Islam Darshan

इस्लाम जनतेसाठी अफूची गोळी आहे काय?

Published : Wednesday, Feb 03, 2016

‘धर्म ही जनतेकरिता अफूची गोळी आहे.’ कार्लमाक्र्सच्या या सुप्रसिद्ध विधानाचा कम्युनिस्ट प्रचारक इस्लामी देशांमध्ये डोळे मिटून आजापर्यंत पुनरुच्चार करीत आहेत. येथपर्यंत हा प्रचार झाला आहे की इस्लामही त्या टीकेतून सुटला नाही.

युरोपवासी जनतेची विवशता

कार्लमाक्र्स व कम्युनिझमच्या आरंभीच्या काळात इतर नेत्यांनी ज्या प्रकारच्या युरोपातील वातावरणात डोळे उघडले, तेथे अशा प्रकारची परिस्थिती त्या वेळी होती, ज्यामुळे चर्च व चर्चवाल्यांविरुद्ध त्यांना उठाव करणे भाग पडले. त्या काळी युरोपात विशेषकरुन रशियात जहागिरदारीची अतिशय जुलमी पद्धत चालू होती. त्यामुळे हजारो लाखो माणसे उपासमारीने व कडाक्याच्या थंडीने मरत असत. जे जिवंत राहत त्यापैकी बहुतेक क्षयरोग अथवा अन्य सांसर्गिक रोगांना बळी पडत असत. त्यांची विचारपूस करणारे कोणी नव्हते. याच्या उलट जहागिरदार समूह या गरिबांचे रक्तशोषण करून आपल्या सुखचैनीची सर्व साधने प्राप्त करीत. ते आपल्या सभोवतालच्या परिस्थितीकडे डोळेझाक करून मनसोक्त भोगविलासात दंग होते.

धार्मिक माणसांचे चरित्र

अत्याचारावर ताण असा की श्रमजीवी लोकांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला, किवा त्यांना आपल्या अभावाची व वंचितपणाची जाणीव झाली तर धार्मिक वर्ग म्हणजे धर्मगुरुंचा वर्ग त्यांना थोपटून, थोपटून पन्हा झोपवित असे. भरडल्या गेलेल्या जनतेचे सहाय्य करण्याऐवजी त्यांना असे सांगून त्यांचे सांत्वन करीत असत की, ‘जर तुमच्या उजव्या गालावर कोणी मारले तर तुम्ही तुमचा डावा गाल त्याच्यापुढे करा.’ जर कोणी तक्रार व फिर्याद करुन तुमचा सदरा घेऊ इच्छित असेल, तर तुमचा लांब झगाही त्याला घेऊ द्या.’ ते त्यांना सांगत की या जगात जे लोक अन्याय व अत्याचारांना बळी पडले आहेत, त्याच्या मोबदल्यात त्यांना सुख, शांतीयुक्त व चिरकाल टिकणारे मरणोत्तर जीवन प्राप्त होईल. म्हणून त्यांनी हालअपेष्टा सहन कराव्यात व आपल्या शासकाविरुद्ध कोणताही आवाज उठवू नये. अशाप्रकारे त्यांनी दुःखी व पीडित जनतेला रमवून व त्यांचे मनोरंजन करुन आपले हक्क मिळविण्याकरिता संघर्ष करण्यापासून रोखून धरले व क्रांतीच्या मार्गाने त्यांना पुढे जाऊ दिले नाही.

परलोकातील सुखाच्या व आरामाच्या अशा कायद्यांनी काम भागले नाही व या पिडलेल्या, गांजलेल्या लोकांनी आपले हक्क प्राप्त करण्याचा आग्रहच धरला तर हे चर्चचे लोक धमक्या देऊन त्यांचे तोंड बंद करुन टाकीत. ते म्हणत की जो कोणी आपल्या जहागिरदार धन्याची अवज्ञा करील तो ईश्वराचा, चर्चचा व धर्मगुरुचा शत्रू व बंडखोर आहे. या काळात चर्च हा मोठा जहागिरदार होता ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हजारो लाखो शेतमजूर त्यांच्या जमिनीत खपत असत. म्हणूनच श्रमजीवी मजुरांमध्ये व जहागिरदारांमध्ये जेव्हा संघर्ष सुरु झाला तेव्हा चर्च स्वाभाविकपणे रशियाच्या राजघराण्याच्या बाजूने व त्यांचे पाठीराखे असलेल्या जहागिरदारांच्या बाजूने उभे राहिले. वास्तविक हे सर्व एकाच माळेचे मणी होते व क्रांती जर घडून आलीच तर तिच्या मिठीतून जहागिरदारही वाचू शकणार नाहीत, तसेच धर्मगुरुंचा समूहही वाचू शकणार नाही ही गोष्ट ते चांगल्या तऱ्हेने जाणत होते. मग परलोकातील यशाच्या व फायद्याच्या वायद्यांनी व धमक्यांनी काम भागले नाही तर इतरांशी व धर्माशी बंड करणाऱ्यांना दंडुक्यांनी बडवून काढले जात असे. या बाबतीत जहागिरदारांना चर्चचा पूर्ण पाठिबा असे. चर्चच्या अशाच प्रकारच्या अनेक कर्तृत्वामुळे युरोपातील जनता हळूहळू असे समजू लागली की माणसाचा खरा शत्रू धर्म आहे. ‘धर्म ही अफूची गोळी आहे.’ या कार्लमाक्र्सच्या विधानात हाच ऐतिहासिक संकेत व तथ्य आहे.

धार्मिक वर्गाच्या बाबतीत कम्युनिझमचे अनुयायी असेही म्हणतात की जे श्रमजीवी वर्गांविरुद्ध शासनाच्या बाजूने उभे राहत आले आहेत. चिरकाल स्वर्गसुखाची आशा दाखवून सर्व प्रकारचा अन्याय व अवमान सहनशीलतेने सोसण्याची शिकवण ते सामान्य जनतेला देत असत, जेणेकरून त्यांना हानीची जाणीव होऊ नये व जुलमी लोकांनी निस्संकोचपणे त्यांचे रक्तशोषण करू शकावे.

जामिया अजहरचे उदाहरण

या संदर्भात जामिया अजहरच्या काही विद्वानांचा हवाला दिला जातो. ते बादशहांच्या व सुलतानांच्या हाताचे चुंबन घेत व त्यांच्या इच्छेनुसार कुरआनचा अर्थ लावून धर्माचे स्वरुप बिघडविण्यासाठी चुकत नसत. असे केल्याने शासकांचे आसन मजबूत होऊन त्यांचा दरारा व दबदबा टिकून राहावा व सामान्य जनतेला त्यांच्या विरुद्ध उठाव करण्यापासून रोखले जावे. म्हणूनच हे लोक सामान्य जनतेला असे सांगत की त्यांनी जर शासनाविरुद्ध उठाव केला अगर त्याची आज्ञा पाळली नाही, तर ते ईश्वराचे गुन्हेगार व बंडखोर ठरतील.

या सर्व गोष्टी खऱ्या असणे शक्य आहे, पण प्रश्न असा आहे की या धंदेवाईक धार्मिक नेत्यांनी जे काही केले ते धर्माच्या आदेशांचे पालन करण्याच्या परिणामस्वरुप होते काय ? ती त्यांच्या स्वार्थप्रियतेची निपज होती.

इहलोकप्रिय उलेमांचे (कायदातज्ञांचे) उदाहरण

जे इहलोकप्रिय उलेमा मुस्लिम इतिहासात होऊन गेले त्यांची रीती व नीति इस्लामी शिकवणीच्या अगदी उलट होती, हेच सत्य आहे. वर्तमान काळातील मार्गभ्रष्ट साहित्यिक, कवी तसेच वृत्तपत्रकार जसे भौतिक लाभासाठी मोठ्यात मोठी घाण व घाणेरडे कृत्य सहन करण्यास तयार असतात. या उलेमांचे उदाहरणही त्यांच्यासारखेच असते. परंतु धार्मिक नेत्यांनी केलेला हा अपराध, गांभीर्यांच्या व भयानकतेच्या दृष्टीने जडवादी साहित्यिकांच्या, कवींच्या व पत्रकरांच्या अपराधापेक्षा कितीतरी पटीने मोठा होता. कारण धर्माच्या आत्म्याशी ते परिचित असल्याने व धर्माच्या ज्ञानाचे रक्षक व जोपासक असल्याकारणाने त्यांनी धर्माचे रक्षण करण्यासाठी उभे राहावे, अशी उचित अपेक्षा त्यांचेकडून केली जाते. अल्लाहचा धर्म बिघडवून ते जो घृणास्पद अपराध करतात त्याचे गांभीर्यही त्यांना ठाऊक असते.

व्यावसायिक धार्मिक वर्ग व इस्लाम

पुढे जाण्याआधी आम्ही ही गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक समजतो की इस्लाममध्ये एकतर कोणत्याही व्यावसायिक धार्मिक वर्गाचे अस्तित्व नसते. दुसरे असे की धार्मिक नेत्याची जी उक्ती व कृती असते तसाच इस्लामचा मानस असणे हे काही आवश्यक नाही. मुस्लिमांच्या दुर्भाग्याचे खरे मूळ कारण त्यांचे स्वतःच्या धर्माबद्दलचे अज्ञान व त्यांचे धर्मांबद्दल औदासिन्य आहे.

इस्लाम एक मोठी स्वातंत्र्य चळवळ

दडपशाहीविरुद्ध आवाज उठविण्याचा व चळवळ करण्याचा श्रमजीवी वर्गाला अधिकार इस्लाम देत नाही, हा इस्लामवरचा आरोप खोटा आहे. मुस्लिमांचा इतिहास याचे सर्वांत मोठे प्रमाण आहे. म्हणून ज्या क्रांतीने इंजिप्शियनांना गतकाळातील इजिप्शियन हुकूमशहा बादशहापासून सुटका करुन दिली ती वास्तविकपणे प्रारंभीची धार्मिक चळवळच होती. फ्रांसविरुद्ध जेव्हा मुस्लिमांनी आवाज उठविला तेव्हा त्यात मुस्लिम उलेमाच अग्रभागी होते. मोहम्मद अलीच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे उमर किराम हेही एक धार्मिक नेतेच होते. सुदानमध्ये इंग्रजाविरुद्ध स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व तेथील प्रसिद्ध धार्मिक नेते अल मेहदी यांनीच केले होते. तसेच लिबीयामध्ये इटालियन व मोरोक्कोमध्ये फ्रेंच साम्राज्याविरुद्ध संघर्ष करण्यातही इस्लामचाच हात होता. ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध काशानी यांनी केलेले क्रांतिकारक आंदोलनही इस्लामी आत्म्याचाच एक चमत्कार होता. सर्व प्रकारच्या सामाजिक अन्यायांविरुद्ध व मानवी अपराधांविरुद्ध इस्लाम एक मोठी स्वातंत्र्य चळवळ आहे हे याचगोष्टीचे मोठे प्रमाण आहे.

कुरआनमध्ये अनुमानाचा कम्युनिस्टांचा घोटाळा

कम्युनिस्ट प्रचारक कुरआनमधील या दोन आयतींचा उल्लेख करुन व आपल्या इच्छेनुसार त्यांचा अर्थ लावून, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की इस्लाम लोकांना सर्व प्रकारचा अन्याय व अवमान सहनशीलतेने व धैर्याने सोसण्याची शिकवण देतो.

‘व ज्या वस्तूंच्या बाबतीत अल्लाहने काहींना काहीपेक्षा प्राधान्य दिले आहे, त्या वस्तूंची आकांक्षा करु नका.’ (कुरआन ४:३२)

‘ज्या वस्तू आमचा विरोध करणाऱ्या विभिन्न समूहाला त्यांची परीक्षा घेण्यासाठी देऊन ठेवल्या आहेत, व ज्या केवळ इहलोकातील जीवनाचीच भूषणे होत, अशा वस्तुकडे पापणीवर करुन पाहू नका. तुमच्या पालनकर्त्याकडून मिळणारी देणगी (जी परलोकात मिळेल) कितीतरी पटीने अधिक चांगली व चिरकाल टिकणारी आहे.’ (कुरआन २०:१३१)

संबंधित लेख

  • ‘जिहाद’ : व्याख्या आणि गरज

    आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या काळातील लढायांचा उल्लेख पाहून काही इतिहासपंडितांकडून होणार्या टीकांच्या आधारावर असा नेहमीच प्रश्न उभा करण्यात येतो की, नैतिकता आणि शांतीचा संदेश देणार्या धर्मात तलवारीची आणि युद्धाची काय गरज आहे? मस्जिदीसह रणभूमीतील कार्याची जोड कशासाठी? कारण धर्म, नीतिमत्ता, पूजापाठ, समाजकार्य वगैरे सर्व काही मस्जिदीमधून होऊ शकते. ‘रणभूमी’चा या बाबीशी काय संबंध आहे?
  • इस्लामी कायद्यात मानवहत्येची शिक्षा

    एखाद्या माणसाला जीवे मारणे हे किती मोठे पाप आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. एका माणसाची हत्या करणे म्हणजे समस्त मानवजातीची हत्या करण्यासम असल्याचे कुरआनात म्हटले आहे.(संदर्भ : सूरह-ए-माइदा : ३२) म्हणूनच इस्लामने मानवहत्या करण्याची शिक्षासुद्धा कठोर स्वरुपाची दिली आहे. शिवाय ही शिक्षा ईह आणि पारलौकिक या दोन्ही जीवनात तजवीज करण्यात आली आहे. मानवहत्या करणारी व्यक्ती नेहमीसाठी नरकाग्नीत राहणार. कुरआनात म्हटले आहे,
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]