Islam Darshan

इस्लामचा चौथा आधारस्तंभ सौम (रोजा) - उपवास

Published : Friday, Feb 05, 2016

सौम अथवा सियाम याचा अर्थ होतो आराम करणे. मनुष्य उपवासाच्या कालावधीत खाणे, पिणे आणि समागम करणे यास पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत आराम देतो.

रोजाची वैशिष्ट्ये: कुरआनने रोजाविषयीचे अनेक फायदे आणि लाभदायक गोष्टी वर्णन केलेल्या आहेत. त्यातील काही मौलिक महत्त्वाच्या आहेत. रोजाचे महत्त्व समजण्यासाठी त्याची सुधारणात्मक वैशिष्ट्ये पाहणे आवश्यक आहे.

ईशपरायणता स्रोत: प्रथम आणि अतिमहत्त्वाचा रोजा (उपवास) चा गुण ईशपरायणता आहे. कुरआन, हदीस आणि मानवी बुध्दीने अनेक उदाहरणे याबद्दलची दिलेली आहेत. कुरआनने ही वास्तविकता सांगताना स्पष्ट केले आहे,

‘‘हे श्रध्दावंतांनो! विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यांवर जेणेकरून तुम्ही ईशपरायण व्हाल.’’ (कुरआन २: १८३)
प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथनसुध्दा वरील सत्यता स्पष्ट करीत आहे.

‘‘रोजा (उपवास) तुमच्यासाठी ढाल आहे (कारण या जगात तुम्हाला पापकर्मांपासून ते दूर ठेवते आणि परलोकात तुमचे नरकापासून संरक्षण करते).’’ - मुस्लिम

‘‘रोजा पाफत्यांविरुध्द ढाल आहे’’ म्हणजेच उपवास मनुष्याला पापभिरू आणि ईशपरायण बनवते. खालील प्रेषितकथन स्पष्ट करून सांगत आहे,

‘‘तुम्ही जेव्हा उपवास धराल, तेव्हा तुम्ही वाईट भाषा वापरू नका अथवा मोठ्याने बोलू नका. जर कोणी तुमच्याशी भांडत असेल, शिवीगाळ करीत असेल तर त्याला सांगा की मी उपवास धरलेला रोजादार आहे.’’ - मुस्लिम

याचाच अर्थ होतो की मुस्लिम नेहमीच शिवीगाळ आणि वाईट गोष्टींपासून दूरच राहतो. जेव्हा तो उपवास करतो तेव्हा याचे महत्त्व आणखी वाढते. जर त्याला या दुर्गुणांचा नेहमीच्या जीवनव्यवहारात विटाळ नसेल तर त्याने कमीतकमी उपवास कालावधीत त्या वाईट सवयींपासून दूर राहावे. हे प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन या गोष्टीचा स्वीकार करीत आहे की रोजा (उपवास) हे ईशपरायणता, पापभिरूता, धर्मनिष्ठा प्राप्त करण्याचे एक प्रबळ साधन आहे.

यासाठी कुरआन संकेत सर्वस्वी पुरावे आहेत. यासाठी आणखी चर्चेची मुळीच गरज नाही. परंतु अधिक समाधानासाठी बुध्दीचा वापर करून या वास्तवतेला अधिक स्पष्ट करू या. आपण यावर विचार करू या की रोजा मनुष्यात ईशपरायणता, पापभिरूता आणि धर्मनिष्ठा कशी निर्माण करतो?

आपण अगोदर हे पाहू या की ईशपरायणता (तकवा) म्हणजे काय आहे. हे त्या सखोल काळजीचे नाव आहे ज्यामुळे आपण अल्लाहच्या अप्रसन्नतेपासून आपला बचाव करतो आणि वाईटापासून दूर राहून चांगुलपणा आत्मसात करतो. दुसऱ्या शब्दांत ही अशी मनःस्थिती आहे की ज्यामुळे अशी मानसिकता तयार होते की मनुष्य आज्ञाधारकता आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी जीवन कंठत असतो. अशी व्यक्ती प्रत्येक क्षणी अल्लाहच्या प्रसन्नतेचा विचार करीत राहते. त्याला अल्लाहची अप्रसन्नता होऊ नये म्हणून एखाद्या कृत्यामुळे अल्लाहची अप्रसन्नता ओढवून घेण्याची भीती त्याच्या मनात नेहमी असते. अल्लाहला प्रसन्न करण्याचा कोणताही प्रसंग अथवा संधीला अशी व्यक्ती हातातून जाऊ देत नाही. ही धडपड आणि आकांक्षा अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करून घेणे आणि अल्लाहच्या अप्रसन्नतेपासून सुरक्षित राहाणे (ईशपरायणता) हे कसे प्राप्त करता येईल? हे तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा मनुष्याला त्याच्या ‘स्व’वर संपूर्ण नियंत्रण असेल आणि मनुष्य आपल्या इच्छा-आकांक्षेच्या आहारी गेलेला नसावा. मनुष्य आपल्या ‘स्व’ला नियंत्रित ठेवून आणि इच्छा-आकांक्षांना बंदिस्त ठेवूनच ‘ईशपरायणता’ प्राप्त करू शकतो. कुरआन स्पष्टोक्ती आहे,

‘‘आणि ज्याने आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्याचे भय बाळगले होते, आणि मनाला वाईट इच्छेपासून दूर ठेवले होते, स्वर्ग त्याचे ठिकाण असेल.’’ (कुरआन ७९: ४०-४१)

आता आपण ‘रोजा’ म्हणजे काय पाहू या. तीन गोष्टी या रोजासाठी पूर्वअटी आहेत. खाणे, पिणे आणि समागम करणे या तिन्ही गोष्टींचा प्रातःकाळापासून ते सूर्यास्तापर्यंत त्याग करणे. दुसऱ्या शब्दांत मनुष्याने आपल्या ‘स्व’च्या मागणीपासून (तिन्ही गरजांपासून) स्वतःला पूर्ण अलिप्त ठेवणे होय. या तीन गरजा ‘स्व’च्या सामुदायिक गरजांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त करून आहेत. इतर दुसऱ्या कोणत्याच गरजा इतक्या महत्त्वाच्या आणि शक्तिशाली नाहीत. इतर सर्व गरजा या तीन गरजांच्या नंतरच्या आहेत. त्या फक्त इच्छा अथवा गरजा नाहीत तर उत्कट स्वाभाविक इच्छा आहेत. मनुष्याचे अस्तित्वच त्यावर अवलंबून नाही तर त्याची वंशपरंपरा त्यावर अवलंबून आहे. त्याला खाणे आणि पिणे स्वतःला जीवंत ठेवण्यासाठी आणि वंशपरंपरावाढीसाठी समागम अत्यावश्यक आहे.

रोजा या शक्तिशाली उत्कट स्वाभाविक इच्छांवर नियंत्रण ठेवते. महिन्याभराचे आंतरिक प्रशिक्षण दररोज बारा ते चौदा तास निरंतर चालत राहते. मनुष्य या कालावधीत इतका तहानलेला बनतो की त्याला नीटसुध्दा बोलता येत नाही. त्याच्या हातात थंड पाणी आपली तहान भागविण्यासाठी असते. त्याला ते पाणी प्यावेसे वाटते परंतु रोजा असे करण्यापासून त्याला परावृत्त करतो आणि ती व्यक्ती असहाय्य बनते. अशाच प्रकारे इतर दोन, गरजांची स्थिती आहे. महिन्याभरात अशा व्यक्तीमध्ये कशा प्रकारची सहनशक्ती, संयम आणि ईशपरायणता निर्माण होत असेल. याची कल्पना करावी तितकी थोडीच! अशा प्रकारे रोजा (उपवास) मनुष्यामध्ये ‘स्व’ला नियंत्रित करून उत्कट स्वाभाविक इच्छांवर प्रबळ नियंत्रण ठेवते. ही ती शक्ती आहे की जिच्या साह्याने मनुष्य ‘स्व’ अथवा सैतानाने निर्माण केलेले अडथळे (दुराचार) दूर करून शुध्द धर्माचरण करतो. ही शक्ती मनुष्याला पापभीरू बनवते आणि मनुष्यात खऱ्या अर्थाने ईशपरायणता निर्माण होते. आणखी दुसरे महत्त्वाचे कारण उपवासांमुळे पापभीरूता निर्माण होण्याचे आहे. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या कथनानुसार,

‘‘उपवास (रोजा) दांभिकते पासून मुक्त आहे.’’ - फतहलबारी दांभिकतेचा अभाव हे या वास्तवतेची हमी आहे की मनुष्य अल्लाहच्या सान्निध्यात आहे. याव्यतिरिक्त चांगले आणि खात्रीलायक साधन असूच शकत नाही. म्हणून हे ईशपरायणतेच्या अत्युत्तम खाद्यापैकी एक आहे. याबद्दल शंका असू शकतच नाही.

स्वतः प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन आहे की ‘‘रोजा हे एक शाश्वत असे माध्यम आहे दांभिकतेपासून दूर राहण्याचे!’’ तसे पाहता नमाज हे दिखाव्याव्यतिरिक्त अथवा एखाद्याजवळ (नमाजी व्यक्ती) दांभिकता अथवा दिखावा नाही असे खात्रीलायक म्हणू शकतच नाही. हे मात्र रोजाबद्दल घडू शकत नाही.

रोजा हे दिखाव्यापासून आणि दांभिकतेपासून पूर्ण अलिप्त अशी उपासनापध्दती आहे. नमाज, हज आणि जकात या उपासनापध्दतीमध्ये काही अनिवार्य कार्य करावे लागते, नाहीतर ती उपासना ठरत नाही. असे मात्र रोजाबद्दल नाही. ही उपासना कुणीही पाहू शकत नाही की ऐकू शकत नाही. अशी उपासना दिखाऊ स्वरूपाची असूच शकत नाही. इस्लामच्या मूलतत्त्वांपैकी रोजा हे एक असे मूलतत्त्व आहे ज्यास दांभिकतेचा सैतान पछाडू शकत नाही.

‘रोजा’च्या याच गुणवैशिष्ट्यामुळे कुरआन वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख करीत आहे,

‘‘हे श्रध्दावंतांनो! विहित केले तुमच्यावर उपवास (रोजा) जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यांवर जेणेकरून तुम्ही ईशपरायण व्हाल.’’ (कुरआन २: १८३)

वरील संकेतवचन फक्त आणि फक्त रोजा (उपवा स) साठीच अवतरित झाले आहे. इतर उपासनापध्दतींद्वारे जरी ईशपरायणता प्राप्त होते तरी त्यांच्यासाठी अशा प्रकारचे वर्णन कुरआनमध्ये कोठेच आलेले नाही. रोजाच्या याच गुणवैशिष्ट्यामुळे अल्लाहने रोजा ‘‘माझा’’ आणि ‘‘माझ्यासाठी’’ हा शब्दप्रयोग केला आहे. उपवासाचा मोबदला आणि बक्षीस सर्वांपेक्षा वजनदार राहील अशी ग्वाही दिली आहे.

‘‘प्रत्येक सत्कृत्याच्या मोबदल्यात सत्कृत्य करणाऱ्यास दहा ते सातशे पटीने बक्षीस दिले जाईल परंतु रोजा यास अपवाद आहे. कारण हे फक्त ‘माझ्यासाठी’ आहे. म्हणून याचा मोबदला मी माझ्या मर्जीनुसार देणार. अल्लाह पुढे म्हणतो की रोजादार (उपासकरू) माझ्यासाठी अन्न-पाणी त्यागून देतो आणि वासनांना आवर घालतो तेसुध्दा माझ्यासाठीच!’’ (मुस्लिम)

‘‘रोजा माझ्यासाठी आहे’’ हेच सिध्द करते की या उपासनेत दिखावा नाही की दांभिकता नाही.

रोजामुळे ईशपरायणता आणि संयम यासारखे सद्गुण निर्माण करण्यावर भर दिला गेला आहे. धर्मशील बनण्यावर मुळीच भर दिला गेला नाही. हे खरे गमक आहे रोजा या उपासनेचे! मनुष्य रोजा कालावधित खाण्या-पिण्यापासून आणि संभोगापासून अलिप्त राहात असतो, याचाच अर्थ असा आहे की इतर वेळी मनुष्य अल्लाहच्या प्रसन्नतेविरुध्द कोणतीही गोष्ट करू शकत नाही. म्हणून रोजादार इतर बाबतीतसुध्दा अल्लाहच्या आज्ञापालनात राहतो, त्याच वेळी त्याचा रोजा खरा सिध्द होतो. किबहुना त्याचा रोजा भूक-तहानेशिवाय काहीच नाही. असा रोजा निरर्थक ठरतो. रोजा फक्त भूक-तहान आणि संभोग यापासून अलिप्त राहणे नव्हे. रोजा उपासनेच्या तांत्रिक बाबी आहेत. कोणी रोजाच्या बाह्य आणि तांत्रिक बाबींमुळे संतुष्ट होत असेल तर अशी व्यक्ती रोजा उपासनेच्या आत्म्याला आणि अंतरंगात प्रवेश करू शकत नाही. प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन आहे,

‘‘असे कितीतरी रोजादार (उपासकरू) आहेत ज्यांना भूक आणि तहानेशिवाय त्यांच्या पदरात काहीच पडत नाही.’’ (दारीमी)

अशी व्यक्ती कशा प्रकारची असते याबद्दल खालील प्रेषितकथनात स्पष्ट झाले आहे.

‘‘एखादी व्यक्ती खोटे बोलणे अथवा पाप करणे (दुराचार) सोडत नसेल तर अल्लाहला त्याच्या उपाशी राहण्याचे काहीएक देणे-घेणे नाही.’’ (बुखारी)

वरील प्रेषितकथनाने हेच सिध्द होते की रोजामध्ये या तिन्हींपासून (भूक, तहान आणि वासना) परावृत्त रखणे म्हणजे आपल्या ‘स्व’ला ताब्यात ठेवणे होय. रोजा यासाठीच प्रशिक्षण आहे. रोजा कालावधीत या कृती चालू राहिल्या तर अशा व्यक्तीला रोजाचे खरे उद्दिष्ट कळलेच नाही. म्हणून त्याने उपाशी राहण्यासारखेच आहे. रोजादार आणि खोजदार (रोजा न ठेवणारा) या दोन्हींमध्ये अशा वेळी काहीच फरक राहत नाही.

रोजा ईशपरायणतापूर्ण जीवन: दुसरे महत्त्वाचे कारण आहे रोजा हे ईशपरायणता प्राप्त करण्याचे एक प्रभावी साधन आहे. त्याच्याशिवाय मनुष्याच्या जीवनात ईशपरायणता येऊ शकत नाही. इतर सद्गुणांमुळे मनुष्य जरूर धर्मशील बनू शकतो, परंतु रोजा या सर्वांपेक्षा प्रभावशाली माध्यम आहे. रोजाची जागा दुसरी कोणतीच उपासनापध्दत घेऊ शकत नाही. कुरआन या संदर्भात स्षष्टोक्ती करीत आहे,

‘‘हे श्रध्दावंतांनो! विहित केले तुमच्यावर उपवास (रोजे) जशे विहित केले होते तुमच्या पूर्वींच्यावर जेणे करून तुम्ही ईशपरायण व्हाल.’’ (कुरआन २: १८३)

रोजाचा उद्देश फक्त श्रध्दाळू आणि धर्मशील बनून राहण्याचाच असता तर अल्लाहने ‘‘जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यांवर’’ हे वाक्य (आयत) येथे दिले नसते. हे एक ऐतिहासिक सत्य आहे की तुमच्या पूर्वींच्या लोकांसाठी (पूर्वजांना) सुध्दा रोजा अनिवार्य केला गेला होता. मुस्लिमांना रोजाच्या उद्देशापासून सचेत करण्यात आले आहे. वरील संकेतवचनामध्ये धर्मशीलतेचा उल्लेख आलेला नाही. तर या संकेतवचनांनुसार हेच स्पष्ट होते की ईशपरायण जीवन व्यतीत करण्यासाठी रोजाव्यतिरिक्त अन्य दुसरी अत्युत्तम अशी कोणतीच उपासनापध्दत नाही. दुसरे कोणतेच कृत्य त्याची जागा घेऊ शकत नाही. असे जर नसते तर उपवास प्रत्येक धर्माचा आधारस्तंभ गणला गेला नसता, हे वरील आयतीमुळे स्पष्ट होते. रोजाची अनिवार्यता हे सिध्द करते की नमाज, जकातप्रमाणे रोजासुध्दा धर्माची स्वाभाविक अनिवार्यता आहे. रोजाअभावी नमाजची शिस्तप्रिय व्यवस्था पूर्णतेला पोहचू शकत नाही.

रोजा रोजादार (उपासकरू) मध्ये ईशपरायणता कशा प्रकारे निर्माण करतो हे पाहण्यासाठी वरील स्पष्टीकरणाचा पुन्हा विचार करणे गरजेचे आहे. हे निर्विवादित सत्य आहे की रोजाव्यतिरिक्त अत्युत्तम प्रभावशाली दुसरी कोणतीच उपासनापध्दत (इस्लामचा आधारस्तंभ) नाही ज्यामुळे ईशपरायणता अंगीकारली जाते. त्यात दिखावा नाही की बडेजाव नाही. दांभिकता यात मनुष्याला शिवतसुध्दा नाही. यामुळे रोजा सर्वसामान्यजनांसाठी एक महत्त्वाची आणि आवडती उपासना आहे.

संबंधित लेख

  • ‘बद्र’ची लढाई ते ‘उहुद’ची लढाई

    ‘बद्र’च्या युद्धापासून ‘उहुद’च्या युद्धापर्यंत या दोन्ही घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या दोन्ही घटनांच्या परिस्थितीचा संक्षिप्तपणे आढावा घेऊ या. परंतु यापूर्वी ‘ज्यू’जणांनी निर्माण केलेल्या एका अप्रिय स्थितीचा उल्लेख करणे आवश्यक आहे. यावरून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची जीवनचर्या आणि इस्लामी इतिहास समजण्यास मदत होईल.
  • आज्ञाधारकता आणि कुरआन

    अल्लाहची भक्ती (उपासना, पूजा) हा मानवनिर्मितीचा एकमेव उद्देश आहे. यासाठी प्रेषितांची नियुक्ती केली. असे कार्य (अल्लाहची भक्ती) अनिश्चित आणि अपरिपक्व स्वरूपाचे असू शकतच नाही. हे फक्त पूजापाठ अथवा उपासनापध्दतीपर्यंतच मर्यादित नाही किवा फक्त आज्ञाधारकतेपुरतेच मर्यादितसुध्दा नाही. बुध्दीविवेक आणि कुरआननुसार हे सिध्द आहे. हे बुध्दीविवेकास धरून आहे की ज्या ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तोच ईश्वर मालक, पालक आणि शासक आहे आणि तोच एकमेव ईश्वर मानवासाठी पूजनीय आहे. सर्व प्रकारची भक्ती आणि उपासना फक्त त्या एकमेव ईश्वर (अल्लाह) साठीच आहे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]