Islam Darshan

हजयात्रेचे सर्वसमावेशक गुण

Published : Friday, Feb 05, 2016

हजयात्रेच्या गुणाबद्दल विचार करताना आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास लक्षात येते की हजयात्रा एक उत्तम उपासनापध्दती आहे कारण,

१) हजयात्रेत प्रार्थनेचा (नमाजचा) समावेश आहे. प्रार्थना (नमाज) दुसरे तिसरे काही नसून अल्लाहचे स्मरण आहे. आपण हे पाहिले आहे की हजयात्रेच्या काळात हाजी लोक अल्लाहचे पूर्ण स्मरण करीत असतात. नमाजमध्ये मग्न राहतात.

२) हजयात्री आपल्या बलिदान दिलेल्या पशुचे मांस गरिबांमध्ये वाटतो. गरिबांचा हिस्सा देणे प्रत्येक हजयात्रीवर बंधनकारक आहे.

‘‘स्वतःदेखील खावे आणि अडचणीत असलेल्या वंचित लोकांनासुध्दा द्यावे.’’ (कुरआन २२: २८)

हजयात्रेवर धन खर्च करण्याचा एकमेव उद्देश अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करणे हा आहे. या उद्देशाव्यतिरिक्त हजयात्रा सफल ठरत नाही. तशीच जकातसुध्दा अल्लाहच्याच प्रसन्नतेसाठी दिली जाते.

३) हजयात्रेत उपवासाचे तत्त्व कार्यान्वित केलेले आहेत. उपवासकाळात दिवसा आपल्या पत्नीशी शरीरसंबंध ठेवणे निषिध्द आहे, पण हजयात्रेच्या काळात पूर्णतः हे निषिध्द केले आहे. हजयात्रेत खाण्यावर बंदी नाही, परंतु उपवासात खाणे पिणे निषिध्द आहे. परंतु हजयात्रेत साज-शृंगार आणि सुंगध निषिध्द केले आहे. अशा प्रकारे मनोकामनांना नियंत्रणात ठेवण्याचे कार्य उपवास या उपासनापध्दतीप्रमाणे हजयात्रेतसुध्दा केले जाते.

४) काबागृहाची इमारत अल्लाहच्या एकेश्वरत्वावर उभी आहे. काबागृहाकडे पाहून मुस्लिम आपली श्रध्दा आणखी दृढ करतो. हजयात्रेचे सर्व विधी अल्लाहच्या एकेश्वरत्वावरील विश्वास आणखी दृढ करतात. सतत करण्यात येणारी उद्घोषणा, ‘‘हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे! हे अल्लाह! मी हजर आहे!’’ तसेच काळ्या दगडाचे चुंबन घेणे, काबागृहाची परिक्रमा, सफा मरवा दरम्यान धावणे, जनावरांचा बळी (कुर्बानी) देणे इ. सर्व उपासनाविधी अल्लाहच्या एकेश्वरत्वाला बळकटी देणारे आहेत.

५) हजयात्रमध्ये सैतानाच्या अडथळ्यांचेसुध्दा स्मरण करून दिले जाते. मीना येथे सैतानी खांबांना लहान लहान दगड मारणे हे कृत्य हाजी लोकांच्या मनात इब्राहीम (अ.) यांच्यासारखा एकेश्वरत्वाचा दृढविश्वास जागृत करते.

६) हजयात्रेने लोकांच्या मनावर धर्मशीलता व नैतिकतेची प्रभावी आणि अद्वितीय छाप पडते. इतर गुणांसह हजयात्रेमुळे हाजी लोकांत अल्लाहबद्दल असीम प्रेम निर्माण होते. धैर्यशीलता, सहनशीलता, समाधानी वृत्ती, अल्लाहवर दृढ विश्वास, ईशइच्छेला शरण जाणे, तसेच भौतिक सुखाला गौणत्व देणे, समानता, बंधुता इ. सद्गुणांना बळकटी मिळते.

७) या उपासनापध्दतीला (हजयात्रा) जो कोणी कमी लेखेल आणि पात्रता असूनसुध्दा हजयात्रेला जात नसेल तर अशी व्यक्ती धार्मिक जीवन जगत आहे असे म्हणणे निरर्थक आहे. ती हजयात्रेला जाण्यासाठी सक्षम आणि पात्र असूनसुध्दा जात नसेल म्हणजेच हजयात्रेच्या या उपासनापध्दतीला ती व्यक्ती कमी लेखत आहे. अशा स्थितीत त्या व्यक्तीच्या श्रध्दाशीलतेवर प्रश्नचिन्ह लागते, किबहुना त्या व्यक्तीची श्रध्दा अपूर्ण ठरते. जी व्यक्ती योग्यता असल्यास हजयात्रा लवकरात लवकर पार पाडते, ती व्यक्ती आपल्या श्रध्दाशीलतेला बळकटी देते आणि इस्लामच्या श्रध्देचा पाया मजबूत करून घेते.

अशा प्रकारे हजयात्रेचा प्रत्येक उपासनाविधी एक विशिष्ट आणि स्वतंत्र महत्त्व ठेवून आहे. आपणास हे कळले आहे की हे काही कर्मकांड नाही तर ते सदाचाराचे आणि अल्लाहच्या उपासनेचे प्रेरणास्रोत आहेत. प्रत्येक विधी अल्लाहच्या आज्ञाधारकतेत आणि अल्लाहजवळ शरणागती पत्करण्यात आपापला हिस्सा उचलत आहे. अल्लाहच्या आज्ञाधारकतेमध्ये (मुस्लिम) पूर्णत्व आणण्यासाठी हे सर्व विधी अत्यंत प्रभावी भूमिका पार पाडत आहेत. प्रत्येक विधी स्वतःची भूमिका स्वतः पार पाडतो, दुसरा विधी त्याची जागा घेऊच शकत नाही. हे सर्व उपासनाविधी एकत्रितपणे हाजीलोकांच्या हृदयात आणि मनमस्तिष्कावर इस्लामबद्दल पूर्ण समाधान रूजवतात. ईशइच्छेसाठी त्यांची हृदये मोकळी होतात. अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी अविरत परिश्रम करणारे मन तयार होते. अल्लाहची आज्ञाधारकता संपादन करण्यासाठी ते नेहमी अल्लाहचे आदेश तत्परतेने पालन करण्यास तयार होते. हजयात्रेच्या सर्व उपासनापध्दतींमध्ये अशा प्रकारे इस्लामच्या इतर उपासनापध्दतींचे गुणवैशिष्ट्य सामावलेले आहे. हजयात्रा हे इस्लामच्या आधारस्तंभांपैकी एक महत्त्वाचा आणि शेवटचा आधारस्तंभ आहे.

‘‘हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे! हे अल्लाह! मी हजर आहे!’’

संबंधित लेख

  • खऱ्या इस्लामी राज्याची गरज

    पुरुषांची समस्या असो की स्त्रियांची असो, इस्लाम व केवळ इस्लामच तिची सोडवणूक करु शकतो. म्हणून आम्हा पुरुषांचे, स्त्रियांचे वडीलधाऱ्यांचे, नवयुवकांचे सर्वांत पहिले कर्तव्य असे की सर्वांनी एकजुटीने, खरेखुरे इस्लामी राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करावा व आपल्या जीवनास इस्लामी नियमानुसार आकार द्यावा. हे काम जेव्हा आम्ही करू तव्हाच आपल्या विचारांना व आस्थांना, कृतीचा विश्वास आम्ही यशस्वी करु शकू. जीवनात समतोल व एकजिनसीपणा प्राप्त करण्यास हाच एकमेव मार्ग आहे. हा मार्ग सर्व प्रकारच्या अन्याय, अत्याचार, जुलूम व जबरदस्तीपासून पूर्णपणे निर्मळ व स्वच्छ आहे.
  • पाश्चिमात्यांची संकुचित दृष्टी

    सृष्टीबद्दल ज्ञान प्राप्त करण्याचे माध्यम या दृष्टीने विज्ञानाला महत्त्व फार मोठे आहे आणि या दृष्टीनेच आतापर्यंतच्या कार्यक्षेत्राची यादीसुद्धा फार प्रभाव पाडते. पण त्याचे हे सारे यश त्याक्षणी निराशेमध्ये रुपांतरित होऊन गेले. ज्याक्षणी पाश्चिमात्यांनी विज्ञानाला ईश्वर मानले आणि त्याला आपल्या प्रेमाचा, निष्ठेचा, श्रद्धेचा एकमात्र केंद्र मानले. त्याच्या या खेदजनक चुकीचा परिणाम असा झाला की त्यांनी व्यवहारातील विज्ञानाच्या अनुभवांच्या मर्यादित साधनाखेरीज ज्ञान मिळविण्याच्या इतर साधनांपासून अलिप्त करुन घेऊन स्वतःला वंचित करुन घेतले.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]