Islam Darshan

भक्ती या शब्दाचा कुरआनने दिलेला खरा अर्थ

Published : Friday, Feb 12, 2016

कुरआनमध्ये हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेला आहे.

‘‘तुम्ही ज्यांची भक्ती करता त्याच्या (अल्लाह) सह, ती सर्व नावे आहेत जी तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी ठेवलेली आहेत.’’

‘‘त्यांनी उत्तर दिले, काही मूर्ती आहेत ज्यांची आम्ही पूजा (भक्ती) करतो आणि त्यांच्याच सेवेत आम्ही लागलेलो असतो.’’ (कुरआन २६: ७१)

वरील कुरआन आयतींनुसार इतर कुणाची (अल्लाहला सोडून) पूजा अर्चा करणे अथवा भक्ती करणे म्हणजेच त्याची (इतरांची) उपासना करणे आहे. अनेकेश्वरवादीं आपल्या मूर्तींशी जो व्यवहार करतात त्यास पूजा (भक्ती) म्हणून येथे संबोधले आहे. म्हणूनच अनेकेश्वरवादी आणि त्यांच्या मूर्तींच्या दरम्यान जो संबंध प्रस्थापित होतो त्याला पूजा (भक्ती) असे म्हटले जाते.

‘‘जे लोक खोट्या ईश्वरांच्या (तागूत) भक्ती (पूजा) पासून अलिप्त राहिले आणि अल्लाहकडे रुजू झाले त्यांच्यासाठी खूशखबर आहे.’’ (कुरआन ३९: १७)

‘‘काय मी त्या लोकांचा निर्देश करु, ज्यांचा शेवट अल्लाहपाशी अवज्ञा करणाऱ्यांच्या शेवटापेक्षा अधिक वाईट आहे? ते अल्लाहने ज्यांचा धिक्कार केला. आणि ज्यांच्यावर त्याचा कोप कोसळला, ज्यांच्यापैकी माकड व डुक्कर बनविले गेले, ज्यांनी मूर्तींची (तागूत) ची भक्ती (पूजा) केली, त्यांचे स्थान आणखीनच वाईट आहे आणि ते सन्मार्गापासून दूरवर भरकटलेले आहेत.’’ (कुरआन ५: ६०)

कुरआनच्या या आयतींनुसार कुणा एकाला सार्वभौम मान्य करून त्याच्या आदेशांचे स्वेच्छेने आज्ञापालन करणे म्हणजेच त्याची पूजा (भक्ती) करणे होय. जे खोट्या ईश्वरांशी असा व्यवहार करतात त्याससुध्दा पूजा (भक्ती) असे संबोधले गेले आहे. वरील आयतीत ‘‘तागूत’’ या शब्दाचा प्रयोग झाला आहे. अरेबिक भाषेत तागूतचा अर्थ होतो ‘‘मर्यादांचे उल्लंघन करणारा’’ तसेच विद्रोह करणारा. तत्त्वतः तागूत म्हणजे असा समुदाय जो दुसऱ्यांना अल्लाहच्या भक्ती (पूजा) पासून दूर ठेवतो आणि विनाशाकडे ढकलतो. याच अर्थाने सैतान आणि मूर्तींना ‘तागूत’ म्हणून संबोधले गेले आहे. याचप्रमाणे ते राज्यप्रमुख, उच्चपदस्थ अधिकारी, राजकारणी मंडळी आणि धार्मिक नेते ज्यांना अल्लाहच्या कोपचे भय नाही. तसेच जे अल्लाहच्या आदेशांची पायमल्ली करतात आणि जे आपले विचार व इच्छा यांना कायद्याचा दर्जा देतात असे सर्व लोक ‘तागूत’च्या व्याख्येत मोडतात. जे लोक यांचे आज्ञापालन करतात आणि अशा तागूतांचा (द्रोहींचा) आदर सन्मान करतात, त्यांना कायदेकानू बनविणारे आणि निर्णय (न्यायनिवाडा) करणारे ठरवतात, ते सर्वजण तागूतांचे श्रध्दापूर्वक आज्ञापालन करून त्यांना ईश्वरस्थानी बसवतात. कुरआन याच कृतीला ‘‘खोट्या ईश्वरांची पूजा’’ म्हणून ठरवतो. अशा लोकांची कृती त्यांच्या खोट्या ईश्वरांची (तागूत) ची पूजा (भक्ती) च आहे. स्वेच्छेने आणि आनंदाने अशा ‘तागूतांचे’ आज्ञापालन करणे दूसरे तिसरे काहीच नसून त्यांची भक्तीच आहे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,

‘‘परंतु त्यांनी गर्व केला आणि बडेजाव केला व म्हणू लागले, काय आम्ही आमच्याचसारख्या दोन माणसांवर श्रध्दा ठेवावी? आणि माणसेही ती ज्यांचा लोकसमूह आमचा गुलाम आहे? म्हणून त्यांनी दोघांना खोटे ठरविले आणि नष्ट होणाऱ्यांना जाऊन मिळाले.’’ (कुरआन २३ :४७)

‘‘उरले तुझे उपकार ज्यांचा ठपका तू माझ्यावर ठेवला आहेस, तर त्याची वस्तुस्थिती अशी आहे की तू बनी इस्राईलांना गुलाम बनविले होते.’’ (कुरआन २६: २२)

वरील कुरआनोक्तींनुसार हेच सिध्द होते की स्वेच्छेने आणि आनंदाने आज्ञाधारकता स्वीकारणेच फक्त भक्ती होत नाही तर अनेच्छेने, परंतु हेतुपुरस्सर आणि समजून-उमजूनसुध्दा ज्यांची आज्ञाधारकता स्वीकारली जाते तीसुध्दा भक्ती आहे. ज्यांची पूजा होते ते स्वतः मग सार्वभौम सत्तेत सहभागी समजत नसतील तरी ईश्वराचा दर्जा देऊन त्यांची भक्ती होते. (मग ती माणसं असोत (मृत अथवा जिवंत) की दगड-धोंडे, पशु-पक्षी, झाडे-झुडपे असोत) याचसाठी वरील कुरआनोक्तीमध्ये बनी इस्राईलांना गुलाम बनविले गेले असा उल्लेख आला आहे. कारण ते अल्लाहला सोडून इतरांची भक्ती करीत होते. ते स्वेच्छेने इतरांचे गुलाम बनले नव्हते. तात्कालीन राजकीय दबावामुळे आणि त्यांच्या कमकुवतपणामुळे त्यांना अत्याचारींच्या पुढे नतमस्तक व्हावे लागले. जो स्वतःला सार्वभौम समजतो आणि त्याची आज्ञाधारकता सरळ सरळ होत असेल तर हे कृत्यसुध्दा त्या राजाचे अथवा राज्यप्रमुखाची पूजा (भक्ती) आहे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,

‘‘आदमच्या मुलांनो, मी तुम्हाला आदेश दिला नव्हता काय की सैतानाची भक्ती करू नका, तो तुमचा उघड शत्रू आहे आणि माझीच भक्ती करा, हा सरळ मार्ग आहे?’’ (कुरआन ३६: ६९)

‘‘हे पित्या, आपण का त्या वस्तूंची उपासना करता ज्या ऐकतही नाहीत आणि पहातही नाहीत आणि आपले कोणतेही काम पार पाडू शकत नाहीत?’’ (कुरआन १९: ४२)

‘‘बाबा, सैतानाची भक्ती करू नये.’’ (कुरआन १९: ४४)

वरील आयतींनुसार आणखी दुसऱ्या प्रकारच्या भक्तीचे स्वरूप स्पष्ट होते. म्हणजे एखाद्याची पूर्ण अनावधानाने पूर्ण आज्ञाधारकतासुध्दा भक्तीच ठरते. येथे कुरआनची ही संकेतवचनं सैतानाच्या अशा भक्तीला स्पष्ट करत आहेत की लोकांचे आचरण आणि विश्वास हा सैतानाच्या भक्तीशी तंतोतंत जुळतो. तसे पाहता त्यांच्यापैकी कोणीही सैतानापुढे नतमस्तक होत नाही अथवा सैतानाची उपासना करीत नव्हता. त्यांच्यापैकी कोणीही सैतानाला आपला पालनकर्ता किवा मार्गदर्शक म्हणून स्वीकारले नव्हते आणि सैतानाबद्दल कुणालाही आदर नव्हता. दुसऱ्या लोकांप्रमाणेच या मंडळीच्या मनात सैतानाबद्दल तिरस्कारच होता. परंतु असे असतानासुध्दा त्यांना ‘सैतानाचे पुजारी अथवा भक्त’ म्हटले गेले. वरील आयतीत त्यांना स्पष्ट आदेश दिला की ‘‘सैतानाची भक्ती करू नका.’’ कुरआननुसार अनावधानाने जरी आज्ञाधारकता होत असेल आणि त्यांचे कृत्य आणि विश्वास सैतानाच्या किवा त्याच्या चेल्यांसारखे असतील तर ती ‘चुकून झालेली आज्ञाधारकता’सुध्दा सैतानाची भक्तीच ठरते.

कुरआनच्या वरील आयतींमध्ये भक्ती या शब्दाचा वापर रूपकात्मकरित्या झालेला आहे असे म्हणणे चुकीचे आहे. हे कुरआन, हदीस अथवा शब्दकोशाच्या अगदी विरुध्द आहे. भक्ती (उपासना) या शब्दाचा अर्थ फक्त पूजा-अर्चा असा होत नाही तर त्याचा अर्थ वरील आयतींनुसारच कुरआनमध्ये सर्वत्र आला आहे. वर नमूद केलेल्या भक्तीचे चार प्रकार हे त्याच शब्दाच्या व्यापक अर्थाचे प्रभाग आहेत. भक्ती आज्ञाधारकता आहे. जाणीवपूर्वक आणि अजाणतेने केलेली आज्ञाधारकतासुध्दा भक्ती आहे. आज्ञाधारकतेविना भक्ती काहीही नाही. कुरआननुसार आज्ञाधारकता भक्ती (पूजा, उपासना) आहे, तर याचाच अर्थ असा आहे की आज्ञाधारकतेचे इतर तीन प्रकारसुध्दा भक्ती आहे. कुरआननुसार आज्ञाधारकता त्याचा खरा अर्थ तेव्हाच प्राप्त करते जेव्हा भक्ती आणि आज्ञाधारकता हे दोन्ही शब्द एकत्र वापरले जातात. अशा प्रकारे आज्ञाधारकता हा शब्द व्यापक आहे. ज्यामध्ये भक्ती आणि आज्ञाधारकता दोन्हींचा समावेश होतो. त्याचे स्वरूप व व्याप्ती धार्मिक गरजांचे आणि इस्लामी आदेशांचे पालन आहे.

संबंधित लेख

  • इस्लामची आर्थिक नीती

    इस्लाम एकीकडे माणसाला स्वत्वाच्या पलीकडे जाऊन पूर्ण निष्ठेने व निस्वार्थीपणाने खर्च करण्याचा मार्ग दाखवितो तर दुसरीकडे त्याला द्वेष व मत्सराच्या मार्गापासून दूर राहण्याची ताकीद देतो. तसेच त्याने स्वतःला स्वतःतच गुरफटून घेऊन अवमानीत करीत फिरू नये असे इच्छितो. अशा रितीने इस्लाम समाजाला अशी वास्तविक आध्यात्मिक शांती प्रदान करतो, जी आर्थिक न्यायाच्या निकडीशीही पूर्णपणे एकरुप असते. कारण इस्लाम धनाचे विकेंद्रीकरण समाजात अशारितीने करु इच्छितो की अतिधनप्राप्तीमुळे काही लोकांनी धुंद होऊन कुमार्गाला लागू नये तसेच निर्धन वर्ग कायमचा हलाखीला, अभावाला बळी पडू नये.
  • नव्या युगातील नवीन ईश्वर

    चारित्र्य व आचरणाच्या दृष्टीने जग आज ज्या ठिकाणी आहे तसेच ते चौदा शतकांपूर्वी याच ठिकाणी व याच स्थितीत होते. त्या वेळी इस्लामनेच त्याला खोट्या देवदेवतांपासून मुक्त केले होते. आजच्या खोट्या ईश्वरापासून इस्लामच मानवतेची सुटका करु शकतो. या ईश्वरांनी, हुकूमशाही, बादशाही, साम्राज्यशाही व भांडवलशाहीचे बुरखे घेतलेले आहेत. एकीकडे पाषाणहृदयी भांडवलदार गरीब मजुरांचे रक्त शोषण करुन आपल्या तिजोऱ्या भरीत आहेत, तर दुसरीकडे श्रमिकवर्गाच्या हुकूमशाहीच्या नावावर काही लोक आपल्या ईश्वरत्वाचा देखावा थाटून बसले आहेत. हे लोक स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांचे स्वातंत्र्य चिरडून टाकीत आहेत. परंतु त्यांच्या तोंडी भाषा अशी असते की ते जनतेच्या इच्छेची पूर्ती करीत आहेत.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]