Islam Darshan

प्रेषित मुहम्मद(स) यांचे ‘मदीना’मध्ये रचनात्मक कार्य

Published : Friday, Feb 05, 2016

जी माणसे आणि जे समूह एखादा महान उद्देश बाळगतात आणि या उद्देशपूर्तीस्तव ते जेव्हा हिजरत (देशत्याग) करतात, ते नवीन ठिकाणी आल्यावर धन-संपत्तीवर तुटून न पडता आपले मूळ उद्दिष्ट पूर्ण करण्याची चिता करीत असतात. ईशमार्गातील सच्चा मुहाजिर (स्थलांतरित वा वतनत्यागी) हा ईश्वरी अवज्ञेपासून स्वतःस वाचविण्यासाठी अणि ईश्वरी धर्मास प्रस्थापित करण्यासाठी वतन व आपले सर्वकाही त्यागणारा असतो.

मदीना शहर गाठताच आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि इस्लामी आंदोलनावर प्राणार्पण करण्यास तयार असणार्या त्यांच्या अनुयायांचे पूर्ण लक्ष हे सत्य व्यवस्थास्थापनेस व्यावहारिक स्वरुप देण्याकडे लावले. त्यामुळे न्याय आणि दयेचे प्रतीक प्रेषित मुहम्मद(स) यांनी पहिल्याच ‘हिजरी सन’मध्ये या कामाची सुरुवात केली व यापैकी बरेच कार्य ‘हिजरी सन’ दोनमध्ये तडीस लावले.

आदरणीय प्रेषित आणि त्यांच्या सोबत्यांनी सर्वप्रथम नमाज कायम करण्याची व्यवस्था चालविण्यासाठी तत्काळ ‘मस्जिद’ निर्मितीची आधारशिला ठेवली. हीच मस्जिद पुढे चालून संसद, न्यायालय, विद्यालय आणि विद्यापीठ तसेच खजिना व अतीथी-गृह सिद्ध झाली.

आदरणीय प्रेषितांची सांडणी ज्या ठिकाणी बसली होती ती जागा दोन अनाथ बालकांच्या मालकीची होती. प्रेषितांनी त्या जागेची भरघोस किमत देऊन जागा खरेदी केली आणि मस्जिदबांधकाम सुरु केले. या कार्यात स्वतः प्रेषितांनी माती कालवण्यापासून ते दगड उचलण्यापर्यंत अक्षरशः मजुराप्रमाणे काम केले.

मस्जिद निर्माण झाल्यावर एक प्रश्न उठला की, मस्जिदीपासून दूरच्या लोकांना नमाज अदा करण्यासाठी कशा प्रकारे बोलविण्यात यावे. याविषयी अनेक प्रस्ताव लोकांनी प्रेषितांसमोर ठेवले. माननीय उमर(र) यांनी त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाचे वर्णन प्रेषितांसमोर ठेवले की, त्या स्वप्नात त्यांनी अजानचे बोल ऐकले, असेच स्वप्न माननीय अब्दुल्लाह बिन जैद(र) यांनादेखील पडले. त्यांनीही स्वप्नात ऐकलेले बोल प्रेषितांना सांगितले. यावर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी हेच बोल ‘अजान’क्रियेसाठी पसंत केले आणि माननीय बिलाल(र) यांना अजान देण्याचा आदेश दिला. माननीय बिलाल(र) मोठ्या आदरभावनेने ‘अजान’ देऊ लागले. मस्जिदीस लागूनच गवत आणि चिखलाच्या साह्याने प्रेषितांसाठी एक साधे निवासस्थान तयार करण्यात आले. ही मस्जिद तयार झाली तेव्हा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे वय ‘त्रेपन्न वर्षे आणि एक महिना’ एवढे होते. हे ‘हिजरी सनाचे’ पहिले वर्ष आणि ‘रब्बिउल अव्वल’चा महिना होता.

ज्या लोकांना मोठमोठे पुण्यकर्म करावयाची असतात त्यांना या कर्मांपासून कोणतीही कठीण परिस्थिती रोखू शकत नाही. ते लवकरात लवकर हे कार्य तडीस लावतात. मस्जिद निर्माण होताच उपदेश आणि प्रवचनाचे कार्य सुरु झाले, जेणेकरून इस्लामी ज्ञानाचा प्रचार व्हावा, तसेच विचारसरणी आणि चारित्र्यनिर्मिती व्हावी. याच मस्जिदमध्ये एक पाठशाळा स्थापित झाली. यातील विद्यार्थ्यांना ‘असहाब-ए-सुफ्फा’ (अर्थात चबुतर्याचे विद्यार्थी) असे म्हणत. म्हणजे ‘सुफ्फा’ नावाचा एक चबुतरा होता. या ठिकाणी अविवाहित विद्यार्थी धर्मशिक्षण घेत असत आणि रात्री येथेच झोपत असत. या विद्यार्थ्यांच्या उपजीविकेची जवाबदारी मदीनावासीयांवर होती.

एखाद्या शहरास त्यागून आणि आपले सर्वस्वी उजाडून दुसरीकडे स्थलांतरीत झालेल्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठा बिकट असतो. यामध्ये मानवसंबंध बिघडतात. लोकांमधील शालीनता निघून जाते. नैतिकमूल्ये नष्ट होऊ लागतात. कारण स्थानिक आणि स्थलांतरितांदरम्यान स्पर्धा निर्माण होते. संपत्ती वाटणीमध्ये तंटे बखेडे चालू होतात. स्थानिक हे स्थलांतरितांना परके समजून त्यांचे अधिकार हिरावून घेण्याच्या प्रयत्नात असतात. त्यातल्या त्यात मदीना शहर तर एक छोटेसे शहर होते. तेसुद्धा विविध वस्त्यांचे मिळून. साधनसामग्रीचा अभाव त्या ठिकाणी होता. अशा बिकट परिस्थितीतही मुहाजिरीन (अर्थात स्थलांतरित) ची जवळपास पंधरा ते वीस टक्के भरती तेथे झाली. परंतु या ठिकाणी जे घडले ते विचित्रच. कोणतीही स्पर्धा आणि ओढाताण झाली नाही. ‘अन्सार’ (मदीनावासीयांनी) मुहाजिरीनना भरभरून दिले. त्यांची अवहेलना मुळीच केली नाही. त्यांना बंधुभाव आणि स्नेहाने सर्व काही दिले. त्यांच्या गरजांची पूर्तता केली. कारण हे दोन्ही समूह प्रेषित मुहम्मद(स) यांचे अनुयायी असल्याने आपसात बंधुच हते. जगामध्ये असत्याविरुद्ध लढणारे आणि तेही प्रेषितांच्या नेतृत्वाखाली लढणारे एकजूट लष्कर होते. एका पक्षाने दुसर्या पक्षाचा भरभरून पाहुणाचार केला.

असे असले तरी ही बाब केवळ भावनिक होती. त्यामुळे एका स्थायी आणि कायमस्वरुपी भातृत्व व्यवस्थेची गरज होती. मानवकल्याणाचे ईश्वरी दूत आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी माननीय अनस बिन मालिक(र) यांच्या घरी एक सभा बोलावली. या सभेतील उपस्थितांची संख्या एकूणनव्वद होती. आदरणीय प्रेषितांनी प्रत्येक अन्सार आणि मुहाजिरमध्ये बंधुत्वाचे नाते प्रस्थापित केले. अशा रितीने जणू प्रत्येकामागे एक प्रकारचे सेवा कर्तव्य लावण्यात आले. अनसार (मदीनावासी) यांनी आपल्या जमीनी, शेती, बागा आणि घर व संपत्तींचा निम्मा वाटा मुहाजिरीन (स्थलांतरित) ना सादर केला. अन्सारच्या संपत्तीतून मुहाजिरीनना वारसाहक्क मिळू लागला. परंतु बरेच मुहाजिरीन असे होते की ज्यांनी अन्सारकडून संपत्ती स्वीकार केली नाही व व्यापारासंबंधी त्यांचे मार्गदर्शन मागितले. स्वतःच्या कष्टाने आणि व्यापार-धंद्याच्या माध्यमाने उपजीविका भागवू लागले.

कोणत्याही समूहाने अथवा पक्षाच्या व्यक्तीने इतर व्यक्तीशी कोणत्याही कारणास्तव किचितही कलह बाळगला नाही. कोणत्याही प्रकारचा संदेह बाळगला नाही. कबिला आणि क्षेत्रावर आधारित भेदभाव केला नाही.

संपूर्ण मानवी इतिहासात कोणतीही विचारसरणी वा आंदोलन विशेषकरून वर्तमान युगातील मुहाजिरीनांच्या पुनर्वसनाचे असे कोणतेच उदाहरण मिळणे शक्य नाही, जे अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्या अनुयायांनी सादर केले. त्यांचा मूळ चमत्कराच हा आहे की, त्यांनी अशा मानवी स्वभावाची रचना केली की ज्यांच्या दृष्टीने ईश्वर, प्रेषित आणि धर्माच्या तुलनेत विश्वाची संपूर्ण संपत्ती आणि प्रत्येक वस्तू कवडी मोल असते. देश, वतन, भूभाग, वंश, परिवार, धन दौलत यापैकी कोणतीच वस्तू सत्यधर्मासमोर महत्त्वाची नसते. वास्तविक इस्लामची शिकवणच मुळात अशी आहे की, या संपूर्ण अनैसर्गिक मर्यादा व सीमारेषा अथवा भेदभावांपासून मानवास दूर ठेवावे. खरे पाहता एखाद्या देश किवा प्रदेशाचे सर्वसमंत संविधान लागू करणे किती कठीण कार्य असते. या प्रगत काळामध्येसुद्धा काही राष्ट्रांना संविधान लागू करण्यासाठी कितीतरी वर्षांचा कालावधी लागतो. परंतु ही अतिशय विलक्षण बाब इतिहासात नोंद आहे की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी राजकीय विवेकशीलतेचा उपयोग करून पहिल्याच हिजरी सनामध्ये ‘ज्यू’ लोकांच्या तीन मोठमोठ्या कबिल्यांना आणि अन्सारच्या दोन मोठ्या कबिल्यांना तसेच मुहाजिरीनच्या समूहास एका संवैधानिक समझोत्यावर सहमत केले. ही अत्यंत आश्चर्याची बाब आहे की, अत्यंत विरुद्ध विचारधारा असतानासुद्धा मुस्लिम अल्पसंख्याकांचे नेते प्रेषित मुहम्मद(स) यांनी बिगर मुस्लिम बहुसंख्याक समूदायाकडून असा करारानामा तयार करून घेतला की ज्याचा सार अशाप्रकारे आहे.

  1. मदीनामध्ये जो नवीन समाज प्रेषित गठित करीत होते, त्यासाठी ईश्वराच्या अर्थात शरीयत (इस्लामी विधी) च्या कायद्यास मौलिक स्थान आहे.
  2. राजनीतिक, कायद्यात्मक आणि न्यायिक दृष्टीत अंतिम अधिकार प्रेषित मुहम्मद(स) यांच्या हाती असतील.
  3. प्रतिरक्षणात्मक दृष्टीने मदीना आणि सभोवतालची संपूर्ण वस्ती एक संयुक्त शक्ती बनली असून कोणत्याही घटकासाठी इस्लामद्रोही असलेल्या कुरैशजणांचे समर्थन करण्याचे मार्ग बंद झाले आहेत. त्याबरोबरच प्रतिरक्षणात्मक दृष्टीनेसुद्धा निर्णायक स्थान हे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्यासाठीच निश्चित करण्यात आले आहे.

मदीनाचा हा संवैधानिक करार हा वस्तुतः इस्लामी राज्यस्थापनेचे स्पष्ट दस्तावेज होते.

यावरून अनुमान करता येईल की, निश्चय पक्का असला आणि प्रबळ निर्णयक्षमता असली तर अत्यंत कठीण परिस्थितीमध्येसुद्धा मार्ग खुला होऊन उद्दिष्टांची प्राप्ती होते.

संबंधित लेख

  • सर्व प्रेषित हे मानव होते

    अल्लाहने नेहमीच मानवाच्या मार्गदर्शनासाठी मानवाचीच नियुक्ती केलेली आहे. हे प्रेषित दूत नव्हते की जिन्न (पवित्रयोनि) नव्हते. असेही कधी घडले नाही की या कार्यासाठी अल्लाहने मानवी रूप धारण केले अथवा इतर रूप धारण केले. जेव्हा जेव्हा या भूतलावर प्रेषित पाठविले गेले ते सर्व मानव होते. अल्लाहने कुरआनमध्ये स्पष्ट केले आहे,
  • मुस्लिम पर्सनल लॉशी संबंधित प्रमाणित तथ्ये

    सर्वात पहिली वस्तुस्थिती ही आहे की मुस्लिमांचे कौंटुबिक जीवन आणि दुसर्या व्यक्तिगत बाबीसंबंधी पवित्र कुरआन व हदीस मध्ये उपदेश, मार्गदर्शन आणि आदेश अस्तित्वात आहेत, इतकेच नव्हे तर ते परिपूर्ण व्याख्यानिशी उपलब्ध आहेत म्हणून पवित्र कुरआन आणि हदीस यांची पृष्ठे उलटत जावीत आणि या उपदेश, मार्गदर्शन आणि आदेशांचे व्यवस्थित अध्ययन करित जावे. निकाह(विवाह) महर(नवर्या मुलाकडून नवरी मुलीला दिली जाणारी रक्कम किवा वस्तू), नफका(पत्नी व मुलासाठी अन्नवस्त्र), तलाक(पतीने पत्नीला दिलेला घटस्फोट), खुलअ(पत्नीने पतीला दिलेला घटस्फोट), इद्दत(घटस्फोटा आधीची मुदत), विरासत(वारसा), वसीअत(वारसापत्र, मृत्यूपत्र), इला, नसब, वक्फ, हिबा इत्यादि समस्यांपैकी एकही समस्या अशी नाही ज्यासंबंधी चर्चा केली नाही, आदेश दिले नाहीत, मूल्ये आणि कायदा निश्चित केला नाही.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]