर सक्ती करतो.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]