Islam Darshan

इस्लाम व त्याचा अर्थ

Published : Friday, May 13, 2016

मुहम्मद(स.) मार्फत इस्लाम आम्हापर्यंत पोहोचला आहे, ‘इस्लाम’ हा अरबी भाषेचा शब्द आहे. त्याचा एक अर्थ ‘आज्ञापालन’ व दुसरा ‘शांति’ असा आहे. मुस्लिम आज्ञाधारकाला संबोधले जाते. अर्थात अल्लाहचा आज्ञाधारक, त्याचे आदेश मानणारा, त्याच्यासमोर नतमस्तक होणारा. अल्लाहने जितके पैगंबर धाडले. त्या सर्वांनी एकेश्वरवादाचीच शिकवण दिली. कोणीही पैगंबराने त्यांची स्वतःची उपासना करण्याचा आदेश दिला नाही. कोणीही स्वतःला ईश्वर अथवा त्याचा अवतार म्हटले नाही. ही गोष्ट अत्यंत विस्मयकारक ठरली की अधिकांश माणसांनी त्या पैगंबरांनाच खोटे ठरविले, त्यांचे म्हणणे ऐकले नाही. उलट त्यांचा छळ केला. त्यांना क्लेश-यातना दिल्या आणि त्यांचे निधन झाल्यावर त्यांना पूज्य म्हणून घोषणा केली. त्यांच्या मूर्ती घडवू लागले आणि त्यांच्या मूर्तीशीच सहाय्यांच्या याचना भाकू लागले व त्या मूर्तींची पूजा करु लागले. वास्तवतः सर्व पैगंबरांचा एकच धर्म होता- इस्लाम, माणसांना ईश्वराचा आज्ञाधारक असणे, हाच सर्वांचा परम हेतू होता. ही गोष्टही उल्लेखनीय आहे की सर्व जगाचा धर्म इस्लामच आहे. धरणी, सूर्य, आकाश, डोंगर, झाडे, चंद्र-तारे, हवा; हे सर्वजण, त्यांच्या निर्माणकर्त्याने घालून दिलेल्या नियमांच्या बंधनानेच अवितरपणे कार्य करीत आहेत.

अमोल श्रद्धा

इस्लामी श्रद्धेची तीन बहुमोल तत्त्वे आहेत. ती मान्य केल्यानंतरच आज्ञाधारक जीवनाचा आरंभ होतो. त्यापैकी एकाचाही इन्कार केल्यास माणूस मुस्लिम राहातच नाही.

एकेश्वरवाद

पहिले तत्त्व आहे. ईश्वरावर प्रगाढ श्रद्धा व दृढ विश्वास जो ईश्वर या संपूर्ण विश्वाचा निर्माणकर्ता आहे, विश्वाचा स्वामी व सत्ताधीश आहे. त्याच्या हातात जीवन व मृत्यू आहे, ज्याची त्याच्या सृष्टीवर सूक्ष्म नजर आहे. व तो सर्व जीवांना अन्न पुरवितो, आपल्या दासांची हाक ऐकतो व त्याचे उत्तर देतो, तो सर्वशक्तिमान असून माणसांसाठी कायदे व नियम करण्याचा केवळ त्याचाच अधिकार आहे. तो आपले अधिकार व गुणवैशिष्ट्ये कोणाकडेही हस्तांतरित करीत नाही.

प्रेषितवाद

दुसरे तत्त्व ईशदूतांवर(पैगंबरांवर) विश्वास(ईमान) बाळगणे आहे. या गोष्टीवर विश्वास की अल्लाहने प्रत्येक युगात माणसांच्या प्रत्येक वसाहतीत त्याचे प्रेषित धाडले. ते प्रेषित त्याचे आदेश माणसांपर्यंत पोचवीत व अचूक पद्धतीने जीवन व्यतीत करण्याची शिकवण देत असत. ही परंपरा प्रेषित मुहम्मद(स.) वर संपविण्यात आली. प्रेषित मुहम्मद(स.) हे अंतिम प्रेषित असल्याची गोष्ट काही लोकांसमोर प्रश्नचिन्ह उभे करते. ते म्हणतात ‘आता पैगंबर अवतरणार नाही?’ याचे उत्तर सोपे आहे, जर कशासाठी येत होते याचे उत्तर आम्ही जाणले तर. पैगंबराचे येण्याचे एक कारण असे होते की एखाद्या विशिष्ट क्षेत्रात अल्लाहचा संदेश पोचलेला नसेल. दुसरे कारण असे की आधीच्या पैगंबराने दिलेल्या शिकवणींचा लोप झालेला असेल. तिसरे कारण असे की अल्लाहच्या आदेशांची व उपदेशांची आता गरजच राहिलेली नसेल. त्या गरजांची पूर्णपणे पूर्तता झाली, तेव्हा प्रेषित धाडण्याची परंपरा बंद होणे, हेच यथोचित होते, अल्लाहचा दिव्य-ग्रंथ व मुहम्मद(स.) चे जीवन-चरित्र आम्हापाशी सुरक्षित आहे. या दोन्ही गोष्टी सर्व जगभर पसरल्या आहेत. केवळ अरबस्थानापुरत्याच त्या गोष्टी सीमित राहिलेल्या नाहीत. आणखी असे की जे काही आवश्यक आदेश माणसांना द्यायचे होते, ते सर्व पुरे केले गेले आणि याची स्पष्ट घोषणा कुरआनमध्ये करण्यात आलेली आहे.

‘‘आज तुमचा धर्म, तुमच्यासाठी आम्ही परिपूर्ण करून टाकला आहे.’’

परलोकवाद

तिसरे तत्त्व आहे, मरणोत्तर परलोकीय जीवनावरील विश्वास. या जगातील आपले जीवन नश्वर आहे. येथे कायम राहाण्यासाठी आपण आलेलो नाही. हे जग सोडून आम्हाला परत जायचे आहे. या जीवनानंतर आणखी एक जीवन आहे. ते कधीही न संपणारे अनंत जीवन आहे. हे जग आपल्या परीक्षेचे स्थान आहे. मरणोत्तर जीवनात, आपणाला आपल्या इहलोकीय कर्मांचा हिशेब द्यावा लागणार आहे. आपले हे वर्तमान जगसुद्धा नश्वर आहे. एके दिवशी या जगाचाही अंत होईल. सर्व माणसांना पुनः जिवंत करून उठविले जाईल व त्यांच्याकडून त्यांच्या इहलोकीय कर्मांचा हिशेब घेतला जाईल. ज्या लोकांनी सत्कर्मे(पुण्य) केली असतील त्यांना स्वर्गाचा आराम मिळेल आणि ज्या लोकांनी ईशआदेशाविरुद्ध जीवन व्यतीत केले असेल ते शिक्षा मिळण्याचे स्थान असलेल्या नरकाग्नीमध्ये झोकून दिले जातील.

या तीन सत्यांना मानणे, याचेच दुसरे नाव इस्लामचा स्वीकार करणे होय. ही तीन तथ्ये मानणे आणि न मानणे या दोन्ही गोष्टी समान नाहीत. ती तत्त्वे मानल्याने व न मानल्याने जीवनात पूर्णतः भिन्न असे दोन दृष्टिकोन निर्माण होतात आणि त्यानुसार आचरण करण्याचे परिणामही सर्वथा भिन्नच असतात. या तिन्ही श्रद्धा जीवनाला एक विशेष दिशा देतात, एक विश्वास निर्माण करतात आणि माणसाला जबाबदार बनवितात. माणसाचे चारित्र्य उज्वल करतात आणि त्याच्या अंतःकरणाला शांति देतात.

उपासना

वरील तिन्ही सत्त्यांचा अंतःकरणपूर्वक स्वीकार केल्यानंतर आज्ञापालनाची सुरवात होते. सर्वसाधारणपणे पूजा-अर्चा यांनाच लोक उपासना असे म्हणतात, जसे नमाज एक उपासना आहे. परंतु उपासना या शब्दाचा इस्लामी अर्थ इतका मर्यादित नाही. अल्लाहची उपासना फक्त मस्जिदमध्येच होते आणि एका ठराविक वेळीच होते, असे नाही. ती उपासना चोवीस तास होत असते आणि प्रत्येक ठिकाणी करावी लागते.

चार उपासना सामूहिकपणे कराव्या लागत असल्याने त्यांचे विशेष महत्त्व असते. त्या उपासना म्हणजे ‘नमाज’, ‘रोजा’, ‘हज्ज’ व ‘जकात’ होत. नमाज दिवसात पाच वेळा अदा केली जाते. रोजे एक वर्षात महिनाभर केले जातात. त्यासाठी ‘रमजान’चा महिना ठरलेला आहे. तिसरी उपासना ‘जकात’. ती एक आर्थिक उपासना आहे आणि धनवान माणसांचीच तिचा संबंध येतो. वर्षभरात मिळविलेल्या धनातून, स्वतःचा सर्व खर्च वजा जाता जी शिल्लक उरते, तिच्या अडीच टक्क्याने हिशेब करून जी रक्कम निघते, ती सामूहिक पद्धतीने, गोरगरीब, निराश्रित, पीडित आणि कैदी माणसांवर खर्च करणे याला ‘जकात’ असे म्हणतात. ही अनिवार्य उपासना आहे. ज्या माणसापाशी साडेसात तोळ्याहून अधिक सोने आहे, त्याच्यासाठी ‘जकात’ अनिवार्य आहे. ‘हज्ज’ यात्रा जीवनात एक वेळ अनिवार्य आहे, परंतु अशा माणसासाठीच ज्यांना मक्केपर्यंत जाण्या-येण्याच्या प्रवासखर्चाची आणि खाण्यापिण्याचा खर्च करण्याची ऐपत आहे.

इस्लाम आम्हाला शिकवितो की माणसाचे संपूर्ण जीवन अल्लाहची उपासना करण्यातच व्यतीत केले जावे. अल्लाहच्या मर्जीनुसार केलेले प्रत्येक कर्म उपासनेतच मोडते खरे बोलणे, असत्यापासून स्वतःचे रक्षण करणे, माता-पित्याची मनोभावे सेवा करणे, शेजारच्या लोकांच्या अडीअडचणींवर लक्ष ठेवणे, माणसांच्या उपयोगी पडणे, न्याय प्रस्थापित करणे, दुष्कृत्ये नष्ट करणे, त्याचप्रमाणे रस्त्यातील उपद्रवकारक काटेकुटे व दगडधोंडे बाजूला टाकणे; ही सर्व कर्मे उपासनेतच येतात. नमाज अदा करून अथवा रोजा करून माणूस जशी अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करतो. आणि पुण्य मिळण्यास पात्र बनतो, त्याचप्रमाणे या बाकींच्या उपासना केल्यानेही त्याला ईश्वराची प्रसन्नता व पुण्य प्राप्त होते.

इस्लामी जीवनव्यवस्था

संपूर्ण जीवनात ईश्वराचे आज्ञापालन हेच इस्लामचे नाव आहे आणि ते आज्ञापालन विशिष्ट वेळी केल्या जाणार्या उपासनांपर्यंतच जर मर्यादित नाही, तर प्रश्न असा उद्भवतो की इस्लाममध्ये माणसाने जीवन व्यतीत करण्याचे सर्व नियम काय आहेत? ते नियम जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसाचे मार्गदर्शन करू शकतील असे नियम आहेत काय? होय! इस्लाम निश्चितपणे एक परिपूर्ण जीवन-व्यवस्था प्रदान करतो. एका व्यक्तीच्या खाजगी जीवनापासून ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दल सर्व नियम व पद्धती इस्लाम आम्हाला देतो. इस्लामची स्वतःची नैतिक व्यवस्था आहे, कौटुंबिक व्यवस्था आहे, सामाजिक व्यवस्था, राजनैतिक व्यवस्था, आध्यात्मिक व्यवस्था आणि आर्थिक व्यवस्था, अगदी सखोल स्वरूपात, इस्लामजवळ आहे. ही सर्व व्यवस्था व कार्यपद्धत केवळ काल्पनिक नाही. त्यांचा प्रयोग प्रत्यक्ष व्यवहारात केला गेला आहे. जीवनातील सर्व समस्यांसंबंधी इस्लामचा एक दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न करू या, ज्या प्रश्नांचे आजच्या सामाजिक क्षेत्रात सर्वाधिक महत्व आहे.

संबंधित लेख

  • हजयात्रेचे सर्वसमावेशक गुण

    हजयात्रेच्या गुणाबद्दल विचार करताना आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास लक्षात येते की हजयात्रा एक उत्तम उपासनापध्दती आहे कारण, १) हजयात्रेत प्रार्थनेचा (नमाजचा) समावेश आहे. प्रार्थना (नमाज) दुसरे तिसरे काही नसून अल्लाहचे स्मरण आहे. आपण हे पाहिले आहे की हजयात्रेच्या काळात हाजी लोक अल्लाहचे पूर्ण स्मरण करीत असतात. नमाजमध्ये मग्न राहतात. २) हजयात्री आपल्या बलिदान दिलेल्या पशुचे मांस गरिबांमध्ये वाटतो. गरिबांचा हिस्सा देणे प्रत्येक हजयात्रीवर बंधनकारक आहे.
  • पूर्व आशियातील आर्थिक अस्थैर्य

    पूर्व आशियातील काही राष्ट्रांनी जबरदस्त आर्थिक प्रगती केली असल्याने त्यांना पौर्वात्य वाघ(Eastern Tigers) म्हटले जाते. परंतु इ. स. १९९७ मध्ये त्यांच्यावर आर्थिक अस्थैर्याचे संकट आले. त्यांच्या शासनाची अर्थनीती अतिशय पोकळ नसूनसुद्धा या परिस्थितीचे काय कारण आहे? एवढेच नव्हे तर तेथील बजेटमध्ये सामान्यतः कोणतीच घसरण(Deficit) नसून उलट बचतच(Surplus) होती. शिवाय या देशातील एकूण बचती राष्ट्रीय उत्पन्नाच्या पस्तीस टक्के होती. ही बाब बर्याच प्रगत देशांसाठी अभिमानास्पद होती.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]