Islam Darshan

माणसाला धर्माची गरज आहे काय?

Published : Wednesday, Feb 03, 2016

या धरतीवर वास्तव करणार्या एकूण सर्व प्राणीमात्रात मानव सर्वांहून श्रेष्ठ आहे. त्याची शक्ती व त्याचे प्रभुत्व मूलतः त्याच्या विचारशक्तीत आणि बुद्धीत आहे. त्याला बुद्धी व ज्ञानाची असीम कुवत देऊन त्याच्या श्रेष्ठत्वाची घोषणा जणू निसर्गानेच केली आहे. आपल्या सर्व श्रेष्ठत्वा-निशीही माणूस आपल्या गरजापोटी अगतिक व असहाय्य असल्यासारखा राहातो. जोवर त्याच्या गरजांची पूर्तता होत नाही, तोवर तो चिंताक्रांत व दुःखी राहतो. त्याच्या गरजा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चालू राहतात आणि काही गरजा तर त्याच्या मृत्यूनंतरही उरतात.

या गरजा अगणिक असतात. काही अशा आहेत की त्यांच्याविना माणूस जिवंतच राहू शकत नाही. हवा, पाणी व अन्न या मुख्य गरजा आहेत. यानंतर कपडे व निवासस्थान आहे. त्यानंतर अशा गरजांची शृंखला सुरू होते, ज्या मानवसमाजाच्या विकासासाठी आवश्यक असतात अथवा विशिष्ट व्यक्तींसाठी त्यांची गरज असते. माणसाच्या मूलभूत गरजांची जबाबदारी निसर्गाने स्वतःच घेतली आहे. कोणत्याही जीवित प्राण्याची पहिली गरज असणारी हवा, सर्व जागी व समान स्वरूपात आहे. पाणीही बर्याच पुरेशा प्रमाणात आहे. अन्न व इतर गरजांची पूर्तता करून घेण्यासाठी साधने व अवसर प्रदान केली गेली आहेत. आणि त्यांचा वापर करण्यासाठी माणसाला बुद्धी दिली गेली आहे. बुद्धीचा उपयोग करून विकास-प्रगतीचे नव-नवे टप्पे गाठले जाऊ शकतात. याचप्रमाणे माणसाच्या मार्गदर्शनाची जबाबदारीही निसर्गाने आपल्यापाशीच राखली आहे.

निसर्गाने माणसासाठी जी व्यवस्था करून ठेवली आहे, ती जरा जवळून पहिल्यास तिच्या वैचित्र्यात डोळे हरवून जातात. अर्भक जन्माला येताच, त्याला गरजेचा असा पौष्टिक व उपयुक्त आहार असलेले दूध, त्याच्या मातेच्या शरीरात निर्माण होण्याची सुरवात होते. जगात येण्यापूर्वीच त्याला कितीतरी सामग्री पुरवून सुसज्ज केले जाते. पाहण्यासाठी डोळे, ऐकण्यासाठी कान, चालण्यासाठी दोन पाय, बोलण्यासाठी जीभ व ओठ आणि सर्वांत जास्त महत्त्वाचे म्हणजे विचार करण्यासाठी बुद्धी, जन्मतः माणूस एक दुर्बल व असहाय्य जीव असतो. त्याला माता-पित्याची अपरिहार्य असलेली मदत जर त्यावेळी मिळाली नाही, तर कदाचित तो जिवंतही राहू शकणार नाही. किती उत्तम व्यवस्था केली आहे निसर्गाने!

समाजशास्त्रज्ञांनी माणसाला समूह करून राहाणारा प्राणी म्हटले आहे. ही गोष्ट बर्याच अंशी खरी नक्कीच आहे. पण ते केवळ माणसाचेच वैशिष्ट्य नाही, कारण मधमाशा, हरणे आणि मुंग्या यांच्यामध्ये सामूहिक जीवनाचे गुणवैशिष्ट्य अधिक प्रबळ असल्याचे आढळून येते. माणसाला सामाजिक प्राणी म्हणण्यापेक्षा, त्याला जर नैतिक प्राणी असे म्हटले गेले तर ते अधिक बरोबर होईल. अन्य प्राण्यांच्या तुलनेत नैतिकता हीच त्याची श्रेष्ठता आहे.

या नैतिकतेचे स्रोत कोणते आहे? ती कोणती गोष्ट आहे जी माणसाला इतर माणसांशी निःस्वार्थ प्रेम करायला शिकविते? दुर्बलांशी व अन्य माणसांशी चांगला व्यवहार करायला, इतरांना संकटात मदत करायला शिकविते? स्वतः कष्ट उपसून इतरांची सेवा करायला शिकविते, बर्या-वाईटाची पारख करायला शिकविते? माता, कन्या व पत्नी यांच्यामध्ये फरक करायला शिकविते? भौतिकवादापासून ही चेतना निर्माण होऊ शकते? मुळीच नाही. केवळ धर्माच्या आस्थेने व अनुभवानेच ती शक्य आहे. येथे आणखी एक प्रश्न उद्भवतो, धर्म म्हणजे काय?

धर्माची आस्था अशा शक्तीचे नाव आहे जी माणसाला अंतर्गत पावित्र्य देते आणि त्याच्या चरित्रात क्रांती घडवून आणते. धर्म माणसातील पाशवी गुणावर त्याच्यातील नैतिकतेला विजय मिळवून देते, असे म्हणतात ते उचितच आहे.

माणसाच्या जीवनाचे जरा बारकाईने अवलोकन केल्यास असे स्पष्टपणे दिसून येते की माणसाच्या गरजा केवळ भौतिकच आहेत, असे नसून त्याला नैतिक गरजाही आहेत. निसर्गाने जेथे माणसाच्या गरजांची पूर्तता होण्याची व्यवस्था केलेली आहे, तेथे त्याच्या नैतिक व आध्यात्मिक गरजांकडेही दुर्लक्ष केलेले नाही. धर्मावरील विश्वासामुळेच माणूस नीतीच्या सीमारेषेत राहून आपल्या भौतिक इच्छा पूर्ण करीत असतो. नैतिकतेच्या सीमारेषेच्या बंधनामुळेच लाभ-हानीच्या भावनेपेक्षा वर जाऊन मोठ्यातला मोठा त्याग व बलिदान करण्यास तयार होतो. धर्म माणसातील नैतिक चेतना जागृत करतो, तसेच ती अधिकाधिक प्रबळ करण्याचीही व्यवस्था करतो. नैतिकतेचा हाच अंश माणसामध्ये निःस्वार्थीपणाची भावना-धारणाही निर्माण करतो. याच कारणाने माणूस एखादा भौतिक लाभ, स्तुती-प्रशंसा आणि कीर्ती यापासून अलिप्त होऊन सेवाभाव आणि त्याग या गुणांचे दर्शन घडवितो. माणसाच्या जिवाचे अस्तित्व जसे हवा, पाणी व अन्नाशिवाय शक्य नाही, त्याचप्रमाणे त्याच्या नैतिक व आध्यात्मिक अस्तित्वासाठी धर्माची नितांत गरज आहे.

आपल्या काळातील कलह

मानव संस्कृतीचा इतिहास दाखवितो की विकास व प्रगती ही प्रत्येक काळात होत आलेली आहे. प्रत्येक काळ त्याच्या आधीच्या काळापेक्षा प्रगत व आधुनिकच राहिला आहे. पण आपल्या या वर्तमान युगात आधुनिकता एक कलह बनली आहे. एक मोठा बिघाड व एक सत्वपरीक्षा बनली आहे. डार्विनचे पुस्तक ‘ओरिजिन ऑफ स्पीशीज’ - पासून ते ‘प्रेस्ट्राइका’ पर्यंत विलक्षण तसेच विस्मयकारक विचार समोर आले आहेत. आणि माणसांना निसर्गानियमांविरूद्ध चालविण्याचे प्रयत्न होत राहिले. भौतिक विकासाच्या कल्पनेने माणसाला काही काळापुरते अशा फसगतीत लोटून टाकले आहे की त्याचे अस्तित्व केवळ भौतिकच आहे आणि आपल्या भौतिक गरजांच्या पूर्ततेच्या धडपडीतच त्याच्या सर्व प्रयत्नांचा शेवट आहे. मानवतेची चर्चा या राजकारणी जगात फार उदंड होत आली आहे, पण भौतिकवादामुळे मानवतेचा आणि मानवी मूल्यांचा र्हासच होत राहिला. या परिस्थितीत मानवता व नैतिकता ही एक उपभोगाची वस्तू झाली आहे, जिची धनदांडग्यांच्या मर्जीनुसार ठोक भावात खरेदी व विक्री केली जाऊ शकते. ही गोष्ट कदापि विसरता कामा नये की माणसाच्या अर्धजागृत मस्तकात धर्माचा जो उरला-सुरला प्रभाव आहे, त्याच्या परिणामस्वरूप, माणूस पशुतेच्या गर्तेत इतका खोलवर पोचलेला नाही, जेथपर्यंत एरवी त्याला पडायला हवे होते.

धर्मातील बिघाड

एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात ज्ञानाच्या प्रगतीबरोबरच धर्माबद्दल एक प्रकारची घृणा निर्माण झाली. खरे तर मध्यकालीन युरोपमध्ये झालेल्या धार्मिक बिघाडाचाच तो परिणाम होता. इहलोकीय लोभ-लालसेने बरबटलेल्या धार्मिक नेत्यांनी चर्चमधील धार्मिक व नैतिक स्थिती अगदी मोडकळीस आणून ठेवली होती. ख्यातनाम लेखक विल ड्युरँट याने, त्याच्या ‘स्टोरी ऑफ सिविलिजेशन’ या पुस्तकात त्या काळातील चर्चच्या अवनीतीची विस्तृत चर्चा केली आहे. त्याने लिहिले की चर्चमधील पुरोहितवर्ग अत्यंत धनलोलुप व अप्रामाणिक बनला होता. काही नाणी देऊन स्वर्गप्राप्तीचे हमीपत्र विकत मिळत असे. त्यानंतर कसलेही पाफत्य करायला वाट मोकळी असे. शासनकर्त्यांच्या मर्जीनुसार धर्मगुरू फतवे काढू लागले होते. याची प्रतिक्रियाही तितकीच तीव्र झाली. धर्मात सुधारणा करण्यासाठी एक आंदोलन सुरू करण्यात आले, परंतु दुदैवाने त्या आंदोलनात ख्रिश्चनधर्माची, किवा धर्माची फार मोठी हानी केली. त्यावेळीच्या धर्मगुरूंनी थोडीशी बुद्धी वापरली असती, तर धर्म आणि विज्ञान यामध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली नसती. त्याकाळी झालेल्या औद्योगिक क्रांतीने सर्व वातावरण व सर्व नातीगोती धनार्जनाच्या शर्यतीत बदलून टाकली. अशा तर्हेने धर्माचे व धार्मिक मूल्यांचे कसलेही मोल किवा प्रतिष्ठा उरली नाही.

धर्माचा व्यवसाय

धर्माच्या नावाखाली व्यवसाय करण्याचे केवळ चर्चपुरतेच मर्यादित होते, असे नसून एखाद्या विशिष्ट काळापुरतेही ते मर्यादित नव्हते. धर्माच्या नावाने स्वतःचा भौतिक लाभ उपटून भरभराट करून घेण्याचे काम सर्व काळात केले जात राहिले आहे. धर्माचे नाव घेऊन आणि लोकांच्या धार्मिक भावना भडकावून आपले काम साधून घेणे व आपला लाभ करून घेणे, हा काही लोकांचा अत्यंत आवडता धंदा बनला आहे. खर्या धर्माला व धर्माच्या खर्या गाभ्याला, त्याच्याशी काहीही देणे-घेणे नसते; ही गोष्ट सर्वांना चांगली ठाऊक आहे. पवित्र कुरआनने मानवांना वारंवार सावधान केले आहे की अल्लाहच्या वचनांची क्षुल्लक लाभापोटी विक्री करू नका.

धर्म पुरातन आहे

या जगात अनेक धर्म व त्यांचे अनुयायी आहेत. धर्माच्या उत्पत्तीसंबंधी तत्त्ववेत्त्यांनी फार मोठे वाद-विवाद केलेले आहेत. या विषयावर पवित्र कुरआनही प्रकाशझोत टाकतो. धर्माची अगदी सरळ व सोपी व्याख्या कुरआन देतो. कुरआन दाखवून देतो की माणसाच्या भौतिक गरजांप्रमाणेच त्याच्या नैतिक गरजांच्या पूर्ततेची व त्याच्या मार्गदर्शनाची व्यवस्था त्याच्या निर्माणकर्त्या स्वामीने विशेष स्वरूपात केली आहे. हे ईश्वरीय मार्गदर्शन हाच धर्माचा आधार असून त्यापर प्रगाढ श्रद्धा दृढ विश्वास बाळगणे आणि त्याचे पालन करणे, हाच धर्म आहे.

कुरआन दाखवून देतो की ज्या पहिल्या मानवी जोडप्याला धरतीवर धाडण्यात आले, त्याला जीवनाचे सर्व नियम सांगितले गेले होते. त्यानंतर त्यांच्या संततीने काही वर्षापर्यंत त्या नियमांचे पालन केले. मग हळू हळू ते नियम विसरून आपल्या इच्छा आकांक्षानुसार वागू लागले. जेव्हा तशी स्थिती निर्माण झाली तेव्हा ईश्वराने त्याच्या दुसर्या प्रेषिताला आपल्या आदेशांसह व नियमांसह पृथ्वीवर धाडले. हीच परंपरा सतत चालत राहिली आणि प्रत्येक भूप्रदेशावर ईश्वराचे प्रेषित येत राहिले. शेवटी प्रेषित मुहम्मद(स.) यांना संपूर्ण मानवजातीसाठी अंतिम दूत बनवून धाडण्यात आले. पवित्र कुरआन फर्मावितो -

आरंभी सर्व लोक एकाच मार्गावर होते. मग ती अवस्था उरली नाही व भेदाभेद प्रकट झाले, तेव्हा अल्लाहने ईशदूत धाडले. ते ईशदूत सरळ मार्गाने चालणार्यांना शुभसंदेश देणारे आणि वाईट मार्गाने चालणार्यांना त्याच्या परिणामांची भयसूचना देणारे होते आणि त्यांच्यावर आम्ही सत्यग्रंथ अवतरला, जेणेकरून सत्याबद्दल लोकांमध्ये जे विभिन्न मतभेद झाले होते, त्यांचे निराकरण केले जावे.- सूरह : बकरा : २१३

कुरआन दर्शावितो की सत्य प्राप्त करून झाल्यानंतर आपापसात अतिरेक करण्यासाठी ते आदेश विसरले आणि भेद निर्माण केले. अनादि काळापासून धर्माच्या रूपाने ईश्वरी नियम आणि आचारसंहिता अस्तित्वात असे; हे स्पष्ट आहे. कोणत्याही देशात व कोणत्याही काळात मानवसमाज धर्माविरहित नव्हता. जर्मन तत्त्ववेत्ता मॅक्स मुल्लर म्हणतो, ‘‘मानवी इतिहास हा धर्माचा इतिहास आहे.’’

धर्मगुरू आणि धर्माच्या शिकवणी

धर्माच्या इतिहासाचा आणि जगात आज आढळून येणार्या धर्मांचा अभ्यास केल्यास, सुरवातीपासूनच एकच धर्म होता, या मताचीच पुष्टी होते. धर्मांच्या शिकवणीतही फार मोठे साम्य आहे. मूळ नैतिक शिकवणी तर जवळजवळ सारखीच आहे. मोठमोठी सत्कृत्ये, जी करण्याचा आदेश देण्यात आले आहेत, तसेच मोठी दुष्कृत्ये ज्यांच्यापासून परावृत्त होण्यास सांगितले गेले आहे, ती सर्व एकसारखी आहेत. आरंभी धर्माचे स्वरूप एकच असावे, असा विश्वास करण्यास ही गोष्ट भक्कम आधार देते.

ईशदूतांनी व सच्चा धर्मगुरूंनी एकमेव ईश्वराची उपासना करण्याचा संदेश दिला आणि ईश्वरीय नियमांनुसार जीवन व्यतीत करण्याचे आवाहन केले, परंतु हे एक आश्चर्यजनक सत्य आहे की माणसांनी अंधश्रद्धेने ईशदूतांची व धर्मगुरूंचीच पूजा करायला सुरवात केली आणि त्यांनाच ईश्वराचे स्थान देऊन टाकले. त्यांच्याकडूनच सहाय्याची याचना करू लागले. धर्मगुरूचेच नाव आपल्या धर्माला देऊन टाकले.

वास्तविकपणे, सर्वच ईशदूतांनी आणलेल्या धर्माचे नावही एकच होते ‘इस्लाम’ हजरत ईसा(अ.) अर्थात येशूच्या अनुयायांनी त्यांना ईश्वराचा पुत्र, असे घोषित करून टाकले. हजरत ईसा(अ.) यांनी स्वतःही, अन्य ईशदूतांप्रमाणेच, एकमेव ईश्वराची उपासना करण्याची शिकवण दिली. त्यांच्या अनुयायींनी येशू(ख्रिस्त) च्या नावावरून आपल्या धर्माला ‘ख्रिश्चन धर्म’ असे नाव दिले. मोठमोठ्या धर्मांची नावे, त्यांच्या धर्मगुरूंच्या नावावरूनच देण्यात आली आहेत. जसे बौद्धधर्म, जैनधर्म, झरतुष्ट्र धर्म वगैरे. प्रेषित मुहम्मद(स.) यांना मानणारे, आपला धर्म इस्लाम मानतात. ‘मोहामेडॉनिझम’ नव्हे. खरे तर त्या नावाचा प्रसार करण्याचे युरोपमध्ये शिकस्तीचे प्रयत्न केले गेले.

आता विविध धर्मांनी दिलेल्या धार्मिक शिकवणींवर दृष्टीक्षेप टाकू या.

इस्लामची शिकवण

 1. ईश्वर एकमेव आहे. त्याच्या ईशत्वात; त्याच्या अधिकारात व त्याच्या गुणवैशिष्ट्यात कोणीही हिस्सेदार नाही.
 2. ईश्वराने आपल्या दासांच्या मार्गदर्शनासाठी आपले प्रेषित धाडले. सर्व प्रेषितांवर श्रद्धा व विश्वास बाळगणे अनिवार्य आहे.
 3. एके दिवशी या जगाचा अंत होईल. नंतर आम्हाला पुनः जिवंत करून उठविले जाईल आणि आपल्या कर्मांचा हिशेब ईश्वरासमोर द्यावा लागेल.
 4. तोंडाने नेहमी सत्य बोला. सत्याचे साक्षीदार व्हा.
 5. कोणालाही पीडा देऊ नका. दुर्बलांचे सहाय्य करा.
 6. सर्व माणसे एकमेकांचे बंधू आहेत.
 7. न्याय प्रस्थापित करा. वगैरे.

झरत्रुष्ट्रने सांगितले

 1. ईश्वर एक आहे, जो सर्वशक्तिमान आहे.
 2. माणूस आपल्या कर्मानुसार स्वर्गात किवा नरकात जाईल.
 3. सत्याचाच नेहमी जय होतो.

जैनधर्माची पाच मौलिक वचने अशी आहेत

 1. नेहमी सत्य बोला.
 2. लोभापासून स्वतःला वाचवा.
 3. चोरी करू नका.
 4. कोणत्याही जिवाला पीडा देऊ नका.
 5. आपल्या इच्छा-वासनांचे दमन करून जीवन व्यतीत करा.

बौद्ध धर्माची शिकवण

खरी सेवा, सच्चे विचार व निर्मळ भावना याबद्दल मोठी शिकवण दिली गेली आहे.

वेदांमधील शिकवण

 1. सर्व माणसे एक कुटुंब आहे.
 2. शेकडो हातांनी मिळवा आणि सहस्त्र हातांनी वाटून टाका.
 3. प्रशंसा व नमस्कार करण्यास पात्र एकच आहे.
 4. सुविचार प्रत्येक दिशेकडून येऊ द्या.

संबंधित लेख

 • अपराधांचे प्रकार

  निश्चितच माणसाचे मौलिक हित विविध प्रकारचे आहेत. मात्र या विविध प्रकारांचासुद्धा विशिष्ट दर्जा ठरविण्यात आला आहे. म्हणून कोणत्या हिताला प्राथमिक महत्त्व द्यायचे आणि कोणत्या हितास दुय्यम स्थान द्यायचे, हे शरियतने अत्यंत विवेकपूर्ण पद्धतीने ठरविले आहे. या प्रमाणानुसारच शरियतने अपराधांचासुद्धा दर्जा ठरविण्यात आला व प्रत्येक अपराधाची शिक्षा त्याच्या दर्जानुसार लागू केली. शरियतने अपराधांचे प्रामुख्याने तीन प्रकार केले ते असे.
 • इस्लामी राजकीय व्यवस्था

  इस्लामची राजकीय व्यवस्था ही दोन मूळ सत्यांवर आधारीत आहे. ते खालीलप्रमाणे आहेत. १) अल्लाहचे स्वतःचे स्थान आणि मानवी विश्व - अल्लाह मनुष्याचा आणि ह्या विश्वाचा फक्त निर्माता आणि नियंताच नाही तर खरा मालक व शासकसुध्दा आहे. २) मनुष्याचे स्वतःचे स्थान - मनुष्याला ह्या विश्वात (पृथ्वीवर) अल्लाहने फक्त निर्माण केले आहे असे नाही तर मनुष्य अल्लाहचा नम्र दास आहे आणि अल्लाहचा या पृथ्वीवर प्रतिनिधी (खलिफा) आहे. वरील दोन महत्त्वाच्या सत्यतेवर ‘‘इस्लामी राजकीय व्यवस्था’’ उभी आहे. इस्लामी राजकीय व्यवस्थेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत,
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]