Islam Darshan

शरिअतचे आदेश

Published : Friday, Feb 12, 2016

इस्लामी शरिअत मानवी जीवनाला कशा प्रकारे एका सर्वोत्तम शिस्तबद्धतेचा पाईक बनविते, तसेच त्या शिस्तबद्धतेत किती लाभकारक गोष्टींचा व तत्त्वदर्शितेचा समावेश आहे हे आपणास कळून येईल.
शरिअतची तत्त्वे
तुम्ही स्वतःच्या स्थितीचे चिंतन केले तर तुम्हाला असे कळून चुकेल की या भूतलावर येताना तुम्ही अनेक प्रकारच्या शक्ती जन्मतःच घेऊन आलेले आहात. प्रत्येक प्रकारची शक्ती व क्षमतेची अशी हाक आहे की तिचा यथोचित वापर केला जावा. तुम्हाला बुद्धी आहे, निश्चयशक्ती आहे. इच्छा-आकांक्षा आहे, दृष्टीं, श्रवणशक्ती, चव, स्पर्शज्ञान इत्यादी पंचेंद्रियांची शक्ती, क्षमता आहेत. हातापायात बळ आहे, तिरस्कार व क्रोध आहे. शोक व प्रेम आहे, भय व लोभ, मोह आहे. या सर्वातील कोणतीही शक्ती व क्षमता अकारण नाही. हे सर्व तुम्हाला याचकरिता दिले गेले आहे की तुम्हाला त्यांची गरज आहे. तुमचा स्वाभाविक प्रकृतीधर्म व नैसर्गिक स्वभावधर्म ज्या गोष्टींची मागणी करीत असतो त्याची पूर्तता करण्यातच तुमचे जीवन व जीवनाची सफलता अवलंबून आहे. हे त्याचवेळी शक्य होईल जेव्हा ईश्वराने प्रदान केलेल्या या सर्व शक्ती तुम्ही उपयोगात आणाल.

नंतर तुम्हाला असेही आढळून येईल की ज्या काही शक्ती व क्षमता तुम्हाला दिल्या गेल्या आहेत त्या सर्वांचा वापर करण्याची साधनेही तुम्हाला दिली गेली आहेत. सर्वप्रथम तुमचे स्वतःचे शरीर आहे; ज्यामध्ये सर्व आवश्यक इंद्रिये व अवयव आहेत. तसेच तुमच्या सभोवतालचे जग आहे व त्यामध्ये हरप्रकारची अगणित साधने विखुरलेली आहेत. तुमच्या सहाय्यासाठी तुमच्याचसारखी अन्य माणसे आहेत. तसेच तुमच्या सेवेसाठी प्राणी, वनस्पती व अवजड वस्तू आहेत. जमीन, पाणी, हवा, प्रकाश व उष्णता व याच प्रकारच्या अगणित बाबी आहेत. त्यांचा तुम्ही वापर करावा व आपले जीवन व्यतीत करण्यासाठी त्यांचा उपयोग करून घ्यावा, यासाठीच ईश्वराने या सर्व गोष्टींची निर्मिती केली आहे.

आता दुसऱ्या एका दृष्टिकोनातून पाहा. तुम्हाला ज्या शक्तीक्षमता दिल्या गेल्या आहेत त्या हितासाठी आहेत, हानीसाठी नव्हे. त्यांच्या यथोचित उपयोगाचे स्वरूप हेच असू शकते की त्यापासून हानी अजिबातच होऊ नये किंवा जेवढी अढळच असेल तितकीच हानी व्हावी. याखेरीज इतर जितकी स्वरूपे असतील ती चुकीचीच असावीत असा बुद्धीचा संकेत आहे. उदाहरणार्थ, एखादे कृत्य केल्याने तुम्हाला स्वतःच जर हानी होणार असेल तर तेही चुकीचे आहे. आपल्या शक्ती-क्षमतांचा वापर करून जर तुम्ही असे एखादे कृत्य केले ज्यामुळे इतरांना ते हानिकारक ठरेल तर तेही चूकच आहे. जर आपल्या शक्तीक्षमतांचा वापर तुम्ही अशा रीतीने कराल की ज्यायोगे तुम्हाला उपलब्ध असलेली साधने वाया जातील तर तसे करणेही चूक ठरेल. हानी, मग ती कसल्याही प्रकारची असो, ती टाळलीच पाहिजे, अशीच ग्वाही तुमची विवेकबुद्धी देईल. जर हानी टाळणे अजिबात शक्यच नसेल किंवा त्या हानीच्या पर्याप्त व परिणामस्वरूप एखादे मोठे हित साधले जाणार असेल, केवळ अशाच अवस्थेत हानी सहन केली जाऊ शकते.

आणखी पुढे जाऊ या. जगात माणसांचे दोन प्रकार आढळून येतात. जी माणसे आपल्या काही शक्ती-क्षमतांचा वापर अशा तऱ्हेने जाणता सवरता करीत असतात की त्यामुळे त्यांच्या स्वतःच्याच काही इतर शक्ती-क्षमतावर अनिष्ट व हानीकारक दुष्परिणाम होतात किंवा दुसऱ्या माणसांवर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यांच्या हितासाठी बहाल करण्यात आलेली साधने त्यांच्या हातून वाया जातात. ही साधने त्यांना हितकर वापरासाठी दिली गेली असून ती निरर्थक वाया घालविण्यासाठी दिली गेलेली नव्हती. दुसऱ्या प्रकारची माणसे जाणूनबुजून व समजूनसवरुन तर अशी कृत्ये करीत नाहीत परंतु अज्ञानामुळे त्यांच्या हातून अशा चुका घडतात.

पहिल्या प्रकारची माणसे दुष्ट प्रवृत्तीची असतात. त्यांना काबूत ठेवता येईल अशी कायद्यांची व शिस्तीची आवश्यकता असते. दुसऱ्या प्रकारची माणसे अज्ञानी असल्याने त्यांना अशा शिक्षणाची गरज आहे ज्यामुळे त्यांना स्वतःच्या शक्ती क्षमतांचे ज्ञान होईल.

ईश्वराने जी शरिअत प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे पाठविली आहे ती याच गरजेची पूर्तता करते. ती तुमच्यामधील कोणतीही शक्ती क्षमता नष्ट करू इच्छित नाही. कोणतीही इच्छा आकांक्षा व कोणतीही भावना नष्ट करू इच्छित नाही. जगाचा परित्याग करा, अरण्यात व गिरीकंदात जाऊन राहा. उपाशी राहा, नागडे हिंडा, आत्मक्लेश करून स्वतःला कष्टात पाडून घ्या आणि जगातील सुख व आराम यांना स्वतःसाठी निषिद्ध माना; असे ती मुळीच सांगत नाही. ही ईश्वरनिर्मित शरिअत आहे व तोच ईश्वर आहे ज्याने या सृष्टीची निर्मिती माणसासाठी केली आहे. ही चराचर सृष्टी नष्ट करून टाकणे अगर विद्रूप करणे हे त्या ईश्वराला कसे पसंत पडेल? माणसामध्ये कोणतीही शक्ती अकारण व अनावश्यक ठेवलेली नाही. तसेच भूमीवर व अवकाशातही अशी कोणतीही वस्तू निर्माण केलेली नाही जिचा कसलाही वापर केला जाऊ नये. या सृष्टीचा व्यापार चैतन्यमय रितीने चालावा. माणसांनी आपल्या प्रत्येक शक्ती क्षमतेचा पुरेपूर उपयोग करावा. जगातील प्रत्येक वस्तूपासून लाभ घ्यावा. तसेच ‘भूमंडलावर’ व अवकाशात पसरलेल्या सर्व साधनांचा वापर व उपयोग करावा परंतु वर सांगितलेल्या अज्ञानामुळे व दुष्टपणामुळे स्वतःचीही हानी करून घेऊ नये आणि इतर माणसांच्या हानीलाही कारणीभूत होऊ नये; अशीच ईश्वराची इच्छा आहे. ईश्वराने शरिअतचे सर्व नियम व तत्त्वे याच गरजेसाठी निर्माण केले आहेत. जितक्या वस्तू व बाबी माणसाला हानीकारक आहेत, त्या सर्व शरिअतमध्ये ‘‘हराम’’ (निषिद्ध) ठरविल्या गेल्या आहेत. तसेच ज्या गोष्टी हितकारक व लाभदायक आहेत त्यांना हलाल (वैध) ठरविण्यात आले आहे. जी कृत्ये करून मनुष्य स्वतःची अगर इतरांची हानी करतो त्या सर्व कृत्यास शरिअतने मनाई केली आहे. माणसांना हितकारक व कोणासही हानीकारक नसणाऱ्या अशा सर्व कृत्यांना शरियत अनुमती देते. जगामध्ये माणसाला सर्व इच्छा, आकांक्षा व गरजांची पूर्तता करण्याचा व स्वहितासाठी हरप्रकारचा प्रयत्न करण्याचा हक्क आहे. या हक्कांचा वापर त्याने अशा तऱ्हेने करावयास हवा की अज्ञानापोटी व दुष्टपणाने त्याने इतरांचे हक्क हिरावू नये. उलट शक्य तितके इतरांना सहाय्यक व मदतगार व्हावे; या तत्त्वावर शरिअतचे सर्व कायदे व नियम आधारलेले आहेत. ज्या कृत्यात एक बाजू हितकारक व दुसरी बाजू हानीची असेल तर अशा बाबतीत मोठ्या हितापोटी लहानशी हानी पत्करली जावी व मोठी हानी टाळण्यासाठी लहानसे हित त्यागिले जावे अशी शरिअतची तत्त्वे व धारणा आहे.

वास्तविकपणे प्रत्येक काळात, प्रत्येक वस्तूचा व प्रत्येक कार्याचा फायदा व तोटा प्रत्येक माणसाला ठाऊक नसतो. म्हणूनच ज्यापासून विश्वसृष्टीतील कोणतेही रहस्य दडलेले नाही अशा ईश्वराने माणसाच्या संपूर्ण जीवनातील एक अचूक नियमावली बनविली आहे. या नियमावलीची कित्येक गुणवैशिष्ठ्ये आजपासून मागील कित्येक शतकापर्यंत माणसांना आकलन होत नव्हती. परंतु शिक्षण व ज्ञानाच्या प्रगतीमुळे त्यांचे आकलन सुकर झाले आहे. अजूनही बऱ्याच काही हितकारक बाबी लोकांच्या लक्षात येत नाहीत, परंतु शिक्षण व ज्ञान यांची जसजशी प्रगती होत राहील तसतसे त्या बाबी लोकांना उमगतील. आपल्या तोकड्या शिक्षणावर व त्रुटीयुक्त ज्ञानावर जी माणसे विसंबून राहतात ती शतकानुशतके चुका करीत व ठेचा खात राहतात. सरतेशेवटी याच शरिअतच्या कोणत्या ना कोणत्या कायद्याचा अवलंब करण्यास ही माणसे विवश झालेली आहेत. परंतु जे लोक ईश्वराचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर दृढ विश्वास ठेवून व विसंबून राहिले ते अज्ञान व अडाणीपणापासून उद्भवणाऱ्या हानीपासून सुरक्षित आहेत. त्यांना शरिअतच्या हितकारक उद्दिष्टांचे ज्ञान असो वा नसो, कोणत्याही स्थितीत ते केवळ अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) वरील विश्वासावर विसंबून असल्याने अशा प्रकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात की जे अचूक व निखालस ज्ञानानुसार बनविले गेले आहेत.

संबंधित लेख

  • इस्लाम व मुस्लिमेतर अल्पसंख्य लोक

    इस्लामी राज्यात मुस्लिमेतर अल्पसंख्य लोकांशी केले जाणारे वर्तन काही लोकांना अतिनाजूक विषय वाटतो. कारण त्यामुळे मुस्लिम व मुस्लिमेतर यामध्ये तिरस्कार व द्वेषभावना उत्पन्न होण्याची भीती असते. म्हणून असे लोक या विषयावर बोलण्यास मागेपुढे करतात.
  • इस्लाम व महिलावर्ग

    इस्लामशी संबद्ध असलेला एक बहुचर्चित विषय मुस्लिम महिलांचा आहे. इस्लाम महिलांना पक्षपाती वागणूक देतो, असा आरोप केला जातो. या आरोपांना मूलतः पाश्चात्य देशातून पुष्टी दिली जाते. पाश्चिमात्य लोक त्यांच्या महिलांशी जसे वर्तन करीत आहेत, महिलांना जसे स्वैर स्वातंत्र्य दिले जाते, तशाच प्रकारचे वर्तन इस्लामनेही आपल्या महिलांशी करावे, तसेच स्वैर स्वातंत्र्य आपल्या महिलांना द्यावे; असेच जर ते इच्छित असतील, तर त्याचे उत्तर स्पष्ट व ठाम शब्दात ‘नाही’ असेच राहील. या दोन्ही समाजाचे आदर्श, एकमेकांच्या नेमके उलट आहेत. इस्लाम आपल्या महिलांना शालीनता, आदर-प्रतिष्ठा व संरक्षण देतो.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]