Islam Darshan

आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांचे ‘नबुवत’ (प्रेषित्व) आणि प्रेषित्वाचे प्रमाण

Published : Friday, Feb 05, 2016

हा तो काळ होता जेव्हा या जगातील समस्त मानवजातीकरिता एक प्रेषित अर्थात आदरणीय मुहम्मद (स.) यांना अरबस्थानातील भूमीवर जन्माला घालण्यात आले. त्यांना इस्लामची परिपूर्ण शिकवण व परिपूर्ण विधान देऊन त्याचा प्रसार सर्व जगभरात करण्याच्या सेवा कार्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
जगाच्या भूगोलाकडे पाहा, आपणास हे कळून चुकेल की साऱ्या जगाच्या प्रेषित्वासाठी पृथ्वीवर अरब भूमीपेक्षा अधिक उपयुक्त स्थान दुसरे कोणतेही असू शकत नाही. हा देश आशिया व आफ्रिका खंडापासून अगदी मध्यवर्ती असून युरोपही येथून नजीकच आहे. युरोपातील सुसंस्कृत जाती त्यावेळी विशेष करून युरोपच्या दक्षिण भागात स्थायिक होत्या. अरबस्थानापासून त्या स्थानाचे अंतर अरबस्थान व भारत त्यांच्या दरम्यान असलेल्या अंतराइतकेच आहे.
त्या काळाचा इतिहास वाचा, तुम्हास हे कळून चुकेल की, त्या काळी अरबवंशापेक्षा उचित दुसरा कोणताही वंश व जात प्रेषित्वासाठी योग्य नव्हती. इतर मोठमोठे वंश आपले सामर्थ्य दाखवून क्षीण झाले होते. अरब वंश त्या वेळी ताज्या दमाचे होते. सामाजिक प्रगतीने इतर जातीवंशात वाईट सवयी जडल्या होत्या आणि अरब वंशात अशी कसलीही प्रगत सामाजिक व्यवस्था नव्हती, ज्यामुळे तेथील लोक ऐषआरामात व विलासात मग्न होतील व हीन अभिरुचीचे बनतील. इसवी सन सहाव्या शतकांतील अरब इतर प्रगत जातीवंशाना जडलेल्या अनिष्ट सवयीपासून मुक्त होते. ज्यांना दोषयुक्त सभ्यतेचे वारे लागले नाही अशा माणसांमध्ये आढळणारी मानवी, गुणवैशिष्टे त्यांच्यात उपलब्ध होती. ते शूर व निर्भय होते, दिलदार व औदार्यपूर्ण होते. वचनाचे पालन करणारे व स्वातंत्र्य व स्वतंत्र विचार-प्रिय होते व कोणत्याही जातीवंशाचे ते गुलाम नव्हते. आपल्या अब्रुसाठी

प्राणार्पण करणे त्यांना अगदी सोपे वाटत असे. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. ऐषआराम व विलास याच्याशी ते अपरिचित होते. त्यांच्यात अनेक दोषही होते यात काही संशय नाही, कारण अडीच हजार वर्षांपासून तेथे कोणत्याही प्रेषितांचे आगमन झाले नव्हते.(१) कोणी मार्गदर्शक झाला नव्हता जो त्यांचे चारित्र्य सुधारु शकेल व त्यांना सभ्यता शिकवील. शतकानुशतके वाळवंटात स्वतंत्र व निर्बंध जीवन जगल्यामुळे त्यांच्यात घोर अज्ञान निर्माण झाले होते. आपल्या अज्ञानात ते इतके निर्ढावलेले होते की, त्यांना माणसात आणणे हे कोणाही सामान्य माणसाच्या आवाक्यातील काम नव्हते. परंतु त्याचबरोबरच त्यांच्यात ही पात्रताही खचितच होती की जर एखाद्या महान व्यक्तीने त्यांच्यात सुधारणा घडवून आणली व त्याच्या शिकवणीच्या प्रभावाने ते एखाद्या उच्च ध्येयासाठी उभे ठाकले तर ते संपूर्ण जगावर प्रभावशाली व्हावेत. जगाच्या पाठीवर प्रेषिताच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी अशा तरुण व सामर्थ्यवान वंशाचीच गरज होती.
यानंतर तुम्ही अरबी भाषेकडे जरा दृष्टी टाका. ही भाषा जेव्हा वाचाल व तिच्यात असलेल्या साहित्याचा व ज्ञानाशयाचा जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुम्हास हे समजून येईल की उदात्त व उच्च विचार व्यक्त करण्यासाठी व ईश ज्ञानासंबंधीच्या अत्यंत नाजूक व संवेदनशील सूक्ष्म गोष्टी व्यक्त करण्यासाठी व जनमाणसाच्या मनावर परिणामाचा ठसा उमटविण्यासाठी अरबी भाषेपेक्षा अधिक उचित व योग्य अशी दुसरी कोणतीही भाषा नाही. या भाषेत मोजक्या काही वाक्यांत मोठमोठ्या गहन विषयांचे विवरण होत असते. त्यातही परिणामकारक प्रभाव इतका असतो की, त्यातील विचार मनःपटलावर कोरले जातात. त्यामध्ये अशी काही गोडी असते की, कानात नाद-माधुर्य घोळत असते. त्यातील काव्य असे असते की मनुष्य अगतिकपणे डोलू लागतो. कुरआनसारख्या ग्रंथासाठी अशीच भाषा आवश्यक होती.
तात्पर्य असे की, अल्लाहचे महान चातुर्य या गोष्टीत ओतप्रोत भरलेले आढळते. संबंध विश्वाच्या प्रेषितासाठी (प्रेषित्वासाठी) अल्लाहने अरब भूमीची निवड केली. जे उज्ज्वल व महान व्यक्तिमत्त्व या कार्यासाठी निवडले गेले होते ते किती अपूर्व व अद्वितीय होते ते आता आपण पाहू या.

१) आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यापूर्वी सुमारे अडीच हजार वर्षे अरबस्थानात आदरणीय इब्राहीम (अ.) व आदरणीय इस्माईल (अ.) हे दोन प्रेषित होऊन गेलेले आहेत व या मधल्या प्रदीर्घ कालावधीत एकही प्रेषित अरबस्थानात जन्मलेला नाही.

आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या प्रेषित्वाचे प्रमाण

थोडावेळ आपले डोळे मिटून आपल्या कल्पनाशक्तीच्या भरारीने एक हजार चारशे वर्षापूर्वीचे जग कसे होते ते पाहू या. माणसामाणसातील विचारांची देवाण-घेवाण करण्याची साधने अल्पशी होती, देशादेशांमधील तसेच वंशावंशातील संपर्काची साधने मर्यादित होती, मनुष्याचे ज्ञान अल्प होते, त्याचे विचार संकुचित होते आणि त्याच्या वर भ्रम व रानटीपणाचा फार मोठा प्रभाव होता. अज्ञानरूपी घोर अंधकारात ज्ञान ज्योत धूसर झाली होती व तिचा प्रकाश त्या घनघोर काळोखाला अति प्रयासाने बाजूला सारीत पुढे जात होता. त्या काळी जगात तार नव्हती, टेलिफोन नव्हता, रेडिओ नव्हता, रेल्वे व विमाने नव्हती, मुद्रणालये, प्रकाशनगृहे नव्हती. शाळा व कॉलेज यांचे आधिक्य नव्हते. वर्तमानपत्रे प्रकाशित होत नव्हती, पुस्तकेही जास्त प्रमाणात लिहिली जात नव्हती. तसेच त्यांचे मोठ्या प्रमाणात प्रकाशनही होत नव्हते. त्याकाळात विद्वान समजल्या गेलेल्या माणसांचे ज्ञानसुद्धा काही बाबतीत आधुनिक युगातील सामान्य माणसाच्या ज्ञानापेक्षा कमी होते. त्या काळातील समाजाच्या उच्चस्तरीय माणसांतही आजच्या मजूर वर्गातील माणसापेक्षा शिष्टता कमी होती. त्या काळचा उदारमतवादी माणूस आजच्या अनुदार व्यक्तीपेक्षासुद्धा अनुदार होता.
जे ज्ञान आज सर्वसामान्य आहे त्याकाळी वर्षानुवर्षे परिश्रम करून, संशोधन करून कष्टाने प्राप्त होत असे. आज माहितीचा स्फोट (इनफरमेशन एक्स्प्लोजन) (Information Explosion) घरबसल्या क्षणार्धात उपलब्ध होतो त्यास प्राप्त करण्यासाठी शेकडो, हजारो मैल प्रवास करावा लागत असे आणि त्यात आयुष्य खपविले जात असे. ज्यांना आज आपण अंधविश्वास म्हणतो ते त्याकाळचे ‘सत्य’ होते. ज्यास आज असभ्य समजले जाते, ते त्याकाळचे दैनंदिन कामे होती. ज्या पद्धतींचे मानवी मन आज तिरस्कार करते त्या पद्धती त्याकाळी उच्च कोटीची नैतिकता समजली जात आणि कोणीही असा विचार त्या काळी करू शकत नव्हता की या पद्धतींविरुद्ध दुसरी पद्धत असू शकते. त्याकाळी मनुष्य अति विलक्षण प्रिय होता. तो एखाद्या गोष्टीला तोपर्यंत सत्य, महान व पवित्र मान्य करीत नसे जोपर्यंत ती गोष्ट अप्राकृतिक, अलौकिक, अस्वाभाविक व असाधारण असत नाही. त्याकाळी मनुष्य स्वतःला इतके हीन समजून होता की एखाद्याचे ईश्वरापर्यंत पोच असणे आणि ईश्वरापर्यंत एखाद्याची पोच असणे आणि ईश्वरापर्यंत पोच असलेली व्यक्ती मनुष्य असणे त्याच्या कल्पनेपलीकडे होते.

संबंधित लेख

  • राजकारण धर्मकारणाचा अविभाज्य अंग

    सार्वभौमत्व हा अल्लाहचा मौलिक विशेष गुण आहे आणि तो मनुष्याच्या राजकीय जीवनाचा मूलाधार सूचित करतो की अल्लाहच्या सार्वभौमत्वात कोणी दुसरा भागीदार नाही. हा या सत्याचा दाखला आहे की मनुष्याचे राजकीय जीवन धर्माच्या कक्षेतील आहे. धर्मापासून राजकारणाला वेगळे यामुळेच करणे अशक्य आहे. आपण जर धर्म आणि राजकारण वेगवेगळे ठरविले तर अल्लाहच्या सार्वभौमत्वाला काही अर्थ राहात नाही. दिव्य प्रकटनात राजकीय तत्त्वांचा समावेश आहे, तसेच इस्लामची एक परिपूर्ण राजकीय व्यवस्था आहे. धर्म आणि राजकारणाची फारकत करणे इस्लामविरोधी आहे.
  • इस्लामी कायदा आणि उपासना

    भक्तीचे स्वरुप: धर्म म्हणजे दुसऱ्या शब्दांत अल्लाहची भक्ती करणे आहे. अल्लाहची उपासना (ईबादत) म्हणजेच धर्म होय. भक्तीचे महत्त्व व स्वरुप लोकांना अल्लाहची भक्ती करण्यास सांगणे आहे. आज्ञाधारकता आणि भक्ती उपासनेमुळे मनुष्याचे मन शुध्द आणि उदात्त बनते आणि मनुष्य अल्लाहची प्रसन्नता आणि कृपा प्राप्त करण्यास योग्य बनतो. ही एक साधारण कल्पना आहे धर्माबद्दलची आणि त्याचे आपण खंडन करू शकत नाही. कुरआननुसार हे एक उघड सत्य आहे. प्रत्येक प्रेषिताचे जीवनध्येय हेच होते,
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]