Islam Darshan

कुरआन : एक स्वप्रमाणित ईश्वरी ग्रंथ

Published : Wednesday, Feb 03, 2016

कुरआन एक असामान्य ग्रंथ आहे. त्याचे वाचन करताना स्पष्टपणे जाणवते की त्याचा लेखक एका अशा उच्च स्थानाहून बोलत आहे, जे कोणत्याही मनुष्यास प्राप्त नाही. त्याची लेखन शैली, भाषाशैली, निवेदन शैलीचा प्रवाह आणि त्याची निर्णायक मर्मभेदक वर्णनशैली, मानवी भाषाशैलीपेक्षा अगदी भिन्न व आर्श्चयजनक आहे. यावरून ही मानवी वाणी नव्हे तर सृष्टीच्या स्वामीची वाणी असल्याचे प्रकर्षाने जाणवते. हा ईश्वरी ग्रंथ आहे ज्यामध्ये ईश्वर आपल्या दासांना संबोधित असल्याचे, त्याची परिपूर्ण विश्वासाने ओतप्रोत श्रेष्ठ वाणी साक्ष देत आहे.

कुरआन मध्ये सृष्टीची वास्तवता कथन केली गेली आहे. मानवाच्या अंतिम परिणामाची सूचना देण्यात आली आहे. आणि जीवनाच्या उघड व गुप्त पैलू संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. परंतु हे सर्व काही इतक्या खात्रीलायक - पणे निवेदन केले आहे की प्रत्यक्षात घटना घडत असल्याचे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. कुरआनचे वाचन करताना अशी अनुभूती होते जणू मानवाला सत्याचे ज्ञानच दिले जात नसून त्याला सत्याच्या पुढे नेऊन उभे करण्यात आले आहे. तो घटनांचे ग्रंथाच्या पृष्ठावर वाचन करीत नसून जणू एखाद्या पडद्यावर आपल्या उघड्या डोळ्यांनी त्या पहात आहे. वाणी मधील स्पष्टवक्तेपणा, हा एक अशा अस्तित्वाचा ग्रंथ आहे ज्यास प्रत्यक्षपणे अंतिम सत्याचे सर्वस्वी ज्ञान असल्याचे उघड करीत आहे. कोणताही मनुष्य जो सत्याचे व्यक्तीशः ज्ञान बाळगत नसेल तो आपल्या वाणी संभाषणात कदापि अशा प्रकारचा जोर वा निश्चितपणा आणू शकत नाही. याठिकाणी नमुन्यादाखल कुरआनच्या एका छोट्याशा ‘सूरह’ (अध्याय) चा अनुवाद प्रस्तुत करीत आहे -

जेव्हा आकाश फाटेल आणि जेव्हा तारे विस्कळून पडतील आणि समुद्र फाडून टाकले जातील आणि कबरी उघडल्या जातील त्यावेळी प्रत्येक माणसाला त्याने पुढचे मागचे केले सवरलेले सर्व कळेल.

हे मानवा ! कोणत्या गोष्टीने तुला आपल्या उदार पालनकर्त्याच्या बाबतीत संभ्रमात टाकले? त्याने तर तुला निर्माण केले, तुला नखशिखांत व्यवस्थित केले, तुला प्रमाणबद्ध बनविले, आणि ज्या रूपात इच्छिले तुला जोडून तयार केले? कदापि नाही, तर (खरी गोष्ट अशी आहे की) तुम्ही लोक मोबदला व शिक्षेला खोटे ठरविता. वस्तुतः तुमच्यावर निरीक्षक नेमले आहे, असे सन्माननीय लिहिणारे जे तुमच्या प्रत्येक कृत्याला जाणतात.

खचितच सदाचारी लोक मजेत असतील आणि दुराचारी लोक नरकात जातील. बदल्याच्या दिवशी ते तिच्यात दाखल होतील आणि तिच्यातून मुळीच बाहेर पडू शकणार नाहीत. आणि तुम्ही काय जाणता की तो बदल्याचा दिवस काय आहे? होय, तुम्हाला काय कल्पना की बदल्याचा तो दिवस काय आहे? हा तो दिवस आहे जेव्हा कोणत्याही माणसासाठी काही करणे कुणाच्याही आवाक्यात नसेल. निर्णय त्या दिवशी अल्लाहच्याच अखत्यारीत असेल.

किती विश्वासाने परिपूर्ण ही वाणी आहे. त्यामध्ये जीवनाचा आरंभ व अंत सर्वकाही उल्लेखले गेले आहे. कोणतेही मानवनिर्मित पुस्तक जे जीवन व विश्वाबाबत लिहिले गेले असेल, अशा प्रकारच्या विश्वासाचे उदाहरण प्रस्तुत करू शकत नाही. शेकडो वर्षापासून मनुष्य विश्वाच्या वास्तवतेवर विचार चितन करीत आहे. मोठमोठे तत्वज्ञानी व शास्त्रज्ञ जन्मले परंतु इतक्या दृढ विश्वासानिशी कोणी बोलण्याचे धाडस करू शकला नाही. एखाद्या निश्चित स्वरुपाच्या वा सत्य ज्ञानापासून अद्यापि फार दूर असल्याचे स्वतः विज्ञान आज देखील कबुल करते, जेव्हा की कुरआन इतक्या विश्वासानिशी कथन करतो आहे जसे सत्याच्या अंतिम सीमेशी तो परिचीत असावा.

कुरआन, ईश्वरी ग्रंथ असल्याचा दुसरा पुरावा हा की त्याने अलौकिक व प्राकृतिक विषयापासून ते सांस्कृतिक, सामाजिक प्रश्नापर्यंत सर्व महत्वपूर्ण विषयावर चर्चा केली आहे, परंतु त्याच्या वर्णनात कोठेही विरोधाभास आढळत नाही. ही वाणी येऊन सुमारे दिड हजार वर्षाचा कालावधि लोटला आहे. त्या कालावधि दरम्यान नवनवीन गोष्टी मानवाला ज्ञात झाल्या आहेत. परंतु त्यात उल्लेखित गोष्टीमध्ये आजही विरोधाभास प्रकट होऊ शकला नाही. मानवापैकी एखाद्या तत्ववेत्त्याचे, त्याने प्रस्तुत केलले तत्वज्ञान, विरोधाभास वा विवादापासून शुद्ध असेल, असे एखादेही नाव सापडू शकत नाही. या कालावधीत हजारो तत्वज्ञानी व चितक जन्मले ज्यांनी आपल्या बुद्धीनुसार जीवन आणि सृष्टीची व्याख्या करणेचा प्रयत्न केला. परंतु अल्पावधितच त्यांनी मांडलेल्या कल्पना मध्ये विरोधाभास प्रकट होऊ लागला आणि काळाने त्याना रद्दबातल ठरविले.

एखाद्या वाणीचे विरोधाभासापासून सुरक्षित असणे हे, ती वाणी पूर्णतः सत्य व वास्तविकतेशी अनुकूल आहे, या गोष्टीचा पुरावा आहे. माणसाला सत्याचे ज्ञान नसेल अथवा आंशिक रूपात अत्यल्प ज्ञान असेल तर जेव्हा कधीही तो सत्याचे वर्णन करू लागेल त्यावेळी निश्चितरित्या तो विरोधाभासाला बळी पडेल. एका पैलू संदर्भात व्याख्या करते वेळी दुसर्या पैलूकडे तो लक्ष देऊ शकणार नाही. तो एक वाट मोकळी करील तर दुसरी बंद करून टाकील. जीवन आणि विश्वाच्या व्याख्येचा प्रश्न सार्वभौम प्रश्न आहे. त्याच्या उत्तराकरिता सर्व सत्यांचे ज्ञान आवश्यक आहे. मानवाला आपल्या मर्यादित क्षमताद्वारे सर्व सत्ये जाणून घेणे शक्य नाही. यास्तव तो सर्व पैलूवर लक्ष देऊ शकत नाही. मानवनिर्मित तत्वज्ञानात विरोधाभास अनिवार्यतः आढळण्याचे हेच कारण आहे. अशा प्रकारच्या विरोधाभासापासून कुरआन पवित्र, शुध्द आहे, हे कुरआनचे वैशिष्टय होय. सत्याची वास्तविक खरी व्याख्या असण्याचा हा पुरावा आहे. याखेरीज अन्य सर्व व्याख्या चुकीच्या अशुद्ध आहेत. ही वास्तवता उदाहरणाद्वारे मी स्पष्ट करीन.

 1. जीवनाच्या विषयाशी संबंधित जे पुस्तक लिहिले जाईल त्याचा एक महत्वपूर्ण अध्याय जीवनातील कर्तव्ये निश्चित करणे असेल. माणसाची कर्तव्ये, जबाबदार्या निश्चित करताना त्याच्या भिन्न भिन्न अंगाचा सारासार यथायोग्य विचार करणे गरजेचे आहे. एका पैलूने अशी एखादी आज्ञा केली जावी की दुसर्या पैलूशी तिचा संघर्ष होता कामा नये. उदाहरणार्थ, स्त्री आणि पुरुषाचे स्थान निश्चित करणे सामाजिक जीवनाचा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. आधुनिक प्रगतीशील युगाने स्त्री - पुरुष समानतेचा उद्घोष केला आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समानरित्या काम करण्याची दोहोना संधी मिळाली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु आपल्या येथे मानवनिर्मित या सामाजिक कायद्याचा यथार्थ वास्तवतेशी संघर्ष होतो आहे. अर्थात जीवशास्त्रा (इळश्रिसिू) नुसार स्त्री आणि पुरुषा दरम्यान समानता नाही. या दृष्टिकोनातून दोघानी जीवनाचे ओझे समानरित्या उचलावे, हे शक्य नाही. याउलट कुरआनने सामाजिक, सांस्कृतिक जीवनात स्त्री पुरुषाचे जे स्थान निश्चित केले आहे, ते दोहोंच्या जन्मजात स्वाभाविक वैशिष्टयाशी अनुकूल आहे आणि कायदा व वास्तवते दरम्यान त्याने विरोध, संघर्ष निर्माण होत नाही.

 2. ज्याप्रकारे एका सार्वभौम, सर्वव्यापी गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार तारे गतीमान आहेत, त्याचप्रमाणे काही अटळ ऐतिहासिक नियम आहेत, जे सामाजिक परिवर्तनास कारणीभूत ठरतात. हे नियम निरंतरपणे कार्यरत आहेत आणि त्यानुसारच मानवी जीवनात क्रांती घडते, असे माक्र्स ने क्रांतीचे तत्वज्ञान मांडले आहे. परंतु हे तत्वज्ञान प्रस्तुत करण्याबरोबरच त्याने ही घोषणा देखील करून टाकली -

  ‘‘जगातील मजुरांनो, एक व्हा !’’
  परस्पर विरुद्ध अशा या दोन गोष्टी आहेत, हे उघड आहे. जर सामाजिक परिवर्तनाचा एखादा अटळ नियम अस्तित्वात आहे तर राजकीय संघर्षा (वर्ग संघर्ष) ची गरजच नाही आणि राजकीय संघर्षाद्वारे क्रांती घडत असते तर मग अटळ ऐतिहासिक नियमांचा काय अर्थ?

  याउलट कुरआन मानवी संकल्प अथवा मानवी निश्चयाचा स्वीकार करतो. जीवनात ज्या घटना घडतात त्या मानवाच्या स्वतःच्या प्रयत्नांचे फळ असते असे त्याचे तत्वज्ञान आहे. भौतिक जगाप्रमाणे या घटनांचा एखादा निश्चित असा तर्क नाही तर मानवाचे प्रयत्न त्यास कोणतेही रूप देऊ शकते. निश्चितच प्रकृतीचे काही नियम आहेत, परंतु त्यांची कार्यपद्धत ही आहे की ते मानवी प्रयत्नांना साथ देऊन त्यास ध्येयापर्यंत नेऊन सोडतात. मानवी प्रयत्न त्या नियमांचे बाह्य प्रकटिकरण नसते. अशा प्रकारे कुरआनचा दृष्टिकोन व आवाहनामध्ये कोणताही विरोधाभास नाही. आपल्या दृष्टिकोनाला व्यवहारिक रूप देण्याकरिता जेव्हा ते लोकांना आवाहन करते तेव्हा आपल्या तत्वज्ञानाचे ते समर्थन करते, खंडन करीत नाही. याविपरीत माक्र्सवादी तत्वज्ञान त्याच्या व्यावहारिक कार्यक्रमाशी स्पष्टरित्या संघर्ष करीत आहे. कम्युनिस्ट पक्षांचे अस्तित्व खर्या अर्थी माक्र्सवादी तत्वज्ञानाचे खंडन आहे. कम्युनिस्ट जाहिरनाम्यातील अंतिम वाक्य त्याच्या पहिल्या वाक्याचे खंडन करीत आहे.
  कुरआनची शिकवण मानवी तत्वज्ञानाच्या तुलनेने पाहिल्यास अशा प्रकारची अनेक उदाहरणे तुम्हास मिळतील.

 3. जवळपास पंधराशे वर्षापासून कुरआन पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे, हे त्याचे तिसरे वैशिष्टय होय. या कालावधीत कित्येक क्रांती घडल्या, इतिहासाची किती उलटापालट झाली, कित्येक युग बदलले, काळ बदलला परंतु आजपावेतो त्याची कोणतीही गोष्ट चुकीची, असत्य ठरली नाही. प्रत्येक काळातील बौद्धिक संभावना आणि सामाजिक, सांस्कृतिक गरजांना निरंतर साथ देत ते चालले आहे. त्याच्या शिकवणीची सर्वव्यापकता कोठेही संपत नाही. प्रत्येक युगातील समस्यावर ती प्रभावी होत चालली आहे. हे या महान ग्रंथाचे एक असे वैशिष्टय आहे जे कोणत्याही मानवी ग्रंथाला आजपावेतो प्राप्त होवू शकले नाही. मनुष्यनिर्मित प्रत्येक तत्वज्ञान अल्पावधितच आपल्यातील उणीवा प्रकट करते. परंतु शतकानुशतकाचा काळ लोटत चालला आहे आणि सदर ग्रंथाच्या सत्यते मध्ये काहीच फरक पडला नाही.

हा नियम-कायदा त्यावेळी बनविला गेला ज्यावेळी अरबस्तानच्या असंस्कृत आणि विखुरलेल्या टोळ्यामध्ये इस्लामी राज्यस्थापनेचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु तद्नंतर कित्येक शतकापर्यंत इस्लामी राज्यसत्तांच्या सर्व आवश्यकतेची तो पूर्तता करीत राहिला. त्याचबरोबर विद्यमान प्रगतीशील युगात - ही तो आधुनिक काळाची साथ देण्यास पूर्णपणे समर्थ आहे. किबहुना तीच एकमात्र अशी व्यवस्था आहे जी खर्या अर्थाने जीवनाच्या समस्यांचे निराकरण करू शकते. दिड हजार वर्षापूर्वी ज्याप्रमाणे त्याने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले होते त्याचप्रमाणे आज देखील सर्व तत्वज्ञानांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व अबाधित आहे.
जीवनाबाबत कुरआनने जो दृष्टिकोन दिला होता आणि व्यक्ती व समाजाच्या व्यवहाराकरिता जो आराखडा बनविला होता, तो आजही जीर्ण झालेला नाही. अथवा त्यामध्ये एखादी उणीव वा त्रुटी काढता येणे शक्य नाही. हा कुरआनचा चमत्कार होय. दरम्यानच्या काळात कित्येक तत्वज्ञानांचा जन्म झाला व ते संपुष्टातही आले, कित्येक व्यवस्था निर्माण झाल्या व संपल्या परंतु कुरआनच्या दृष्टिकोनाची यथार्थता, सत्यता आणि व्यवहारिक व्यवस्थेची उपयुक्तता आज देखील आपल्या जागी विराजमान आहे. जल, वायुसमान स्थळ, काळाच्या बंधनातून मुक्त आहे. दोन्ही दृष्टीकोनातून मी या ठिकाणी एक एक उदाहरण प्रस्तुत करीन.

विश्वाला कार्यरत ठेवणारी एक शक्ती आहे, जी आपल्या इच्छेनुसार त्यास गती देत आहे, असा कुरआनने दावा केला होता. युरोपच्या पुनर्जागरणाच्या फार आधी कुरआनने हा दावा केला होता. तद्नंतर कित्येक तत्ववेत्ते व शास्त्रज्ञ निर्माण झाले ज्यानी अत्यंत जोरदारपणे विश्व हे एक भौतिक मशीन आहे जी स्वंयचलित आहे असा दावा केला. या विचारसरणीचा प्रभाव दोनशे वर्षापर्यंत मानवाच्या मनमस्तिष्कावर राहिला. विज्ञानाच्या प्रगतीने जणू कुरआनचा दावा रद्दबातल केला असल्याचे वाटत होते. परंतु तद्नंतर विश्वाच्या अध्ययनाने स्वतः वैज्ञानिकांनी निष्कर्ष काढला की जीवनाची व सृष्टीची व्याख्या केवळ भौतिक नियमांच्या आधारे केली जाऊ शकत नाही. आता विज्ञान दिवसेदिवस कुरआनच्या त्या विचारसरणीकडे परतत आहे, ज्यानुसार या विश्वापलिकडे एक शक्ती आहे जी आपल्या इच्छेनुरूप त्यास गती देत आहे. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर जेम्स जीन्स सदर परिवर्तनाबाबत स्पष्टिकरण देताना लिहितात,

‘‘माहिती विज्ञानाने मागील काही वर्षात अत्यंत वेगाने एक नवीन दिशा घेतली आहे. तीस वर्षापूर्वी आमचा समज होता अथवा आम्ही कबूल केले होते की आम्ही एका अशा अंतिम सत्याकडे मार्गक्रमण करीत आहोत जे आपल्या स्वरूपाच्या दृष्टीने यांत्रिक आहे. असे वाटत होते जणू सृष्टी, अणूंच्या एका अशा विस्कटीत ढीगांनी बनली आहे जे योगायोग वा अपघाताने एकत्रित झाले असावेत. त्यांचे कार्य असे की व्यर्थ, निरुद्देश्य अथवा अंध शक्तीच्या आधारावर अविवेकी असे काही कालावधीकरिता निरर्थक नृत्य करीत रहावे, ज्याच्या नष्ट पावल्यानंतर एक मृत विश्व शिल्लक राहते. या निव्वळ यांत्रिकी जगतात त्या अंध शक्तींच्या क्रिये दरम्यान जीवन एका अपघातापायी योगायोगाने निर्माण झाले आहे. विश्वातील एक अत्यंत लहानसा अंश काही काळापुरता योगायोगाने सचेत झाला आहे. परंतु सद्यस्थितीत उपलब्ध माहितीनुसार ज्ञान प्रवाह आता आपणास एका अयांत्रिकी सत्या (Non Mechanical Reality) कडे घेऊन जात आहे, या गोष्टीवर विज्ञानाचे एकमत आहे.’’

याच लेखात पुढे त्यानी लिहिले आहे,

‘‘उतावीळपणे प्रस्थापित केलेल्या आपल्या आधीच्या विचारांचे पुनर्निरिक्षण करण्यास आधुनिक माहिती आपणास विवश करते आहे. अर्थात आम्ही योगायोग म्हणून एका अशा विश्वात येऊन पडलो आहोत, ज्याचा जीवनाशी काहीच संबंध नाही वा जीवनाशी पद्धतशीररित्या ते वैर बाळगते या विचारांचे-सृष्टी एका अशा निर्माण शक्ती वा नियंत्रण शक्ती (Disigning or Controlling Power) चा पुरावा उपलब्ध करीत आहे जो आपल्या मानवी मस्तिष्काशी बर्यापैकी मिळता जुळता आहे, हे आम्हास आता उमगले आहे...’’ (मॉडर्न साइंटिफीक थॉटस्, पृष्ठ १०४)

वैचारिक अंगाचे हे एक उदाहरण होते. आता व्यवहारिक बाजू पाहू या. इस्लामने सामाजिक जीनवाकरिता जो कायदा बनविला आहे, त्यानुसार एका पुरुषाला चार स्त्रीयांशी विवाह करण्याचा अधिकार आहे. इस्लामनंतर जेव्हा पाश्चिमात्य संस्कृतीचा उदय झाला तेव्हा त्यानी या कायद्याची फार थट्टा मस्करी केली. आणि त्यास अज्ञान युगातील पाशवी कायदा संबोधिले. त्यांच्या मतानुसार इस्लामचा सदर कायदा म्हणजे स्त्रियांवर अगदी अन्याय होता. आणि या आधारावर कधीही कोणत्याही उन्नतीशील समाजनिर्मितीची इमारत उभी करणे अशक्य असल्याचे त्यांचे मत होते. तसे पाहता ख्रिश्चन धर्मामध्ये त्याची तरतूद होती परंतु पाश्चिमात्य संस्कृतीने ती मूळातून काढून टाकली आणि एखाद्या व्यक्तीने एक पत्नी असताना दुसर्या स्त्रीशी विवाह करणेस एक अत्यंत निदनीय कृत्य ठरवून टाकले. या विचारांचा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झाला की कोणताही पुरुष आता हे साहस करू शकत नाही. कोणतीही स्त्री आपल्या बाबतीत असा विचार करू शकत नाही की एखाद्या पुरुषाची दुसरी वा तिसरी पत्नी बनावे, अशी परिस्थिती आजमितीस आहे.

परंतु परिस्थितीने विशेषकरून दुसर्या महायुद्धाच्या परिस्थितीने आता हे सिद्ध केले आहे की एकापेक्षा जास्त विवाहाची परवानगी वस्तुतः एक व्यवहारिक गरज आहे. कधी काही लोकांच्या जीवनात आणि कधी संपूर्ण समाजाकरिता अशी असाधारण परिस्थिती निर्माण होते की दोन गोष्टीपैकी एकाची निवड करणे अनिवार्य होते. एक तर चारित्र्यहीनता अथवा दुराचाराचा स्वीकार करावा ज्याचा अर्थ संपूर्ण समाज व संस्कृतीला एका भयानक संकटात झोकून देणे आहे किवा बहुविवाहाचा स्वीकार केला जावा ज्यामुळे समस्येचे निराकरणही होते आणि कोणता बिघाडही निर्माण होत नाही. दुसर्या महायुद्धानंतर युद्धात सामील त्या सर्व देशामध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणात जिवंत राहिल्या आणि पुरुष बहुसंख्येंने मारले गेले. अशी परिस्थिती निर्माण झाली. पुरुषांची संख्या कमी व स्त्रियांची संख्या जास्त झाली. त्याचा प्रभाव आज अखेर आहे. इ. स. १९५५ च्या जनगणनेनुसार जपान मध्ये प्रत्येक पुरुषामागे आठ स्त्रियांची सरासरी होती. या महायुद्धाचा सर्वात जास्त फटका जर्मनीला बसला. तेथे असंख्य स्त्रिया विधवा झाल्या आणि कित्येक बालके अनाथ झाली. मुलींना वर मिळणे कठीण झाले. परिणामस्वरुप त्या देशामध्ये बेवारस आणि अनौरस मुलांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली. जे अनाथ झाले, त्यांना कोणी वारस उरला नाही आणि ज्या स्त्रिया पतीपासून वंचित झाल्या होत्या, त्यांनी प्राकृतिक निकडीच्या परिणामस्वरुप विवश होऊन आपल्या कामेच्छा पूर्ण करण्याकरिता अनुचित मार्गाचा अवलंब करण्यास सुरुवात केली. परिस्थिती इतकी टोकाला पोहचली की जर्मनीमध्ये काही स्त्रियांच्या घरावर अशा प्रकारचा फलक झळकू लागला -

(रात्रीसाठी एक पाहुणा हवा आहे)

दुसर्या महायुद्धात लढणार्या देशातील असंख्य पुरुष मारले गेले. परिणामस्वरुप स्त्रिया वैवाहिक जीवनाशी निराश होऊन वेश्येचे जीवन जगू लागल्या. जेम्स एम. कैमरोन (गराशी च. उराशी) दुसर्या महायुद्धाच्या प्रसंगी जर्मनीत पत्रकार होते. या अनुषंगाने त्यानी आपल्या स्मृती प्रकाशित केल्या आहेत. हा ब्रिटिश पत्रकार त्यामध्ये लिहितो,

‘‘युध्द संपल्यानंतर मी बर्लिनला गेलो तेव्हा भग्नावस्थेतील हे शहर भुकेल्या वेश्या नी भरले होते. मी त्याचे विस्मरण करायचे ठरवले परंतु करु शकलो नाही.’’

यापुढे ते लिहितात

‘‘युद्ध सहन करण्याची शक्ती तर माझ्यात होती परंतु हा विजय सहन करण्याची शक्ती माझ्यात नव्हती.’’ (गार्डियन, १० ऑक्टोबर १९८२)

तसे पाहता पाश्चिमात्यानी आपल्या मस्तिष्क व बुद्धीने यासंदर्भात अद्यापि आपली चूक कबूल केलेली नाही. परंतु सत्य परिस्थितीने त्यांचे चुकीच्या मार्गावर असणे सिद्ध केले आहे आणि तो दिवस दूर नाही जेव्हा प्रत्यक्षात ते स्वीकारले जाईल. त्यावेळी कळून चुकेल की विवाहाबाबत ज्या सिध्दांताचा पाश्चिमात्यानी अंगिकार केला होता, त्याचा अर्थ समाजाला अश्लीलतेत झोकून अपराधांची असंख्य द्वारे उघडी करणे आहे. इस्लामचा सिद्धांत मूळ समस्येचे उत्कृष्ट पद्धतीने निराकरण करतो आहे आणि समाजाला गंभीर परिणामापासून वाचवित आहे.

कुरआनची विचारसरणी आणि त्याच्या कायदाबंधनाच्या चिरस्थायित्वाची ही दोन उदाहरणे होती. यावरून मानव निर्मित सिध्दांत व कायदे बनत राहिले, नष्ट पावत राहिले, परंतु कुरआनने प्रथमदिनी जे कथन केले होते, शेवटच्या दिनापर्यंत त्याच्या सत्यतेत कोणताही फरक पडला नाही, हे स्पष्टरित्या उघड होते. ज्याप्रमाणे पूर्वी ते सत्य होते त्याप्रमाणे आजही सत्य आहे. ज्याच्या ज्ञानाने भूतकाळ ते भविष्यकाळ सर्वकाही व्यापले आहे, अशा बुद्धीची ती निपज असल्याचे कुरआनच्या या वैशिष्टयानी उघड होत आहे. कुरआनचे चिरस्थायित्व, कुरआन ईश्वरी ग्रंथ असल्याचा उघड पुरावा होय.

संबंधित लेख

 • इस्लाम व कम्युनिझम

  निस्संशय इस्लाम जीवनातील सर्व प्रकारच्या चांगुलपणाचा, सद्गुणांचा संयोग तसेच निकोप जीवनमूल्यांचे नाव आहे. हा एक शाश्वत धर्म असून मानवी पिढ्यांच्या सुधारणेसाठी कायदा पद्धत आहे. गेली चार शतके इस्लामी समाज ज्या प्रकारच्या कठीण तणावात व असंतोषात गुरफटलेला आहे. त्यामुळे आर्थिक समस्यांशी निगडित असलेला इस्लामी कायद्याचा भाग तुंबला गेला आहे व स्थगित झाल्यासारखा आहे; तसेच आपले निरंतर विकास कार्य पुढे चालू ठेवू शकत नाही. म्हणून आपल्या आध्यात्मिक व वैचारिक शुद्धीकरणासाठी इस्लामी श्रद्धेचा अवलंब करुन आर्थिक समस्या सोडविण्यासाठी कम्युनिझमला मार्गंदर्शक बनवून घ्यावे हेच अधिक चांगले नाही काय?
 • प्रेषितांची कार्यप्रणाली आणि शासन

  प्रेषितांना जे कार्य सोपविण्यात आले होते ते व्यावहारिकदृष्ट्या दुसरे तिसरे काही नसून धार्मिक आणि इस्लामी शासन स्थापन करण्याचे कार्य होते. प्रेषितांना धार्मिक आणि इस्लामी शासनव्यवस्था कायम करण्याचे महत्कार्य यासाठी सुपूर्द करण्यात आलेले होते की त्याव्यतिरिक्त इस्लाम (अल्लाहचा धर्म) पूर्णरूपेन कार्यान्वित होऊ शकतच नाही. सत्तेशिवाय ईशधर्माचे तंतोतंत पालन अशक्य आहे. हे आज जितके सत्य आहे तितकेच प्रेषितकाळातसुध्दा होते. याच एकमेव कारणासाठी ईशधर्मांनी आपली सर्व ताकत शासन- सत्ता प्राप्त करण्यात खर्ची घातली होती. ही दुसरी गोष्ट आहे की आजची स्थिती अनुकूल नाही. अतोनात कष्ट करूनसुध्दा फलश्रुती नाही, हे चित्र आहे. स्वाभाविकपणे, कार्यप्रणालीची यशाचे शिखर गाठण्याची असमर्थता ही एक बाब आणि त्याचे आंतरिक पूर्णत्व दुसरी बाब आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]