Islam Darshan

एका महान क्रांतीची सत्यकथा

Published : Friday, Feb 05, 2016

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची जीवनचर्या काही दंतकथा नाही, तसेच केवळ एखाद्या व्यक्तीची व्यक्तिगत कथादेखील नाही, तर ती एका अशा महान आणि पावन क्रांतीची सत्यगाथा आहे की, तिचे उदाहरण इतिहासात मिळणे अशक्यप्राय आहे. या सत्यगाथेचे मूळ पात्र प्रेषित मुहम्मद(स) यांचे व्यक्तिमत्व होय. या सत्यगाथेतील इतर सहयोगी पात्र हे माननीय अबू बकर(र), उमर(र), हमजा(र), बिलाल, यासिर(र), उस्मान(र), सन्माननीय खदीजा(र) व आयशा(र) असो किवा विरोधी पात्र हे अबू लहब व त्याची पत्नी असो किवा कच्चे काळिज चावून खाणारी हिदा असो, या पात्रांवरुन सहयोग आणि संघर्षाच्या परिणामस्वरुपी इतिहासाचा तो सोनेरी अध्याय लिहिला गेला, ज्याच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत प्रेषित मुहम्मद(स) यांच्या पवित्र जीवन चरित्राचे व इस्लामास्तव आपले सर्वस्व त्यागणार्या सोबत्यांचे प्रतिबिब दिसते. या संघर्षाशिवाय प्रेषित मुहम्मद(स) यांना समजणे कठीण आहे.

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे काही ऐहिक जीवनाशी नाते तोडून आणि जीवनसंघर्षापासून पळवाट काढून सन्यास घेणारे व्यक्तिमत्व नव्हतेच मुळी. त्याचप्रमाणे त्यांनी पूजा व कर्मकांडापुरते मर्यादित व निष्प्रभ धर्म किवा मत दिले नाही, तर दिव्य कुरआनाच्या विश्वव्यापी आदेशानुसार त्यांना या जगात अवतरित करण्याचा उद्देशच नेमका असा आहे की, ईश्वरवादी विवेक आणि पावन चारित्र्याने सुशोभित करून एका अशा मानवसमूहाची निर्मिती करावी की जो प्रेषितांच्या नेतृत्वास भरपूर प्रयत्न करून सत्य धर्मास प्रत्येक विचारसरणी, सिद्धान्त आणि बुरसटलेल्या जुनाट धार्मिक परंपरांचा नायनाट करून संपूर्ण मानव समाजास सत्य धर्माच्या एकाच छत्राखाली आणावे.

ही बाब आकलनास्तव आपण स्वयं आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या दोन तीन प्रसंगीच्या कथनांवर दृष्टिक्षेप टाकल्यास स्पष्ट होते की, प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या कठीण आणि हतोत्साहित करणार्या प्रारंभिक काळात याची पूर्णतः जाणीव होती की, त्यांना काय करावयाचे आहे. सत्यधर्म प्रसार कार्याच्या सुरूवातीलाच त्यांनी ‘हाशिम’ कबिल्याच्या सर्व सदस्यांना एका ठिकाणी एकत्र करून भाषण दिले की,

‘‘मी आणलेल्या ईश्वरी संदेशाचा जर तुम्ही स्वीकार केला तर यामध्ये तुमचे ऐहिक जीवन तर समृद्ध (व यशस्वी) होईलच शिवाय पारलौकिक जीवनातसुद्धा यश मिळेल!’’
मग संघर्षांच्या प्रारंभकाळात विरोधकांना त्यांनी हितोपदेश केला की,
‘‘हे केवळ एक ईश्वरी धर्मसूत्र आहे, तुम्ही माझ्याकडून जर याचा स्वीकार केला तर या सूत्राच्या बळावर तुम्ही सर्व अरबजणांवर प्रभुत्व मिळवाल आणि संपूर्ण अरबेतर विश्व तुमचे नेतृत्व स्वीकारेल!’’
असेच आणखीन एका प्रसंगी बशीर (शुभ सूचना देणारे) आणि नजीर (ईश्वराच्या कोपाचे भय दाखविणारे) प्रेषित अर्थात मुहम्मद(स) ‘काबा’च्या भितीस टेक लावून बसले होते. प्रेषितसोबती माननीय खब्बाब(र) ज्यांच्यावर विरोधक अमानवी अत्याचार करीत होते, म्हणाले की,

‘‘हे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स)! आमच्या हितात ईश्वरी मदतीची प्रार्थना करावी!’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) उत्तरले,

‘‘हे खब्बाब(र)! तुमच्या पूर्वीच्या सत्यधर्मप्रचारकांना जिवंत गाडण्यात आले, त्यांच्या डोक्यावर करवती चालविण्यात आल्या, त्यांचे तुकडेतुकडे करण्यात आले, त्यांच्या शरीरावरील मांस ओरबाडण्यात आले, अशा मरणयातना भोगूनही त्यांनी सत्यधर्माचा त्याग केला नाही. ईश्वराची शपथ! या कार्यास ईश्वर अशा प्रकारे पूर्ण करील की, एक प्रवासी ‘सुनआ’ (एका स्थानाचे नाव) पासून हजरमौता (एका ठिकाणाचे नाव) पर्यंत एकटा प्रवास करील, परंतु त्यास ईश्वराशिवाय कुणाचेच भय नसेल. (अर्थात संपूर्ण मानवजात भयमुक्त जीवन जगेल.)’’

मदीना वास्तव्यकाळात प्रेषितांनी माननीय ‘अदी बिन हातिम(र)’ यांना म्हटले,
‘‘ईश्वराची शपथ! ती वेळ जवळ आहे की, तुम्ही पाहाल, एकटीच स्त्री कादसिया शहरापासून मक्का येथे जाऊन हजचे विधी करेल व तिला कशाचीच भीती वाटणार नाही.’’

या कथनावरून स्पष्ट होते की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडे बंधुत्व, समानता, न्याय आणि शांतीपूर्ण व सुरक्षापूर्ण जीवनव्यवस्थेची अशी योजना अर्थात या जीवनव्यवस्थेत दुर्बल आणि एकटी व्यक्तीसुद्धा भयमुक्त आणि अन्याय व अत्याचारापासून सुरक्षित असेल.

हे होते ‘ते’ लक्ष्य, जेथे संपूर्ण जगाच्या मानवांचे नेते प्रेषित मुहम्मद(स) यांनी अरबजणांना पोहोचविण्यासाठी आजीवन व अथक प्रयत्न केले. हा अरब समाज अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेला, अनुशासनहीन, अपराधी, आपसात रक्तपात माजविणारा, दुर्बलांवर अन्याय व अत्याचार करणारा होता.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आणलेल्या या अभूतपूर्व क्रांतीचे नावही,

‘‘ईश्वरा शिवाय कोणीच उपास्य नसून मुहम्मद(स) ईश्वराचे प्रेषित आहेत.’’
या धर्मसूत्रावर ठेवण्यात आले होते. अर्थातच या संपूर्ण सृष्टीचा आणि संपूर्ण मानवजातीचा एकमात्र उपास्य हा ईश्वरच आहे. उपासना केवळ त्याचीच होईल. आदेश आणि कायदा केवळ ईश्वराचाच चालेल. आपल्या गरजा व याचना त्याच्याच समोर ठेवण्यात येतील. मागणी पूर्ण करण्याची प्रार्थना त्याच्याच समोर करण्यात येईल. पुण्य व पापकर्मांचा हिशोब घेणारा आणि पुण्याचे बक्षीस व पापाची भयानक शिक्षा देणारा केवळ ईश्वरच आहे. जीवन, मृत्यू, आरोग्य, आजीविका, सुख-शांती आणि सन्मान हे सर्व काही ईश्वराकडूनच मिळते. त्याच्याशिवाय मानवी जीवनात इतर कोणीही उपास्य असूच शकत नाही. कोणत्याही बादशाहची बादशाही, शासकाचे शासन चालणार नाही. तसेच कोणत्याही वंश, जात, परिवार, श्रीमंत, पुरोहित, पंडित, पादरी, कोण्याही जागीरदार व सामंत किवा चौधरीचा आणि स्वतःचादेखील कोणताच आदेश वा नियम व शासन चालणार नाही. ईश्वराशिवाय कोणताही माणूस आपले शासन वा आदेश चालवितो, (अर्थात ईशत्व किवा प्रभुत्व गाजवितो), आपली मर्जी बळजबरी वा कोणत्याही मार्गाने इतरांवर लादतो किवा दुसर्यांना आपल्यासमोर नमवितो किवा इतर गोष्टींसमोर नमवितो अथवा लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचा दावेदार बनतो, तो माणूस ‘तागूत’ (अर्थात बंडखोर वा ईशद्रोही) चीच भूमिका पार पाडतो.

या क्रांतिकारी सूत्राचा दुसरा भाग असे स्पष्ट करतो की, आदरणीय मुहम्मद(स) यांना ईश्वराने आपले प्रेषित नियुक्त केले आहे. त्यांना दिव्यबोधाच्या माध्यमाने मार्गदर्शन व मार्गभ्रष्टता, पाप व पुण्य, वैध आणि अवैध यासारख्या बाबींचे ज्ञान प्रदान केले. प्रेषित मुहम्मद(स) हे ईश्वराकडून जग कायम असेपर्यंत संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक, आपल्या अनुयायांचे प्रमुख, शिक्षक, आणि आदर्श ठरविण्यात आलेले आहेत.

या क्रांतिकारी धर्मसूत्रापासून न्याय आणि दया व कृपेच्या व्यवस्थेचा तो पावन वृक्ष प्रकट झाला, ज्याच्या फांद्या वातावरणात विस्तारल्या आणि मूळ जमिनीत खोलवर पोहोचले. त्याची शीतल छाया दूर दूर पसरली आणि त्याचे चितन, व्यवहार, नैतिकता व न्यायाच्या फळांचा काही भाग हा प्रत्येक राष्ट्र आणि समाजापर्यंत पोहोचला.

आदरणीय प्रेषितांनी घडविलेल्या क्रांतीच्या आश्चर्यजनक पैलूंपैकी एक पैलू हा आहे की, ज्याने त्यांचा संदेश स्वीकार केला, त्याचे सर्व काही पार बदलून गेले. त्याची विचारसरणी, त्याचे चितन, त्याच्या भावना, त्याची रूची व आवड, त्याची मैत्री व वैर आणि त्याचा नैतिक स्तर वगैरे सर्वच पार बदलून गेले. चोर आणि लुटारू आले व त्यांनी इतर लोकांच्या संपत्तीचे जीवापाड रक्षण केले. व्यभिचारी आणि बलात्कारी आले व त्यांनी दुसर्यांच्या शील व सतीत्वाचे जीवापाड रक्षण केले. व्याजखोर आले आणि त्यांनी आपल्या कष्टाची कमाई आर्थिक दुर्बलांवर खर्च केली. साक्षात अहंकारी आले आणि ते विवेक व नम्रतेचा आदर्श बनले. आपल्या अभिलाषांचे पुजारी आले आणि क्षणभरातच जगाने पाहिले की, त्यांनी आपल्या अभिलाषांना आपल्या पायदळी तुडवीत एक श्रेष्ठतम लक्ष्य गाठण्याकडे धाव घेतली. अज्ञानी आले आणि ते झगमगत्या तार्यांप्रमाणे ज्ञानक्षितिजावर चमकू लागले आणि जगाने अक्षरशः तोंडात बोट घातले. उंट आणि गुरेढोरे चारणारे मानवतचे रक्षक बनले, दासी आणि गुलामांच्या पददलितवर्गातून असे वीर आणि स्वाभिमानी निर्माण झाले की, शत्रूंनी त्यांच्यावर अत्याचाराचे प्रत्येक हत्यार आजमावले, परंतु त्यांच्या अंतरात्म्याची साद दाबण्यात आणि श्रद्धेपासून परास्त करण्यात यशस्वी झाले नाहीत.

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आणलेल्या क्रांतीच्या या स्वयंसेवकांमध्ये असे अद्वितीय संयम आणि अनुशासन होते की, दारू निषिद्ध होण्याचा ईश्वरी आदेश मिळताच सर्वांनी एकाच वेळी दारू सोडली. ज्यांच्या घरामध्ये दारूचा साठा होता, त्यांनी सगळी दारू फेकून दिली, ज्यांच्या मुखापर्यंत मदिरेचा पेला आला होता, त्यांनी तोंडाचा पेला फेकून दिला. मदीना शहरात मदिरेचे नद्यानाले वाहू लागले. आदरणीय प्रेषितांकडून जेव्हा ‘परदा’ करण्याचा आदेश ऐकला तेव्हा ताबडतोब सर्व स्त्रियांनी स्वतःस चादरीत झाकून घेतले. धर्मप्रसारासाठी जेव्हा संपत्तीची गरज पडली तेव्हा प्रत्येकाने घरातील सर्व सामान आणून प्रेषितांसमोर ढीग लावला. एवढेच नव्हे तर मजुरांनी आपली दिवसभराची कमाई प्रेषितांसमोर आणून टाकली.

अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांचे मानवी सभ्यतेवर सर्वात मोठे उपकार हे आहे की, त्यांनी संपूर्ण मानवी नात्यांना बळकट व सदृढ आधारांवर कायम करून एक दुसर्यांच्या जवाबदार्या, अधिकार व कर्तव्य निश्चित केले आणि आपल्या आदर्श समाजात माता-पिता व संतान, भाऊ-बहीण, पती-पत्नी, गुरु-शिष्य, श्रीमंत-गरीब, शेजारी व सहयात्री, शासक प्रजा वगैरेच्या संबंधांना उत्तम स्वरुप दिले.

समाजाच्या व्यक्तीमध्ये जन्म घेणार्या या क्रांतीच्या परिणामस्वरुप अरब समाजात जी क्रांती घडून आली, ती अतिशय आश्चर्यकारक आहे. ज्या वेळी आदरणीय प्रेषितांनी मदीना शहरात ‘इस्लामी स्टेट’चा पाया रोवला तेव्हा त्याचे जास्तीतजास्त शंभर वर्ग मैल एवढेच क्षेत्र होते. परंतु आठ-नऊ वर्षांच्या अल्पमुदतीत हे राज्य विस्तारून दहा-बारा लाख वर्ग मैल इतके झाले. या विस्तारामध्ये कोणताही वर्गीय संघर्ष नव्हता. या राज्यामध्ये सर्व प्रकारचा वांशिक अभिमान नष्ट पावला होता. सधन निर्धन शिक्षित-अशिक्षित सर्वच आपसात बंधु झाले. अपराध जवळपास नष्ट झालेत. प्रत्येकजण एक-दुसर्याचा सहाय्यक बनला होता. हे एका नवीन जगाच्या निर्मितीचे आंदोलन होते.

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची ही पवित्र क्रांती लोकांवर बळाचा वापर करून मुळीच आलेली नव्हती. या क्रांतीसाठी कोणताच रक्तपात घडलेला नव्हता. कोणावरही अत्याचार झालेला नव्हता. कोणासही जेलमध्ये डांबण्यात आले नव्हते. कोणत्याही प्रकारचा आतंक नव्हता. उलट या क्रांतीचा आत्माच मुळात स्नेह, प्रेम व बंधुत्व होता. आदरणीय प्रेषितांनी मोठ्या प्रेमाने हाडाचा शिक्षक बनून प्रारंभी ‘मक्का’ शहरात तेरा वर्षांपर्यंत आणि मग मदीना शहरात दहा वर्षांपर्यंत अथक परिश्रम घेतले.

मक्का शहरामध्ये तर त्यांनी लोकांचे शिव्याशाप ऐकून घेतले. निदानालस्ती सहन केली. लोकांचा मार खाल्ला आपल्या परिवारजणांसह तीन वर्षांपर्यंत नजरबंद राहिले. त्यांच्या अनुयायांवर अमानवी अत्याचार करण्यात आले व जीवे मारण्यात आले. परंतु आदरणीय प्रेषितांनी स्नेहपूर्वक आपले कार्य तडीस नेले.

यानंतर मदीना शहरामध्येसुद्धा त्यांना पावलोपावली विभिन्न प्रकारे छळण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्याविरुद्ध कटकारस्थाने रचण्यात आली. जीवे मारण्याचे डावदेखील बर्याच वेळा रचण्यात आले.

ज्या वेळी विरोधक व अज्ञानी शक्ती स्वतःहून वारंवार त्यांच्यावर चाल करून आली तेव्हा विवश होऊन प्रेषितांनी इस्लामी लष्करास रणभूमीवर आणले. बदर, उहुद आणि एहजाबची तीन मोठी युद्धे मदीना शहराच्या मुख्य द्वारावर लढण्यात आली. याशिवाय आणखीन एका युद्धात मक्का आणि दुसर्या एका युद्धात हुनैन व ताईफवर विजय मिळाला. शत्रूंच्या सामरिक शक्ती आणि सत्यविरोधी कार्यवाहीच्या केद्रांना नष्ट केले नसते, तर दीर्घ मुदतीपर्यंत रक्तपात झाला असता. त्याचप्रमाणे ‘बनु मुस्तलिक’ची लढाई आणि ‘खैबर’ची लढाई लढण्याचा हेतु हा भयानक प्रकारच्या गद्दारीने भरलेल्या कटकारस्थानांचा नायनाट करणे होता. बाकी इतर छोटी-मोठी युद्धे मात्र डाकू व दरोडेखोरांना शरण आणण्यासाठी अथवा सीमावर्ती होणार्या झडपांप्रमाणे होती.

कमाल अशी की, युद्धांमध्येसुद्धा शांती व सद्भाव आणि दया व कृपेचा संदेश देणार्या प्रेषितांनी असे उपायदेखील योजले की, शत्रूंची जीवित हानी कमीतकमीच व्हावी. त्याचप्रमाणे युद्धभूमीवरसुद्धा त्यांनी श्रेष्ठ आणि उच्च आचारसंहिता लागू करून दाखविली. संपूर्ण नऊ वर्षाच्या सामरिक कारवाईमध्ये शत्रूपक्षाच्या केवळ ७५९ व्यक्ती ठार झाल्या. म्हणजेच दरवर्षी केवळ ८४ व्यक्ती ठार होण्याचे प्रमाण होते. त्याचप्रमाणे ठार होणार्या मुस्लिमांची संख्या २५९ एवढीच म्हणजेच दरवर्षी १८ एवढी होती.

जगाच्या कोणत्याही क्रांतीचा इतिहास पाहिल्यास एवढ्या कमी प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होऊन एवढी मोठी व अभूतपूर्व क्रांतीचे उदाहरण इतिहासात खरोखरच सापडत नाही. या कथित सभ्य जगामध्ये क्रांती ही एखाद्या राक्षसाप्रमाणे येते आणि लाखो माणसांची मानवता, प्राण, शीलता अगदी अमानुषपणे पायदळी तुडवीत येते. मग लोकांचा बळी घेऊन आलेले शासन बळाच्या व अत्याचाराच्या सिहासनावर बसून मानवी रक्ताची आणि शीलतेची सर्रास होळी खेळून आनंदोत्सव साजरा करते. छळ, हत्या, स्त्रियाच्या विटंबनेचे उग्र तांडव थांबता थांबत नाही. निष्पाप मुले, वृद्ध व अपंग आणि स्त्रियांसुद्धा त्यांच्या असुरी आनंदास बळी जाताना आजही पाहण्यात येते आणि इतिहासाची पाने याच सत्यकथांनी रक्ताळलेली आहेत. या अमानुष आणि अत्याचारी रक्तरंजित क्रांतीकारी सिद्धान्तामुळे मानवी प्रकृतीचे स्वरुप पार विद्रूप झालेले आहे.

या उलट आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आणलेल्या स्नेह व बंधुत्वावर आधारित क्रांतीची आपण जेव्हा इतर कोणत्याही क्रांतीशी तुलना करतो तेव्हा हे स्पष्ट होते की, त्या इस्लामेतर क्रांत्या निव्वळ असत्य आणि पाखंडी स्वरुपाच्या आहेत.

त्यामुळे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या जीवनचरित्राच्या अध्ययनाचा, आपला हेतुच मुळात असा असावयास हवा की, आपण प्रेषितसंदेश, त्यांच्या प्रार्थना, आचरण, संगठन, कार्यपद्धती, कार्यनीतींना समजून स्वतःस यासाठी तयार करावे की, सुरुवातीस या इस्लामी क्रांतीचा आरंभ स्वतःपासून व्हावा. मग आपला समाज व राष्ट्र आणि मग संपूर्ण मानवजातीस या क्रांतीच्या मार्गाने लाभान्वित करावे. आपल्यासाठी सत्यमार्ग हा केवळ आदरणीय प्रेषितांचे व्यक्तिमत्त्व हे सामूहिक जीवनासाठी मार्गदर्शक व आदर्श स्वरुपात स्वीकारून त्याचा अनुनय करावा. अन्यथा आपले व संपूर्ण मानवजातीचे जीवन व्यर्थ आणि निरर्थक सिद्ध होऊन नरक बनेल आणि हे आज आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत.

संबंधित लेख

  • अमेरिकेची भयंकर दुर्घटना - कोण जबाबदार?

    वर्ल्ड ट्रेड सेंटर व पेन्टॅगॉनचा विध्वंस आणि पाशविकता व निष्ठुरपणाच्या या कृतीची जितकी निदा केली जाईल तितकी ती थोडीच आहे. मानवी स्वभाव याचा तिरस्कार करतो. इस्लामची नैतिक मूल्ये आणि मुस्लिमांचा सदाचारी स्वभाव अशा प्रकारच्या सर्रास कत्तलीचा तीव्र निषेध करतो. निष्पाप लोकांचे जीव घेणे आणि तेही अशा प्रकारे की त्यांच्या शरीराच्या चिध्या उडाव्यात किवा त्यांना आगीत फेकून देणे की त्यानी मृत्यूच्या कुशीत हुंदके देऊन-देऊन मरुन जावे हे दयाळू धर्माच्या स्वभावाविरुद्ध आहे. म्हणूनच मानवाच्या शरीराच्या नाक-कानसारख्या अवयवांना कापण्याची प्रेषितांनी मनाई कली आहे. या शिकवणीच्या फलस्वरुप मुस्लिमांची ही प्रतिक्रिया स्वाभाविक आहे की त्यांनी दहशतवादाला बळी पडलेल्या लोकांच्या दुःखात सामील व्हावे.
  • इस्लाम व महिलावर्ग

    इस्लामशी संबद्ध असलेला एक बहुचर्चित विषय मुस्लिम महिलांचा आहे. इस्लाम महिलांना पक्षपाती वागणूक देतो, असा आरोप केला जातो. या आरोपांना मूलतः पाश्चात्य देशातून पुष्टी दिली जाते. पाश्चिमात्य लोक त्यांच्या महिलांशी जसे वर्तन करीत आहेत, महिलांना जसे स्वैर स्वातंत्र्य दिले जाते, तशाच प्रकारचे वर्तन इस्लामनेही आपल्या महिलांशी करावे, तसेच स्वैर स्वातंत्र्य आपल्या महिलांना द्यावे; असेच जर ते इच्छित असतील, तर त्याचे उत्तर स्पष्ट व ठाम शब्दात ‘नाही’ असेच राहील. या दोन्ही समाजाचे आदर्श, एकमेकांच्या नेमके उलट आहेत. इस्लाम आपल्या महिलांना शालीनता, आदर-प्रतिष्ठा व संरक्षण देतो.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]