Islam Darshan

दीन / जीवनधर्म व शरिअत

Published : Friday, Feb 12, 2016

‘शरिअत’ म्हणजे काय व शरिअत आणि ‘दीन’ मध्ये काय फरक आहे?

दीन (जीवनधर्म) व शरिअत
इस्लाम धर्मानुसार तुम्ही अल्लाहच्या अस्तित्वावर व त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर श्रद्धा बाळगावी, तसेच पारलौकिक जीवनात या जगातील सत्कर्माबद्दल मिळणारे इनाम व दुष्कर्माबद्दल मिळणारी शिक्षा या गोष्टीवर अल्लाहच्या सच्चा प्रेषितांनी जी शिकवण दिलेली आहे त्यानुसार तुम्ही ईमान धारण करावे. ईशग्रंथांना मान्य करून आपल्या स्वैर आवडीच्या व पसंतीच्या मार्गाचा परित्याग करावा. या ग्रंथांमध्ये जो मार्ग दाखवून देण्यात आला आहे त्या मार्गाचाच अवलंब करा. अल्लाहच्या प्रेषितांचेच अनुयायीत्व करा व इतर सर्व गोष्टी सोडून त्यांच्याच आज्ञांचे पालन करा. ‘इबादत’ (उपासना) मध्ये अल्लाहखेरीज इतर कोणाचाही समावेश करु नका. त्याच ‘ईमान’ व ‘इबादत’ चे नाव ‘दीन’ असे आहे. हे सर्व प्रेषितांच्या शिकवणीत समाविष्ट आहे.

यानंतर शरिअत (धर्मशास्त्र) म्हणजे काय हे पाहू या. शरिअत (धर्मशास्त्र) म्हणजे उपासना करण्याच्या पद्धती, सामाजिक नियम व कायदे, ‘हराम’ (निषिद्ध) व ‘हलाल’ (वैध) इ. तसेच धर्मसंमत व धर्मअसंमत यांच्या मर्यादा वगैरे. या विविध बाबींसाठी सर्वश्रेष्ठ अल्लाहने भिन्नभिन्न काळांत भिन्नभिन्न जातीवंशाच्या व जनसमूहांच्या अवस्थांनुसार आपल्या प्रेषितांकरवी वेगवेगळ्या शरिअत-पद्धती पाठविल्या होत्या, जेणेकरून प्रेषितांनी प्रत्येक जातीवंशाला नीती व सभ्यतेची, संस्कृतीची वेगवेगळी शिकवण देऊन त्यांना एका विशाल कायद्याच्या पालनासाठी तयार करीत राहावे. जेव्हा हे कार्य पूर्ण झाले तेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांना तो विशाल कायदा देऊन पाठविले. त्या विशाल कायद्याची एकूण कलमे व तरतूदी सर्व विश्वासाठी आहेत. आता ‘दीन’ तर तोच आहे जो आधीच्या प्रेषितांनी शिकविला होता. परंतु मागील सर्व ‘शरिअत-पद्धती’ मात्र रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या ठिकाणी अशी ‘शरिअत’ प्रस्थापित केली गेली आहे ज्यामध्ये समस्त मानवजातीसाठी उपासनांच्या पद्धती, सामाजिक नियम, आपापसातील व परस्परातील संबंधाचे व व्यवहाराचे नियम, ‘हराम’ व ‘हलाल’ यांच्या मर्यादा, सर्वांना सारख्या लागू आहेत.

शरिअतच्या आज्ञा जाणून घेण्याची साधने

अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या शरिअतचे नियम व आदेश जाणण्यासाठी आपल्याकडे दोन साधने आहेत. पवित्र ‘कुरआन’ व ‘हदीस’ ही ती साधने होत.

पवित्र ‘कुरआन’ हा ईशग्रंथ आहे व त्यातील प्रत्येक शब्द अल्लाहकडून आहे हे तर तुम्ही जाणताच. प्रश्न उरला हदीसचा, हदीस म्हणजे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या उक्ती व कृतीबद्दलची माहिती आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे संपूर्ण जीवन म्हणजे ‘कुरआन’ चे प्रत्यक्ष आचरणाने घडविलेले स्पष्टीकरण आहे. प्रेषित्वाच्या प्राप्तीनंतर सतत तेवीस वर्षांच्या कालावधीपर्यंत ते सदैव शिकवण व उपदेश, मार्गदर्शनाच्या कार्यात मग्न असत. आपल्या वाणीने व आचरणाने ते लोकांना हे दाखवून देत असत की, अल्लाहच्या मर्जीनुसार जीवन व्यतीत करण्याची पद्धत कोणती आहे. त्यांच्या अत्यंत प्रभावी जीवनकालात त्यांचे (सहाबी) साथीदार पुरुष व साथीदार स्त्रिया, त्यांचे आप्तेष्ट, तसेच त्यांच्या पत्नी ही सर्व मंडळी प्रेषित मुहम्मद (स.) यांची प्रत्येक उक्ती लक्ष देऊन ऐकत असत, प्रत्येक कृत्याचे लक्षपूर्वक निरीक्षण करीत असत, तसेच त्यांना वेळोवेळी सामोऱ्या येणाऱ्या व्यावहारिक समस्यांबद्दल ते प्रेषिताकडून शरिअतच्या आदेशाची मागणी करत असत. प्रेषित मुहम्मद (स.) कधी सांगत असत की अमुक काम करु नका व जे लोक त्या वेळी हजर असत ते ही उक्ती ऐकून घेऊन स्मरणात ठेवीत असत. त्याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद (स.) एखादे कृत्य काही विशिष्ट पद्धतीने करीत असत आणि तसे करताना त्यांना प्रत्यक्ष पाहणारे लोक ती विशिष्ठ पद्धत लक्षात ठेवीत असत. ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले नाही अशा लोकांना ते तंतोतंत वर्णन करुन सांगत असत. तसेच प्रेषितांच्या समक्ष कधी एखादा मनुष्य एखादे कृत्य करी तेव्हा प्रेषित कधी स्तब्ध राहात अगर त्याबद्दल आपली पसंती वा नापसंती व्यक्त करीत असत. हे सर्व हजर असणारे लोक आपल्या स्मृतीत जतन करून ठेवीत असत. असे जे काही प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सोबती व साथीदार स्त्री पुरुषांनी ऐकले, काहींनी ते पाठांतराने मुखोद्गत करुन टाकले, काहींनी लिखाण करून त्यांच्या नोंदी करून ठेवल्या आणि ती माहिती कोणाकडून मिळाली यांचीही नोंद ठेवली, या सर्व रिवायतींना (निवेदनांना) पुढे पुढे एकत्रीकरण करुन त्यांना पुस्तकी स्वरुप देण्यात आले. अशाप्रकारे ‘हदीस’ चा एक मोठा संग्रह उपलब्ध झाला. हदीसचा संग्रह करणाऱ्यात प्रामुख्याने इमाम मालिक (रह.), इमाम बुखारी (रह.), इमाम मुस्लिम (रह.), इमाम तिरमिजी (रह.), इमाम अबू दाऊद (रह.), इमाम निसाई (रह.), इमाम इब्ने माजा (रह.) यांनी संग्रह केलेले ग्रंथ अधिक प्रमाणित मानले जातात.

‘फिकाह’ नियमावली

कुरआन व हदीस यातील सर्व आदेशांचा अभ्यास व अध्ययन करुन काही इस्लाम धर्मश्रेष्ठींनी सामान्य माणसांना सोयीस्कर होईल अशा रितीने खुलासेवार नियमावली तयार केली असून त्या नियमांना ‘‘फिकाह’’ असे म्हणतात. प्रत्येक मनुष्य कुरआनमधील सर्व बारकावे नीट समजू शकत नाही, तसे माणसाला हदीसचेही इतके ज्ञान प्राप्त नसते की त्याने स्वतःच शरिअतचे आदेश जाणून घ्यावे. म्हणून ज्या धर्मश्रेष्ठींनी वर्षानुवर्षे अध्ययन व संशोधन करून जो ‘फिकाह’ संकलित करून ठेवला आहे, त्यांच्या उपकाराचे ऋण जगातील मुस्लिम कधीही फेडू शकत नाहीत.

आज जगातील कोट्यवधी मुस्लिम कसल्याही श्रमाविना शरिअतच्या नियमाचे पालन करीत आहेत. तसेच ईश्वराचे व प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आदेश जाणणे कोणालाही अवघड वाटत नाही. हे त्या धर्मश्रेष्ठींनी घेतलेल्या खडतर परिश्रमाचेच फळ आहे.

आरंभीच्या काळात अनेक धर्मश्रेष्ठींनी ‘फिकाह’ चे संकलन आपापल्या पद्धतीने करून ठेवले होते, परंतु पुढे फक्त चार फिकाहच अखेरीस उरले व जगातील मुस्लिम सर्वाधिक त्यांचेच आज्ञापालन करीत आहेत. त्या चार ‘फिकाह’ खालीलप्रमाणे आहेत.

(१) इमाम अबू हनीफा (रह.) यांची फिकाह. या फिकाहचे संकलन करण्यात इमाम अबू युसूफ (रह.), इमाम मुहम्मद (रह.), इमाम जाफर (रह.) व तसे आणखी काही श्रेष्ठ धर्मपंडितांचा सल्ला समाविष्ट होता. याला ‘फिकाह हनफी’ असे नाव आहे.

(२) इमाम मालिक (रह.) ची फिकाह. ही फिकाह ‘मालिकी’ या नावाने प्रसिद्ध आहे.

(३) इमाम शाफई (रह.) ची फिकाह. याला ‘फिकाह शाफई’ असे म्हणतात.

(४) इमाम अहमद बिन हम्बल (रह.) ची फिकाह. याला फिकाह ‘हम्बली’ असे म्हटले जाते.

या चारही नियमावली (फिकाह चे संकलन) प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या निधनानंतर २०० वर्षांच्या कालावधीच्या आत संकलित झालेले आहेत. या चार फिकहमध्ये जे काही भेद आहेत ते अगदी स्वाभाविक फरक आहेत. एखादी घटना अथवा एखादा व्यवहार याची काही वेगवेगळे लोक जेव्हा सखोल चौकशी करतात किंवा एखादी गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या चौकशीच्या निष्कर्षात व त्यांच्या संकलित माहितीत थोडीफार तफावत अवश्य असतेच. परंतु वरील चारही धर्मश्रेष्ठी सद्हेतु धारण करणारे व मुस्लिमांचे हितचिंतक होते. म्हणून सर्व मुस्लिम या चारीही धर्मश्रेष्ठींना सत्याधिष्ठित मानतात.

अर्थातच आपल्या सर्व जीवनव्यवहारांसंबधी कोणतीही एकच फिकाह पद्धत अवलंबली जाऊ शकते. चार विविध पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकत नाही; ही गोष्ट उघड आहे. म्हणून बहुतेक इस्लामी धर्मपंडितांचे असे मत आहे की मुस्लिमांनी या चार फिकाहपैकी कोणत्याही एकाचाच अवलंब करणे अगत्याचे आहे. याशिवाय इस्लाम धर्मपंडितांचा एक समूह असा आहे ज्याच्या म्हणण्यानुसार कोणत्याही एका विशिष्ट नियमावलीचा अवलंब करणे आवश्यक नाही, ज्ञान व माहिती असणाऱ्या प्रत्येक माणसाला ‘कुरआन’ व ‘हदीस’ मधून थेट आदेश प्राप्त करुन घ्यावयास हवे. जे विद्येपासून वंचित आहेत त्यांनी ज्या धर्मपंडितावर त्यांची श्रद्धा असेल त्याचे अनुकरण करावे. त्यांना ‘‘अहले हदीस’’ असे संबोधिले जाते. वरील चार समूहाप्रमाणे हा पाचवा समूहसुद्धा सत्त्याधिष्ठित आहे.

(१) मान. इमाम अबु हनीफा (रह.) ८० हि. (इ.स. ६९९) जन्माला आले. मृत्यू १७१ हि (इ.स. ७६७) मध्ये झाला. या फिकाहचे अनुयायी तुर्कस्तान, पाकिस्तान, भारत, अफगाणिस्तान, इंडोचीन रशिया इ. मध्ये आहेत.

(२) मान. इमाम मालिक अनस - जन्म ९३ हि (इ.स.७१४), मृत्यू १७१ हि (इ.स.७९८). या फिकहचे मानणारे मॉरिशस अहजेरिया, सुडान, ट्युनिशिया, कुवेत व बहरीनमध्ये आहेत.

(३) मा. इमाम इदरीस बिन शाफई (रह.) जन्म १५० हि (इ.स. ७६७), मृत्यू २४० हि (इ.स.८५४). यांचे अनुयायी पॅलेस्टाईन, लेबेनान, इजिप्त, इराक, सऊदी, अरब, यमन व इंडोनिशियामध्ये आहेत.

(४) मा. इमाम अहमद बीन हम्बल (रह.) जन्म १६४ हि (इ.स. ७८०), मृत्यू २४१ हि. (इ.स. ८५५). यांचे अनुयायी अधिकांश सऊदी अरब, लेबेनान व सीरियामध्ये आहेत.

‘तसव्वुफ’ (आत्मशुद्धी)

फिकाहचा संबंध माणसाच्या दर्शनी कृतीशी आहे. फिकाह फक्त इतकेच पाहत असते की, तुम्हाला जसा व ज्या प्रकारे आदेश दिला गेला आहे, तो तुम्ही पार पाडला आहे किंवा नाही. जर तुम्ही तो आदेश पार पाडला असेल तर तुमच्या अंतःकरणाच्या स्थितीशी फिकाहला काही कर्तव्य नाही. मनाच्या स्थितीशी संबंध असणाऱ्या गोष्टीला ‘तसव्वुफ’(१) असे नाव आहे. उदाहरणार्थ तुम्ही नमाज पढता, या उपासनेत फिकाह केवळ इतकेच पाहतो की तुम्ही वजू नीट केला आहे किंवा नाही, काबागृहाकडे तोंड करून उभे आहात की नाही, नमाजचे सर्व अनिवार्य विधी केले किंवा नाही, नमाजमध्ये ज्या सूत्राचे पठन करावे लागते ते तुम्ही केले किंवा नाही. ज्या समयी जितकी ‘रकाआत’ नमाज ठरलेली आहे अगदी त्याच वेळी तुम्ही तितकीच नमाज अदा केली आहे किंवा नाही. इतके सर्व तुम्ही पूर्ण केले तर फिकाहच्या दृष्टीने तुमची नमाज पूर्ण झाली. परंतु उपासना करताना तुमच्या अंतःकरणाची स्थिती काय होती, तुमच्या मनाची एकाग्रता ईश्वराकडे होती किंवा नाही, तुमचे मन या जगातील विचारापासून निर्मळ होते किंवा नाही. नमाजमुळे तुमच्या मनात ईशभय, ईश्वराचे सर्वज्ञानी व सर्वव्यापी असण्यावरील विश्वास व केवळ ईश प्रसन्नता प्राप्त करण्याची भावना निर्माण झाली किंवा नाही. या नमाजमुळे तुमची आत्मशुद्धी किती प्रमाणात झाली. तुमचे चारित्र्य कितपत सुधारले, नमाजने तुम्हाला किती प्रमाणात सच्चा व पक्का कृतीशील मुस्लिम बनवून सोडले, वरील सर्व बाबींचा तसव्वुफ उहापोह करतो.

१) कुरआनमध्ये यालाच ‘तझकिया’ (आत्मशुद्धी व ‘हिकमत’) असे म्हटले आहे. हदीसमध्ये याला ‘एहसान’ असे संबोधले गेले आहे व नंतरच्या लोकांत हीच गोष्ट ‘तसव्वुफ’ या नावाने सुप्रसिद्ध झाली.
नमाजच्या मूळ हेतूशी संबंध असणाऱ्या या सर्व बाबी जितक्या अधिकाधिक प्रमाणात तुमच्यात निर्माण होतील तितक्याच प्रमाणात तुमची नमाज ‘तसव्वुफ’च्या दृष्टीने अधिक परिपूर्ण होईल. या गोष्टींची जितक्या प्रमाणात तुमच्यात उणीव असेल तितक्याच प्रमाणात ‘तसव्वुफ’ तुमची नमाज दोषयुक्त ठरवील. याच तऱ्हेने ‘शरिअत’ चे जे काही आदेश ज्या स्वरुपात दिले गेले होते त्याच स्वरुपात तुम्ही त्यांचे पालन केले आहे किंवा नाही; फिकाह एवढेच पाहते. तर या आदेशांचे पालन करताना तुमच्या अंतःकरणात निष्ठा, प्रामाणिकपणा, सद्भाव व खरा आज्ञाधारकपणा किती प्रमाणात होता. या बाबींची चिकित्सा ‘तसव्वुफ’ करतो.
या दोहोंमधील फरक खालील उदाहरणावरुन अधिक स्पष्टपणे कळू सकतो. तुम्हाला जेव्हा एखादा मनुष्य भेटतो तेव्हा तुम्ही दोन दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहता. एक म्हणजे तो शारीरिकपणे सुदृढ व निकोप प्रकृतीचा आहे किंवा नाही. तो आंधळा, लंगडा, पांगळा तर नाही? देखणा आहे की कुरुप, कपडे नीटनेटके व स्वच्छ आहेत की घाणेरडा आहे. तुमचा दुसरा दृष्टिकोन असा असेल की त्याचे चारित्र्य कशा प्रकारचे आहे? त्याच्या सवयी व गुणवैशिष्ठ्ये कशी आहेत. त्याची बुद्धिमत्ता व व्यवहारी ज्ञान कसे आहे, तो विद्वान आहे की अडाणी, सदाचारी आहे की दुराचारी? वरील पहिला दृष्टिकोन फिकाहचा आहे तर दुसरा दृष्टिकोन तसव्वुफचा आहे.
मैत्रीखातर जेव्हा तुम्हाला एखादा मनुष्य निवडायचा असेल तेव्हा त्याचे व्यक्तीमत्त्व तुम्ही या दोन्ही दृष्टिकोनांतून पडताळून पाहाल. त्याचे अंतरंग तसेच बाह्यरूप चांगले असावे अशीच तुमची इच्छा असेल. त्याचप्रमाणे शरिअतच्या आदेशांचे पालन बाह्यत्कारी व दर्शनी दृष्टीनेही अचूक असावे व मानसिक दृष्टिकोनाने ते निकोप असावे. अशाच प्रकारचे जीवन इस्लाममध्येही अधिक पसंत आहे. ज्याचे बाह्यत्कारी आज्ञापालन बरोबर आहे, परंतु अंतःकरणात जर आज्ञाधारकत्व नसेल तर त्याच्या कर्माची उपमा एका देखण्या परंतु मृत माणसासारखी आहे. तसेच ज्या माणसाच्या कर्मात आंतरिक सर्व गुण आहेत, परंतु त्याची दर्शनी कृती अचूक नसेल तर त्याला एखाद्या सभ्य व सदाचारी पण अत्यंत कुरुप व दिसावयास ओंगळ अशा माणसाची उपमा देता येईल.
या उदाहरणावरून तुम्हाला ‘फिकाह’ व ‘तसव्वुफ’ यांचा परस्पर संबंधही लक्षात आला असेल. परंतु खेदाची गोष्ट अशी की नंतरच्या काळात विद्येची व चारित्र्याची अधोगती झाली. त्यात अनेक दोष निर्माण झाले. तसेच ‘तसव्वुफ’ चा निर्मळ झराही गढूळ झाला. मार्ग चुकलेल्यांकडून मुस्लिमांनी, नाना प्रकारची बिगरइस्लामी तत्त्वे शिकून व त्यांना ‘तसव्वुफ’ च्या नावाखाली इस्लाममध्ये समाविष्ट करून टाकले. अनेक प्रकारच्या चमत्कारिक व विलक्षण श्रद्धा व पद्धतींना ‘तसव्वुफ’ ची लेबले चिकटवली गेली. त्यांना ‘कुरआन’ व ‘हदीस’मध्ये कसलेही स्थान नाही. नंतर या प्रवृत्तीच्या लोकांनी हळूहळू स्वतःला शरिअतच्या बंधनातूनही विमुक्त करून घेतले. तसव्वुफच्या शरिअतशी कसलाही संबंध नाही व हा मार्गच वेगळा आहे असे ते म्हणतात. सुफी माणसाला कायदा व नियमांचे बंधन पाळण्याचे कसले कर्तव्य आहे? अशा तऱ्हेचे विचार बहुतेक अडाणी सुफींच्या तोंडून ऐकावयास मिळतात. परंतु वास्तवात हे अगदी चूक आहे. शरिअतमधील आदेशाशी कसलाही संबंध नसलेला तसव्वुफ इस्लाममध्ये असण्यास वाव नाही. नमाज, रोजे, जकात व हजच्या बंधनातून मुक्त होण्याचा कोणाही सुफीचा हक्क नाही. जे सामाजिक नियम, आर्थिक नियम, आचार व व्यवहार, हक्क व कर्तव्ये, हलाल व हराम यांच्या मर्यादा अल्लाहने व त्याचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दाखवून दिले आहेत त्या नियमांविरुद्ध आचरण करण्याचे कोणत्याही सुफी माणसाला हक्क प्राप्त होत नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे खरेखुरे अनुयायीत्व न करणाऱ्या व त्यांनी ठरवून दिलेल्या पद्धतीचे पालन न करणारा माणूस हा मुस्लिम सुफी म्हणवून घेण्यासच पात्र नाही. खरेतर तसव्वुफ हे अल्लाह व त्याचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावरील गाढ प्रेम व आसक्तीचेंच नाव आहे. हे गाढ प्रेम तर अशी निकडीची मागणी करते की माणसाने अल्लाहच्या व त्याच्या प्रेषिताच्या आज्ञांचे पालन करण्यात तसूभरही कसूर करता कामा नये. म्हणून शरिअतपासून वेगळी अशी इस्लामी तसव्वुफ नामक कसलीही गोष्ट नाही. उलट शरिअतचे आदेश अत्यंत निष्ठापूर्वक व सद्भावनेने पाळणे तसेच आज्ञापालनात अल्लाहचे प्रेम व अल्लाहचे भय ओतप्रोत भरून टाकणे; याचेच नाव तसव्वुफ आहे.

संबंधित लेख

  • वर्तमान काळातील अपराध : महिलांवरील अत्याचार

    ‘मुले म्हणजे देवाघरची फुले!‘ असे आपण म्हणतो, ऐकतो. असो! मात्र अत्याचारांनी अंतिम कळस गाठलेला दिसतो. लहान-लहान आणि कोवळी मुलेसुद्धा या अमानुष अत्याचारांना बळी पडली. अल्पवयीन मुला-मुलींवर भयानक प्रकारचे लैंगिक अत्याचार होत असल्याचे आताच आपण पाहिले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालानुसार, जगातील अत्यंत प्रगत आणि न्याय, स्वातंत्र्याच्या गप्पा मारणार्या खुद्द अमेरिकेत तीन लाख अल्पवयीन मुली वेश्या व्यवसाय करीत आहेत. या अल्पवयीन मुलींपैकी बर्याच मुली अगदी १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत.
  • पारलौकिक जीवनावर (आखिरत) ईमान (दृढ श्रद्धा)

    प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईमान धारण करण्यासाठी ज्या शिकवणी दिल्या, त्यापैकी पाचवी शिकवण म्हणजे पारलौकिक जीवनावरील दृढ श्रद्धा होय. पारलौकिक जीवनासंबंधी ज्या गोष्टीवर श्रद्धा बाळगणे अगत्याचे आहे, त्या खालीलप्रमाणे, १. एके दिवशी अल्लाह सर्व ब्रह्मांडाला व त्याने निर्मिलेल्या एकूण प्राणीमात्राला व वस्तूमात्राला नष्ट करून टाकील. त्या दिवसाला ‘कयामत’ (प्रलयकाळ) असे नाव आहे. २. नंतर तो सर्वांना पुन्हा जिवंत करून दुसरे जीवन प्रदान करील. सर्वजण एके ठिकाणी ईश्वरासमोर आणले जातील. त्या दिवसाला ‘हश्र’ असे नाव आहे. ३. प्रत्येक माणसाने या जगातील जीवनात केलेल्या एकूण कर्माची नोंद असलेले दप्तर (अभिलेख) ईशन्यायालयात सादर केले जाईल. ४. ईश्वर प्रत्येक माणसाच्या पाप-पुण्याचे तंतोतंत मूल्यमापन करील. ईशतराजूत ज्याचे पुण्यकर्माचे पारडे पापकृत्याच्या पारड्यापेक्षा अधिक जड असेल त्याला क्षमा केली जाईल. उलट ज्याचे पापकृत्याचे पारडे, अधिक जड असेल त्याला शिक्षा होईल. ५. जे क्षमेस पात्र ठरतील, ते जन्नत (स्वर्ग लोक) मध्ये प्रवेश करतील व जे शिक्षेस पात्र ठरतील त्यांना ‘जहन्नम’ (नरकाग्नी) मध्ये झोकून दिले जाईल.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]